रविवार, ६ मार्च, २०२२

"सोन्यात माखुनही निराशा, कचऱ्यातुन मिळते तिला नवी आशा"

                        💗"तिचं जग"💗
आपल्या संस्कृतीची एक खुप वाईट सवय आहे. ती म्हणजे भेदाभेद. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, धर्मभेद हे जणु या पारतंञ्यात जखडून बसलेल्या संस्कृतीचे चार स्तंभच आहेत. जे उखडायचे प्रयत्न करणारेच दलदलीसारखे त्यात फसत जातात. कितीही जनजागृती झाली ,कळत असलं तरी वळवून घ्यायचं नसतं ही जणु गोचिडासारखी माणसाला चिकटलेली घाणेरडी सवय आहे. हे चार‌ भेद तर अभेद्यासारखे समाज पोखरायला उभे आहेतच. माञ त्यात‌ कमी की काय मानवनिर्मित कमीपणाचा भेदही त्याचबरोबरीने आता उभा रहात आहे. उच्चशिक्षित तरुण मोठ्या कंपनीत‌ नोकरी करतात तर ते साहेब उच्चवर्णीय, छोट्यामोठ्या कंपनीत‌ काम करणारे ते मध्यमवर्गीय आणि मग काय जे मोलमजुरी, कचराडेपोत ,भांडे घासून आपला उदरनिर्वाह करतात ते काय तर मग या मानवनिर्मित वर्णाचा भागच नाही. जे लोक फुटपाथावर काम करतात, कचरा वेचतात‌ त्यांना आपला समाज कमी लेखतो. 

पण काळ बदलतो; तो कोणासाठीच थांबत‌ नाही हे वाक्य माञ ते हा भेद निर्माण करतांना विसरलेच असणार यात दुमत नाही. आणि परिस्थिती बदलवणारा तो काळ होता कोरोना काळ. या काळात खऱ्या अर्थाने कोण या जगात सर्वश्रेष्ठ याची जाणीव करुन दिली. ज्या सफाई कामगारांना , कचरावेचक महिलांना आजपर्यंत कमी लेखण्यात येत आलं त्याच महिला अत्यावश्यक सेवा देत कोरोनायोध्दा झाल्या. कचरावेचक महिला याचं जीवन कसं असतं याचा साधा विचारदेखील आपल्या मनात कधीच‌ येत नाही. आपण तर आपल्या सेट आयुष्यात सुखी असतो माञ त्या अत्यंत कमी पैशात कचरावेचून आपलं आयुष्य जगत असतात. यात अनेक संघर्ष अगदी रोज उठल्यापासून त्यांची वाट बघत असतात. माञ दिवसाच्या शेवटी त्या समाधानी असतात. कसं बरं या आपल्या आयुष्यात संघर्ष असला तरीही समाधानी असतात? तर बघूयात आज कचरावेचक महिलेचं तिचं जग..!

खरतर या कचरावेचक आजी. दिवसभर औरंगाबाद येथील एका संस्थेद्वारे उभारण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रात कचरा वेचत आपला दिवस सत्कारणी लावतात. त्या आजींचे नाव तान्हाबाई अवचरमल. शिक्षण जेमतेम पहिली- दुसरी. घरी अत्यंत गरिब परिस्थिती असल्याकारणाने शिक्षण सोडून ‌बालवयात मोलमजूरी आजी करत असे. अल्पवयातच तान्हाबाईंचं लग्न झालं. सासरकडची परिस्थितीही बेताचीच. तेव्हा पाटलाच्या घरी त्यांचा दादला(पती) मजूरीला जात असे. दिवसभर राब राब राबून त्याकाळी वर्षाचे दोनशेच रुपये त्यांना मिळत असत. रोज मिळणाऱ्या मनभर दाण्यातून पोटाची खळगी भरणं खरच अवघड कारण त्याकाळी एकञ कुटूंबपध्दती असे. वरुन मागासलेला समाज म्हणत पाटलांचा रोष ओढवून घेणं ते वेगळच. आजी माञ स्वाभिमानी. त्यांनी त्यांच्या घरच्यांना ते काम सोडायला लावले. लोकांची गुलामगिरी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने कमावून खाऊ असं म्हणत‌ आजीने बाडबिस्तार गुंडाळत आपल्या पती व चुलत्यांसह रेल्वेने मुंबई गाठली. त्याकाळी रेल्वेला दहा रुपये तिकीट होतं. मुंबई, पुणे, रायगड अशा जिल्ह्यांमध्ये मोलमजुरी करत आजींनी आपल्या पतीला साथ दिली. तरुण रक्त असल्यामुळे त्या काळी आजीमध्ये ताकद होती. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी कुठं विटा उचल‌, कुठं सिमेंटचे टोपले उचल असे अनेक कामं केली. पण काळानुसार शरीरातील ताकद कमी झाली माञ गरिबीची झळ काही थांबली नाही. 

घरी शांत बसण्याची तान्हाआजींना सवय नसल्यामुळे त्यांना जेव्हा कचरा वर्गीकरण संस्थेच्या कचरावेचक कामाबद्दल कळालं तेव्हापासून त्या गोणी हातात‌ घेवून कचरावेचक महिला म्हणून काम करत‌ आहेत. संपुर्ण शहरातून येथे सुका कचरा आणला जातो. त्याचे वर्गीकरण करतांना व्यवस्थितरित्या त्यातील विक्रीयोग्य घटक बाजूला काढत संध्याकाळच्या सुमारास इथे असणाऱ्या सफाई साथींनी निवडलेल्या कचऱ्याचे धरमकाट्यावर मोजमाप केले जाते व‌ त्यानुसार‌ त्यांना दिवसाची मजुरी म्हणजेच त्यांच्या कष्टाचे पैसे दिले‌ जातात. हे पैसे दर रोजच्या मजूरीची नोंद करत आठवड्याच्या शेवटी त्यांना दिले जातात. त्यावर त्यांची उपजिविका भागते. तान्हा आजी म्हातारपणी काम करत आठवड्याला २- ३ हजार‌‌ कमवत कुटूंबाला हातभार‌ लावतात. त्यांची मुलगी, सुन आणि नात याही सफाईसाथी आहेत. त्यांची नात‌ ही अत्यंत हुशार आहे असं आजी आवर्जून सांगतात. कचरावेचक बनून काम करत‌ ती तिचा अभ्यास करत शिक्षण घेत आहेत. याचा आजींना अभिमान वाटतो. माझे दोन्ही मुलं शिकले नाहीत एक दारुही पितो माञ माझ्या नातींना जेवढं शिकायचं आहे तेवढं मी शिकू देणार असं आजी छातीठोक पणे सांगतात. 'जग आकाशात उडतं आपण निदान आपल्या मुलींना जमीन चालत यश गाठण्याची संधी तर देवूच शकतो ना!' हे अलौकिक उदगार त्या कचरावेचक आजींच्या तोंडून एकणं खरच त्यांना शिक्षणाचे कळालेले महत्व अधोरेखित करते.

कोरोनाकाळात जेव्हा काही दिवस त्यांना घरी रहावं लागलं तेव्हा त्यांच्या कचरा वर्गीकरण संस्थेनी घरपोच किराणा पोहोचवत त्यांची कशी काळजी घेतली या सगळ्या गोष्टी आजींच्या तोंडून ऐकतांना मन अगदी भारावून गेलं. कोरोना काळातही अत्यावश्यक सेवा देत तान्हा आजींनी जीवाची परवा न करता काम केले. खरच तान्हा आजी आणि त्याच्यासोबतच्या सगळ्या कचरावेचक महिला, सफाईसाथी म्हणजे देशाच्या खऱ्या योध्दा आहेत. सीमेवर जावून बंदूक घेऊन लढत नाही माञ कचऱ्यातून पसरणाऱ्या रोगराईला थांबवणाऱ्या सफाईसाथी आहेत. कोणालातरी ते काम करावंच लागणार‌ मग आजींनी केलं आणि त्यांच्यासारख्याच गरज असणाऱ्या अनेक महिलांनी केलं‌ तर काय‌ बिघडलं. आपण घरातला कचरा साफ करुन बाहेर‌ टाकतो; त्या‌ तोच कचरा उचलून‌ त्याचे योग्य वर्गीकरण करत देश स्वच्छ ठेवण्यात योगदान देतात. त्यातूनच मिळणाऱ्या चार पैशातून‌ आपली पोटाची खळगी भरतात. खरच घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करता- करता जर समाजातील वाईट विचारांच्या कचऱ्याचे, लोकांच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या उच्चनिच्चतेच्या कचऱ्याचे जर वर्गीकरण करता आले असते तर खरच त्या कचऱ्याची पार विल्हेवाट लावली असती. निदान देशाची या वाईट गोष्टींच्या कचऱ्यातून मुक्तता तरी झाली असती. 

कचरावेचक महिला या देशाचा अभिमान आहे. त्यांच्या कार्याला खरच सलाम! तान्हा आजींबद्दलचा तो संवाद खरच आजी-नातीचा संवाद झाला. त्या भरभरुन बोलल्या आम्ही फक्त ऐकत होतो. या वयातही दांडग्या उत्साहात त्या सफाईसाथी बनून काम करतात. तान्हा आजींना उंदड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महिला दिनाचा कचरावेचक तान्हाआजीसह सर्व सफाओ साथींना सलाम!

     ‌‌‌‌                       🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

 

९ टिप्पण्या:

  1. उत्तम लेखनशैली,प्रभावी शीर्षक 👍

    उत्तर द्याहटवा

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...