साहित्याचा दर्पणातून, मनाच्या कोपऱ्यातून आणि अनुभवाच्या वालयातून उमटणारी अक्षरे येथे पेरते #प्राचीच्यालेखणीतून
रविवार, ६ मार्च, २०२२
"सोन्यात माखुनही निराशा, कचऱ्यातुन मिळते तिला नवी आशा"
शनिवार, ५ मार्च, २०२२
🏥"वैद्यकीय क्षेत्रातील कर्तबगार: डॉ. शिल्पा तोतला" 🏥
शुक्रवार, ४ मार्च, २०२२
❤️अनाथांच्या आशेचा किरण; "कविताआई"❤️
तिचं जग! या महिलादिन विशेष सदराच्या सुरुवातीला आपण मायेच्या वलयात भ्रमंती करुन आलो. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची व्याप्ती ही पुढील हजारो वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात अजरामर असणार आहे. पण हा इतिहास वाचणं आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणणं हे कोणाच्या अंगवळणी पडत नाही. मग काय, समाजहिताचे ते कार्य इतिसाच्या पानावरच निरंतर आपल्या वाचनातून जिवंत असते. माई निवर्तल्या पण त्यांच्या कार्याचं या वलयला अजूनही सिमा नसणार ये, हा प्रत्यय तुम्हाला आपल्या औरंगाबादमध्ये येईल जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या अतोनात मातृत्वाने भरलेल्या वात्सल्याच्या मुर्तीला भेट द्याल.
आई, हे साम्राज्य डोळ्यांच्या दृष्टीत सामावणारं नाही. ज्यांना ह्या साम्राज्याच्या सुरक्षित पटलाखाली जगण्याची संधी मिळते त्यांना या अमृताची गोडी रोज त्यांच्या आईच्या, कुटूंबाच्या सहवासात प्राप्त होत असते. पण शेवटी जीवनचक्र आहे ते कोणासाठीच समान नसते. दु:ख, यातना,संघर्ष ,आनंद, जिव्हाळा हे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जगण्या अविभाज्य भाग असला तरीही काहींच्या माञ जखमांवर फुंकर घालण्यापलीकडे त्यांचं आयुष्य खडतर असतं. त्यात अजूनही स्ञीजन्म आपल्या समाजात काही प्रमाणात कलंक मानला जातो हे कटु सत्य आहे. अशा निरपराध मुलींचा जन्म झाल्यापासून कचऱ्याच्या डब्यात तर कधी फुटपाथावरुन त्यांचा हा प्रवास सुरू होतो आणि गोंधळलेल्या अवस्थेत तो निष्पाप जी माञ पोटापुरत्या अन्नासाठी भटकत असतो. आपण असं का भटकतोय? हे समजण्यापलीकडची त्यांची बिकट अवस्था असते. पण आयुष्यात जसे दु:ख देणारे असतात तसेच त्याच दु:खावर सुखाचे पांघरुन घालणारे ही जन्माला येतच असतात. तर हेच वात्सल्याचे पांघरुन घालून या निराधार मुलींच्या आयुष्याला उबदार करण्याचे काम औरंगाबादमधील अनाथांची माय 'कविता वाघ' करता आहे. तर जाणुन घेवुयात याच मायेचं तिचं जग!
