सोमवार, ७ मार्च, २०२२

💝💝^^^अंजली^^^💝💝

                      💗  "तिचं जग"💗
मुहूर्त जागतिक महिला दिनाचा! तिचं जग हे खास सदर सुरू असतांना माझ्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपण रोज वेगवेगळ्या महिलांच्या विश्वात शिरुन तिच्याशी गुजगोष्टी करतो आहोत. तिची संघर्षातून यशाकडील वाटचाल, तिचं समाजकार्य, तिचं जीवन हे सगळंंच अगदी भारावून टाकणारं आहे. खरतर सगळ्याच महिलांचे त्यांच्या नियमित आयुष्याव्यतिरिक्त त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे प्रत्येकीला एकमेकींशी जोडणारं पण तरीही वेगळं असं काहीसं आहे. अशी महिला जी या सगळ्या महिलांच्या कार्याचा भाग असेल ती जर महिलादिनाच्या दिवशी असेल तर 'तिचं जग' या सदराचा शेवट गोड नक्कीच होईल. आणि विचारांच्या कल्पनेतून आकृती उभी राहिली एका बहारदार, भारदस्त महिला व्यक्तिमत्त्वाची. 
तु कल्पना नवनिर्मितीची...
पेटावी जणु मशाल स्वप्न आर्ततेची...
एक दिशा, एक आशा तु या ऐतिहासिक शहराची...
ओळख तुझ्या परिचयाची, जिल्ह्याची आई
'अंजली' धानोरकरांची...

हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच एक चमक येईल. काम करण्यापेक्षा काम बोललं की, त्या पदावरील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच बोलायला लागते. औरंगाबाद जिल्ह्याचा अतिशय सराईतपणे आपल्या प्रसन्न मुद्रेने पदभार सांभाळणारे लेखक, पञकार, साहित्यिक, अभिनेञी‌, वत्कृत्व, सॉफ्टस्कील ट्रेनर, कर्तव्यदक्ष अधिकारी असे सप्तरंगांची उधळण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर.‌ महिलादिनी बघुयात अंजली धानोरकरांचं 'तिचं जग'! 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १९९८ सालच्या त्या वर्ग-१ च्या अधिकारी. अंजली धानोरकर यांचा जन्म जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे झाला. त्यांचे वडील हे तेथील एका बॅंकेत कार्यरत होते तर आई ही गृहिणी. त्यांचं मुळ गाव हे आताचं तालुका असणारं बदनापूर हे आहे. तेव्हा माञ ते छोटसं खेडं गाव होतं. त्यांचे ९ वी पर्यंतचे शिक्षण हे पैठण येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत झाले. त्यामुळे बालपणाचे टप्पे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवले. १० वी ची परिक्षा त्या परभणीच्या बाल विद्यामंदिरातून चांगल्या गुणांकाने उत्तीर्ण झाल्या. नंतर अंबडच्या मत्स्योदरी महाविद्यालयात १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपरोक्त महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. लहानपणापासून त्या अतिशय चंचल आणि अभ्यासू होत्या. त्यांच्यातील तेच गुण हेरुन वडीलांनी त्यांना वाचनाची सवय लावली‌. १२वीत गुणतालिकेत छान क्रमांक असूनही मनाचा ध्यास घेत त्यांनी कलाक्षेञात प्रवेश निश्चित केला. आईवडील पाठीशी असल्यामुळे बाकीच्यांचा विरोध कारणी लागला नाही. पदवीनंतर समंजस आणि परखड विचारांच्या अंजली धानोरकर यांनी आपल्या याच विचारांना योग्य दिशा मिळावी, योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अभ्यासू वृत्तीतून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. याच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अक्षरशः पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण करत त्या शासकीय महसूल सेवेत तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. पञकारीतेतून थेट अधिकारी पदी त्यांनी झेप घेत आपली जिद्द पुर्ण केली होती. आता वेळ आली होती स्वत:ला सिद्ध करण्याची. कारण त्या काळी प्रशासकीय अधिकारी म्हणून स्ञियांचे प्रमाण अगदी नगण्य होते. पुरुषीमक्तेदारी असणाऱ्या कार्यालयात ही महिला काय काम करणार? असा दृष्टिकोन सुरुवातीला तिथल्या कर्मचाऱ्यांचा असायचा‌. पण आपली जिद्द, बोलण्यातील आपुलकी आणि नियोजनबद्ध काम या पध्दतीने त्यांनी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांची वाटचाल नुसतीच यशस्वी नाही तर दिमाखात सुरू आहे. तहसीलदारापासून सुरु झालेल्या त्यांच्या कार्याचा आलेख विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी चे झेंडे रोवत औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

 तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना घरच्यांनी जेव्हा त्यांच्या लग्नाचं बाशिंग काढलं तेव्हा येणाऱ्या स्थळांना अंजली धानोरकरांची नोकरी मंजूर नव्हती. मुळातच पुरोगामी विचारसरणीच्या अंजली यांनी स्पष्टपणे त्या स्थळांना नकार‌ देत मुलगी ही चार चौकटीच्या बाहेरही स्वत:चे अस्तित्व घडवू शकते असे सांगितले. इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल माञ कष्टाने मिळवलेली नोकरी तर सोडायची नाही याची त्यांनी मनाशी गाठ बांधली. समाजाची दुसरी बाजू तितकीच मजबूत आहे जिला मुलगी ही अभिमान वाटते. तसच काहीसं अंजली धानोरकरांबाबत‌ झालं. खरतर एक सोपोस्कार म्हणून त्यांनी ठिकाण बघितले कारण पुर्व अनुभवानूसार तर‌ आपण नकारच देणार असं त्यांना माहित होतं. माञ त्यांची गाठ ही अभय‌ धानोरकरांशीच बांधलेली असावी. अभय धानोरकर‌ आणि त्यांच्या आईवडीलांना अजंली धानोकरांच्या कामाचा अभिमान वाटला. कमी वयात त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल, त्यांच्या कर्तबगारीबद्दल पेशाने डॉक्टर असणाऱ्या अभय धानोरकरांना फार कौतुक वाटले. आणि अंजलींना 'धानोरकर कुटूंबात' येवून त्यांच्या या ध्येयाला खंबीर‌ साथ लाभली. 
  
त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतांना त्यांच्या कर्तबगारीचे, खमक्या निर्णयप्रक्रियेचे अनेक पैलू आपल्याला उलगडत जातात. आणि सुखाचा धक्का देत जातात. ज्या क्षेञात त्यांनी पाऊल टाकले त्या क्षेञाचे नंदनवन त्यांनी केले. त्यातलेच एक वन खात्यात वन उपजिल्हाधिकारी व वनजमावबंदी अधिकारी पदावर कार्यरत असतांना हा विभाग अगदी अडगळीत पडलेला होता‌;अधिकाऱ्यांमध्ये शिस्त नव्हती. त्यातील एकाने मॅडमला सल्ला दिला, काय तुम्ही, इथे येवून फायदा नाही. इथे काही काम चालत नाही. त्यावेळस अतिशय आत्मविश्वासाने त्या अधिकाऱ्याला त्यानी खडसावत सांगितले. " सर मी या खुर्चीवर बसून एवढे चांगले काम करुन जाईल की परत इथे येण्यासाठी अधिकारी तुम्हाला विनंती करतील". त्यावेळेस कदाचित त्या अधिकाऱ्यांना ते हास्यास्पद वाटले असेल माञ योग्य नियोजन पध्दतीने, उत्कृष्ट कार्यप्रणाली राबवत तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यातींल कार्यक्षमता त्यांनी ओळखली. त्यानुसार त्यांनी कामाचे वर्गीकरण केले. कष्टातून बदल‌ दिसून आला आणि काय तर औरंगाबाद वनजमावबंदी कार्यालय 'आयएसओ' नामांकन मिळणारे महाराष्ट्रातील पहिले वन कार्यालय ठरले. त्यांनी त्यांचा दिलेला शब्द खरा ठरवला. अशा पध्दतीचे आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त करून देणं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरव आहे. आणि या गौरवात खारीचा वाटा हा अंजली धानोरकरांनाच जातो‌.

सन २०१७ मध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रत्येक कामातील वेगळेपण घेरुन त्यात आपली छाप कशी उमटवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजली धानोरकर. इथेही त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत आपलं नाव इतिहासाच्या पानावर भल्यामोठ्या अक्षरात कोरलं. जगप्रसिद्ध वेरुळ येथील चारही केंद्रावर त्यांनी महिलांना प्रशिक्षण देत महिला जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेञीय अधिकारी, मतदान केंद्राधिकारी, केंद्राध्यक्ष, BLO या सर्व पदावर त्यांनी महिलांची नियुक्ती केली. एवढेच नाही तर सुरक्षेसाठीही महिलापोलिसांचीच नियुक्ती त्याठिकाणी करण्यात आली होती. अंजली धानोरकरांच्या मते जर देशाच्या सर्वोच्च पदी महिला असू शकतात तर‌ मग निवडणूक प्रक्रिया त्या का सुव्यवस्थित पार पाडू शकणार नाही. सुदैवाने जिल्हाधिकारी ही त्यावेळेला महिलाच होती त्यामुळे त्यांनी‌ हा उपक्रम राबवला. अगदी मशीन ऑपरेट करण्यापासून ते पोलिंग एजंटपर्यंत सगळंच महिलाराज होतं.‌ हे पाऊल उचलून त्यांनी जोखीम तर पत्करली होती; कारण ही भारतातील पहिली घटना होती. माञ अजंली धानोरकरांच्या अखत्यारीत ही निवडणूक अगदी लिलया पार पडली. महिलांची अशी प्रशासकीय व राजकीय साखळी संपूर्ण भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा घडून आली. आणि हा मैलाचा दगड यशस्वीपणे पेलला तो अंजली धानोरकरांनी. प्रशासकीय अधिकारी कसा असावा? या वाक्याचं दोनच शब्दात उत्तर म्हणजे 'अंजली धानोरकर'.
दबंग हा शब्द पोलिस महिलेला वापरत असले तरी हे विशेषण त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला अगदी चोखपणे लागू होते. कारण त्या कामातून‌ जनतेपर्यंत पोहोचतात. 

एक महिला जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या उपजिल्हाधिकारी पदावर. ना मागे ना पुढे ,काम थेट तोंडावर! एवढा मोठा जिल्ह्याचा सांभाळ करतांना स्वत:साठी वेळ काढणं हे खरच अवघड आहे. माञ या वाक्याला अंजली धानोरकर अपवाद ठरतात. एवढ्या व्यापातूनही त्यांनी स्वत:ला कलाक्षेञाशी अगदी सराईतपणे जोडून ठेवलय. त्यांच्यातील‌ साहित्यिका जेव्हा- जेव्हा बाहेर पडली तेव्हा- तेव्हा साहित्यक्षेञासाठी ती देणगी अनमोल ठरली. 'गट्टीफु' हा त्यांचा बालकवितासंग्रह फार प्रसिद्ध असून त्यांनी चौथ्या आवृत्तीपर्यंत मजल मारली. 'मनतरंग या त्यांच्या ललितलेखासंग्रहाने तर‌ अशी कमाल केली की, त्यातील‌ 'काहूर' हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीएससी, बी. एस.डब्ल्यु व बी.एफ.ए च्या द्वितीय वर्षाच्या‌ अभ्यासक्रमात सन २०१२-१३ पासून समाविष्ट आहेत. त्या स्वतः सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. याचसंदर्भातील व्यक्तीमत्व विकासासाठी सॉफ्टस्किल हे त्यांचे पुस्तक वाचनीय‌ आहे. विविध शासकीय प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्कील मधील विविध विषयांवर प्रशिक्षण दिले तर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, कॉर्पोरेट विभाग अशा अनेक क्षेञांसाठी वेळ काढत त्यांनी सॉफ्ट स्कीलचे धडे दिले. यासोबत 'मला आयएएस व्हायच' हे त्यांच अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे. साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' या पुस्तकाच्या अभिवाचनाची त्यांच्या मधूर आवाजात रेकॉर्डींग ऐकली की आई-मुलाच्या नात्यातील तो निरागस संवाद डोळ्यासमोर चिञ उभे करतो. नामांकित वृत्तपञ मासिकातील त्यांचे स्तंभ लेखन तर पर्वणी ठरते. साहित्यवेड्या अंजली धानोरकरांच्या लेखणीने त्यांना खरच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेपले आहे. स्वत:ला काळाबरोबर त्या कशाप्रकारे सुसंगत ठेवतात याचा प्रत्यय 'Lets Talk Anjali' या त्यांच्या युट्यूब चॅनलवर येतो. त्या कामातून वेळ काढत स्वत;ची आवड जोपासतात. 'जिंदगी मिलेंगी ना दोबारा, मनभर इसे जिले यारा' ह्या ओळींमधील ओवी म्हणजेच अंजली धानोरकर. 

त्यांच्या सामाजिक कार्याचा वेग जाणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त आहेत. २०१९ मध्ये फेमिना मासिकात त्यांच्यावर 'Pillar Of Democracy' म्हणजेच 'लोकशाही आधारस्तंभ' या शीर्षकाने लेख प्रसिद्ध झाला. तो क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. लोकशाहीचा आधारस्तंभ ही स्तुतीसुमनं खरच गगनभेदी आहेत. त्यांच्या किर्तीचे गोडवे सातासमुद्रापारही मोठ्या अभिमानाने गायले जातात. याचं उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या ‘Thrive Global’ या मासिकात त्यांच्यावर प्रसिद्ध झालेला लेख. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वृत्तपञातून त्यांनी आपले लेख जगात पोहोचविले. खरच एका महिलेनं मिळविलेलं हे क्षितीजापलिकडलं यश आपल्या भारताच्या कुठल्याच कोपऱ्यात न मावणारं आहे. त्याला सामावून घ्यायचं असेल तर मनच लागेल आणि जेव्हा ते प्रत्येकाच्या मनात उतरेल ना तेव्हा अंजली धानोरकरांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांसारखे अधिकारी तयार होऊन कायदा व‌ सुव्यवस्थेतून कशा पध्दतीने विकास साध्य होतो. याची प्रचिती येईल. खडतर परिश्रम आणि मनात असणाऱ्या अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन प्रशासकीय सेवेबरोबरच विविध क्षेञाला आपल्या कलेतून संपन्न करत अंजली धानोरकर‌ यांनी आपली विशेष छाप सोडली. कधीही न पुसणारी अशी. सह्याद्रीच्या उंचीसारखं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या या ध्येयवेड्या नारीशक्ती साठी भारतीयांच्या माना शानेनं आणि अभिमानानं उंचावतात. त्यांनी एवढी मोठी उंची गाठली आहे माञ त्यांचा निर्मळ स्वभाव हा सर्वसामान्यांनाही आपलंसं करुन घेतो. त्यांच्या दरबारी सगळेच एकसमान असून कोणी शेतकरी जरी आला तरी त्या वेळ काढून तितक्याच आपुलकीने विचारपूस करतात. याला म्हणतात पतंगाची झेप आभाळाला टेकली तरी डोर माञ जमिनीशी कायम संधान साधून असते. 

