रविवार, ६ मार्च, २०२२

💗 कुजबूज नाही तर स्वच्छंदी ती💗

                         💗"तिचं जग"💗

आज कोणतेही आढेवेढे न घालता थेट विषयाला हात घालते. कारण जो समाज काही गोष्टींची सार्वजनिकरित्या वाच्यता करण्याला बंदी घालतो त्याच समाजाच्या अज्ञानामुळे आज महिलांवरील लैंगिक अत्याचार तर वाढतातच आहेत माञ लैंगिक शिक्षणाची समाजात असणारी अज्ञानता यामुळे महिलापुरुषांना समसमान पातळीवर समस्यांना सामोरं जावं लागतं. मग विषय इथेच येवून अडतो‌ की बोलणार कोण? या गोष्टी काय‌ चारचौघात बोलण्याचा विषय आहे का? याच सगळ्या प्रश्नांवरील उत्तर म्हणजे आपल्या औरंगाबादच्या स्ञीरोगतज्ञ डॉ. रश्मी बोरीकर. या जगात प्रत्येक शारीरिक व्याधीचं निराकरण करण्याची क्षमता ही वैद्यकीय क्षेञात आहे. सहज कोणालातरी विचारलं की वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची नावं सांगा. अगदी सहज सांगून टाकतो न आपण. पण जेव्हा लैंगिक समस्येवर अनुबोधन करणारा डॉक्टर जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा माञ जीभ अडखळते. आज माञ बदल घडलाय तो शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत आणि ग्रामीण भागापासून ते आदिवासी पाड्यापर्यंत. आणि हा बदल‌ घडवून आणण्यामागे असणारे मजबूत हात म्हणजे डॉ. रश्मी बोरीकर. कुजबूज न करता स्वच्छंदीपणे शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांवर मोकळेपणाने त्या समाजात भाष्य करतात. त्यांचा या क्षेञापर्यंतचा प्रवास खरतर खुप गमतीदार आहे .सोबतच अगदी खुला आहे‌ या बंदिस्त क्षेञापेक्षा. बघूयात तिचा प्रवास 'तिचं जग' मधून...!

रश्मी बोरीकर यांचा जन्म नागपूरचा आहे कारण त्यांच्या आईचं माहेर हे नागपूरचं. त्यानंतरचं संपुर्ण बालपण हे त्यांचं औरंगाबादमध्ये गेलं. त्यापुढील शिक्षण हे सगळं औरंगाबादमध्येच झालं. इयत्ता १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण त्यांनी शारदा मंदिर मुलींच्या शाळेत घेतलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाची निवड केली व त्यापुढील वाटचालीसाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादमध्ये आपले MBBS चे शिक्षण पुर्ण केले. त्यांचे‌ वडील हे सरस्वती भुवन महाविद्यालयात अर्थशास्ञाचे प्राध्यापक होते तर आई ही सरस्वती भुवन मुलांच्या शाळेतून उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचे आजोबा श्रीनिवासराव सखारामपंत बोरीकर हे हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे अग्रणी नेते होते. तसेच त्यांचे वडील आणि आत्या यांनीही वयाचे १० ते१६ या वयोगटात‌ असतांना हैद्राबाद मुक्तीसंग्रामामध्ये तरुण पिढी म्हणुन काम करत आपले शौर्य गाजवले. घरामध्येच स्वातंञ्यसंग्रामात काम केल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना घरातुनच आजोबा आणि समाजसेवेचे बाळकडू मिळाले. आजोबांनी आठवण काढतांना बोरीकर‌ मॅडम सांगतात की, त्यांच्या आजोबाचं वत्कृत्व फार छान होतं. त्याच्या बोलण्याची शैली त्या काळात फार‌ प्रसिद्ध होती. त्यामुळे त्यांच्यातील ते अंगभुत गुण आपोआपच बोरीकर मॅडममध्ये उतरले. त्यामुळे शाळेपासूनच वेगवेगळ्या वत्कृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि मग ओघानेच बक्षिसं. असं सगळं बालपण त्यांच औरंगाबादमध्ये व्यतीत झालेलं आहे.

खरतर बोरीकर मॅडमला स्वत: ला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्यांना कला क्षेत्रात आपलं करिअर करायचं होतं किंवा सायन्सला असतांना फिजिक्सबाबत निर्माण झालेली आवड यामुळे त्यातच काहीतरी संशोधनात्मक करावे असा त्यांचा मानस होता. पण त्या काळात वडीलांचा विचार असा होता की मुलींनी मुलींसाठी वैद्यकीय क्षेञ निवडणं अतिशय  चांगलं आहे. ओघाओघाने गुणही चांगले प्राप्त होत गेले आणि वैद्यकीय प्रवेश निश्चित झाला. प्रवेश घेतल्यानंतर मॅडमला या क्षेञात‌ येण्याचा कधीच पश्चात्ताप झाला नाही. त्यांना हे क्षेत्र आवडायला लागले. त्याचं शिक्षण सगळं घाटीत‌ झालं असल्यामुळे घाटीत येणारे रुग्ण हे खान्देश,मराठवाडा, विदर्भ अशा अनेक भागांतून येत असत. अक्षरशः राञराञ प्रवास करुन रुग्ण प्रसूतीसाठी घाटी मध्ये येत असत. आणि हे ज्या आर्थिक आणि समाजिक घटकातील नागरिक होते त्या भागात शिक्षणाची फार वाणवा प्रकर्षाने जाणवत असत. एका रुग्णाबरोबर‌ नातेवाईकांचा येणारा जत्था जेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर आहे हे कळताच त्या रुग्णाबरोबरची एक बाई सोडली तर‌ सगळे पसार होवून जायचे. त्यावेळेस माञ विद्यार्थीदशेत असतांना त्यांनी स्वत: रूग्णांसाठी रक्त देत ते लेबररुम पर्यंत पोहोचवत त्या महिला आणि बाळाला वाचविण्यासाठी आपल्या शिक्षकांची मदत करायची. या सगळ्यांमधून त्यांना लक्षात आलं की बायकांच्या आयुष्यात जो काही अज्ञानाचा अंधकार आहे‌ त्यांच्यासाठी आपण काहीतरी फार मोठं काम करायला हवं. मग त्यांनी ठरवलं की ,प्रसूती, सिझर,ऑबार्शन यांसारख्या गोष्टी तर सगळेच स्ञीरोगतज्ञ करतात. पण ही जी एक पायाभुत शिक्षणाची गरज आहे ती आपण करू शकतो का? आणि मग त्यातून फक्त‌ लैंगिक शिक्षण असं नाव न घेता त्यांनी त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्राप्त होईल असा प्रयत्न केला. जर यात शरीराची माहिती सांगितली जाईल,शरीराचं विज्ञान सांगितलं जाईल तर नक्कीच सगळ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलूच शकतो. मॅडम स्ञीरोगतज्ञ असल्याने त्या या गोष्टी अधिक शास्ञशुध्द पध्दतीने मांडु शकत होत्या तसेच त्यांच्यात असलेल्या वत्कृत्वाची सांगड आणि घराकडून मिळालेली सामाजिक जाणीव यामुळे या क्षेञात त्या बदल‌ घडवून आणू शकल्या. ज्या गोष्टी आजही डॉक्टर होतांनाच्या अभ्यासक्रमात शिकविल्या जात नाही, ते त्यांनी स्वत: अभ्यास करत जाणून घेतले तसेच दुसऱ्या देशात या शिक्षणाकडे कशापधदतीने बघितले जाते व अगदी सहजरित्या ते हे शिक्षण कसे देतात याचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला. आजपर्यंत बोरीकर मॅडम यांनी पाच मुली असणाऱ्या आदिवासी तांड्यावर‌ जावून सुध्दा मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले आहेत तर अगदी ४०० मुलींच्या समुदायात जावून ही त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. हे काम करत असतांना कुठेही आपला समाज काय म्हणतोय,आपली संस्कृती काय म्हणतेय या गोष्टी मध्ये न येवू देता शास्ञाने त्यांना काय शिकवलेलं आहे? शास्त्राने त्यांना शिकवलेली बाईची प्रजनन संस्था काय आहे? तिचं काम काय आहे आणि त्याच वेळेला शास्ञाने मला शिकवलेली पुरुषांची प्रजनन संस्था पण काय आहे? हे सगळं त्या वैद्यकीय दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहोचवतात. 
 
लैंगिक शिक्षणाची गरज ही फक्त महिलांनाच नाही तर‌ पुरुषांनाही त्या बाबतीत सजग असणं अगदी गरजेचं असतं माञ आपल्या समाजात ती मोकळीक नसते. तर डॉ. बोरीकरांनी ग्रामीण भागातील अनेक शाळेत मुलांशी बोलण्याचाही प्रयत्न केला.जर एक कार्यक्रम त्यांनी मुलींसाठी केला तर‌ दुसरा कार्यक्रम मुलांसाठी करणार असा त्यांचा आग्रह असतो.एवढेच नाही तर एक पाऊल पुढे जावून त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत‌ बोलावून आपल्या मुलांसाठी लैंगिक शिक्षणाबद्दलची जागृकता किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक मोकळीकता त्यांच्या कार्यक्रमांमधून निर्माण झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी हे शिक्षण नसणं ही गोष्ट कारणीभूत आहे. कारण अल्पवयीन मुलीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा समोरची व्यक्ती तिच्या शरीराशी काय करतेय हे तिला कळण्याइतपत तिची समज नसते ना. तो अत्याचार आहे हेच तिला माहित नसतं त्यामुळे हे शाळेतूनच शिकवलं पाहिजे कारण आजही अशी परिस्थिती आहे की, आपण आपल्या आईवडीलांपेक्षा आपल्या शिक्षकांवर जास्त विश्वास ठेवतो. तर हे शिक्षण शाळेतून देतांना नुसतं मुलामुलींशी बोलून उपयोग नाही तर‌ त्यांच्या पालकांनाही विश्वासात घेणं गरजेचं आहे. आता कायद्याने प्रत्येक शाळेमध्ये पालकसंघ आहे. जेव्हा डॉक्टर बोरीकरांनी पालकांशी संवाद साधला तेव्हा ते इतके खुश झाले की ते मॅडमला म्हणाले मॅडम तुम्ही जे बोलता आहात ते जीवनशिक्षण आहे. ते लैंगिक शिक्षण आपण असं म्हणूच शकत नाही. असही नाही आहे की मुलांना शिकवलं की उद्या ते जावून लैंगिक संबधच ठेवणार. तर असं नाही ये. आपली तरुण पिढी ही खुप हुशार आणि समजूतदार आहे. त्या कृतीमागचं विज्ञान समजून घेणं आणि मग त्यावर विचार करणं हा अगदी वेगळा मुद्दा आहे. 
 
याला अनुसरुच एक मुद्दा म्हणजे मुलींच्या मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज. आजही वर्षानुवर्षे चालत आलेल्या समज-गैरसमजांमुळे मासिक पाळीत महिलांना अस्पृश्य समजलं जातं. आजही त्यांना बाजूला बसवलं जातं तर काही समाजात घराबाहेर ठेवायला ही मागेपुढे बघितलं जात नाही. याबाबत डॉ.बोरीकर प्रत्यक्ष शिक्षकांशी संवाद साधत संपुर्ण प्रजनन संस्थेची आकृती फळ्यावरती काढून स्ञीबीज कसं तयार होतं? मृतपेशी काय असते. हे समजावून सांगतात. जर घरातील निर्णय प्रक्रियेत आई, वडील सगळेच असतात तर‌‌ मासिक पाळी बद्दल बोलतांना आजही जीभ का कचरते. मासिक पाळी म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी सगळ्यात सुंदर आहे. ज्यातून एक नवीन जीव‌ जन्माला  येतो. जो समाज मासिक पाळीत स्ञीला कमी लेखतो तो समाज त्या पाळीमुळेच आज या जगात आहे. हे माञ तो सोयीस्कर पणे विसरतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही पाळी हा मुद्दा देवाधर्माशी जोडलेला आहे. बाईची पाळी ही प्रत्येकच धर्मात वाईट मानली गेलेली आहे. मुस्लिम धर्मात तिला नमाज पडण्याची परवानगी नाही, हिंदू धर्मात नमस्कार करण्याची नाही तर‌ बाकी कुठल्याच धर्मात प्रार्थनेची परवानगी नाही. मग जर कुठल्याही सजीवाचा जन्म हा त्या गर्भाशयातून आहे तर मग त्या गर्भपिशवीला वाईट मानायचं काय‌ कारण? आजही दुकानदाराला सॅनिटरी नॅपकिन मागायला मुलींना लाज वाटते. सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट ते वर्तमानपञात  गुंडाळून देतात.  का बरं असं? ज्या दिवशी मुलगी पाळीला पाप समजणार‌ नाही, ज्या दिवशी नवरा, वडील, मुलगा, मिञ तिच्यासाठी स्वत: जावून सॅनिटरी नॅपकिन आणून तिची त्या चार दिवसांत काळजी घेईल त्या दिवसापासून 'पाळी' हा शब्द नॉर्मल असेल. पण या सगळ्या दिशेनं होणारा बदल हा खुप सावकाश आहे. यावर बदल‌ घडवून आणायचा असेल तर शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आपल्याला प्रत्येक कुलूपेचं ताळं तोडण्यासाठी उपयुक्त आहे. 

बोलत रहा,बोलत राहा समाजात सकारात्मकता पसरवत रहा. ताशेरे ओढले जातील माञ हेतू उदात्त असल्याने एक दिवस नक्कीच उजाडेल जेव्हा नावीन्यपूर्ण बदल‌ दिसून येईल. १०००० मुलींमागे दोन मुली जरी बदलल्या की मी आता पाळीत कुठलेही बंधन पाळणार नाही तरी यात माझं यश असेल असं डॉ. बोरीकर मॅडम आवर्जून सांगतात. 
बोरीकर‌ मॅडमच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश काळातील‌ जी आरोग्यव्यवस्था आहे तिच आपण पाळत आहोत. आपण आजही त्यात काहीही बदल केलेला नाही. जो सामाजिक शास्त्र हा विषय वैद्यकीय क्षेत्रात पुर्णपणे शिकवला जायला हवा तो पाहिजे तसा शिकवला जात‌ नाही. वैद्यकीय अभ्यासक्रम आता काळानुसार अद्यायावत करण्याची गरज आहे. शरीरक्रिया शिकवत असतांना माणसामाणसातील नातेसंबंध कसे असावेत. कुटूंबाला धरुन संबंध कसे असावे हेही त्यात अंतर्भूत केलं पाहिजे.

 दरवर्षी युनो ही संस्था महिलादिनाचे थीम देत असते. तर यावर्षीचं थीम आहे. 'CHANGE THE BUYEST' म्हणजे 'ग्रह बदलूयात'. मग आपल्याबद्दलचे ग्रह आपणच बदलूयात ना. बाई म्हणजे क्षमाशील, बाई म्हणजे नाजूक, बाई म्हणजे सुंदर, बाई म्हणजे प्रेमळ, बाई म्हणजे संवेदनशील, बाई म्हणजे सहनशील ही जी काही चौकट महिलांसाठी आखलेली आहे तर हीच आपण बदलूयात ना. मग आपण म्हणु शकतो मी एक महिला असण्याआधी मी एक माणूस आहे. आणि माणुस म्हणून सगळ्यांना असणाऱ्या भावना या आपल्याला सुध्दा आहेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्ञीला स्वत:ची ओळख आणि तिच्यातील अस्मितेची जाणीव होईल. ही सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी. खरच डॉ. रश्मी बोरीकर या जे शास्ञशुध्द पध्दतीतून लैंगिक शिक्षणाचे कार्य करत समाजात जागृकता निर्माण करता आहेत त्याला तोड नाही. त्यांच्या या कार्याला महिलादिनानिमित्त सलाम! 

   ‌                        🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

६ टिप्पण्या:

  1. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खुपच महत्त्वपुर्ण विषयावर लेख लिहिला आहे, खुप छान.

    उत्तर द्याहटवा
  2. प्राची, खूप मस्त मांडणी केलीस, दुर्लक्षित असणारा हा विषय तू प्रकाशात आणलास,,,,, असच लिहीत रहा,,, अनेक विषयांचं अज्ञान दूर करत राहा...💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...