💗 "तिचं जग"💗
खरतर हॉस्पिटल म्हटलं की सगळ्यांनाच भिती वाटते. पण आपल्या आजारावरचं एकमेव औषध म्हणजे डॉक्टर. तेव्हा माञ ते देवासारखे आपल्याला तारतात.डॉक्टर म्हणजे मनुष्य प्राण्यातला खराखुरा देव!
'आनंदी गोपाळ जोशी' हे नाव देशातील प्रत्येक महिला डॉक्टरच्या रक्तात भिनलेलं एक शक्तीचं द्रव्य असणार. समाजाचा विरोध पत्करुन आपल्या हिमतीच्या जोरावर दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घेत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान या दुर्गेने करुन दाखविला. जीवसृष्टीवरील प्रत्येक मनुष्यजातीच्या आयुष्याची डोरच जणु डॉक्टरांच्या हातात असते. त्यातल्या त्यात महिला डॉक्टर होणं सोप्पी गोष्ट नवे. पण आजची स्ञी ही समाजाला जाब विचारत आपल्या अधिकारांसाठी लढणारी काली आहे. आता ती तिच्या वाटेवर तिच्याच आकलनानुसार वळणे घेत आपल्याला आवड असणाऱ्या गोष्टीतून शिक्षण घेत स्वबळावर ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. हिरा हा सुरुवातीला म्हटलं तर दगडच असतो पण जेव्हा त्याचे अनेक पैलू पाडून तो समोर येतो तेव्हा अब्जावधीच्या किंमतीचा तो मानकरी ठरतो. स्ञी ही या श्रृष्टीवरील एकमेव अशी मनुष्य प्राणी आहे जिचे या आयुष्याच्या प्रवासात हिऱ्यासारखे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. ती मुलगी असते, ती बहीण असते, ती माय असते, ती जिवकीप्राण मैञिण असते, ती बायको असते,ती आजीही होते आणि या सगळ्या जवाबदाऱ्या निभावत ती वेगळं नातं निर्माण करते ते स्वबळावर उभं राहण्याचं. तिथे ती अगदी सराईतपणे व्यवसायाची मालकीण असते, नोकरीत प्रमाणिक कर्मचारीही असते आणि समाजाची जाण असणारी समाजसेविकाही असते. हे पैलू पाडणारा तो देव खरच किती उत्कृष्ट जोहरी असावा; कारण हा एकमेव हिरा आहे ज्याचे अनाकलनीय पैलू आहेत. असाच एक अस्सलिखित हिरा आज 'तिचं जग' या सदरातून आपण उलगडणार आहोत.
नाव शिल्पा तोतला. आपण म्हणतो नावात काय आहे? पण खरच या नावात काय गम्मत आहे हे पुढे तुम्हाला नक्कीच उमगेल. जळगावसारख्या छोट्या जिल्ह्यात शिल्पा तोतलांचं बालपण गेलं. शिल्पा तोतला या लहानपणासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. घरात वातावरण अगदी वैद्यकीय क्षेञाचं होतं. त्यांचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते. जेव्हा शिल्पा मॅडम आपल्या आईवडीलांची रुग्णसेवा बघायच्या तेव्हा त्यांना खुप अप्रुप वाटत असे. आपले आई-वडील रुग्णसेवा करत अनेकांच्या आजाराचं निदान करतात. ही खरच मनाला समाधान देणारी बाब आहे. त्यावेळला त्या १० वीत होत्या. तिथेच त्यांना त्यांच्या आतला आवाज कळाला की , आपल्याला वैद्यकीय क्षेपञातच करिअर करायचे. आपल्या आईवडीलांचा आदर्श बाळगत त्या तयारीला लागल्या. इयत्ता १२ वीत त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले जेव्हा अथक परिश्रमांच्या जोरावर खांदेशातील एक नाही ,दोन नाही तर तब्बल ३ जिल्ह्यांतून त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. वैद्यकीय क्षेञात भारतात कुठेही त्यांना प्रवेश मिळणं शक्य होतं. त्यांनी मुंबईच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आणि जळगावसारख्या छोट्या जिल्ह्यातील ही मुलगी आपले स्वप्न उराशी बाळगून निघाली पुर्णत्वाच्या दिशेने. मुंबई सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली महिला होण्याचा बहुमानही शिल्पा तोतला यांनी आपल्या परिश्रमांच्या जोरावर आपल्याकडे खेचून आणला. १९९८ मध्ये MBBS सारखा किचकट अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केला. आणि शिल्पा तोतला या नावाला 'डॉक्टर शिल्पा तोतला' अशी भारदस्त पदवी मिळाली. हा प्रवास खरतर त्यांच्यासाठी खडतर होता. कारण लहान जिल्ह्यातून आलेली मुलगी. मुंबईचे वातावरण झेपेल का? तिथे इंग्रजीमध्ये सहजरित्या चालणारे संभाषण आपल्याला जमेल का? मुळात ती संस्कृती मला स्वीकारेल का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांच्या मनात होती. पण त्यांच्यातील काही गुण हे इतरांपेक्षा बळकट होते. त्यांची आकलन क्षमता खुप चांगली असल्याने त्या पटकन एखादी चांगली गोष्ट आपल्याकडे खेचून आणतात. याच कारणामुळे त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील महाविद्यालयीन प्रवास अविस्मरणीय राहिला.