कोणतेही कार्य हाती घेण्याआधी आपण त्या परिस्थितीतून प्रवास केलेला असतो. असाच अनुभव कविताईंना आपल्या बालपणात आला आणि त्यांच्या हातून निराधार बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कविताईंचे संपुर्ण बालपण हे कन्नड तालुक्यातील मेहगाव येथे ४३-४४ लोकांच्या कुटूंबात गेले. त्यांचे आजोबा हे गावचे पोलीस पाटील असल्याने गावात त्यांचे संबंध सलोख्याचे होते. त्यांच्या आजोंबांकडे गावातील प्रत्येक समस्येचा न्यायनिवाडा होत असतांना कविताताईंवर त्या सगळ्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झाला. त्या अत्यंत बारकाईने आजोबा कशा पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवितात याकडे लक्ष द्यायच्या. आपोआपच त्यांच्यात समाजाप्रतीची आत्मीयता निर्माण झाली व सामाजसेवेची मशाल नकळत त्यावेळेस त्यांनी आपल्या हाती घेतली. शिक्षणातून वाटचाल करत त्यांची जिद्दीने यश गाठले. अचानक विज पडावी तसा त्यांच्या आयुष्यात गडगडाट झाला जेव्हा १९९६ साली त्यांचे वडील किसनराव घुगे यांचे अपघाती निधन झाले. काळा मोठा आला होता;कुटूंब पार खचून गेले. कविताताईंना न पेलवणारं दु:ख झालं कारण बापाचं छञ हरपलं होत. क्षणार्धात ओळख पुसली गेली. ते तालुका प्रमुख असल्याकारणाने कुटूंबासह , गोरगरिबांचा आधारही संपला होता. कविताईंनी परिस्थितीचे गांभिर्य समजून घेतले आणि वडीलांच्या कार्यात झोकून देवून काम करण्याचा दृढ निश्चय केला.
कविताताईंनी सन १९९९ वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जयकिशन शिक्षण संस्थेची' स्थापना केली. समाजात असलेली मुलींबद्दलची विषमता नेहमीच त्यांच्या मनाला खटकत होती. मुलगी ही समस्यांचे मुळ नसून समस्या सक्षमपणे हाताळणारा त्या समस्येचा पहिला आणि शेवटचा उपाय आहे असे त्यांचे ठाम मत आहे. आणि हेच मत प्रवाहात आणण्यासाठीचा त्यांचा पहिला प्रयत्न म्हणजे 'शांती कंप्युटरची' सिडको येथे स्थापना. यातून अनेक गरिब मुलींना या इंन्स्टिट्युट पर्यंत आणून कप्युटरचे शिक्षण देत स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. परिस्थितीला माञ हे मंजूर नव्हते. आर्थिक कारणांमुळे हे इंन्स्टिट्युट जरी बंद करावे लागले असले तरी हा छोटासा स्वल्पविराम होता. या आर्थिक परिस्थितीत त्यांचे पती त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. समाजासाठी चांगले काम करतांना वाईट प्रवृत्तीचा सामना हा करावाच लागतो. पण त्यातून लढण्याची ताकद मिळते आणि याच ताकदीचा वापर करत कविताताईंनी औरंगाबादमधील सातारा परिसर येथे 'भगवानबाबा प्राथमिक शाळेची' सुरुवात केली. परिस्थितीमुळे शिक्षणाची वाट अडलेले विद्यार्थी, निराधार , अपंग विद्यार्थी यांच्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. कोणत्याही समाजकार्यात फळाची अपेक्षा न करत झटत राहणाऱ्या कविताईंच्या कामाची दखल त्यावेळच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली व तुम्ही वसतिगृह का सुरु करत नाही असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडत त्यांच्या कार्याची ही ज्योत ज्वलंत करण्याची संधी त्यांना उपलब्ध करुन दिली. यातूनच २००५ साली त्यांनी कन्नड तालुक्यातील १४ गावांमध्ये सुसज्ज वसतिगृह निर्मिती करत ७०० विद्यार्थ्यांना ममतेचा हात दिला. पण तरीही मुलींचा प्रश्न कायम होता. निराधार मुलींना आधार देणं ही आपली नैतिक जवाबदारी आहे या विचाराने त्यांना कधीच स्वस्त बसू दिलं नाही. सरकार दफ्तरी येरझाऱ्या घालत त्यांनी अखेर २००६-२००७ साली महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार महिला व बालकल्याण अंतर्गत ५० मुलींसाठी 'भगवानबाबा बालिकाश्रमाची' स्थापना केली. आज त्या बालिकाश्रमाला वटवृक्षाचं स्वरुप आलय.तिथं गेलं की तो मुलींचा निरागस आवाज, लहान वयात आलेला समजुतदार पणा पाहून एक आनंद निर्माण होतो सोबतच समाजातील परिस्थिती बघून अश्रूही तरळतात. काही दोष नसतांना या मुलींना निराधार शिक्का लागतो, निसर्गतः मिळालेले अपंगत्व समाजाची बघण्याची दृष्टी बदलवते, अनाथ नसूनही अनाथपण नशिबी येते. पण त्या मुलींना याच वाईट समाजात अभिमानाने जगण्यासाठी कविताताई तयार करतात.
बाहेरच्या जगात त्यांच्या याच मुली आज कर्तृत्व गाजवता आहेत. या मुलींचं संगोपन करणं खरच त्याच्यासाठी अवघड होतं पण एका आईने सगळं निभावलं. सुरुवातीला बालिकाश्रमाला अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावं लागलं कारण ५० मुलींचीच परवानगी होती. पण त्या कायदेशीर बाबींची झळ कधी मुलींना कविताताईंनी लागू दिली नाही. २००८-०९ साली जेव्हा बालगृहाची जाहिरात त्यांनी वाचली तेव्हा आश्रमाची मान्यता मिळवत निराधार मुलांनाही मायेची साद त्यांनी घातली. त्यावेळी भगवानबाबा आश्रमाध्ये मुली, योगेश्वरी बालकाश्रमामध्ये मुले तर गोकूळ व भगवानबाबा बालकाश्रमामध्ये मुले असे एकूण ४०० मुलामुलींचे आश्रयस्थान कविताताई झाल्या. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं म्हणतात. याच म्हणीला खोडत कविताईंनी तिन्ही जगातील मुलामुलींना एकसंध करत वात्सल्याच्या कवेत त्यांना घेतलं. कविता ताईंच्या मुलींचा दिवस हा उठल्यापासून आव्हानं घेवून येतो.अगदी सकाळी ब्रश करण्यापासून ते स्वत:ची तयारी करुन शाळेत जावून येई पर्यंत त्यांची परिक्षा असते. एखादं मुल जेव्हा बालिकाश्रमात आणलं जातं तेव्हा त्याची मनोवस्था खचून गेलेली असते. नेमकं आपल्यासोबत घडतय तरी काय? हे आकलन करण्याइतपतही समज त्या लेकरांना नसते. तेव्हा फक्त गरज असते ती मातृत्वाची. त्या मुलावर झालेल्या मानसिक आघातातून त्याला बाहेर काढत आश्रमात एकरुप होण्यात मदत करणं खरच सोप्प नसतं. पण माया लावली की वासरुही एक दिवस हंबरडा फोडत अश्रुंतून दु:खाला वाट मोकळी करुन देतेच.
या आश्रमाचा कविताताईंच्या अथक परिश्रमातून खुप विस्तार झाला आहे. त्यांच्या कार्याला सामाजिक संस्था,अनेक कुटूंब , महाराष्ट्र शासन सदैव हातभार लावत असतात. कोरोना काळातील परिस्थितीतही कविताईंच्या या संस्थेला अनेक समाथिक संस्थांनी मदतीचा हात दिला. कविताताईंचा काळजी होती माञ मनात ठाम विश्वास होता की या संकटाला फाटकाच्या आत प्रवेश करू द्यायचा नाही आणि तसैच झाले. सर्वतोपरी काळजी घेत त्यांनी आपल्या लेकरांच रक्षण केलं. कविताताई आपल्या मुलींना उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांना यश म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच पडत असते. आज या आश्रमातील कविताताईंच्या लेकी स्वबळावर इंजिनिअर, डॉक्टर, फार्माशिस्ट अशा अनेक क्षेञात बालिकाश्रमाचं नाव मोठं करता आहेत. मुलांमधील गुण ओळखून त्याच्या छंदाचं रुपातंर हे उपजीविकेत कसं करता येईल याचं योग्य मार्गदर्शन हे कविताताई आपल्या लेकरांना करत असतात. याच मुलींसाठी योग्य जोडीदार बघून त्या त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळवून देतात. यापेक्षा मोठं काय असू शकतं या मुलींसाठी. कविताताईंचा समाजकार्याचा हा आलेख खरच आकलनापलीकडच्या पातळीवर आहे. त्यांनी त्यांच्या मुलींना सर्व परिस्थितीशी तोंड देण्यासाठी सक्षम केलेले आहे. पण तरीही का बरं समाजात मुलगी जन्माला अजून विरोध आहे? का आपल्या आईवडीलांना मुलं वृध्दश्रमात पाठवतात? एवढी लोकसंख्या असतांना ही निष्पाप लेकरं निराधार का? तर या परिस्थितीवर भाष्य करतांना कविताताई सत्यपरिस्थितीची जाणीव करुन देतात. मुलगी जन्माला येणं म्हटलं की आईवडीलांच्या जीवाला अगदी घोर लागतो तिची सुरक्षा, तिच्या लग्नाचा खर्च, गरिब परिस्थिती असून तिच्या कल्याणासाठी अव्वाच्या सव्वा हुंडा या विचारानेच ते खचून जातात. ग्रामीण भागात तर सध्या वातावरण एवढं खराब आहे की आईवडील शेतात जातात पण मन माञ मुलीमध्ये अडकलेलं असतं की ती एकटी घरी सुखरूप असेल ना? मग यावर उपाय काय तर मुलगीच नको; यामुळे समाजात विषमता पसरते. जर हुंडाबळीसारखी गुन्हा असूनही ही प्रथा अजून चालू असेल तर कोणत्या बापाला आपल्या मुलीची काळजी वाटणार नाही. जर या जगात तिला मुक्त फिरता येत नसेल तर कोणता बाप बेचैन होणार नाही. हुंडा देणं आणि घेणं या गुन्ह्याला जेव्हा सरकार दरबारी कडक शिक्षेतून आळा बसेल तेव्हा माञ कोणत्याच बापाला आपली लेक ही भार वाटणार नाही. उलट एक मुलगी ही एका मुलांपेक्षा आईवडीलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. ज्या मुलीला नाकारलं जातं तिच बापाच्या काळजाचा तुकडा असते. पण या समाजातील हुडाबळीसारख्या कुप्रथांमुळे बापलेकीचं नात्यात दुरावा ही गोष्ट आली.
आपण ज्या घरात वाढतो त्या घरात होणाऱ्या संस्कारातून आपण घडत असतो. आपण कधी विचारच केला नाही की , एखादा मुलगा आपल्या पालकांना वृध्दाश्रमात नेवून सोडत असेल तर आपण त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की, काय हा मुलगा आईवडील सांभाळत नाही. पण तो असंं का वागत असावा ही मनस्थिती आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला का?त्याच्यावरती आधी तसे संस्कार रुजवले गेलेले नक्कीच असू शकतात.पण त्याच्यावर संस्कार होतांना कुटूंबातलं वातावरण जर त्याला तसं मिळालं असतं तर कदाचित त्याने ते पाऊल उचललं नसतं. यासाठी भांडवल, पैसा लागत नाही तर आपण करणाऱ्या कामातून मिळणारं समाधान महत्वाचं असतं. मनाची श्रीमंती आणि आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी समाजाला देणं यापेक्षा दुसरं सुख नाही. मी, माझं यापलिकडे जावून विचार करण्याची शक्ती जर मुलांमध्ये निर्माण केली तसेच आपण समाजाचं देणं लागतो हे संस्कार जर आपल्या मुलांवर केले तर नक्कीच कोणत्याच आईवडीलांना वृध्दाश्रमाची पायरी चढावी नाही लागणार. कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. समाजातील परिस्थितीत खोलवर शिरून या गोष्टी का घडत असाव्यात हे शोधून काढले तर नक्कीच समाजात परिवर्तन घडवून आणायला वेळ नाही लागणार. कविताताईंची समाजाप्रती असणारी ही जाण खरच विचार करायला भाग पाडणारी आहे. महिला व मुलींनी आपल्यात अंतर्भुत असणारी शक्ती ओळखली पाहिजे. तिच्यातील उर्जेचा योग्य प्रकारे वापर करुन ती नक्कीच स्वतः च्या पायावर भक्कम पणे उभी रहात आपल्या कुटूंबालाही साथ देवू शकतेच आणि हे फक्त स्ञीच करु शकते. तर उठा, दुसऱ्यांसाठी जगता जगता एकदिवस आतमधल्या स्वत:च्या प्रतिमेला भेटा तुम्हाला नक्कीच तुमचं जग सापडेल. कविताताईंचा हा संदेश अगदी मोलाचा आहे. कविताताईंनी काम करतांना कधी स्वत:चा विचार केला नाही. सतत त्यांच्या मुलींसाठी त्या झटत असतात. एवढेच नाही तर २०१२ पासून त्या सातारा येथील पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा समितीत कार्यरत आहेत. यातून त्या समाजातील महिलांच्या प्रश्नाची सोडवणूक करत त्यांचे समुपदेशन करतात. त्यांचे आयुष्य सत्कारणी लावण्यात त्यांना मदत करतात. त्यांचे कार्य हे कोणत्याच चौकटीत बसणारं नाही एवढं ते विलोभनीय आहे. कविताताईंच्या नावातील कविता ही त्यांचा प्रवास शब्दबध्द करतांना अडखळेल एवढा तो शब्दांपलिकडचा प्रवास अतुट आहे..
कविताताई आणि त्यांच्या बालिकांचं नातं म्हणजे...
पदर तुझा पदरातुन माये काय कसा उलगडला
वात्सल्याचा अनेक क्षणांनी तुझ्यामुळे बहरला...
जगण्या माझ्या अर्थ दिला, तु नावाला भावार्थ दिला तु
घडणाऱ्या अनाथ जीवाला मायेचा सार्थ दिला...
आयुष्याच्या या कवितेला तुच कवि अन् सुर दिला तु....
कविता वाघ ह्या हजारोंच्या मॉं साहेबांना शतश: नमन! महिला, मातृत्व आणि मातृत्वातून निर्माण केलेलं तुमचं मातृत्वाचं प्रांगण हे सदैव खुललेलं असावं .भगवान बाबा बालिकाश्रमातील प्रत्येक मुलीचा झोका उंचच उंच झुलावा अगदी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या त्या कवितेतील आशेच्या किरणासारखाच...!
आई...!
आशेचा किरण तुझ्याही मनात असू देत| तु किती हिंमतवाण आहेस हे जगालाही कळू दे|अनेक रंगांनी तुझे जीवन रंगून जावू दे| आणि तु खुप मोठी होतांना मला पाहू दे|
कविताताई बालिकाश्रमातील लेकरांची प्राणप्रिय आई, तुमच्या कार्याला सलाम. महिलादिनाच्या या आईला लाख लाख शुभेच्छा....!
🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
गुरुवार, ३ मार्च, २०२२
🇮🇳🇮🇳🇮🇳वर्दीच्या सोबतची ती🇮🇳🇮🇳🇮🇳
मंगळवार, १ मार्च, २०२२
"शिक्षणातून माणुसकी घडवणाऱ्याआदर्श शिक्षिका; सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी"
सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ
"अनाथांची माय सिंधुताई सपकाळ"
💗"तिचं जग"💗
एक स्ञी आपल्या आयुष्यात किती त्याग करते याचा थांग लागणे खरच शक्य नाही. तिचं मातृत्व आणि कर्तृत्व हे या जीवसृष्टीतील चराचरात अजरामर आहे.याच स्ञी कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महिला दिन विशेष आठवडा साजरा करायचं ठरवलय "तिचं जग" या खास ब्लॉगच्या माध्यमातून. आज पासून रोज ऐका नवीन क्षेञातल्या रणरागिणीचा प्रवास मी तुमच्या समोर मांडणार आहे ; जी खरच कौतुकास पाञ आहे.तिच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा आढावा नक्कीच आपल्यातील स्ञियांना स्वकर्तृत्व गाजवण्याची उभारी देईल. आज १ मार्च! पहिला ब्लॉग अखंड भारताची जननी अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला समर्पित. ज्या मायेच्या वलयात आपण अंतर्मुख होतो ते वलय आहे भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात...
अनाथांची माय, गरिबांच्या दुधावरची जाळीदारसाय साय!
दि.४ जानेवारी २०२२ सकाळपासूनच भयाण वाटत होतं. काहीतरी होणार आहे याची चाहुल लागलेली पण मनात एक आशा जी शेवटपर्यंत आस जागवून होती. अचानक ८ वाजुन १० मिनिटांनी टिव्ही लावताच काही क्षण सगळं सुन्न झालं. गॅलॅक्सी रुग्णालयातून बातमी वाऱ्यासारखी परसली. अनाथांची माय निवर्तली. जन्मापासून सुरु असलेला एकपाञी संघर्ष अनेक पाञांना आधार देवून शेवटाकडे वळाला. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने अख्खं विश्वच पोरकं झालं असलं तरी त्यांचा प्रवास हा त्या विश्वाला परत नव्याने संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद देईल एवढा तो कणखर कणा होता.
दि.१४ नोव्हेंबर १९४८. वर्धा जिल्ह्यातील ,पिंप्री मेघे आणि गावातील ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी आईवडीलांना नकुशी असणारी एक मुलगी जन्माला आली. म्हणून तिचं नाव चिंधी ठेवलं. पण पुढे जावून ह्याच चिंधीच्या ठिगळाने कित्येकाच्या आयुष्याची गोधडी उबदार होणार आहे याची कल्पना त्यावेळेला त्यांच्या आईवडीलांना नव्हती. जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा संघर्ष वयाच्या ९ व्या वर्षीपासून आणखीनच कठीण झाला जेव्हा २६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याची त्यांचा विवाह झाला. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि उमलत्या वयात लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता पुर्ण झाल्यानंतर शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगावात गेल्या. भातुकलीच्या वयात सिंधुताईंवर खऱ्या संसाराची जवाबदारी पडली. घरी प्रचंड सासुरवास होता .कुटूंबात शैक्षणिक वातावरण नाही. माईंना माञ शिक्षणाची आवड. जंगलात लाकुडफाटा शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणून उंदराच्या बिळात लपवून ठेवत. क्वचितच घरी एकट्या असल्या की त्या अभ्यास हा करायच्या. हे लग्न फार काळ टिकले नाही. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. माञ चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्याच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी असणाऱ्या गुरांचेशेण काढता काढता बायांचे पार कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या माञ त्याचा काहीही मोबदला मिळत नसे. या शेणाचा लिलाव वनखात्यातील अधिकारी करायचे. इथेच सिंधुताईंनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारला आणि याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक लढा सुुुरू झाला. याच लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली.
हा लढा त्या जिंकल्या पण त्याची माञ त्यांना जबर किंमत चुकवावी लागली. एका बाईने दाखवलेल्या धैर्याने गावातील दमडाजी असतकर दुखावला गेला आणि सिधुंताईच्या पोटातील मुल आपले आहे असा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चारिञ्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पुर्ण दिवस भरलेल्या गर्भवती माईंना त्याने बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. तशाच बिकट अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले आणि तिथेच त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने टाकून दिलेली बाई म्हणजे आपल्या समाजाच्या मार्गात अडसरच ना! अशा अस्पृश्य विचारसरणीच्या गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिले. सासरमधून बाहेर पडलेल्या माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही आणि त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्थानकावर त्या चतकोर भाकरी साठी, एखाद्या उष्ठ्या फळासाठी पोटाची खळगी भरावी म्हणुन भिक मागत हिंडायच्या. या सगळ्या ञासाला कंटाळुन एक दिवस त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ;पण तान्हुल्या लेकीकडे पाहून परत मागे फिरल्या. दिवसभर त्या भीक मागायच्या आणि राञी स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधीच एकटे खाल्ले नाही.सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि सगळे भिकारी एकञ मिळून जेवणाचा आनंद घेत असत. याच भिकाऱ्यांनी २१ वर्षाच्या सिंधुताईला संरक्षण दिले. दोन दिवस माञ काहीच मिळाले नाही तेव्हा माञ त्यांच्या लक्षात आले तिथे कायम राहता येणार नाही. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी थेट स्मशान गाठले. जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजत त्यांनी त्या चितेलाही पविञ्याची शाल पांघरली. समोर आलेल्या धकधकत्या संकटांच्या छाताडावर बसून त्यांनी वाट रोखली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं.
आपल्या मुलीवर आलेली वेळ कोणावर येवू नये या विचारात आपल्या तान्हुल्या लेकीची आई हजारोंची माई बनली. अनाथ मुलांना सांभाळुन त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील 'कुंभारवळण' या गावात "ममता बालसदनची" स्थापना केली आणि त्या अनाथ आणि बेवारस मुलांच्या आयुष्याचा साचा बनल्या. या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. एवढ्यावरच थांबतील त्या माई कसल्या. आर्थिक दृष्ट्या स्वयंपुर्ण झाल्यावर या युवक युवतींचे योग्य जोडीदार बघून माईंनी स्वतः कन्यादान केलं. आपली कन्या ममता हिला दगडुशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्या इथवरच थांबल्या नाहीत तर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी संकलन करण्यासाठी त्यांनी "मदर ग्लोबल फाऊंडेशनची" स्थापना केली. यातून अनेक परदेश दौरे करत त्यांनी आपल्या काव्यातून आणि बोलण्यातून समाजप्रबोधन केले. त्याच्या कार्याचा उत्तुग असा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात जावून समाजमनावर बिंबवला गेला तो त्यांच्या "मी सिंधुताई सपकाळ" या त्यांच्या जीवनपटातून! तसेच "अनाथांची यशोदा" या नावाचा २०१४ साली प्रदर्शित झालेला अनुबोधपटही त्यांच्या जीवनाचा ठाव घेण्यास उद्युक्त करतो. त्याच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण जेव्हा २०२१ साली महाराष्ट्राच्या लाडक्या माईंना "पद्मश्री सिंधुताई सपकाळ" असे भारदस्त नाव मिळाले तेव्हा माञ मनामनांत माईंचा अभिमान वाटावा असा क्षण सगळ्या जनमानसाने अनुभवला. आजही माईंचे जुने भाषण काढुन ऐकायला घेतले तरी अंगावर शहारा येतो. मनात समाजसेवेची मशाल पेटते आणि समाजकार्यासाठी प्रेरणा मिळते.
आज ही संघर्षाची मशाल थंडावली. माञ तिचा प्रकाश हा सदैव या आयुष्याच्या खुल्या रंगमंचावर आपल्याला वाट दाखवत पडत राहणार आहे. माईंच्या जीवनाची सुरुवात ही नकुशी या शब्दाने झाली, चिंधी या नावाने झाली. नंतर त्यानी अग्निदिव्यातून जात संघर्ष करत केवळ स्वत:चच नाही तर हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. आपलं आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालते पण तिचं आयुष्य माञ निराधारांच्या वेळापञकावर चालले. याच अनाथांच्या यशोदेचं असं अचानक सोडून जाणं असह्य असलं तरी...
माई म्हणजे अथांग असा कधीही न आटणारा असा मायेचा समुद्र आहे...
वरुन जरी शांत दिसत असला तरी आत अख्या जगाचं चक्र चालवणारा समाजकार्याने झपाटलेला अनाथांचा आधार आहे...
माई म्हणजे कधीही थांग न लागणारा अथांग असा सागर आहे अथांग असा सागर आहे...
माई आहेत आणि असणार आहे त्यांनी घडवलेल्या अनाथांच्या संस्कारात...
माई आहेत आणि असणार आहेत त्यांनी रोवलेल्या समाजसेवेच्या बीजारोपणात...
माई आहेत आणि असणार आहेत प्रत्येक भारतीयांच्या कणा कणात आणि मनामनात...
माईंच्या या संघर्षमय वाटचालीला सलाम..!आपण त्यांच्या इतका मोठा पदर तर नाही मारू शकत कारण माय ती मायच असते' परंतु आपणा ज्यांना शक्य असेल त्यांनी एका अनाथास दत्तक घेतले अथवा त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली तर ती नक्कीच ताईंना खरी श्रद्धांजली असेल! स्ञी जीवनाचा आदर्श आधारस्तंभ म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्या आज नाहीत पण त्यांचे कार्य माञ यापुढील अनेक पिढ्यांना घडवणार आहेत.!
🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
मराठी भाषा गौरव दिन..,
......गोष्ट मराठी भाषेची......मुहूर्त २७ फेब्रुवारीचा! 'विष्णू वामन शिरवाडकर'अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती.नाटककार,लेखक,कविवर्य अशा थोर व्यक्तीचिञातून मराठी भाषेला विविधता प्राप्त करून देत मातीतून मनात रुजवणारे आपले लाडके कुसुमाग्रज.त्याच्या स्मरणार्थ २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.आपली मराठी भाषा ,मराठी साहित्य हे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. संतांनी निर्माण केलेल्या विपुल साहित्याची देणगी म्हणजे आपली माय मराठी...आणि याच आपल्या अभिजात मराठीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणिअसायलाच हवा.आपली मराठी भाषा जपायची असेल तर ती आपण ऐकलीच पाहिजे,वाचलीच पाहिजे,बोललीच पाहिजे आणि क्षणाक्षणाला आचरणात आणलीच पाहिजे आणि ती वाढती ठेवली पाहिजे.आपल्या मातृभाषेतून आपण व्यक्त व्हायलाच हवं ....अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा आणि त्याच माझ्या मायबोलीत मी आज माझ्याच मराठीला काव्यबध्द करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे... सादर करते... एक मराठीमय कविता...मी मराठीगर्व मराठी, सुर मराठीराजभाषा मराठीरुपारुपांतून बहरत जाते,मायबोली मराठीइतिहासाच्या पटलावरची श्रेष्ठ भाषा मराठीआचरणातून समृध्द व्हावी मायबोली मराठीएकच नारा मराठीबाणा हेच स्वप्न उराशी!मृदेतून जन्मणारी मृदू भाषा मराठीसंतंमहतांच्या वाणीतूनी गर्जणारी मराठीधगधगत्या लाटेतून आली माय माझी मराठीआचरणातून आता रुजावी महाराष्ट्रात मराठी!गर्व असा मी मराठीचा,अभिमान असावा मी मराठीचादारावरच्या पाटीवरही माज दिसावा मी मराठीचाभाषेतून भाषा उसळत जावी ,हा असावा ध्यास मी मराठीचा!दर्जा अभिजाततेचा उसळावा सळसळत्या रक्तापरीआचरणातून समृध्दीचा मार्ग सापडावा मी मराठी...जेव्हा आचारणातून दिसेल आपली अभिजात मराठीतेव्हाच आर्त साद जाईल तनमन धनातून मी मराठी मी मराठी मी मराठी...!बघतोयस का माझ्या मराठीची पुण्याई..अभिजात दर्जा नसुनही गुंजतेय ती मरीठीची शहनाई!गोफ मराठीचा गुफंतानामराठी साहित्याला स्मरतांनाआवाज निघतो उरातूनमाझ्या माय मराठीला मिळावाअभिजात दर्जा मनातुनआणि अखंड महाराष्ट्रीयन जनतेच्या आचरणातून .....माझ्या माय मराठीला मिळावाअभिजात दर्जा मनातून आणि अखंड महाराष्ट्रीयन जनतेच्या आचरणातून..! 🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२
राजं🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२
औरंगाबादचा सोनेरी नजराणा.....
🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...
-
पुरुष सत्ताक समाज??? लेखाची सुरुवात कशी करु मला काही उमजेना, काट्याकुट्यातल्या पुरुषाला जाणणं मला काही ...
-
हरे व्यंकटेशा किती चालविशी, तुझे पाय पद्म कधी दाखविशी| तुझ्या भेटीची आस मोठी जिवाला, कधी भेटशी व्यंकटेशा दयाळा|| लक्ष्मी रमन ...
-
❤️👑❤️ बाबा ❤️👑❤️ बाबा जगण्याच्या वर्तुळातला एक अव्यक्त कोपरा! बाबा लिहायला घेतला तरी पेन जड होतो असं वलय. बाबा क...