अंजली धानोरकर सांगतात. " कायम कायद्याला धरुनच काम करायला हवं. आपली उंची गाठतांना अनेक प्रसंगांना महिला म्हणून सामोरं‌ जावंच लागतं माञ ध्येय मनाशी पक्क असलं की आपल्यातील भुक वाढत जाते. आणि नकळत ती ताकद आपल्यात निर्माण होते कोणत्याही गोष्टीचा निडर होऊन सामना करण्याची. तुमच्यातील क्षमतांना ओळखा, नकारात्मक लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील माञ तेच बळ समजत वाटचाल करत‌ रहा. यश तुमच्या पायाशी असेल. खरच अंजली धानोरकर म्हणजे प्रशासकीय क्षेञातील व्यापक असे विद्यापीठ. त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक महिलादिन पुरेसा नाही. प्रत्येक महिलादिनी गौरव व्हायलाच हवा अशी ही महिलांची शक्ती. प्रशासकीय क्षेञात पाऊल टाकू इच्छिणाऱ्या अनेक महिला, मुलींचं प्रेरणास्थान. या प्रामाणिकतेच्या चालत्याबोलत्या संवेदनशील पुतळ्याला महिलादिनी सलाम! 
                     
                            🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


रविवार, ६ मार्च, २०२२

💗 कुजबूज नाही तर स्वच्छंदी ती💗

                         💗"तिचं जग"💗

आज कोणतेही आढेवेढे न घालता थेट विषयाला हात घालते. कारण जो समाज काही गोष्टींची सार्वजनिकरित्या वाच्यता करण्याला बंदी घालतो त्याच समाजाच्या अज्ञानामुळे आज महिलांवरील लैंगिक अत्याचार तर वाढतातच आहेत माञ लैंगिक शिक्षणाची समाजात असणारी अज्ञानता यामुळे महिलापुरुषांना समसमान पातळीवर समस्यांना सामोरं जावं लागतं. मग विषय इथेच येवून अडतो‌ की बोलणार कोण? या गोष्टी काय‌ चारचौघात बोलण्याचा विषय आहे का? याच सगळ्या प्रश्नांवरील उत्तर म्हणजे आपल्या औरंगाबादच्या स्ञीरोगतज्ञ डॉ. रश्मी बोरीकर. या जगात प्रत्येक शारीरिक व्याधीचं निराकरण करण्याची क्षमता ही वैद्यकीय क्षेञात आहे. सहज कोणालातरी विचारलं की वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची नावं सांगा. अगदी सहज सांगून टाकतो न आपण. पण जेव्हा लैंगिक समस्येवर अनुबोधन करणारा डॉक्टर जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा माञ जीभ अडखळते. आज माञ बदल घडलाय तो शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत आणि ग्रामीण भागापासून ते आदिवासी पाड्यापर्यंत. आणि हा बदल‌ घडवून आणण्यामागे असणारे मजबूत हात म्हणजे डॉ. रश्मी बोरीकर. कुजबूज न करता स्वच्छंदीपणे शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांवर मोकळेपणाने त्या समाजात भाष्य करतात. त्यांचा या क्षेञापर्यंतचा प्रवास खरतर खुप गमतीदार आहे .सोबतच अगदी खुला आहे‌ या बंदिस्त क्षेञापेक्षा. बघूयात तिचा प्रवास 'तिचं जग' मधून...!

रश्मी बोरीकर यांचा जन्म नागपूरचा आहे कारण त्यांच्या आईचं माहेर हे नागपूरचं. त्यानंतरचं संपुर्ण बालपण हे त्यांचं औरंगाबादमध्ये गेलं. त्यापुढील शिक्षण हे सगळं औरंगाबादमध्येच झालं. इयत्ता १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण त्यांनी शारदा मंदिर मुलींच्या शाळेत घेतलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाची निवड केली व त्यापुढील वाटचालीसाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादमध्ये आपले MBBS चे शिक्षण पुर्ण केले. त्यांचे‌ वडील हे सरस्वती भुवन महाविद्यालयात अर्थशास्ञाचे प्राध्यापक होते तर आई ही सरस्वती भुवन मुलांच्या शाळेतून उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचे आजोबा श्रीनिवासराव सखारामपंत बोरीकर हे हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे अग्रणी नेते होते. तसेच त्यांचे वडील आणि आत्या यांनीही वयाचे १० ते१६ या वयोगटात‌ असतांना हैद्राबाद मुक्तीसंग्रामामध्ये तरुण पिढी म्हणुन काम करत आपले शौर्य गाजवले. घरामध्येच स्वातंञ्यसंग्रामात काम केल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना घरातुनच आजोबा आणि समाजसेवेचे बाळकडू मिळाले. आजोबांनी आठवण काढतांना बोरीकर‌ मॅडम सांगतात की, त्यांच्या आजोबाचं वत्कृत्व फार छान होतं. त्याच्या बोलण्याची शैली त्या काळात फार‌ प्रसिद्ध होती. त्यामुळे त्यांच्यातील ते अंगभुत गुण आपोआपच बोरीकर मॅडममध्ये उतरले. त्यामुळे शाळेपासूनच वेगवेगळ्या वत्कृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि मग ओघानेच बक्षिसं. असं सगळं बालपण त्यांच औरंगाबादमध्ये व्यतीत झालेलं आहे.

खरतर बोरीकर मॅडमला स्वत: ला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्यांना कला क्षेत्रात आपलं करिअर करायचं होतं किंवा सायन्सला असतांना फिजिक्सबाबत निर्माण झालेली आवड यामुळे त्यातच काहीतरी संशोधनात्मक करावे असा त्यांचा मानस होता. पण त्या काळात वडीलांचा विचार असा होता की मुलींनी मुलींसाठी वैद्यकीय क्षेञ निवडणं अतिशय  चांगलं आहे. ओघाओघाने गुणही चांगले प्राप्त होत गेले आणि वैद्यकीय प्रवेश निश्चित झाला. प्रवेश घेतल्यानंतर मॅडमला या क्षेञात‌ येण्याचा कधीच पश्चात्ताप झाला नाही. त्यांना हे क्षेत्र आवडायला लागले. त्याचं शिक्षण सगळं घाटीत‌ झालं असल्यामुळे घाटीत येणारे रुग्ण हे खान्देश,मराठवाडा, विदर्भ अशा अनेक भागांतून येत असत. अक्षरशः राञराञ प्रवास करुन रुग्ण प्रसूतीसाठी घाटी मध्ये येत असत. आणि हे ज्या आर्थिक आणि समाजिक घटकातील नागरिक होते त्या भागात शिक्षणाची फार वाणवा प्रकर्षाने जाणवत असत. एका रुग्णाबरोबर‌ नातेवाईकांचा येणारा जत्था जेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर आहे हे कळताच त्या रुग्णाबरोबरची एक बाई सोडली तर‌ सगळे पसार होवून जायचे. त्यावेळेस माञ विद्यार्थीदशेत असतांना त्यांनी स्वत: रूग्णांसाठी रक्त देत ते लेबररुम पर्यंत पोहोचवत त्या महिला आणि बाळाला वाचविण्यासाठी आपल्या शिक्षकांची मदत करायची. या सगळ्यांमधून त्यांना लक्षात आलं की बायकांच्या आयुष्यात जो काही अज्ञानाचा अंधकार आहे‌ त्यांच्यासाठी आपण काहीतरी फार मोठं काम करायला हवं. मग त्यांनी ठरवलं की ,प्रसूती, सिझर,ऑबार्शन यांसारख्या गोष्टी तर सगळेच स्ञीरोगतज्ञ करतात. पण ही जी एक पायाभुत शिक्षणाची गरज आहे ती आपण करू शकतो का? आणि मग त्यातून फक्त‌ लैंगिक शिक्षण असं नाव न घेता त्यांनी त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्राप्त होईल असा प्रयत्न केला. जर यात शरीराची माहिती सांगितली जाईल,शरीराचं विज्ञान सांगितलं जाईल तर नक्कीच सगळ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलूच शकतो. मॅडम स्ञीरोगतज्ञ असल्याने त्या या गोष्टी अधिक शास्ञशुध्द पध्दतीने मांडु शकत होत्या तसेच त्यांच्यात असलेल्या वत्कृत्वाची सांगड आणि घराकडून मिळालेली सामाजिक जाणीव यामुळे या क्षेञात त्या बदल‌ घडवून आणू शकल्या. ज्या गोष्टी आजही डॉक्टर होतांनाच्या अभ्यासक्रमात शिकविल्या जात नाही, ते त्यांनी स्वत: अभ्यास करत जाणून घेतले तसेच दुसऱ्या देशात या शिक्षणाकडे कशापधदतीने बघितले जाते व अगदी सहजरित्या ते हे शिक्षण कसे देतात याचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला. आजपर्यंत बोरीकर मॅडम यांनी पाच मुली असणाऱ्या आदिवासी तांड्यावर‌ जावून सुध्दा मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले आहेत तर अगदी ४०० मुलींच्या समुदायात जावून ही त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. हे काम करत असतांना कुठेही आपला समाज काय म्हणतोय,आपली संस्कृती काय म्हणतेय या गोष्टी मध्ये न येवू देता शास्ञाने त्यांना काय शिकवलेलं आहे? शास्त्राने त्यांना शिकवलेली बाईची प्रजनन संस्था काय आहे? तिचं काम काय आहे आणि त्याच वेळेला शास्ञाने मला शिकवलेली पुरुषांची प्रजनन संस्था पण काय आहे? हे सगळं त्या वैद्यकीय दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहोचवतात. 
 
लैंगिक शिक्षणाची गरज ही फक्त महिलांनाच नाही तर‌ पुरुषांनाही त्या बाबतीत सजग असणं अगदी गरजेचं असतं माञ आपल्या समाजात ती मोकळीक नसते. तर डॉ. बोरीकरांनी ग्रामीण भागातील अनेक शाळेत मुलांशी बोलण्याचाही प्रयत्न केला.जर एक कार्यक्रम त्यांनी मुलींसाठी केला तर‌ दुसरा कार्यक्रम मुलांसाठी करणार असा त्यांचा आग्रह असतो.एवढेच नाही तर एक पाऊल पुढे जावून त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत‌ बोलावून आपल्या मुलांसाठी लैंगिक शिक्षणाबद्दलची जागृकता किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक मोकळीकता त्यांच्या कार्यक्रमांमधून निर्माण झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी हे शिक्षण नसणं ही गोष्ट कारणीभूत आहे. कारण अल्पवयीन मुलीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा समोरची व्यक्ती तिच्या शरीराशी काय करतेय हे तिला कळण्याइतपत तिची समज नसते ना. तो अत्याचार आहे हेच तिला माहित नसतं त्यामुळे हे शाळेतूनच शिकवलं पाहिजे कारण आजही अशी परिस्थिती आहे की, आपण आपल्या आईवडीलांपेक्षा आपल्या शिक्षकांवर जास्त विश्वास ठेवतो. तर हे शिक्षण शाळेतून देतांना नुसतं मुलामुलींशी बोलून उपयोग नाही तर‌ त्यांच्या पालकांनाही विश्वासात घेणं गरजेचं आहे. आता कायद्याने प्रत्येक शाळेमध्ये पालकसंघ आहे. जेव्हा डॉक्टर बोरीकरांनी पालकांशी संवाद साधला तेव्हा ते इतके खुश झाले की ते मॅडमला म्हणाले मॅडम तुम्ही जे बोलता आहात ते जीवनशिक्षण आहे. ते लैंगिक शिक्षण आपण असं म्हणूच शकत नाही. असही नाही आहे की मुलांना शिकवलं की उद्या ते जावून लैंगिक संबधच ठेवणार. तर असं नाही ये. आपली तरुण पिढी ही खुप हुशार आणि समजूतदार आहे. त्या कृतीमागचं विज्ञान समजून घेणं आणि मग त्यावर विचार करणं हा अगदी वेगळा मुद्दा आहे. 
 
याला अनुसरुच एक मुद्दा म्हणजे मुलींच्या मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज. आजही वर्षानुवर्षे चालत आलेल्या समज-गैरसमजांमुळे मासिक पाळीत महिलांना अस्पृश्य समजलं जातं. आजही त्यांना बाजूला बसवलं जातं तर काही समाजात घराबाहेर ठेवायला ही मागेपुढे बघितलं जात नाही. याबाबत डॉ.बोरीकर प्रत्यक्ष शिक्षकांशी संवाद साधत संपुर्ण प्रजनन संस्थेची आकृती फळ्यावरती काढून स्ञीबीज कसं तयार होतं? मृतपेशी काय असते. हे समजावून सांगतात. जर घरातील निर्णय प्रक्रियेत आई, वडील सगळेच असतात तर‌‌ मासिक पाळी बद्दल बोलतांना आजही जीभ का कचरते. मासिक पाळी म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी सगळ्यात सुंदर आहे. ज्यातून एक नवीन जीव‌ जन्माला  येतो. जो समाज मासिक पाळीत स्ञीला कमी लेखतो तो समाज त्या पाळीमुळेच आज या जगात आहे. हे माञ तो सोयीस्कर पणे विसरतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही पाळी हा मुद्दा देवाधर्माशी जोडलेला आहे. बाईची पाळी ही प्रत्येकच धर्मात वाईट मानली गेलेली आहे. मुस्लिम धर्मात तिला नमाज पडण्याची परवानगी नाही, हिंदू धर्मात नमस्कार करण्याची नाही तर‌ बाकी कुठल्याच धर्मात प्रार्थनेची परवानगी नाही. मग जर कुठल्याही सजीवाचा जन्म हा त्या गर्भाशयातून आहे तर मग त्या गर्भपिशवीला वाईट मानायचं काय‌ कारण? आजही दुकानदाराला सॅनिटरी नॅपकिन मागायला मुलींना लाज वाटते. सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट ते वर्तमानपञात  गुंडाळून देतात.  का बरं असं? ज्या दिवशी मुलगी पाळीला पाप समजणार‌ नाही, ज्या दिवशी नवरा, वडील, मुलगा, मिञ तिच्यासाठी स्वत: जावून सॅनिटरी नॅपकिन आणून तिची त्या चार दिवसांत काळजी घेईल त्या दिवसापासून 'पाळी' हा शब्द नॉर्मल असेल. पण या सगळ्या दिशेनं होणारा बदल हा खुप सावकाश आहे. यावर बदल‌ घडवून आणायचा असेल तर शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आपल्याला प्रत्येक कुलूपेचं ताळं तोडण्यासाठी उपयुक्त आहे. 