MBBS चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी २००१पॅथॉलॉजीमध्ये शिक्षण पुर्ण केले. सुरुवातीलाच त्यांनी एमजीएम मध्ये पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम पाहिले. आपल्यातील जिज्ञासू वृत्ती घेरुन शिल्पा तोतला यांनी स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला.आणि 'कुशल पॅथॉलॉजी लॅबची' मुहूर्तमेढ औरंगाबादमध्ये रोवली गेली. यासोबत त्यांचे 'चिरायू चिल्ड्रन्स केअर' हॉस्पिटलही लहान मुलांसाठी काम करत आहे. आज औरंगाबादमधील कुशल पॅथॉलॉजी लॅबचा रिपोर्ट हा सर्वदेशात अग्रस्थानी मांडला जातो; एवढा तो विश्लेषणात्मक आणि परिपुर्ण असतो. याचे पुर्ण श्रेय हे डॉ. शिल्पा तोतला यांच्या सुव्यवस्थित शिस्तबद्ध संघटनाला जातं. त्यांची काम करण्याची पध्दत , त्यांचं रोजच्या कामाचं नियोजन या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन शिकावं ते फक्त कुशल पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावून. आज पॅथॉलॉजीमध्ये काम करुन अखंड रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. शिल्पा तोतलांना २१ वर्षे पुर्ण झालेत. पण त्या क्षेञातील नावीन्य त्यांनी अजुनही टिकवून ठेवलेले आहे. त्याचबरोबर त्यांचा छंद कुठेही त्यांनी मागे पडू दिला नाही. शिक्षण ,नोकरी आणि बाकीच्या अनेक गोष्टींबरोबरच त्यांनी नृत्य आणि संगीताची आवड खुप छान पध्दतीने जोपासली आहे. शालेय जीवनात त्यांनी कथ्थक या नृत्यप्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत पारितोषिक प्राप्त केले. तसेच स्वत:चे ज्ञान हे काळाबरोबर सुसंगत असावे या दृष्टीने त्या नेहमी स्वतः ला विद्यार्थीदशेतच ठेवतात. आणि सतत काही ना काही तरी शिकत असतात. त्याचबरोबर प्राध्यापिका म्हणूनही वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी काम केले आहे.
एक महिला जेव्हा काम करत असते तेव्हा ती अनेक जवाबदाऱ्यांसहित आपले काम उत्तमरित्या पुर्ण करत असते. यात जर तिला तिच्या कुटूंबाची साथ मिळाली तर मग यापेक्षा मोठं समाधान आणि यश तिच्यासाठी कोणतंच नसतं. शिल्पा तोतला मॅडमलाही लग्नानंतर आपल्या पतीची खंबीर साथ तर मिळालीच पण आपल्या मुलांच्या डोळ्यात आईबद्दल असणारा तो अभिमान खरच त्यांना अजून जोमाणं काम करण्याची ताकद देतो. घर आणि ऑफिस हे एकाच ठिकाणी असल्यामुळे डॉ.शिल्पा तोतला याचं घराकडे कधीच दुर्लक्ष झालं नाही. एका विशिष्ट वेळेनंतर जेव्हा डॉ. शिल्पा यांना अशी जाणीव झाली की, आपली लॅब ही आता सुसज्ज झाली असून व्यवस्थित चालते आहे. आता गरज आहे आपण करत असलेल्या समाजकार्याला अजून गती देण्याची. त्यातून त्यांना एक लक्षात आलं की, डॉक्टरांनाच गरज आहे डॉक्टरांना योग्य ठिकाणी नोकरी शोधून देण्याची. डॉ. शिल्पा तोतलांना ही कल्पना सुचल्या नंतर त्यांनी लगेच हेडगेवार, धुथ हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अँडमिन्ससोबत यासंदर्भात विचारविनिमय केला असता त्यांनी क्षणार्धात सांगितले नक्कीच या क्षेञात उतरा. डॉक्टरांनाच उभं करण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. कारण डॉक्टरांच जग , डॉक्टरांची भाषा हे समजणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टरच असू शकते. तोपर्यंय वैद्यकीय क्षेञातला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे सहजरित्या त्या या क्षेत्रात उतरल्या आणि डॉक्टरांना जॉब प्लेसमेंट मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला व्यक्तीमत्व होण्याचा मान डॉ. शिल्पा तोतला यांच्या शिरपेचात रोवला गेला. या प्लेसमेंट अंतर्गत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी डॉक्टर्स स्वत: मुलाखती घेवुन पाठवले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे खेड्यापाड्यावरती, ग्रामीण वस्त्यांवरती त्याचबरोबर भारतातील शहरांसह दुर्गम भागातही डॉक्टर्स पोहोचले आहेत. जवळजवळ १ लाख डॉक्टर्सचा डाटाबेस त्याच्याकडे उपस्थित आहे. पुढील काही दिवसांत देशाबाहेरील वैद्यकीय क्षेञात डॉ. शिल्पा तोतला प्लेसमेंट मिळवून देणार आहेत. ही खरच भावी डॉक्टरांसाठी मोलाची संधी असणार हे आहे. ९ वर्षांपुर्वी सुरु केलेल्या या प्लेसमेंटला Merirecruiters हे नाव डॉ. शिल्पा तोतलांच्या नजरेतून मिळाले. ही औरंगाबाद शहरासाठी खरच अभिमानाची बाब आहे.