बोलत रहा,बोलत राहा समाजात सकारात्मकता पसरवत रहा. ताशेरे ओढले जातील माञ हेतू उदात्त असल्याने एक दिवस नक्कीच उजाडेल जेव्हा नावीन्यपूर्ण बदल‌ दिसून येईल. १०००० मुलींमागे दोन मुली जरी बदलल्या की मी आता पाळीत कुठलेही बंधन पाळणार नाही तरी यात माझं यश असेल असं डॉ. बोरीकर मॅडम आवर्जून सांगतात. 
बोरीकर‌ मॅडमच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश काळातील‌ जी आरोग्यव्यवस्था आहे तिच आपण पाळत आहोत. आपण आजही त्यात काहीही बदल केलेला नाही. जो सामाजिक शास्त्र हा विषय वैद्यकीय क्षेत्रात पुर्णपणे शिकवला जायला हवा तो पाहिजे तसा शिकवला जात‌ नाही. वैद्यकीय अभ्यासक्रम आता काळानुसार अद्यायावत करण्याची गरज आहे. शरीरक्रिया शिकवत असतांना माणसामाणसातील नातेसंबंध कसे असावेत. कुटूंबाला धरुन संबंध कसे असावे हेही त्यात अंतर्भूत केलं पाहिजे.

 दरवर्षी युनो ही संस्था महिलादिनाचे थीम देत असते. तर यावर्षीचं थीम आहे. 'CHANGE THE BUYEST' म्हणजे 'ग्रह बदलूयात'. मग आपल्याबद्दलचे ग्रह आपणच बदलूयात ना. बाई म्हणजे क्षमाशील, बाई म्हणजे नाजूक, बाई म्हणजे सुंदर, बाई म्हणजे प्रेमळ, बाई म्हणजे संवेदनशील, बाई म्हणजे सहनशील ही जी काही चौकट महिलांसाठी आखलेली आहे तर हीच आपण बदलूयात ना. मग आपण म्हणु शकतो मी एक महिला असण्याआधी मी एक माणूस आहे. आणि माणुस म्हणून सगळ्यांना असणाऱ्या भावना या आपल्याला सुध्दा आहेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्ञीला स्वत:ची ओळख आणि तिच्यातील अस्मितेची जाणीव होईल. ही सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी. खरच डॉ. रश्मी बोरीकर या जे शास्ञशुध्द पध्दतीतून लैंगिक शिक्षणाचे कार्य करत समाजात जागृकता निर्माण करता आहेत त्याला तोड नाही. त्यांच्या या कार्याला महिलादिनानिमित्त सलाम! 

   ‌                        🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

"सोन्यात माखुनही निराशा, कचऱ्यातुन मिळते तिला नवी आशा"

                        💗"तिचं जग"💗
आपल्या संस्कृतीची एक खुप वाईट सवय आहे. ती म्हणजे भेदाभेद. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, धर्मभेद हे जणु या पारतंञ्यात जखडून बसलेल्या संस्कृतीचे चार स्तंभच आहेत. जे उखडायचे प्रयत्न करणारेच दलदलीसारखे त्यात फसत जातात. कितीही जनजागृती झाली ,कळत असलं तरी वळवून घ्यायचं नसतं ही जणु गोचिडासारखी माणसाला चिकटलेली घाणेरडी सवय आहे. हे चार‌ भेद तर अभेद्यासारखे समाज पोखरायला उभे आहेतच. माञ त्यात‌ कमी की काय मानवनिर्मित कमीपणाचा भेदही त्याचबरोबरीने आता उभा रहात आहे. उच्चशिक्षित तरुण मोठ्या कंपनीत‌ नोकरी करतात तर ते साहेब उच्चवर्णीय, छोट्यामोठ्या कंपनीत‌ काम करणारे ते मध्यमवर्गीय आणि मग काय जे मोलमजुरी, कचराडेपोत ,भांडे घासून आपला उदरनिर्वाह करतात ते काय तर मग या मानवनिर्मित वर्णाचा भागच नाही. जे लोक फुटपाथावर काम करतात, कचरा वेचतात‌ त्यांना आपला समाज कमी लेखतो. 

पण काळ बदलतो; तो कोणासाठीच थांबत‌ नाही हे वाक्य माञ ते हा भेद निर्माण करतांना विसरलेच असणार यात दुमत नाही. आणि परिस्थिती बदलवणारा तो काळ होता कोरोना काळ. या काळात खऱ्या अर्थाने कोण या जगात सर्वश्रेष्ठ याची जाणीव करुन दिली. ज्या सफाई कामगारांना , कचरावेचक महिलांना आजपर्यंत कमी लेखण्यात येत आलं त्याच महिला अत्यावश्यक सेवा देत कोरोनायोध्दा झाल्या. कचरावेचक महिला याचं जीवन कसं असतं याचा साधा विचारदेखील आपल्या मनात कधीच‌ येत नाही. आपण तर आपल्या सेट आयुष्यात सुखी असतो माञ त्या अत्यंत कमी पैशात कचरावेचून आपलं आयुष्य जगत असतात. यात अनेक संघर्ष अगदी रोज उठल्यापासून त्यांची वाट बघत असतात. माञ दिवसाच्या शेवटी त्या समाधानी असतात. कसं बरं या आपल्या आयुष्यात संघर्ष असला तरीही समाधानी असतात? तर बघूयात आज कचरावेचक महिलेचं तिचं जग..!

खरतर या कचरावेचक आजी. दिवसभर औरंगाबाद येथील एका संस्थेद्वारे उभारण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रात कचरा वेचत आपला दिवस सत्कारणी लावतात. त्या आजींचे नाव तान्हाबाई अवचरमल. शिक्षण जेमतेम पहिली- दुसरी. घरी अत्यंत गरिब परिस्थिती असल्याकारणाने शिक्षण सोडून ‌बालवयात मोलमजूरी आजी करत असे. अल्पवयातच तान्हाबाईंचं लग्न झालं. सासरकडची परिस्थितीही बेताचीच. तेव्हा पाटलाच्या घरी त्यांचा दादला(पती) मजूरीला जात असे. दिवसभर राब राब राबून त्याकाळी वर्षाचे दोनशेच रुपये त्यांना मिळत असत. रोज मिळणाऱ्या मनभर दाण्यातून पोटाची खळगी भरणं खरच अवघड कारण त्याकाळी एकञ कुटूंबपध्दती असे. वरुन मागासलेला समाज म्हणत पाटलांचा रोष ओढवून घेणं ते वेगळच. आजी माञ स्वाभिमानी. त्यांनी त्यांच्या घरच्यांना ते काम सोडायला लावले. लोकांची गुलामगिरी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने कमावून खाऊ असं म्हणत‌ आजीने बाडबिस्तार गुंडाळत आपल्या पती व चुलत्यांसह रेल्वेने मुंबई गाठली. त्याकाळी रेल्वेला दहा रुपये तिकीट होतं. मुंबई, पुणे, रायगड अशा जिल्ह्यांमध्ये मोलमजुरी करत आजींनी आपल्या पतीला साथ दिली. तरुण रक्त असल्यामुळे त्या काळी आजीमध्ये ताकद होती. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी कुठं विटा उचल‌, कुठं सिमेंटचे टोपले उचल असे अनेक कामं केली. पण काळानुसार शरीरातील ताकद कमी झाली माञ गरिबीची झळ काही थांबली नाही. 

घरी शांत बसण्याची तान्हाआजींना सवय नसल्यामुळे त्यांना जेव्हा कचरा वर्गीकरण संस्थेच्या कचरावेचक कामाबद्दल कळालं तेव्हापासून त्या गोणी हातात‌ घेवून कचरावेचक महिला म्हणून काम करत‌ आहेत. संपुर्ण शहरातून येथे सुका कचरा आणला जातो. त्याचे वर्गीकरण करतांना व्यवस्थितरित्या त्यातील विक्रीयोग्य घटक बाजूला काढत संध्याकाळच्या सुमारास इथे असणाऱ्या सफाई साथींनी निवडलेल्या कचऱ्याचे धरमकाट्यावर मोजमाप केले जाते व‌ त्यानुसार‌ त्यांना दिवसाची मजुरी म्हणजेच त्यांच्या कष्टाचे पैसे दिले‌ जातात. हे पैसे दर रोजच्या मजूरीची नोंद करत आठवड्याच्या शेवटी त्यांना दिले जातात. त्यावर त्यांची उपजिविका भागते. तान्हा आजी म्हातारपणी काम करत आठवड्याला २- ३ हजार‌‌ कमवत कुटूंबाला हातभार‌ लावतात. त्यांची मुलगी, सुन आणि नात याही सफाईसाथी आहेत. त्यांची नात‌ ही अत्यंत हुशार आहे असं आजी आवर्जून सांगतात. कचरावेचक बनून काम करत‌ ती तिचा अभ्यास करत शिक्षण घेत आहेत. याचा आजींना अभिमान वाटतो. माझे दोन्ही मुलं शिकले नाहीत एक दारुही पितो माञ माझ्या नातींना जेवढं शिकायचं आहे तेवढं मी शिकू देणार असं आजी छातीठोक पणे सांगतात. 'जग आकाशात उडतं आपण निदान आपल्या मुलींना जमीन चालत यश गाठण्याची संधी तर देवूच शकतो ना!' हे अलौकिक उदगार त्या कचरावेचक आजींच्या तोंडून एकणं खरच त्यांना शिक्षणाचे कळालेले महत्व अधोरेखित करते.

कोरोनाकाळात जेव्हा काही दिवस त्यांना घरी रहावं लागलं तेव्हा त्यांच्या कचरा वर्गीकरण संस्थेनी घरपोच किराणा पोहोचवत त्यांची कशी काळजी घेतली या सगळ्या गोष्टी आजींच्या तोंडून ऐकतांना मन अगदी भारावून गेलं. कोरोना काळातही अत्यावश्यक सेवा देत तान्हा आजींनी जीवाची परवा न करता काम केले. खरच तान्हा आजी आणि त्याच्यासोबतच्या सगळ्या कचरावेचक महिला, सफाईसाथी म्हणजे देशाच्या खऱ्या योध्दा आहेत. सीमेवर जावून बंदूक घेऊन लढत नाही माञ कचऱ्यातून पसरणाऱ्या रोगराईला थांबवणाऱ्या सफाईसाथी आहेत. कोणालातरी ते काम करावंच लागणार‌ मग आजींनी केलं आणि त्यांच्यासारख्याच गरज असणाऱ्या अनेक महिलांनी केलं‌ तर काय‌ बिघडलं. आपण घरातला कचरा साफ करुन बाहेर‌ टाकतो; त्या‌ तोच कचरा उचलून‌ त्याचे योग्य वर्गीकरण करत देश स्वच्छ ठेवण्यात योगदान देतात. त्यातूनच मिळणाऱ्या चार पैशातून‌ आपली पोटाची खळगी भरतात. खरच घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करता- करता जर समाजातील वाईट विचारांच्या कचऱ्याचे, लोकांच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या उच्चनिच्चतेच्या कचऱ्याचे जर वर्गीकरण करता आले असते तर खरच त्या कचऱ्याची पार विल्हेवाट लावली असती. निदान देशाची या वाईट गोष्टींच्या कचऱ्यातून मुक्तता तरी झाली असती. 

कचरावेचक महिला या देशाचा अभिमान आहे. त्यांच्या कार्याला खरच सलाम! तान्हा आजींबद्दलचा तो संवाद खरच आजी-नातीचा संवाद झाला. त्या भरभरुन बोलल्या आम्ही फक्त ऐकत होतो. या वयातही दांडग्या उत्साहात त्या सफाईसाथी बनून काम करतात. तान्हा आजींना उंदड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महिला दिनाचा कचरावेचक तान्हाआजीसह सर्व सफाओ साथींना सलाम!

     ‌‌‌‌                       🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

 

शनिवार, ५ मार्च, २०२२

🏥"वैद्यकीय क्षेत्रातील कर्तबगार: डॉ. शिल्पा तोतला" 🏥

                   💗 "तिचं जग"💗
खरतर हॉस्पिटल‌ म्हटलं की सगळ्यांनाच भिती वाटते. पण आपल्या आजारावरचं एकमेव औषध म्हणजे डॉक्टर. तेव्हा माञ ते देवासारखे आपल्याला तारतात.डॉक्टर म्हणजे मनुष्य प्राण्यातला खराखुरा देव!

'आनंदी गोपाळ जोशी' हे नाव देशातील प्रत्येक महिला डॉक्टरच्या रक्तात‌ भिनलेलं एक शक्तीचं द्रव्य असणार. समाजाचा विरोध पत्करुन आपल्या‌ हिमतीच्या जोरावर दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घेत भारतातील‌ पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान या दुर्गेने करुन दाखविला. जीवसृष्टीवरील प्रत्येक मनुष्यजातीच्या आयुष्याची डोरच जणु डॉक्टरांच्या हातात‌‌ असते. त्यातल्या त्यात‌ महिला डॉक्टर‌ होणं‌ सोप्पी गोष्ट नवे. पण आजची स्ञी ही समाजाला जाब विचारत आपल्या अधिकारांसाठी लढणारी काली आहे. आता ती तिच्या वाटेवर तिच्याच आकलनानुसार वळणे घेत आपल्याला आवड असणाऱ्या गोष्टीतून शिक्षण घेत स्वबळावर ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. हिरा हा सुरुवातीला म्हटलं तर‌ दगडच  असतो पण जेव्हा त्याचे अनेक पैलू पाडून तो समोर येतो तेव्हा अब्जावधीच्या किंमतीचा तो मानकरी ठरतो. स्ञी ही या श्रृष्टीवरील एकमेव‌ अशी मनुष्य प्राणी आहे जिचे या आयुष्याच्या प्रवासात हिऱ्यासारखे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. ती मुलगी असते, ती बहीण असते, ती माय असते, ती जिवकीप्राण मैञिण असते, ती बायको असते,ती आजीही होते आणि या सगळ्या जवाबदाऱ्या निभावत ती वेगळं नातं निर्माण करते ते स्वबळावर उभं राहण्याचं. तिथे ती अगदी सराईतपणे व्यवसायाची मालकीण असते, नोकरीत प्रमाणिक कर्मचारीही असते आणि समाजाची जाण असणारी समाजसेविकाही असते. हे  पैलू पाडणारा तो देव खरच किती उत्कृष्ट जोहरी असावा; कारण हा एकमेव हिरा आहे ज्याचे अनाकलनीय पैलू आहेत. असाच एक अस्सलिखित हिरा आज 'तिचं जग' या सदरातून आपण उलगडणार आहोत. 

नाव शिल्पा तोतला. आपण म्हणतो नावात काय आहे? पण खरच या नावात काय गम्मत आहे हे पुढे तुम्हाला नक्कीच उमगेल. जळगावसारख्या छोट्या जिल्ह्यात शिल्पा तोतलांचं बालपण गेलं. शिल्पा तोतला या लहानपणासूनच  अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. घरात वातावरण अगदी वैद्यकीय क्षेञाचं होतं. त्यांचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते. जेव्हा शिल्पा मॅडम आपल्या आईवडीलांची रुग्णसेवा बघायच्या तेव्हा त्यांना खुप अप्रुप वाटत असे. आपले आई-वडील रुग्णसेवा करत अनेकांच्या आजाराचं निदान‌ करतात. ही खरच मनाला समाधान देणारी बाब आहे. त्यावेळला त्या १० वीत होत्या. तिथेच त्यांना त्यांच्या आतला आवाज कळाला की , आपल्याला वैद्यकीय क्षेपञातच करिअर करायचे. आपल्या आईवडीलांचा आदर्श बाळगत त्या तयारीला लागल्या. इयत्ता १२ वीत त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले जेव्हा अथक परिश्रमांच्या जोरावर खांदेशातील एक नाही ,दोन नाही तर तब्बल ३ जिल्ह्यांतून त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. वैद्यकीय क्षेञात भारतात कुठेही त्यांना प्रवेश मिळणं शक्य होतं. त्यांनी मुंबईच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आणि जळगावसारख्या छोट्या जिल्ह्यातील ही मुलगी आपले स्वप्न उराशी बाळगून निघाली पुर्णत्वाच्या दिशेने. मुंबई सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली महिला होण्याचा बहुमानही शिल्पा तोतला यांनी आपल्या परिश्रमांच्या जोरावर आपल्याकडे खेचून आणला. १९९८ मध्ये MBBS सारखा किचकट अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केला. आणि शिल्पा तोतला या नावाला 'डॉक्टर शिल्पा तोतला' अशी भारदस्त पदवी मिळाली. हा प्रवास खरतर त्यांच्यासाठी खडतर‌ होता. कारण लहान जिल्ह्यातून आलेली मुलगी. मुंबईचे वातावरण झेपेल का? तिथे इंग्रजीमध्ये सहजरित्या चालणारे संभाषण आपल्याला जमेल का? मुळात ती संस्कृती मला स्वीकारेल‌ का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती‌ त्यांच्या मनात होती. पण त्यांच्यातील काही गुण हे इतरांपेक्षा  बळकट होते. त्यांची आकलन‌ क्षमता खुप चांगली असल्याने ‌त्या पटकन एखादी चांगली गोष्ट आपल्याकडे खेचून आणतात. याच कारणामुळे त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील महाविद्यालयीन प्रवास अविस्मरणीय राहिला.

 MBBS चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी २००१पॅथॉलॉजीमध्ये शिक्षण पुर्ण केले. सुरुवातीलाच त्यांनी एमजीएम मध्ये पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम पाहिले. आपल्यातील जिज्ञासू वृत्ती घेरुन शिल्पा तोतला यांनी स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला.आणि 'कुशल पॅथॉलॉजी लॅबची' मुहूर्तमेढ औरंगाबादमध्ये रोवली गेली. यासोबत त्यांचे 'चिरायू चिल्ड्रन्स केअर' हॉस्पिटलही  लहान‌ मुलांसाठी काम करत आहे. आज औरंगाबादमधील कुशल पॅथॉलॉजी लॅबचा रिपोर्ट हा सर्वदेशात अग्रस्थानी मांडला जातो; एवढा तो विश्लेषणात्मक आणि परिपुर्ण असतो. याचे पुर्ण श्रेय हे डॉ. शिल्पा तोतला यांच्या सुव्यवस्थित शिस्तबद्ध संघटनाला जातं. त्यांची काम करण्याची पध्दत , त्यांचं रोजच्या कामाचं नियोजन या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन शिकावं ते फक्त कुशल पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावून. आज पॅथॉलॉजीमध्ये काम करुन अखंड रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. शिल्पा तोतलांना २१ वर्षे पुर्ण झालेत. पण त्या क्षेञातील नावीन्य त्यांनी अजुनही टिकवून ठेवलेले आहे. त्याचबरोबर त्यांचा छंद कुठेही त्यांनी मागे पडू दिला नाही. शिक्षण ,नोकरी आणि बाकीच्या अनेक गोष्टींबरोबरच त्यांनी नृत्य आणि संगीताची आवड खुप छान पध्दतीने जोपासली आहे. शालेय जीवनात त्यांनी कथ्थक या नृत्यप्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल‌ मारत पारितोषिक प्राप्त केले. तसेच स्वत:चे ज्ञान हे काळाबरोबर सुसंगत असावे या दृष्टीने त्या नेहमी स्वतः ला विद्यार्थीदशेतच ठेवतात. आणि सतत काही ना काही तरी शिकत असतात. त्याचबरोबर प्राध्यापिका म्हणूनही वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी काम केले आहे.

एक महिला जेव्हा काम करत असते तेव्हा ती अनेक जवाबदाऱ्यांसहित आपले काम उत्तमरित्या पुर्ण करत असते. यात जर‌ तिला तिच्या कुटूंबाची साथ मिळाली तर‌ मग यापेक्षा मोठं समाधान आणि यश तिच्यासाठी कोणतंच नसतं. शिल्पा तोतला मॅडमलाही लग्नानंतर आपल्या पतीची खंबीर साथ तर‌ मिळालीच पण आपल्या मुलांच्या डोळ्यात आईबद्दल असणारा तो‌ अभिमान खरच त्यांना अजून जोमाणं काम करण्याची ताकद देतो. घर आणि ऑफिस हे एकाच ठिकाणी असल्यामुळे डॉ.शिल्पा तोतला याचं घराकडे कधीच दुर्लक्ष झालं नाही. एका विशिष्ट वेळेनंतर जेव्हा डॉ. शिल्पा यांना अशी जाणीव‌ झाली की, आपली लॅब ही आता सुसज्ज झाली असून व्यवस्थित चालते आहे. आता गरज आहे आपण करत असलेल्या समाजकार्याला अजून गती देण्याची. त्यातून त्यांना एक लक्षात आलं की, डॉक्टरांनाच गरज आहे डॉक्टरांना योग्य ठिकाणी नोकरी शोधून देण्याची. डॉ. शिल्पा तोतलांना ही कल्पना सुचल्या नंतर त्यांनी लगेच हेडगेवार, धुथ हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अँडमिन्ससोबत यासंदर्भात विचारविनिमय केला असता त्यांनी क्षणार्धात सांगितले नक्कीच या क्षेञात उतरा. डॉक्टरांनाच उभं करण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. कारण डॉक्टरांच जग , डॉक्टरांची भाषा हे समजणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टरच असू शकते. तोपर्यंय वैद्यकीय क्षेञातला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे सहजरित्या त्या या क्षेत्रात उतरल्या आणि डॉक्टरांना जॉब प्लेसमेंट मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला व्यक्तीमत्व होण्याचा मान डॉ. शिल्पा तोतला यांच्या शिरपेचात रोवला गेला. या प्लेसमेंट अंतर्गत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी डॉक्टर्स स्वत: मुलाखती घेवुन पाठवले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे खेड्यापाड्यावरती, ग्रामीण वस्त्यांवरती त्याचबरोबर भारतातील शहरांसह दुर्गम भागातही डॉक्टर्स पोहोचले आहेत.  जवळजवळ १ लाख डॉक्टर्सचा डाटाबेस त्याच्याकडे उपस्थित आहे. पुढील काही दिवसांत देशाबाहेरील वैद्यकीय क्षेञात डॉ. शिल्पा तोतला प्लेसमेंट मिळवून देणार आहेत. ही खरच भावी डॉक्टरांसाठी मोलाची संधी असणार हे आहे. ९ वर्षांपुर्वी सुरु केलेल्या या प्लेसमेंटला  Merirecruiters हे नाव डॉ. शिल्पा तोतलांच्या नजरेतून मिळाले. ही औरंगाबाद शहरासाठी खरच अभिमानाची बाब आहे.  

अजूनही वैद्यकीय क्षेञात‌ येवू इच्छिणाऱ्यांना आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रवेश‌ उपलब्ध नाहीत . तसेच भारताच्या तुलनेत दुसऱ्या देशातील वैद्यकीय शिक्षण हे त्यामानाने स्वस्त असल्याकारणाने भारतातील विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिकावे लागते. आपल्या देशात‌ वैद्यकीय  महाविद्यालयांची क्षमता वाढावी व जास्तीत जास्त डॉक्टरांना संधी मिळावी असा प्राजंळ विचार डॉ. शिल्पा तोतलांनी मांडला. डॉक्टर शिल्पा तोतला यांना रुग्णसेवा करतांना कधीच शहरातील समस्येकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या शहरात काय घडतय याबाबत त्या  सदैव जागृक असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॅगलोर सारख्या आयटी हब असणाऱ्या शहरात जिथे औरंगाबादचे बहुसंख्य विद्यार्थी, कामगार‌ काम करतात त्याच शहरात‌ जाण्यासाठी साधी विमानसेवा उपलब्ध नसणं ही खरच लाजिरवाणी गोष्ट होती. त्या विद्यार्थ्यांचे हाल‌ओळखत त्यांच्या स्वप्नांना पंख मिळावे‌ म्हणून डॉ. शिल्पा तोतला यांनी एक संघटना स्थापन करुन सतत प्रशासनाचा पाठपुरावा करत औरंगाबाद ते बॅंगलोर ही विमानसेवा सुरू केली. यावेळी त्या शहराच्या आणि देशाच्या घराघरात पोहोचल्या. 

डॉक्टर शिल्पा तोतला या महिलांबद्दल बोलतांना सांगतात की, महिला या दोन खांबासारख्या दोन गोष्टींमध्ये खुप मजबूत असतात. एक तर त्या खुप प्रामाणिक असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एकावेळी अनेक कामं करून शकतात. ही गोष्ट त्यांच्या रक्तातच असते. या दोन गोष्टींचा समन्वय झाला तर‌ नक्कीच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेतून स्ञी ही नक्कीच आपली कर्तबगारी गाजवू शकते. ती जर चार भिंतीच्या आतून बाहेर पडली तर तिच्या बाह्य शिक्षणातून ती आपल्या घरात बदल‌ घडवून‌ आणू‌ शकते‌. तिच्या व्यक्तिमत्व विकासाला अजून ‌चालना मिळू शकते. तर स्ञी ही कर्तृत्व गाजवण्यासाठीच जन्माला आली आहे आणि तिने तिचे कर्तृत्व गाजवायलाच हवे. शिल्पा तोतला यांनी अत्यंत कमी वयात आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर वैद्यकीय क्षेञाला नावीन्यपुर्णता प्राप्त करुन दिली. 

रुग्णसेवेसाठी सदैव‌ तत्पर असणाऱ्या शिल्पा तोतला यांना स्ञी शक्तीचे अनेक पुरस्कार ‌प्राप्त आहेत. त्यांच्यातील स्ञी शक्तीने वैद्यकीय क्षेञात नवे आयाम स्थापन केले. त्यांच्या या कार्याचा अभिमान‌‌ त्यांच्या आईला वाटावा आणि माझी मुलगी माझा आदर्श आहे असं म्हणावं यापेक्षा त्यांच्या कामाची अनमोल‌ अशी पोचपावती त्यांच्यासाठी कोणतीच नसेल. अशी ही आईचा आदर्श असणारी त्यांची कर्तबगार लेक ! डॉ. शिल्पा तोतला या कर्तबगार विचारांच्या आणि आचरणाच्या प्रगल्भ मुर्तीला महिला दिनानिमित्त शुभेच्छा...! त्यांच्या ‌या कार्याचा गौरव सर्वदूर पसरत राहो हीच सदिच्छा....!

                   ‌‌‌‌    🖋️‌‌ ‌‌प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

❤️अनाथांच्या आशेचा किरण; "कविताआई"❤️

                         💗"तिचं जग"💗


तिचं जग! या महिलादिन विशेष सदराच्या सुरुवातीला आपण मायेच्या वलयात भ्रमंती करुन आलो. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची व्याप्ती ही पुढील‌ हजारो वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात अजरामर असणार आहे. पण हा इतिहास वाचणं आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणणं हे कोणाच्या अंगवळणी पडत‌ नाही. मग काय, समाजहिताचे ते कार्य इतिसाच्या पानावरच निरंतर आपल्या वाचनातून जिवंत असते. माई निवर्तल्या पण त्यांच्या कार्याचं या वलयला अजूनही सिमा नसणार ये, हा प्रत्यय तुम्हाला आपल्या औरंगाबादमध्ये येईल जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या अतोनात मातृत्वाने भरलेल्या वात्सल्याच्या मुर्तीला भेट द्याल.

आई, हे साम्राज्य डोळ्यांच्या दृष्टीत सामावणारं नाही. ज्यांना ह्या साम्राज्याच्या सुरक्षित पटलाखाली जगण्याची संधी मिळते  त्यांना या अमृताची गोडी रोज त्यांच्या आईच्या, कुटूंबाच्या सहवासात प्राप्त होत असते. पण शेवटी जीवनचक्र आहे ते कोणासाठीच समान नसते. दु:ख, यातना,संघर्ष ,आनंद, जिव्हाळा हे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जगण्या अविभाज्य भाग असला तरीही काहींच्या माञ जखमांवर फुंकर घालण्यापलीकडे त्यांचं आयुष्य खडतर असतं. त्यात अजूनही स्ञीजन्म आपल्या समाजात काही प्रमाणात कलंक मानला जातो हे कटु सत्य आहे. अशा निरपराध मुलींचा जन्म झाल्यापासून कचऱ्याच्या डब्यात तर कधी फुटपाथावरुन त्यांचा हा प्रवास सुरू होतो  आणि गोंधळलेल्या अवस्थेत तो निष्पाप जी माञ पोटापुरत्या अन्नासाठी भटकत असतो. आपण असं का भटकतोय? हे समजण्यापलीकडची त्यांची बिकट अवस्था असते. पण  आयुष्यात जसे दु:ख देणारे असतात तसेच त्याच दु:खावर सुखाचे पांघरुन घालणारे ही जन्माला येतच असतात. तर हेच वात्सल्याचे पांघरुन घालून या निराधार मुलींच्या आयुष्याला उबदार करण्याचे काम औरंगाबादमधील अनाथांची माय 'कविता वाघ' करता आहे. तर‌ जाणुन घेवुयात याच मायेचं तिचं जग!

कोणतेही कार्य हाती घेण्याआधी आपण त्या परिस्थितीतून प्रवास केलेला असतो. असाच अनुभव कविताईंना आपल्या बालपणात आला आणि त्यांच्या हातून निराधार बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कविताईंचे संपुर्ण बालपण हे कन्नड तालुक्यातील मेहगाव येथे ४३-४४ लोकांच्या कुटूंबात गेले. त्यांचे आजोबा हे गावचे पोलीस पाटील असल्याने गावात‌ त्यांचे संबंध सलोख्याचे होते. त्यांच्या आजोंबांकडे गावातील प्रत्येक समस्येचा न्यायनिवाडा होत असतांना कविताताईंवर त्या सगळ्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झाला. त्या अत्यंत बारकाईने आजोबा कशा पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवितात याकडे लक्ष‌ द्यायच्या. आपोआपच त्यांच्यात समाजाप्रतीची आत्मीयता निर्माण झाली व सामाजसेवेची मशाल नकळत त्यावेळेस त्यांनी आपल्या हाती घेतली. शिक्षणातून वाटचाल करत त्यांची जिद्दीने यश गाठले. अचानक विज पडावी तसा त्यांच्या आयुष्यात गडगडाट झाला जेव्हा‌ १९९६ साली त्यांचे वडील किसनराव घुगे यांचे अपघाती निधन झाले. काळा मोठा आला होता;कुटूंब पार‌ खचून गेले. कविताताईंना न पेलवणारं दु:ख झालं कारण बापाचं छञ हरपलं होत. क्षणार्धात ओळख पुसली गेली. ते तालुका प्रमुख असल्याकारणाने कुटूंबासह , गोरगरिबांचा आधारही संपला होता. कविताईंनी परिस्थितीचे गांभिर्य समजून घेतले आणि वडीलांच्या कार्यात झोकून देवून काम करण्याचा दृढ निश्चय केला.

कविताताईंनी सन १९९९ वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जयकिशन शिक्षण संस्थेची' स्थापना केली. समाजात असलेली मुलींबद्दलची विषमता नेहमीच त्यांच्या मनाला खटकत होती. मुलगी ही समस्यांचे मुळ नसून समस्या सक्षमपणे हाताळणारा त्या समस्येचा पहिला आणि शेवटचा उपाय आहे असे त्यांचे ठाम मत आहे. आणि हेच मत प्रवाहात आणण्यासाठीचा त्यांचा पहिला प्रयत्न म्हणजे 'शांती कंप्युटरची' सिडको येथे स्थापना. यातून अनेक गरिब मुलींना या इंन्स्टिट्युट पर्यंत आणून कप्युटरचे शिक्षण देत स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. परिस्थितीला माञ हे मंजूर नव्हते. आर्थिक कारणांमुळे हे इंन्स्टिट्युट जरी बंद करावे लागले असले तरी हा छोटासा स्वल्पविराम होता. या आर्थिक परिस्थितीत त्यांचे पती त्यांच्या सोबत‌ खंबीरपणे उभे राहिले. समाजासाठी चांगले काम करतांना वाईट प्रवृत्तीचा सामना हा करावाच लागतो‌. पण त्यातून लढण्याची ताकद मिळते आणि याच ताकदीचा वापर करत कविताताईंनी औरंगाबादमधील सातारा परिसर‌ येथे 'भगवानबाबा प्राथमिक शाळेची' सुरुवात केली. परिस्थितीमुळे शिक्षणाची वाट अडलेले  विद्यार्थी, निराधार , अपंग विद्यार्थी यांच्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. कोणत्याही समाजकार्यात फळाची अपेक्षा न करत झटत राहणाऱ्या कविताईंच्या कामाची‌ दखल त्यावेळच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली व तुम्ही वसतिगृह का सुरु करत नाही असा प्रस्ताव त्यांच्यासमोर‌ मांडत त्यांच्या कार्याची ही ज्योत ज्वलंत करण्याची संधी त्यांना उपलब्ध करुन दिली. यातूनच २००५ साली त्यांनी कन्नड तालुक्यातील १४ गावांमध्ये सुसज्ज वसतिगृह निर्मिती करत ७०० विद्यार्थ्यांना ममतेचा हात दिला. पण तरीही मुलींचा प्रश्न कायम होता. निराधार मुलींना आधार देणं ही आपली नैतिक जवाबदारी आहे‌ या विचाराने त्यांना कधीच स्वस्त बसू दिलं नाही. सरकार दफ्तरी येरझाऱ्या घालत त्यांनी अखेर २००६-२००७ साली महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार महिला व बालकल्याण अंतर्गत ५० मुलींसाठी 'भगवानबाबा बालिकाश्रमाची' स्थापना केली. आज त्या बालिकाश्रमाला वटवृक्षाचं स्वरुप आलय.तिथं गेलं की तो मुलींचा निरागस आवाज, लहान वयात आलेला समजुतदार पणा पाहून एक आनंद निर्माण होतो सोबतच समाजातील परिस्थिती बघून अश्रूही तरळतात. काही दोष नसतांना या मुलींना निराधार शिक्का लागतो, निसर्गतः मिळालेले अपंगत्व समाजाची बघण्याची दृष्टी बदलवते, अनाथ नसूनही अनाथपण नशिबी येते. पण त्या मुलींना याच वाईट समाजात अभिमानाने ‌जगण्यासाठी कविताताई तयार‌ करतात.

बाहेरच्या जगात त्यांच्या याच मुली आज कर्तृत्व गाजवता आहेत. या मुलींचं संगोपन करणं खरच त्याच्यासाठी अवघड होतं पण एका आईने सगळं निभावलं. सुरुवातीला बालिकाश्रमाला अनेक खडतर‌ प्रसंगांना तोंड द्यावं लागलं कारण ५० मुलींचीच परवानगी होती. पण त्या कायदेशीर बाबींची झळ कधी मुलींना कविताताईंनी लागू दिली नाही. २००८-०९ साली जेव्हा बालगृहाची जाहिरात त्यांनी वाचली तेव्हा आश्रमाची मान्यता मिळवत निराधार‌ मुलांनाही मायेची साद‌ त्यांनी घातली. त्यावेळी भगवानबाबा आश्रमाध्ये मुली, योगेश्वरी बालकाश्रमामध्ये मुले तर गोकूळ व भगवानबाबा  बालकाश्रमामध्ये‌ मुले असे एकूण ४०० मुलामुलींचे आश्रयस्थान कविताताई झाल्या. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं म्हणतात. याच म्हणीला खोडत कविताईंनी तिन्ही जगातील‌ मुलामुलींना एकसंध करत वात्सल्याच्या कवेत त्यांना घेतलं. कविता ताईंच्या मुलींचा दिवस हा उठल्यापासून आव्हानं घेवून येतो.अगदी‌ सकाळी ब्रश करण्यापासून ते स्वत:ची तयारी करुन शाळेत जावून येई पर्यंत त्यांची परिक्षा असते. एखादं मुल जेव्हा बालिकाश्रमात‌ आणलं जातं तेव्हा त्याची मनोवस्था खचून‌ गेलेली असते. नेमकं आपल्यासोबत‌ घडतय तरी काय? हे आकलन करण्याइतपतही समज त्या लेकरांना नसते. तेव्हा फक्त गरज असते ती मातृत्वाची. त्या मुलावर झालेल्या मानसिक आघातातून त्याला बाहेर काढत‌ आश्रमात एकरुप होण्यात मदत करणं खरच सोप्प नसतं. पण माया लावली की वासरुही एक दिवस हंबरडा फोडत अश्रुंतून दु:खाला वाट मोकळी करुन देतेच.

या आश्रमाचा कविताताईंच्या अथक परिश्रमातून खुप विस्तार झाला आहे. त्यांच्या कार्याला सामाजिक संस्था,अनेक कुटूंब , महाराष्ट्र ‌शासन सदैव हातभार लावत असतात. कोरोना काळातील परिस्थितीतही कविताईंच्या या संस्थेला अनेक समाथिक संस्थांनी मदतीचा हात दिला. कविताताईंचा काळजी होती माञ मनात ठाम विश्वास होता की या संकटाला फाटकाच्या आत प्रवेश करू द्यायचा नाही आणि तसैच झाले. सर्वतोपरी काळजी घेत त्यांनी आपल्या लेकरांच रक्षण केलं. कविताताई आपल्या मुलींना उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांना यश म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच पडत असते. आज या आश्रमातील कविताताईंच्या लेकी स्वबळावर इंजिनिअर, डॉक्टर, फार्माशिस्ट अशा अनेक क्षेञात बालिकाश्रमाचं नाव मोठं‌ करता आहेत. मुलांमधील‌ गुण ओळखून त्याच्या छंदाचं रुपातंर हे उपजीविकेत कसं करता येईल‌ याचं योग्य मार्गदर्शन हे‌ कविताताई आपल्या लेकरांना करत असतात. याच मुलींसाठी योग्य जोडीदार बघून त्या त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळवून देतात. यापेक्षा मोठं काय असू शकतं या मुलींसाठी. कविताताईंचा समाजकार्याचा हा आलेख खरच आकलनापलीकडच्या पातळीवर आहे. त्यांनी त्यांच्या मुलींना सर्व परिस्थितीशी तोंड देण्यासाठी सक्षम केलेले आहे. पण तरीही का बरं समाजात मुलगी जन्माला अजून विरोध आहे? का आपल्या आईवडीलांना मुलं वृध्दश्रमात पाठवतात? एवढी लोकसंख्या असतांना ही निष्पाप लेकरं निराधार का? तर‌ या परिस्थितीवर भाष्य करतांना कविताताई सत्यपरिस्थितीची जाणीव करुन देतात. मुलगी जन्माला येणं म्हटलं की आईवडीलांच्या जीवाला अगदी घोर‌ लागतो तिची सुरक्षा, तिच्या लग्नाचा खर्च, गरिब परिस्थिती असून तिच्या कल्याणासाठी अव्वाच्या सव्वा हुंडा या विचारानेच‌ ते खचून जातात. ग्रामीण भागात तर सध्या वातावरण एवढं खराब आहे‌ की आईवडील शेतात जातात पण मन‌ माञ मुलीमध्ये अडकलेलं असतं की ती एकटी घरी सुखरूप असेल ना? मग यावर उपाय काय तर मुलगीच नको; यामुळे समाजात विषमता पसरते. जर हुंडाबळीसारखी गुन्हा असूनही ही प्रथा अजून चालू असेल‌ तर कोणत्या बापाला आपल्या मुलीची काळजी वाटणार‌ नाही. जर या जगात तिला मुक्त फिरता येत नसेल तर कोणता बाप बेचैन होणार नाही. हुंडा देणं‌ आणि घेणं या गुन्ह्याला जेव्हा सरकार दरबारी कडक शिक्षेतून आळा बसेल तेव्हा माञ कोणत्याच बापाला आपली लेक ही भार‌‌ वाटणार‌ नाही. उलट एक मुलगी ही एका मुलांपेक्षा आईवडीलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. ज्या मुलीला नाकारलं जातं तिच बापाच्या काळजाचा तुकडा असते. पण या समाजातील हुडाबळीसारख्या कुप्रथांमुळे बापलेकीचं नात्यात दुरावा ही गोष्ट आली.

आपण ज्या घरात वाढतो त्या घरात होणाऱ्या संस्कारातून आपण घडत असतो. आपण कधी विचारच केला नाही की , एखादा मुलगा आपल्या पालकांना वृध्दाश्रमात  नेवून सोडत असेल‌ तर आपण त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की, काय हा मुलगा आईवडील सांभाळत‌ नाही. पण तो असंं का वागत असावा ही मनस्थिती आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला का?त्याच्यावरती आधी तसे संस्कार रुजवले गेलेले नक्कीच असू शकतात.पण त्याच्यावर संस्कार होतांना कुटूंबातलं वातावरण जर त्याला तसं मिळालं असतं तर कदाचित त्याने ते पाऊल उचललं नसतं. यासाठी भांडवल, पैसा लागत नाही तर आपण करणाऱ्या कामातून मिळणारं समाधान महत्वाचं असतं. मनाची श्रीमंती‌ आणि आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी समाजाला देणं यापेक्षा दुसरं सुख नाही. मी, माझं यापलिकडे जावून विचार करण्याची शक्ती जर मुलांमध्ये निर्माण केली तसेच आपण समाजाचं देणं लागतो हे संस्कार जर आपल्या मुलांवर केले तर नक्कीच कोणत्याच आईवडीलांना वृध्दाश्रमाची पायरी चढावी नाही लागणार. कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. समाजातील परिस्थितीत खोलवर शिरून या गोष्टी का घडत असाव्यात हे शोधून काढले तर‌ नक्कीच समाजात परिवर्तन घडवून आणायला वेळ नाही लागणार. कविताताईंची समाजाप्रती असणारी ही जाण खरच विचार करायला भाग पाडणारी आहे. महिला व मुलींनी आपल्यात अंतर्भुत असणारी शक्ती  ओळखली पाहिजे. तिच्यातील उर्जेचा योग्य प्रकारे वापर करुन ती नक्कीच स्वतः च्या पायावर भक्कम पणे उभी रहात आपल्या कुटूंबालाही साथ देवू शकतेच आणि हे फक्त स्ञीच करु शकते. तर उठा, दुसऱ्यांसाठी जगता जगता एकदिवस आतमधल्या स्वत:च्या प्रतिमेला भेटा तुम्हाला नक्कीच तुमचं जग सापडेल. कविताताईंचा हा संदेश अगदी मोलाचा आहे. कविताताईंनी काम करतांना कधी स्वत:चा विचार केला नाही. सतत त्यांच्या मुलींसाठी त्या झटत असतात. एवढेच नाही तर २०१२ पासून त्या सातारा येथील पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा समितीत कार्यरत आहेत. यातून त्या समाजातील महिलांच्या प्रश्नाची सोडवणूक करत त्यांचे समुपदेशन करतात. त्यांचे आयुष्य सत्कारणी लावण्यात त्यांना मदत करतात.  त्यांचे कार्य हे कोणत्याच चौकटीत बसणारं नाही एवढं ते विलोभनीय आहे. कविताताईंच्या नावातील कविता ही त्यांचा प्रवास शब्दबध्द करतांना अडखळेल एवढा तो शब्दांपलिकडचा प्रवास अतुट आहे..
कविताताई आणि त्यांच्या बालिकांचं नातं म्हणजे...

पदर तुझा पदरातुन माये काय कसा उलगडला
वात्सल्याचा अनेक क्षणांनी तुझ्यामुळे बहरला...
जगण्या माझ्या अर्थ दिला, तु नावाला भावार्थ दिला तु
घडणाऱ्या अनाथ जीवाला मायेचा सार्थ दिला...
आयुष्याच्या या कवितेला तुच कवि अन् सुर दिला तु....

कविता वाघ ह्या हजारोंच्या मॉं साहेबांना शतश: नमन! महिला, मातृत्व आणि मातृत्वातून निर्माण केलेलं तुमचं मातृत्वाचं प्रांगण हे सदैव खुललेलं असावं .भगवान बाबा बालिकाश्रमातील प्रत्येक मुलीचा झोका उंचच उंच झुलावा अगदी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या त्या कवितेतील आशेच्या किरणासारखाच‌...!

आई...!
आशेचा किरण तुझ्याही मनात असू देत| तु किती हिंमतवाण आहेस हे जगालाही कळू दे|अनेक रंगांनी तुझे जीवन रंगून जावू दे| आणि तु खुप मोठी होतांना मला पाहू दे|

कविताताई बालिकाश्रमातील लेकरांची प्राणप्रिय आई,  तुमच्या कार्याला सलाम. महिलादिनाच्या या आईला लाख लाख शुभेच्छा....!

                           🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


गुरुवार, ३ मार्च, २०२२

🇮🇳🇮🇳🇮🇳वर्दीच्या सोबतची ती🇮🇳🇮🇳🇮🇳

                        💗"तिचं जग" 💗

पोलीस म्हटलं की समोर उभी राहते ती खाकीतली शिस्तबध्द आकृती. पोलीस हा शब्द उच्चारला की‌ आपोआपच आपल्या नजरा उंचावतात आणि हाताचा तळवा सलाम ठोकण्यासाठी सरासवतो. हे क्षेञ म्हणजे देशसेवा, समाजसेवा, कायदा व‌ सुव्यवस्था या सुञींनी सज्ज असे देशप्रेम. पुर्वी पोलीस म्हंटले की रुबाबदार असा पुरुषवर्ग जो कोणत्याही संकटाचा छातीठोकपणे सामना करेल. पण आता माञ गृहसेवेबरोबरच देशसेवेचा वसा घेत आपल्या हिमतीतून आणि कौशल्यातून शञुला धुळ चारणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या क्षेञाला काबीज केलय. जिथे महिला साधा उंबरठा ओलांडत नसे तिथे आज हीच स्ञी शक्ती प्रसंगी सीमेपार जाऊन गुन्हेगारांना चाप बसवण्यात मागे हटत नाही.

 अशाच धडाकेबाज पोलीस कर्मचारी सिल्लोड ग्रामीण पोलीस चौकीत आहेत ज्यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अंगावर वर्दी चढवली. ज्या वयात मुली फक्त शिक्षणाचे स्वप्न बघतात, आयुष्याच्या नवीन महाविद्यालयीन प्रवासाकडे वळतात,  त्या वयात तेजस्विनी सुरवसे/ जोशी मॅडम देशकार्यासाठी सज्ज झाल्या. 
 
  अभिमान अशा या रणरागिणीचा...
  जिने सत्यात उतरवला ध्यास आपुल्या आयुष्याचा...
  पाहुयात‌ तिचं जग...!
  
  वर्दीतल्या देशसेविका सिल्लोड ग्रामीण पोलिसच्या बीट मदतनीस पोलिस अंमलदार  तेजस्विनी जोशी मॅडम. आपल्या कामातून सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये छाप पाडत कायद्याचे रक्षण करणाऱ्या तेजस्विनी मॅडम या मुळच्या लातूरच्या. त्यांचे शालेय शिक्षण हे ज्ञानेश्वर विद्यालयातून तर दहावीनंतरचे शिक्षण हे‌ त्यांनी शाहू महाविद्यालय लातूर येथुन पुर्ण केले. तेजस्विनी मॅडम लहान असतांना आपल्या वडीलांची वर्दी बघतांना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक निर्माण होत असे. त्यांची समाजकार्याप्रती असणारी धडपड आणि वर्दीवरील प्रेम यातून ते नेहमी सांगायचे की आपण देशासाठी लढलं पाहिजे, देशासाठीच जगलं पाहिजे आणि देशासाठीच सर्वस्व अर्पण करायला पाहिजे. त्यांचे शब्द हे तेजस्विनी मॅडमच्या उरात खोलवर रुजले आणि वडीलांच्या वर्दीत त्या स्वत:ला बघायला लागल्या. मग हेच स्वप्न उराशी बाळगत तेजस्विनी मॅडमने शाळेच्या वयापासूनच वर्दीची तयारी करायला सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कराटे प्रकारात ब्लॅक बेल्ट पुर्ण करत आपली शारीरिक क्षमता वाढवली. स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खडतर परिक्षेसाठी सक्षम करत आपली क्षमता सिध्द केली. आणि पहिल्या प्रयत्नातच संपादन करत वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पोलीस भर्तीमध्ये रुजू झाल्या. हे यश त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटूंबासाठी डोळे दिपवणारं‌ होतं. त्यानंतरचे नऊ महिने त्यांच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारे ठरले जेव्हा पुढील‌ ट्रेनिंगसाठी त्यांना नागपूरच्या पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये जावे लागले. तिथे फक्त व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या सक्षम करत‌ नाही तर अनेक दिव्यातुन पार होत तुमची यशोशिखर गाठण्यासाठीची तयारी करुन घेतली जाते. हया नऊ महिन्यांच्या प्रवासात‌ एक व्यक्ती म्हणून त्यांच्यात फार बदल‌ झाले हे त्या आवर्जुन सांगतात .त्या काळात‌ ती १८ वर्षाची तेजस्विनी ९ महिन्यांनंतर बाहेर पडत असताना एक जवाबदार कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी म्हणून बाहेर पडली. 
  
सुरुवातीला त्या औरंगाबाद ग्रामीण मुख्यालय येथून वैजापूर पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्या. त्यानंतर अजिंठा पोलीस स्टेशन आणि आता सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रुजू आहेत. त्यांच्या आयुष्याचा एक नवा काळ त्यांच्यासमोर‌ भरपूर कसोट्या घेवुन उभा ठाकला. घरातच वडील आणि काका पोलिस हेडकॉन्स्टेबल तर काकांचे दोन्हीही मुले  त्यांची भावंड पोलिस ऑफिसर असल्यामुळे बऱ्यापैकी त्या त्याच वातावरणात वाढलेल्या असल्याने त्या लगेच तिथे रुळल्या. याच दरम्यान त्यांचा विवाह सध्याचे सिल्लोड ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे  बीट जमादार अनंत जोशी यांच्याशी  पार पडला. दोघही पोलीस क्षेञात कार्यरत असल्याने मुळातच समाजसेवेचे बीज‌ त्यांच्या घरात रुजलेले आहे. या क्षेञात तेजस्विनी जोशी यांना ११ वर्षे पुर्ण झाले असून‌ सध्या त्या सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आपलेच श्रीमान‌ बीट जमादार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली बीट मदतनीस म्हणून कार्यरत आहेत.

 बीट मदतनीस हे काम खरच सोप्पं नाही. दिलेल्या गावात जावून कायदा आणि सुव्यवस्था राखणं अत्यंत गरजेचे होवून‌ जाते. अशा वेळेस अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. हुंडाबळी, गुन्हेगारी,अंतर्गत वाद,चोरी,अशा अनेक प्रकरणांचा गांभिर्याने विचार करत गावात काम करावे लागते. अनेक महिला जेव्हा आपले प्रश्न घेवुन येतात तेव्हा एक महिला म्हणून त्या प्रसंगात‌ तिला धीर‌ द्यावा वाटतो पण कायदा हा सर्वांसाठी समान असतांना न्यायदेवतेच्या नजरेतून गुन्हा सिध्द होईपर्यंत समोरची व्यक्ती ही आरोपीच असते. अशावेळेस तेथील‌ नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणं खरच आवश्यक असतं. पण तेजस्विनी मॅडम या आपला बीट उत्तम प्रकारे सांभाळतात. त्यांचं कर्तव्य अत्यंत चोख रित्या पार पाडतात. म्हणूनच खेड्यातील महिलांच्या नजरेत त्या लेडी सिंगमच आहेत. एक महिला पोलीस अंमलदार होऊन घरची जवाबदारी सांभाळणं खरच अवघड असतं कारण पोलीसी क्षेञात कर्तव्य पार पाडतांना वेळेचं बंधन रहात नाही. जेव्हा फोन‌ वाजला तेंव्हा कर्तव्यावर हजर‌ होणं भाग असतं. एक आई म्हणून जेव्हा तेजस्विनी जोशी आपल्या कुटूंबाकडे बघतात तेव्हा त्यांना त्यांनी घडवलेल्या स्वावलंबी मुलांचा अभिमान वाटतो. पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की काटेकोर शिस्त ही आलीच आणि‌ हिच तेजस्विनी जोशींनी आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबली. सुदैवाने त्यांचे‌ श्रीमान हे‌ याच क्षेत्रात कर्तव्यदक्ष असल्याने त्यांना आपल्या पत्नीबद्दल नक्कीच सहानूभुती आहे. दोघांनाही तेवढाच वेळ आपल्या कर्तव्यावर द्यावा लागतो तर‌ घराची जवाबदारी ही दोघांचीच हवी अशा समजुतदार पाविञ्यातून ते आपल्या पत्नीला सर्वतोपरी‌ मदत करतात.
 
एक पोलीस ऑफिसर म्हणून‌ त्या आपल्या पदाला न्याय देतच आहेत पण मुलांकडेही लक्ष देत त्या आपला आईधर्म पाळतात. पोलीस क्षेञात काम करतांना मानसिक तणाव हा नक्कीच येत असतो. कारण पोलीस स्टेशन मध्ये महिला किंवा पुरुष असा भेदभाव नसुन पोलीस हे फक्त पोलीसच असतात. दोघांनाही सारखेच कामे दिली जातात. हे काम करत असतांना अनेक विचारांनी पोलीस ग्रासलेले असतात कारण तेही शेवटी मनुष्यच आहेत. जेव्हा सामान्य जनता गणेशोत्सव, दिवाळी, शिवजयंती असे सण साजरे करत असतात तेव्हा माञ पोलीस हे राञंदिवस सुरक्षारक्षक बनून आपले कर्तव्य बजावत असतात. त्या सणांच्या काळात कुटूंबाचा न‌ मिळणारा सहवास त्यांना नक्कीच आतून‌ पोखरत असतो. ही वास्तव परिस्थिती आहे तर सहाजिकच आहे ताण येणं. पण याही परिस्थितीत तेजस्विनी जोशी मन‌ खंबीर करुन समाजाच्या आनंदात आपला सण साजरा करत कर्तव्य पार पाडत असतात. याच कार्याची दखल म्हणून तेजस्विनी जोशी  आजपर्यंत अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या रोखठोक कामामुळे नेहमीच त्या चर्चेत असतात. 


प्रत्येक महिला ही अनेक गुणांनी सुप्त असते. काळाच्या ओघात‌ माञ तिचे ते गुण कुठेतरी दबले जातात. माञ तेजस्विनी जोशी या वाक्याला पुर्णपणे अपवाद‌ ठरतात. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य पार पाडतांना आपल्या छंदांचं ही संगोपण करणं ही खरच सोपी गोष्ट नव्हे. तेजस्विनी जोशी या उत्तम नृत्यांगणा आणि गोड गळ्याच्या गायिका आहेत. या प्रचंड धकाधकीच्या जीवनात त्यांनी त्यांचे हे छंद अगदी चोखंदळपणे जपले आहेत याबद्दल त्या खरच कौतुकास पाञ ठरतात. पोलीस ऑफिसर‌ म्हटलं की लोकांच्या मनात‌ धाक असतो की हे कशा पध्दतीने आपल्या समस्या सोडवतील माञ‌ तेजस्विनी जोशींच्या बोलक्या आणि स्वच्छंदी स्वभावातुन त्यांनी जनतेच्या मनात स्वतः चं घर‌ निर्माण करत विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांना बीट दिलेल्या गावात त्या रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होतांना दिसते. महिलांचे प्रश्न त्यांच्यात बसुन तेजस्विनी जोशी समजून‌ घेत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे त्या नेहमीच देत असतात. या जगात वावरत असतांना बऱ्याच महिलांवर अतिप्रसंग ओढावतात , भरपुर समस्यांना त्या सामोऱ्या जात असतात‌ तर‌ अशा वेळेस त्या सगळ्या महिला वर्गाला आवाहन करतात की महिला पोलीस या सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दामिनी पथक २४ तास कार्यरत असते तर‌ तुम्ही न घाबरता प्रवास करा आपली स्वप्न पुर्ण करा. मनात कुठलाही न्युनगंड न‌ बाळगता, भिती न बाळगता त्वरित महिला पोलिसांशी संपर्क साधा. तेजस्विनी मॅडमनी आतापर्यंत अशा अनेक केसेसद्वारे महिलांना आधार‌ देत परत नव्याने उभे केले आहे. तेजस्विनी  जोशी यांचे वर्दीतले स्वप्न पुर्ण झाल्यानंतर त्या अविरतपणे आपली देशसेवेची मशाल रोज आपल्या कार्यातून उजळवत आहेत. कधीही फळाची अपेक्षा न‌ करता त्या या समाजकार्यात झोकुन देवून काम करत आहे. पण नक्कीच जर आपल्या कार्याची कोणी दखल‌ घेत  पाठीवर कौतुकाची थाप पडली तर‌ आपल्यात अजून दांडगा उत्साह संचारतो आणि आपण आपले काम अजून चांगले करण्यासाठी धडपडत असतो. तशीच थाप नुकतीच त्यांच्या पाठीवर‌ एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या पुरस्काराने पडली. सपत्निक पुरस्कार स्वीकारणं हा त्यांच्या साठी खरच सोनेरी क्षण घडला. ही सुखद‌ घटना त्यांनी आपल्या मनात बंदिस्त करुन‌ घेतली. कायद्याच्या मंदिरात पोलीस ऑफिसर म्हणून महिला कर्मचाऱ्यांना समान‌ वागणूक दिली जाते. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या कामात प्रगती करण्यासाठी वाव‌ मिळत असतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ऑफिसर आपला विकास साधत असतात. एकरुप होवून काम करणे, प्रसंगावधान राखून निर्णय घेणे अशा अनेक गुणानुक्रमामुळे तेजस्विनी जोशी सगळ्यांमध्ये वेगळ्या भासतात. 

एक स्ञी‌ म्हणून या क्षेञात येणाऱ्या महिलांसाठी संदेश देतांना तेजस्विनी मॅडम सांगतात की, जेव्हा ती खाकी वर्दी अंगावर‌ चढते त्या क्षणापासून स्ञी आणि पुरुष हा भेदभाव तिथे पुरला जातो आणि समाजाच्या नजरेत तुम्ही फक्त खाकीतले तारणहार असतात. एक वेगळीच ऊर्जा त्या रंगातून आपल्यात संचारते आणि खाकीतले सौंदर्य आपलं रूप खुलवते‌. आता स्पर्धा प्रचंड वाढली असली तरी मेहनतीतून कोणतेही शिखर सहज सर करता येते. मुलगी आहे म्हणून मागे‌ न‌ हटता पोलीस ऑफिसर होण्याचे स्वप्न बघणारी नारीशक्ती म्हणून दहा पाऊलं पुढं टाका आणि आपल्या स्वप्नाला गवसणी घाला. हे आकाश तुमचंच आहे; तुमच्याच कर्तृत्वाचा इंद्रधनुष्य त्यात रेखाटा. नक्कीच! तो अनुभव शब्दबद्ध करण्यापलीकडचा असेल. एक दिव्यत्व प्राप्त करुन देणारा!

 पोलीस क्षेञ हे खरच समुद्रासारखं अनिश्चित, अनाकलनीय आहे आणि याच  समुद्रात बुट मदतनीस तेजस्विनी जोशी आपली विशेष छाप पाडत समाजकार्य करत आहेत. त्यांच्यासारख्या कडक, प्रामाणिक  पोलिस ऑफिसरची  महाराष्ट्र पोलिसांत गरज आहे.
 
अंखड परिश्रमाच्या जोरावर तेजस्विनी जोशींनी बीट मदतनीस पदापर्यंत गवसणी घातली आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देत त्या कायदा व सुव्यवस्था टिकवून आहेत.  याबद्दल त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच!  तेजस्विनी मॅडमची देशसेवेच्या होमकुंडात उत्तरोत्तर प्रगती होवो आणि त्यांना चांगल्याप्रकारे  आरोग्य लाभो हीच माझी सदिच्छा. मॅडम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सलाम...!

                              🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

मंगळवार, १ मार्च, २०२२

"शिक्षणातून माणुसकी घडवणाऱ्याआदर्श शिक्षिका; सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी"

                        💗"तिचं जग"💗
शिक्षण म्हणजे समाजातील विषमतेला तडीस नेण्याचे सामर्थ्य, शिक्षण म्हणजे बुध्दीला विचाराची जोड आणि माणसाला साक्षरता प्राप्त करून जीवनाची दिशा दाखवण्यासाठीचा एक सुलभ मार्ग.शिक्षणातून माणूस घडतो, माणसातुन देश घडतो आणि त्याच देशाचे परिपुर्ण असे विश्व होते.याच शिक्षणप्राप्तीसाठी मनुष्य प्राण्याला गरज असते ती एका गुरुची, जो त्याला योग्य मार्गदर्शन करेल.आई- वडील‌ हे पहिले गुरु असूनही बौध्दिक, मानसिक ज्ञानप्राप्तीसाठी पुर्वापार चालत आलेली अध्ययन प्रणाली म्हणजे शाळा, महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे. तिथेच आपल्याला आपल्या खऱ्या जगाची ओळख होत असते आणि ही ओळख करून देण्याचे काम करतात आपले शिक्षक. आज अशाच एका निवृत्त आदर्श शिक्षिकेविषयी आपण जाणून घेणार आहोत. शिक्षणाला सामाजिक कार्य समजुन खडतर परिस्थितीतही विद्यार्थी घडवण्याचा वसा घेतलेल्या उंडणगावच्या निवृत्त आदर्श शिक्षिका सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी!
 
 सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव या छोट्याशा खेड्या गावात नाईक कुटूंबात त्यांचा जन्म झाला. गाव तसं खेडं पण चांगलं मोठं. याच मोठ्या गावात त्यांचं भलमोठं कुटूंब. आईवडीलांना ५ मुली आणि काकांचे २मुलं आणि ३ मुली असं १४ जणांचं एकञ कुटूंब. परिस्थिती अगदी हलाखीची. पण मंगलाबाई म्हणजेच आताच्या कुलकर्णी मॅडमला अभ्यासाची फार‌ गोडी. लहान वयात शिस्तीने अभ्यास करणाऱ्या मंगलबाईंनी एक स्वप्न बघितलं शिक्षिका होण्याचं. त्याच ध्येयपुर्तीसाठी त्यांनी काहीही करुन शिकायचे हा ध्यास ‌मनाशी बाळगला. १० पर्यंतचं शिक्षण त्यांनी उंडणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केले. योगायोगाने आपले शिक्षक असणारेच काका वसंतराव नाईक यांच्या सहाय्याने त्यांचा नंबर औरंगाबादला शासकीय डि.एड अध्यापक महाविद्यालयात लागला. परिस्थिती वाईट असल्यामुळे वडिलांना त्यांना बाहेर पाठवणं अवघड होतं पण त्यांनी हिम्मत बांधली आणि मंगलाबाईंना पाठवलं. २वर्षाच्या अथक मेहनतीनंतर शेवटी ऐन केन प्रकारे१९७२ साली त्यांचे डि.एड पुर्ण झाले. १९७२ तो‌ दुष्काळाचा काळ. मराठवाडा प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसत असताना मॅडमलाही ती झळ लागली. पण त्याच दुष्काळात त्यांच्या घरातील दुष्काळ संपवण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला. १९७२ सालीच जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत त्या आपल्याच जन्मभुमीत म्हणजे उंडणगावला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. घरातील पहिली मुलगी ही स्वबळावर तेही अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षिका झाली याचा आईवडीलांना खुप आनंद झाला.
 
 त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय हे त्यांना मार्ग दाखवणाऱ्या वसंतराव नाईकांना जातं हे त्या आवर्जून सांगतात. कुलकर्णी मॅडमनी त्यांचं शिक्षिका होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं होतं. लहानपणापासून आपल्या भावंडांची सवय असल्याने शाळेत त्या लहान मुलांमध्ये रममाण होऊन जायच्या. पण तितक्याच त्या शिस्तबध्द . स्वत: शिस्तीचे पालन करत त्यांनी मुलांना शिस्तीचे धडे देत हसत‌खेळत आनंदाने ज्ञानार्जन केले. याच शैक्षणिक प्रवासात त्यांना मोलाची साथ‌ लाभली ती त्यांचे श्रीमान‌ प्रकाश लक्ष्मणराव कुलकर्णी. तेही पेशाने शिक्षक. अत्यंत बुद्धिमान आणि शिक्षणक्षेञात अमुल्य असे योगदान देणारे कुलकर्णी सर यांच्या कौतुकाला सिमा नाही. सुरुवातीला उंडणगाव आणि नंतर‌ खंडाळासारख्या छोट्याशा गावात‌ जिथे शिक्षणाचे बीजच नाही अशा गावात त्यांनी जिल्हा परिषद शाळा आपल्या कौशल्यातुन खुलवली आणि आदर्श शिक्षक पुरस्कारासह शिक्षण क्षेत्रातील अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. कुलकर्णी मॅडम या विशेष शिक्षिका असण्याचे कारण म्हणजे त्यांनी कधीच त्या पेशाकडे नोकरी म्हणून बघितले नाही तर 'आपण ज्या समाजात‌ राहतो‌ त्याचे‌ देणं लागतो.विद्यार्थी घडवणं‌ म्हणजे देश घडवणं हा त्यांचा यामगचा स्पष्ट दृष्टीकोन होता.' त्यामुळे त्यांनी १० ते ४ शाळा शिकवण्यापलीकडे ती घडवली. 
 
वेगवेगळ्या उपक्रमातून खेड्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावत त्यांच्यातील गुणांची जाणीव करुन दिली. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिकरित्या त्या काळात त्यांनी लक्ष दिले. पालकांशी संवाद साधत शिक्षणाची जनजागृती त्यांनी केली. गरीब परिस्थितीतही शिकण्याची जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना तर‌ त्यांनी सर्वतोपरी मदत केली. मैदानी खेळ, भाषण स्पर्धा, शैक्षणिक सहल असे उपक्रम त्यांनी लहान मुलांसाठी राबवले व सगळ्यांच्या लाडक्या शिक्षिका होण्याचा मान पटकावला. हे सगळं करत असतांना त्या फार‌ ओढाताण होत‌ असे कारण वडीलांच्या जाण्यानंतर आई अंथरुणावर आणि तीन मुलं. त्यांचं करुन शाळेत ड्युटी बजावणं खरच सोप्पं नव्हतं पण कडक शिस्तीच्या कुलकर्णी मॅडम नी तेही दिव्य यशस्वीरित्या पार‌ पाडत शाळेचा कारभार‌ सांभाळला. 

आज मागे वळून बघतांना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तयार‌ झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेञात आपला झेंडा यशस्वीपणे फडकवत आहेत. त्यात प्रसिद्ध आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक, अँडव्होकेट मिलिंद महाजन, डॉ.राजेंद्र धनवई, शिक्षक दगडू लांडगे असे असंख्य गुणवंत आहेत‌ ज्यांना मॅडमच्या शिक्षणछायेत आपला शिक्षणविकास साधता आला. शिक्षण काळात अनेक कटूगोड प्रसंगांना त्यांना सामोरे जावच लागले. अर्धी सेवा उंडणगावच्या शाळेसाठी खर्ची घातल्यावर अचानक त्यांच्या बदलीचे सरकारी दफ्तरातून फरमान निघाले. गोड आठवणी कटूप्रसंगामध्ये बदलायला वेळ लागला नाही. कारण ज्या विद्यामंदिराचा कुंटूंबाप्रमाणे सांभाळ केला ते सोडणं खरच अवघड होतं. कर्तव्याचा एवढा काळ एकाच‌ शाळेत राहून‌ विकास साधनं खरतर‌ ही अवघड गोष्ट असते. तसेच घरची जवाबदारी सांभाळून दुसऱ्या गावात शिकवायला जाणे खरच त्यावेळी तारेवरची कसरत होती. ही बातमी जेव्हा शाळेत आणि गावात पसरली तेव्हा सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. पण सरकारी आदेशापुढे नमतं घेणं भाग होतं आणि मॅडम त्या बदलीच्या गावाला रुजू झाल्या‌. विद्यार्थी माञ हिरमुसले; संपुर्ण शाळेचं प्रांगण जणु स्तब्ध झालं होतं. पण विद्यार्थ्यांनी मॅडम परत या ची दिलेली हाक खरच देवाने मंजूर करावी अशी झाली आणि पुढच्या दोनच दिवसात मॅडम पुन्हा आपल्या केंद्रीय प्रशालेला उंडणगाव मध्ये रुजू झाल्या. कटु आठवण गोड आठवणीत चुटकीसरशी बदलली. कारण गाव, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागणीतून परत मॅडम आपल्या मुळ ठिकाणी परत आल्या होत्या. हा अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी कौतुकाची थाप होती हे सांगतांना त्यांच्या अनेक शालेय आठवणींना उजाळा मिळाला. 

शिक्षण क्षेञात वरिष्ठांकडून मिळणारी कौतुकाची थाप आपल्याला ज्ञानदान करण्यास प्रोत्साहन देते. आपण अथक परिश्रम घेत‌ शिक्षणाचे समाजकार्य करत असतो आणि एक दिवस आपल्या कार्याला परिपुर्णता प्राप्त होते. लहानपणी बघितलेले स्वप्न सत्यात उतरुन ते निवृत्तीच्या दिशेने कधी सरसावले याची काडीमाञ जाणीव मॅडमला आपलं कार्य करतांना झाली‌ नाही. अखेर २८ फेब्रुवारी २०१० ला आदर्श शिक्षिका प्रतिभा प्रकाश कुलकर्णी यांच्या नावापुढे निवृत्त हे नाव‌ लागले आणि शिक्षणाचे बाळकडू त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडे देत खडू खाली ठेवला. त्यांचे दोंन्ही मुलं आणि एक मुलगी आज उच्चशिक्षित होवून आपापल्या क्षेञात‌ कार्यरत आहेत तर मोठा मुलगा हा प्राध्यापक आहे. निवृत्त १२ वर्षे होवून देखील‌ विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची धडपड त्यांची आजही चालू असते. त्यांच्या आई-वडीलांच्या नावाने त्या दरवर्षी गुणवंत शालेय‌ विद्यार्थ्यांना पारितोषिक पर रक्कम देतात; जेणेकरून तेवढीच त्यांना शिक्षणाला उभारी मिळेल.अनेक शालेय कार्यक्रमात ‌त्या आवर्जून सहभागी होत‌ विद्यार्थ्यांचे आजही मनोबल‌ वाढवतात. 

सौ.प्रतिभा कुलकर्णी मॅडम आजच्या काळातील ‌विद्यार्थी पालकांचा खाजगी शालेय संस्थांकडे वाढणारा कल बघतांना म्हणतात की‌, जिल्हा परिषद शाळा या खऱ्या‌ अर्थाने‌ शिक्षणासाठी परिपुर्ण असतांना त्यांची सद्यस्थितीला असणारी दयनीय अवस्था न बघवणारी आहे. जर‌ जिल्हा परिषद शिक्षकांनी झोकुन देवून काम करत परत एकदा उत्तम दर्जाचे ‌शिक्षण देत विश्वास संपादन केला तर नक्कीच विद्यार्थी परत एकदा सरकारी शाळेकडे वळतील. खंत वाटते की आज जिल्हा परिषद‌ शाळेला विद्यार्थी नाहीत; ओस पडलेल्या शाळेत बसायला व्यवस्थित वर्ग नाही. मी निर्माण केलेली शाळा आता मला कुठेच दिसत नाही हे विचार‌ मांडतांना त्या माञ भावूक झाल्या. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाले आणि‌ विद्यार्थ्यांची शाळेची नाळ तुटली. 

'विद्येचे मंदिर ते विद्येचेच असते'.

घरी बसून कितीही विद्या ग्रहण केली तरी शाळेची मज्जा काही औरच असते. यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेचे धडे मिळणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर‌ विद्यार्थ्यांमधील एकलकोंडेपणा वाढेल असेही त्या म्हणाल्या. आजही त्या शिक्षण क्षेञाच्या बाबतीत मिळेल त्यावेळेला काम करत असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. आजही कुलकर्णी मॅडम या सगळ्यांच्या तितक्याच‌ लाडक्या अध्यापिका आहेत. त्यांचा गोड मार‌ खावून आज मोठ्या पदापर्यंत मजल मारणारे विद्यार्थी ही अनेक आहेत. तो मार खरच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

अशा या उंडणगावच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ निवृत्त आदर्श शिक्षिका 'सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी मॅडम' यांना महिला दिनाचा सलाम! तुमच्यासारख्या प्रामाणिक शिक्षिका घडल्या तर‌ देशाचे भविष्य सुरक्षित हातात असेल ही अगदी काळया दगडावरची पांढरी रेघ आहे!तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
        ‌‌
                               🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

           "अनाथांची माय सिंधुताई सपकाळ"

                          💗"तिचं जग"💗


 एक स्ञी आपल्या आयुष्यात किती त्याग करते याचा थांग लागणे खरच शक्य नाही. तिचं मातृत्व आणि कर्तृत्व हे या जीवसृष्टीतील चराचरात अजरामर आहे.याच स्ञी कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महिला दिन विशेष आठवडा साजरा करायचं ठरवलय "तिचं जग" या खास ब्लॉगच्या माध्यमातून. आज पासून रोज ऐका नवीन क्षेञातल्या रणरागिणीचा प्रवास मी तुमच्या समोर‌ मांडणार‌ आहे ; जी खरच कौतुकास पाञ आहे.तिच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा आढावा नक्कीच आपल्यातील स्ञियांना स्वकर्तृत्व गाजवण्याची उभारी देईल. आज १ मार्च! पहिला ब्लॉग अखंड भारताची जननी अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला समर्पित. ज्या मायेच्या वलयात आपण अंतर्मुख होतो ते वलय आहे भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात...

अनाथांची माय, गरिबांच्या दुधावरची जाळीदारसाय  साय!

दि.४ जानेवारी २०२२ सकाळपासूनच भयाण वाटत होतं. काहीतरी‌ होणार आहे याची चाहुल लागलेली पण मनात एक आशा जी शेवटपर्यंत आस जागवून होती. अचानक ८ वाजुन १० मिनिटांनी टिव्ही लावताच काही क्षण सगळं सुन्न झालं. गॅलॅक्सी रुग्णालयातून बातमी वाऱ्यासारखी परसली. अनाथांची माय निवर्तली. जन्मापासून सुरु असलेला एकपाञी संघर्ष अनेक पाञांना आधार देवून शेवटाकडे वळाला. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने अख्खं विश्वच पोरकं झालं असलं तरी त्यांचा प्रवास हा त्या विश्वाला परत नव्याने संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद देईल एवढा तो कणखर कणा होता.

दि.१४ नोव्हेंबर १९४८. वर्धा जिल्ह्यातील ,पिंप्री मेघे आणि गावातील ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी आईवडीलांना नकुशी असणारी एक मुलगी जन्माला आली. म्हणून तिचं नाव चिंधी ठेवलं. पण पुढे जावून ह्याच चिंधीच्या ठिगळाने कित्येकाच्या आयुष्याची गोधडी उबदार होणार आहे याची कल्पना त्यावेळेला त्यांच्या आईवडीलांना नव्हती. जन्मापासून‌ सुरु झालेला चिंधीचा संघर्ष वयाच्या ९ व्या वर्षीपासून आणखीनच कठीण झाला जेव्हा २६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याची त्यांचा विवाह झाला. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि उमलत्या वयात लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता पुर्ण झाल्यानंतर शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगावात गेल्या.   भातुकलीच्या वयात सिंधुताईंवर खऱ्या संसाराची जवाबदारी पडली. घरी प्रचंड सासुरवास होता .कुटूंबात शैक्षणिक वातावरण नाही. माईंना माञ शिक्षणाची आवड. जंगलात लाकुडफाटा शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणून उंदराच्या बिळात लपवून ठेवत. क्वचितच घरी एकट्या असल्या की त्या अभ्यास हा करायच्या. हे लग्न फार काळ टिकले नाही. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली.   माञ चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्याच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे‌ वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी असणाऱ्या गुरांचे‌शेण काढता काढता बायांचे पार कंबरडे‌ मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या माञ त्याचा काहीही मोबदला मिळत नसे‌. या शेणाचा लिलाव वनखात्यातील अधिकारी करायचे. इथेच सिंधुताईंनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारला आणि याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक लढा सुुुरू झाला. याच लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. 

हा लढा त्या जिंकल्या पण त्याची माञ त्यांना जबर किंमत चुकवावी लागली. एका बाईने दाखवलेल्या धैर्याने  गावातील दमडाजी असतकर दुखावला गेला आणि सिधुंताईच्या पोटातील मुल आपले आहे असा प्रचार  सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चारिञ्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पुर्ण दिवस भरलेल्या गर्भवती माईंना त्याने बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. तशाच बिकट अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले आणि तिथेच त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने टाकून दिलेली बाई म्हणजे आपल्या समाजाच्या मार्गात अडसरच ना! अशा अस्पृश्य विचारसरणीच्या गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिले. सासरमधून बाहेर पडलेल्या माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही आणि त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्थानकावर त्या चतकोर भाकरी साठी, एखाद्या उष्ठ्या फळासाठी पोटाची खळगी भरावी म्हणुन भिक मागत हिंडायच्या. या सगळ्या ञासाला कंटाळुन एक दिवस त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ;पण तान्हुल्या लेकीकडे पाहून परत मागे फिरल्या. दिवसभर त्या भीक मागायच्या आणि राञी स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधीच‌ एकटे खाल्ले नाही.सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि सगळे भिकारी एकञ मिळून जेवणाचा आनंद घेत असत. याच भिकाऱ्यांनी २१ वर्षाच्या सिंधुताईला संरक्षण दिले. दोन दिवस माञ काहीच मिळाले नाही तेव्हा माञ त्यांच्या लक्षात आले  तिथे कायम राहता येणार‌ नाही. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी थेट स्मशान गाठले. जळणाऱ्या‌ चितेवर भाकरी भाजत त्यांनी त्या चितेलाही पविञ्याची शाल पांघरली. समोर आलेल्या धकधकत्या संकटांच्या छाताडावर बसून त्यांनी वाट रोखली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. 

आपल्या मुलीवर आलेली वेळ कोणावर येवू नये या विचारात आपल्या तान्हुल्या लेकीची आई हजारोंची माई बनली. अनाथ मुलांना सांभाळुन त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर‌ तालुक्यातील 'कुंभारवळण' या गावात "ममता बाल‌सदनची" स्थापना केली आणि त्या अनाथ आणि बेवारस मुलांच्या आयुष्याचा साचा बनल्या. या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. एवढ्यावरच थांबतील त्या माई कसल्या. आर्थिक दृष्ट्या स्वयंपुर्ण झाल्यावर या युवक युवतींचे योग्य जोडीदार बघून माईंनी स्वतः कन्यादान केलं. आपली कन्या ममता हिला दगडुशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्या इथवरच थांबल्या नाहीत तर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी संकलन करण्यासाठी त्यांनी "मदर ग्लोबल फाऊंडेशनची" स्थापना केली. यातून अनेक परदेश दौरे करत त्यांनी आपल्या काव्यातून आणि बोलण्यातून समाजप्रबोधन केले. त्याच्या कार्याचा उत्तुग असा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात जावून समाजमनावर बिंबवला गेला तो त्यांच्या "मी सिंधुताई सपकाळ" या त्यांच्या जीवनपटातून!  तसेच  "अनाथांची यशोदा" या नावाचा २०१४ साली  प्रदर्शित झालेला अनुबोधपटही त्यांच्या जीवनाचा ठाव घेण्यास उद्युक्त करतो. त्याच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण जेव्हा २०२१ साली महाराष्ट्राच्या लाडक्या माईंना "पद्मश्री सिंधुताई सपकाळ" असे भारदस्त नाव मिळाले तेव्हा माञ मनामनांत माईंचा अभिमान वाटावा असा क्षण सगळ्या जनमानसाने अनुभवला. आजही माईंचे जुने भाषण काढुन ऐकायला घेतले तरी अंगावर शहारा येतो. मनात समाजसेवेची मशाल पेटते आणि समाजकार्यासाठी प्रेरणा मिळते.

आज ही संघर्षाची मशाल थंडावली. माञ तिचा प्रकाश हा सदैव या आयुष्याच्या खुल्या रंगमंचावर आपल्याला वाट दाखवत पडत राहणार आहे. माईंच्या जीवनाची सुरुवात ही नकुशी या शब्दाने झाली, चिंधी या नावाने झाली. नंतर त्यानी अग्निदिव्यातून जात संघर्ष करत केवळ स्वत:चच नाही तर हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. आपलं आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालते पण तिचं आयुष्य माञ निराधारांच्या वेळापञकावर चालले. याच अनाथांच्या यशोदेचं असं अचानक सोडून जाणं असह्य असलं तरी...

माई म्हणजे अथांग असा कधीही न आटणारा असा मायेचा समुद्र आहे..‌‌.

वरुन जरी शांत दिसत असला तरी आत अख्या जगाचं चक्र चालवणारा समाजकार्याने झपाटलेला अनाथांचा आधार आहे...

 माई म्हणजे कधीही थांग न लागणारा अथांग असा सागर आहे अथांग असा सागर आहे...

माई आहेत आणि असणार आहे त्यांनी घडवलेल्या अनाथांच्या संस्कारात...

माई आहेत आणि असणार‌ आहेत त्यांनी रोवलेल्या समाजसेवेच्या बीजारोपणात...

माई आहेत आणि असणार‌ आहेत प्रत्येक भारतीयांच्या कणा कणात  आणि मनामनात...

    माईंच्या  या संघर्षमय वाटचालीला सलाम..!आपण त्यांच्या इतका मोठा पदर तर नाही मारू शकत कारण माय ती मायच असते' परंतु आपणा ज्यांना शक्य असेल त्यांनी एका अनाथास दत्तक घेतले अथवा त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली तर ती नक्कीच ताईंना खरी श्रद्धांजली असेल!  स्ञी जीवनाचा आदर्श आधारस्तंभ म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्या आज नाहीत पण त्यांचे कार्य माञ यापुढील अनेक पिढ्यांना घडवणार आहेत.!

                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

मराठी भाषा गौरव दिन..,

                 ......गोष्ट मराठी भाषेची......


मुहूर्त २७ फेब्रुवारीचा! 'विष्णू वामन शिरवाडकर'अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती.नाटककार,लेखक,कविवर्य अशा थोर व्यक्तीचिञातून मराठी भाषेला विविधता प्राप्त करून देत मातीतून मनात रुजवणारे आपले लाडके कुसुमाग्रज.त्याच्या स्मरणार्थ २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.आपली मराठी भाषा ,मराठी साहित्य‌ हे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. संतांनी निर्माण केलेल्या विपुल‌ साहित्याची देणगी म्हणजे आपली माय मराठी...आणि याच आपल्या अभिजात मराठीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणिअसायलाच हवा.आपली मराठी भाषा जपायची असेल तर ती आपण ऐकलीच पाहिजे,वाचलीच पाहिजे,बोललीच पाहिजे आणि क्षणाक्षणाला आचरणात आणलीच पाहिजे आणि ती वाढती ठेवली पाहिजे.आपल्या मातृभाषेतून आपण व्यक्त व्हायलाच हवं ....अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा आणि त्याच माझ्या मायबोलीत मी आज माझ्याच मराठीला काव्यबध्द करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे... सादर करते... एक मराठीमय कविता...


मी मराठी


गर्व मराठी, सुर मराठी‌

राजभाषा मराठी
रुपारुपांतून बहरत जाते,मायबोली मराठी
इतिहासाच्या पटलावरची श्रेष्ठ भाषा मराठी
आचरणातून समृध्द व्हावी मायबोली मराठी
एकच नारा मराठीबाणा हेच स्वप्न उराशी!


 मृदेतून जन्मणारी मृदू भाषा मराठी

 संतंमहतांच्या वाणीतूनी गर्जणारी मराठी
 धगधगत्या लाटेतून आली माय माझी मराठी
 आचरणातून आता रुजावी महाराष्ट्रात मराठी!

गर्व असा मी मराठीचा,अभिमान असावा मी मराठीचा

दारावरच्या पाटीवरही माज दिसावा मी मराठीचा
भाषेतून भाषा उसळत जावी ,हा असावा ध्यास मी मराठीचा!

 दर्जा अभिजाततेचा उसळावा सळसळत्या रक्तापरी

 आचरणातून समृध्दीचा मार्ग सापडावा मी मराठी...
जेव्हा आचारणातून दिसेल आपली अभिजात मराठी
तेव्हाच आर्त साद जाईल तनमन धनातून मी मराठी मी मराठी मी मराठी...!

बघतोयस का माझ्या मराठीची पुण्याई..

अभिजात दर्जा नसुनही गुंजतेय ती मरीठीची शहनाई!

गोफ मराठीचा गुफंताना

मराठी साहित्याला स्मरतांना
आवाज निघतो उरातून 
माझ्या माय मराठीला मिळावा
अभिजात‌ दर्जा मनातुन‌आणि अखंड महाराष्ट्रीयन जनतेच्या आचरणातून .....
माझ्या माय मराठीला मिळावा 
अभिजात दर्जा मनातून आणि अखंड महाराष्ट्रीयन जनतेच्या आचरणातून..!

                     ‌‌‌‌       🖋️‌‌ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

 
 

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...