अजूनही वैद्यकीय क्षेञात येवू इच्छिणाऱ्यांना आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रवेश उपलब्ध नाहीत . तसेच भारताच्या तुलनेत दुसऱ्या देशातील वैद्यकीय शिक्षण हे त्यामानाने स्वस्त असल्याकारणाने भारतातील विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिकावे लागते. आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढावी व जास्तीत जास्त डॉक्टरांना संधी मिळावी असा प्राजंळ विचार डॉ. शिल्पा तोतलांनी मांडला. डॉक्टर शिल्पा तोतला यांना रुग्णसेवा करतांना कधीच शहरातील समस्येकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या शहरात काय घडतय याबाबत त्या सदैव जागृक असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॅगलोर सारख्या आयटी हब असणाऱ्या शहरात जिथे औरंगाबादचे बहुसंख्य विद्यार्थी, कामगार काम करतात त्याच शहरात जाण्यासाठी साधी विमानसेवा उपलब्ध नसणं ही खरच लाजिरवाणी गोष्ट होती. त्या विद्यार्थ्यांचे हालओळखत त्यांच्या स्वप्नांना पंख मिळावे म्हणून डॉ. शिल्पा तोतला यांनी एक संघटना स्थापन करुन सतत प्रशासनाचा पाठपुरावा करत औरंगाबाद ते बॅंगलोर ही विमानसेवा सुरू केली. यावेळी त्या शहराच्या आणि देशाच्या घराघरात पोहोचल्या.
डॉक्टर शिल्पा तोतला या महिलांबद्दल बोलतांना सांगतात की, महिला या दोन खांबासारख्या दोन गोष्टींमध्ये खुप मजबूत असतात. एक तर त्या खुप प्रामाणिक असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एकावेळी अनेक कामं करून शकतात. ही गोष्ट त्यांच्या रक्तातच असते. या दोन गोष्टींचा समन्वय झाला तर नक्कीच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेतून स्ञी ही नक्कीच आपली कर्तबगारी गाजवू शकते. ती जर चार भिंतीच्या आतून बाहेर पडली तर तिच्या बाह्य शिक्षणातून ती आपल्या घरात बदल घडवून आणू शकते. तिच्या व्यक्तिमत्व विकासाला अजून चालना मिळू शकते. तर स्ञी ही कर्तृत्व गाजवण्यासाठीच जन्माला आली आहे आणि तिने तिचे कर्तृत्व गाजवायलाच हवे. शिल्पा तोतला यांनी अत्यंत कमी वयात आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर वैद्यकीय क्षेञाला नावीन्यपुर्णता प्राप्त करुन दिली.
रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या शिल्पा तोतला यांना स्ञी शक्तीचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्यातील स्ञी शक्तीने वैद्यकीय क्षेञात नवे आयाम स्थापन केले. त्यांच्या या कार्याचा अभिमान त्यांच्या आईला वाटावा आणि माझी मुलगी माझा आदर्श आहे असं म्हणावं यापेक्षा त्यांच्या कामाची अनमोल अशी पोचपावती त्यांच्यासाठी कोणतीच नसेल. अशी ही आईचा आदर्श असणारी त्यांची कर्तबगार लेक ! डॉ. शिल्पा तोतला या कर्तबगार विचारांच्या आणि आचरणाच्या प्रगल्भ मुर्तीला महिला दिनानिमित्त शुभेच्छा...! त्यांच्या या कार्याचा गौरव सर्वदूर पसरत राहो हीच सदिच्छा....!
🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
So nice article
उत्तर द्याहटवाMam is just incredible....am proud to be her student..
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा