गुरुवार, ३ मार्च, २०२२

🇮🇳🇮🇳🇮🇳वर्दीच्या सोबतची ती🇮🇳🇮🇳🇮🇳

                        💗"तिचं जग" 💗

पोलीस म्हटलं की समोर उभी राहते ती खाकीतली शिस्तबध्द आकृती. पोलीस हा शब्द उच्चारला की‌ आपोआपच आपल्या नजरा उंचावतात आणि हाताचा तळवा सलाम ठोकण्यासाठी सरासवतो. हे क्षेञ म्हणजे देशसेवा, समाजसेवा, कायदा व‌ सुव्यवस्था या सुञींनी सज्ज असे देशप्रेम. पुर्वी पोलीस म्हंटले की रुबाबदार असा पुरुषवर्ग जो कोणत्याही संकटाचा छातीठोकपणे सामना करेल. पण आता माञ गृहसेवेबरोबरच देशसेवेचा वसा घेत आपल्या हिमतीतून आणि कौशल्यातून शञुला धुळ चारणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या क्षेञाला काबीज केलय. जिथे महिला साधा उंबरठा ओलांडत नसे तिथे आज हीच स्ञी शक्ती प्रसंगी सीमेपार जाऊन गुन्हेगारांना चाप बसवण्यात मागे हटत नाही.

 अशाच धडाकेबाज पोलीस कर्मचारी सिल्लोड ग्रामीण पोलीस चौकीत आहेत ज्यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अंगावर वर्दी चढवली. ज्या वयात मुली फक्त शिक्षणाचे स्वप्न बघतात, आयुष्याच्या नवीन महाविद्यालयीन प्रवासाकडे वळतात,  त्या वयात तेजस्विनी सुरवसे/ जोशी मॅडम देशकार्यासाठी सज्ज झाल्या. 
 
  अभिमान अशा या रणरागिणीचा...
  जिने सत्यात उतरवला ध्यास आपुल्या आयुष्याचा...
  पाहुयात‌ तिचं जग...!
  
  वर्दीतल्या देशसेविका सिल्लोड ग्रामीण पोलिसच्या बीट मदतनीस पोलिस अंमलदार  तेजस्विनी जोशी मॅडम. आपल्या कामातून सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये छाप पाडत कायद्याचे रक्षण करणाऱ्या तेजस्विनी मॅडम या मुळच्या लातूरच्या. त्यांचे शालेय शिक्षण हे ज्ञानेश्वर विद्यालयातून तर दहावीनंतरचे शिक्षण हे‌ त्यांनी शाहू महाविद्यालय लातूर येथुन पुर्ण केले. तेजस्विनी मॅडम लहान असतांना आपल्या वडीलांची वर्दी बघतांना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक निर्माण होत असे. त्यांची समाजकार्याप्रती असणारी धडपड आणि वर्दीवरील प्रेम यातून ते नेहमी सांगायचे की आपण देशासाठी लढलं पाहिजे, देशासाठीच जगलं पाहिजे आणि देशासाठीच सर्वस्व अर्पण करायला पाहिजे. त्यांचे शब्द हे तेजस्विनी मॅडमच्या उरात खोलवर रुजले आणि वडीलांच्या वर्दीत त्या स्वत:ला बघायला लागल्या. मग हेच स्वप्न उराशी बाळगत तेजस्विनी मॅडमने शाळेच्या वयापासूनच वर्दीची तयारी करायला सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कराटे प्रकारात ब्लॅक बेल्ट पुर्ण करत आपली शारीरिक क्षमता वाढवली. स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खडतर परिक्षेसाठी सक्षम करत आपली क्षमता सिध्द केली. आणि पहिल्या प्रयत्नातच संपादन करत वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पोलीस भर्तीमध्ये रुजू झाल्या. हे यश त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटूंबासाठी डोळे दिपवणारं‌ होतं. त्यानंतरचे नऊ महिने त्यांच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारे ठरले जेव्हा पुढील‌ ट्रेनिंगसाठी त्यांना नागपूरच्या पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये जावे लागले. तिथे फक्त व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या सक्षम करत‌ नाही तर अनेक दिव्यातुन पार होत तुमची यशोशिखर गाठण्यासाठीची तयारी करुन घेतली जाते. हया नऊ महिन्यांच्या प्रवासात‌ एक व्यक्ती म्हणून त्यांच्यात फार बदल‌ झाले हे त्या आवर्जुन सांगतात .त्या काळात‌ ती १८ वर्षाची तेजस्विनी ९ महिन्यांनंतर बाहेर पडत असताना एक जवाबदार कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी म्हणून बाहेर पडली. 
  
सुरुवातीला त्या औरंगाबाद ग्रामीण मुख्यालय येथून वैजापूर पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्या. त्यानंतर अजिंठा पोलीस स्टेशन आणि आता सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रुजू आहेत. त्यांच्या आयुष्याचा एक नवा काळ त्यांच्यासमोर‌ भरपूर कसोट्या घेवुन उभा ठाकला. घरातच वडील आणि काका पोलिस हेडकॉन्स्टेबल तर काकांचे दोन्हीही मुले  त्यांची भावंड पोलिस ऑफिसर असल्यामुळे बऱ्यापैकी त्या त्याच वातावरणात वाढलेल्या असल्याने त्या लगेच तिथे रुळल्या. याच दरम्यान त्यांचा विवाह सध्याचे सिल्लोड ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे  बीट जमादार अनंत जोशी यांच्याशी  पार पडला. दोघही पोलीस क्षेञात कार्यरत असल्याने मुळातच समाजसेवेचे बीज‌ त्यांच्या घरात रुजलेले आहे. या क्षेञात तेजस्विनी जोशी यांना ११ वर्षे पुर्ण झाले असून‌ सध्या त्या सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आपलेच श्रीमान‌ बीट जमादार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली बीट मदतनीस म्हणून कार्यरत आहेत.

 बीट मदतनीस हे काम खरच सोप्पं नाही. दिलेल्या गावात जावून कायदा आणि सुव्यवस्था राखणं अत्यंत गरजेचे होवून‌ जाते. अशा वेळेस अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. हुंडाबळी, गुन्हेगारी,अंतर्गत वाद,चोरी,अशा अनेक प्रकरणांचा गांभिर्याने विचार करत गावात काम करावे लागते. अनेक महिला जेव्हा आपले प्रश्न घेवुन येतात तेव्हा एक महिला म्हणून त्या प्रसंगात‌ तिला धीर‌ द्यावा वाटतो पण कायदा हा सर्वांसाठी समान असतांना न्यायदेवतेच्या नजरेतून गुन्हा सिध्द होईपर्यंत समोरची व्यक्ती ही आरोपीच असते. अशावेळेस तेथील‌ नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणं खरच आवश्यक असतं. पण तेजस्विनी मॅडम या आपला बीट उत्तम प्रकारे सांभाळतात. त्यांचं कर्तव्य अत्यंत चोख रित्या पार पाडतात. म्हणूनच खेड्यातील महिलांच्या नजरेत त्या लेडी सिंगमच आहेत. एक महिला पोलीस अंमलदार होऊन घरची जवाबदारी सांभाळणं खरच अवघड असतं कारण पोलीसी क्षेञात कर्तव्य पार पाडतांना वेळेचं बंधन रहात नाही. जेव्हा फोन‌ वाजला तेंव्हा कर्तव्यावर हजर‌ होणं भाग असतं. एक आई म्हणून जेव्हा तेजस्विनी जोशी आपल्या कुटूंबाकडे बघतात तेव्हा त्यांना त्यांनी घडवलेल्या स्वावलंबी मुलांचा अभिमान वाटतो. पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की काटेकोर शिस्त ही आलीच आणि‌ हिच तेजस्विनी जोशींनी आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबली. सुदैवाने त्यांचे‌ श्रीमान हे‌ याच क्षेत्रात कर्तव्यदक्ष असल्याने त्यांना आपल्या पत्नीबद्दल नक्कीच सहानूभुती आहे. दोघांनाही तेवढाच वेळ आपल्या कर्तव्यावर द्यावा लागतो तर‌ घराची जवाबदारी ही दोघांचीच हवी अशा समजुतदार पाविञ्यातून ते आपल्या पत्नीला सर्वतोपरी‌ मदत करतात.
 
एक पोलीस ऑफिसर म्हणून‌ त्या आपल्या पदाला न्याय देतच आहेत पण मुलांकडेही लक्ष देत त्या आपला आईधर्म पाळतात. पोलीस क्षेञात काम करतांना मानसिक तणाव हा नक्कीच येत असतो. कारण पोलीस स्टेशन मध्ये महिला किंवा पुरुष असा भेदभाव नसुन पोलीस हे फक्त पोलीसच असतात. दोघांनाही सारखेच कामे दिली जातात. हे काम करत असतांना अनेक विचारांनी पोलीस ग्रासलेले असतात कारण तेही शेवटी मनुष्यच आहेत. जेव्हा सामान्य जनता गणेशोत्सव, दिवाळी, शिवजयंती असे सण साजरे करत असतात तेव्हा माञ पोलीस हे राञंदिवस सुरक्षारक्षक बनून आपले कर्तव्य बजावत असतात. त्या सणांच्या काळात कुटूंबाचा न‌ मिळणारा सहवास त्यांना नक्कीच आतून‌ पोखरत असतो. ही वास्तव परिस्थिती आहे तर सहाजिकच आहे ताण येणं. पण याही परिस्थितीत तेजस्विनी जोशी मन‌ खंबीर करुन समाजाच्या आनंदात आपला सण साजरा करत कर्तव्य पार पाडत असतात. याच कार्याची दखल म्हणून तेजस्विनी जोशी  आजपर्यंत अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या रोखठोक कामामुळे नेहमीच त्या चर्चेत असतात. 


प्रत्येक महिला ही अनेक गुणांनी सुप्त असते. काळाच्या ओघात‌ माञ तिचे ते गुण कुठेतरी दबले जातात. माञ तेजस्विनी जोशी या वाक्याला पुर्णपणे अपवाद‌ ठरतात. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य पार पाडतांना आपल्या छंदांचं ही संगोपण करणं ही खरच सोपी गोष्ट नव्हे. तेजस्विनी जोशी या उत्तम नृत्यांगणा आणि गोड गळ्याच्या गायिका आहेत. या प्रचंड धकाधकीच्या जीवनात त्यांनी त्यांचे हे छंद अगदी चोखंदळपणे जपले आहेत याबद्दल त्या खरच कौतुकास पाञ ठरतात. पोलीस ऑफिसर‌ म्हटलं की लोकांच्या मनात‌ धाक असतो की हे कशा पध्दतीने आपल्या समस्या सोडवतील माञ‌ तेजस्विनी जोशींच्या बोलक्या आणि स्वच्छंदी स्वभावातुन त्यांनी जनतेच्या मनात स्वतः चं घर‌ निर्माण करत विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांना बीट दिलेल्या गावात त्या रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होतांना दिसते. महिलांचे प्रश्न त्यांच्यात बसुन तेजस्विनी जोशी समजून‌ घेत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे त्या नेहमीच देत असतात. या जगात वावरत असतांना बऱ्याच महिलांवर अतिप्रसंग ओढावतात , भरपुर समस्यांना त्या सामोऱ्या जात असतात‌ तर‌ अशा वेळेस त्या सगळ्या महिला वर्गाला आवाहन करतात की महिला पोलीस या सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दामिनी पथक २४ तास कार्यरत असते तर‌ तुम्ही न घाबरता प्रवास करा आपली स्वप्न पुर्ण करा. मनात कुठलाही न्युनगंड न‌ बाळगता, भिती न बाळगता त्वरित महिला पोलिसांशी संपर्क साधा. तेजस्विनी मॅडमनी आतापर्यंत अशा अनेक केसेसद्वारे महिलांना आधार‌ देत परत नव्याने उभे केले आहे. तेजस्विनी  जोशी यांचे वर्दीतले स्वप्न पुर्ण झाल्यानंतर त्या अविरतपणे आपली देशसेवेची मशाल रोज आपल्या कार्यातून उजळवत आहेत. कधीही फळाची अपेक्षा न‌ करता त्या या समाजकार्यात झोकुन देवून काम करत आहे. पण नक्कीच जर आपल्या कार्याची कोणी दखल‌ घेत  पाठीवर कौतुकाची थाप पडली तर‌ आपल्यात अजून दांडगा उत्साह संचारतो आणि आपण आपले काम अजून चांगले करण्यासाठी धडपडत असतो. तशीच थाप नुकतीच त्यांच्या पाठीवर‌ एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या पुरस्काराने पडली. सपत्निक पुरस्कार स्वीकारणं हा त्यांच्या साठी खरच सोनेरी क्षण घडला. ही सुखद‌ घटना त्यांनी आपल्या मनात बंदिस्त करुन‌ घेतली. कायद्याच्या मंदिरात पोलीस ऑफिसर म्हणून महिला कर्मचाऱ्यांना समान‌ वागणूक दिली जाते. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या कामात प्रगती करण्यासाठी वाव‌ मिळत असतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ऑफिसर आपला विकास साधत असतात. एकरुप होवून काम करणे, प्रसंगावधान राखून निर्णय घेणे अशा अनेक गुणानुक्रमामुळे तेजस्विनी जोशी सगळ्यांमध्ये वेगळ्या भासतात. 

एक स्ञी‌ म्हणून या क्षेञात येणाऱ्या महिलांसाठी संदेश देतांना तेजस्विनी मॅडम सांगतात की, जेव्हा ती खाकी वर्दी अंगावर‌ चढते त्या क्षणापासून स्ञी आणि पुरुष हा भेदभाव तिथे पुरला जातो आणि समाजाच्या नजरेत तुम्ही फक्त खाकीतले तारणहार असतात. एक वेगळीच ऊर्जा त्या रंगातून आपल्यात संचारते आणि खाकीतले सौंदर्य आपलं रूप खुलवते‌. आता स्पर्धा प्रचंड वाढली असली तरी मेहनतीतून कोणतेही शिखर सहज सर करता येते. मुलगी आहे म्हणून मागे‌ न‌ हटता पोलीस ऑफिसर होण्याचे स्वप्न बघणारी नारीशक्ती म्हणून दहा पाऊलं पुढं टाका आणि आपल्या स्वप्नाला गवसणी घाला. हे आकाश तुमचंच आहे; तुमच्याच कर्तृत्वाचा इंद्रधनुष्य त्यात रेखाटा. नक्कीच! तो अनुभव शब्दबद्ध करण्यापलीकडचा असेल. एक दिव्यत्व प्राप्त करुन देणारा!

 पोलीस क्षेञ हे खरच समुद्रासारखं अनिश्चित, अनाकलनीय आहे आणि याच  समुद्रात बुट मदतनीस तेजस्विनी जोशी आपली विशेष छाप पाडत समाजकार्य करत आहेत. त्यांच्यासारख्या कडक, प्रामाणिक  पोलिस ऑफिसरची  महाराष्ट्र पोलिसांत गरज आहे.
 
अंखड परिश्रमाच्या जोरावर तेजस्विनी जोशींनी बीट मदतनीस पदापर्यंत गवसणी घातली आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देत त्या कायदा व सुव्यवस्था टिकवून आहेत.  याबद्दल त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच!  तेजस्विनी मॅडमची देशसेवेच्या होमकुंडात उत्तरोत्तर प्रगती होवो आणि त्यांना चांगल्याप्रकारे  आरोग्य लाभो हीच माझी सदिच्छा. मॅडम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सलाम...!

                              🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

मंगळवार, १ मार्च, २०२२

"शिक्षणातून माणुसकी घडवणाऱ्याआदर्श शिक्षिका; सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी"

                        💗"तिचं जग"💗
शिक्षण म्हणजे समाजातील विषमतेला तडीस नेण्याचे सामर्थ्य, शिक्षण म्हणजे बुध्दीला विचाराची जोड आणि माणसाला साक्षरता प्राप्त करून जीवनाची दिशा दाखवण्यासाठीचा एक सुलभ मार्ग.शिक्षणातून माणूस घडतो, माणसातुन देश घडतो आणि त्याच देशाचे परिपुर्ण असे विश्व होते.याच शिक्षणप्राप्तीसाठी मनुष्य प्राण्याला गरज असते ती एका गुरुची, जो त्याला योग्य मार्गदर्शन करेल.आई- वडील‌ हे पहिले गुरु असूनही बौध्दिक, मानसिक ज्ञानप्राप्तीसाठी पुर्वापार चालत आलेली अध्ययन प्रणाली म्हणजे शाळा, महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे. तिथेच आपल्याला आपल्या खऱ्या जगाची ओळख होत असते आणि ही ओळख करून देण्याचे काम करतात आपले शिक्षक. आज अशाच एका निवृत्त आदर्श शिक्षिकेविषयी आपण जाणून घेणार आहोत. शिक्षणाला सामाजिक कार्य समजुन खडतर परिस्थितीतही विद्यार्थी घडवण्याचा वसा घेतलेल्या उंडणगावच्या निवृत्त आदर्श शिक्षिका सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी!
 
 सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव या छोट्याशा खेड्या गावात नाईक कुटूंबात त्यांचा जन्म झाला. गाव तसं खेडं पण चांगलं मोठं. याच मोठ्या गावात त्यांचं भलमोठं कुटूंब. आईवडीलांना ५ मुली आणि काकांचे २मुलं आणि ३ मुली असं १४ जणांचं एकञ कुटूंब. परिस्थिती अगदी हलाखीची. पण मंगलाबाई म्हणजेच आताच्या कुलकर्णी मॅडमला अभ्यासाची फार‌ गोडी. लहान वयात शिस्तीने अभ्यास करणाऱ्या मंगलबाईंनी एक स्वप्न बघितलं शिक्षिका होण्याचं. त्याच ध्येयपुर्तीसाठी त्यांनी काहीही करुन शिकायचे हा ध्यास ‌मनाशी बाळगला. १० पर्यंतचं शिक्षण त्यांनी उंडणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केले. योगायोगाने आपले शिक्षक असणारेच काका वसंतराव नाईक यांच्या सहाय्याने त्यांचा नंबर औरंगाबादला शासकीय डि.एड अध्यापक महाविद्यालयात लागला. परिस्थिती वाईट असल्यामुळे वडिलांना त्यांना बाहेर पाठवणं अवघड होतं पण त्यांनी हिम्मत बांधली आणि मंगलाबाईंना पाठवलं. २वर्षाच्या अथक मेहनतीनंतर शेवटी ऐन केन प्रकारे१९७२ साली त्यांचे डि.एड पुर्ण झाले. १९७२ तो‌ दुष्काळाचा काळ. मराठवाडा प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसत असताना मॅडमलाही ती झळ लागली. पण त्याच दुष्काळात त्यांच्या घरातील दुष्काळ संपवण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला. १९७२ सालीच जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत त्या आपल्याच जन्मभुमीत म्हणजे उंडणगावला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. घरातील पहिली मुलगी ही स्वबळावर तेही अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षिका झाली याचा आईवडीलांना खुप आनंद झाला.
 
 त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय हे त्यांना मार्ग दाखवणाऱ्या वसंतराव नाईकांना जातं हे त्या आवर्जून सांगतात. कुलकर्णी मॅडमनी त्यांचं शिक्षिका होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं होतं. लहानपणापासून आपल्या भावंडांची सवय असल्याने शाळेत त्या लहान मुलांमध्ये रममाण होऊन जायच्या. पण तितक्याच त्या शिस्तबध्द . स्वत: शिस्तीचे पालन करत त्यांनी मुलांना शिस्तीचे धडे देत हसत‌खेळत आनंदाने ज्ञानार्जन केले. याच शैक्षणिक प्रवासात त्यांना मोलाची साथ‌ लाभली ती त्यांचे श्रीमान‌ प्रकाश लक्ष्मणराव कुलकर्णी. तेही पेशाने शिक्षक. अत्यंत बुद्धिमान आणि शिक्षणक्षेञात अमुल्य असे योगदान देणारे कुलकर्णी सर यांच्या कौतुकाला सिमा नाही. सुरुवातीला उंडणगाव आणि नंतर‌ खंडाळासारख्या छोट्याशा गावात‌ जिथे शिक्षणाचे बीजच नाही अशा गावात त्यांनी जिल्हा परिषद शाळा आपल्या कौशल्यातुन खुलवली आणि आदर्श शिक्षक पुरस्कारासह शिक्षण क्षेत्रातील अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. कुलकर्णी मॅडम या विशेष शिक्षिका असण्याचे कारण म्हणजे त्यांनी कधीच त्या पेशाकडे नोकरी म्हणून बघितले नाही तर 'आपण ज्या समाजात‌ राहतो‌ त्याचे‌ देणं लागतो.विद्यार्थी घडवणं‌ म्हणजे देश घडवणं हा त्यांचा यामगचा स्पष्ट दृष्टीकोन होता.' त्यामुळे त्यांनी १० ते ४ शाळा शिकवण्यापलीकडे ती घडवली. 
 
वेगवेगळ्या उपक्रमातून खेड्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावत त्यांच्यातील गुणांची जाणीव करुन दिली. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिकरित्या त्या काळात त्यांनी लक्ष दिले. पालकांशी संवाद साधत शिक्षणाची जनजागृती त्यांनी केली. गरीब परिस्थितीतही शिकण्याची जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना तर‌ त्यांनी सर्वतोपरी मदत केली. मैदानी खेळ, भाषण स्पर्धा, शैक्षणिक सहल असे उपक्रम त्यांनी लहान मुलांसाठी राबवले व सगळ्यांच्या लाडक्या शिक्षिका होण्याचा मान पटकावला. हे सगळं करत असतांना त्या फार‌ ओढाताण होत‌ असे कारण वडीलांच्या जाण्यानंतर आई अंथरुणावर आणि तीन मुलं. त्यांचं करुन शाळेत ड्युटी बजावणं खरच सोप्पं नव्हतं पण कडक शिस्तीच्या कुलकर्णी मॅडम नी तेही दिव्य यशस्वीरित्या पार‌ पाडत शाळेचा कारभार‌ सांभाळला. 

आज मागे वळून बघतांना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तयार‌ झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेञात आपला झेंडा यशस्वीपणे फडकवत आहेत. त्यात प्रसिद्ध आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक, अँडव्होकेट मिलिंद महाजन, डॉ.राजेंद्र धनवई, शिक्षक दगडू लांडगे असे असंख्य गुणवंत आहेत‌ ज्यांना मॅडमच्या शिक्षणछायेत आपला शिक्षणविकास साधता आला. शिक्षण काळात अनेक कटूगोड प्रसंगांना त्यांना सामोरे जावच लागले. अर्धी सेवा उंडणगावच्या शाळेसाठी खर्ची घातल्यावर अचानक त्यांच्या बदलीचे सरकारी दफ्तरातून फरमान निघाले. गोड आठवणी कटूप्रसंगामध्ये बदलायला वेळ लागला नाही. कारण ज्या विद्यामंदिराचा कुंटूंबाप्रमाणे सांभाळ केला ते सोडणं खरच अवघड होतं. कर्तव्याचा एवढा काळ एकाच‌ शाळेत राहून‌ विकास साधनं खरतर‌ ही अवघड गोष्ट असते. तसेच घरची जवाबदारी सांभाळून दुसऱ्या गावात शिकवायला जाणे खरच त्यावेळी तारेवरची कसरत होती. ही बातमी जेव्हा शाळेत आणि गावात पसरली तेव्हा सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. पण सरकारी आदेशापुढे नमतं घेणं भाग होतं आणि मॅडम त्या बदलीच्या गावाला रुजू झाल्या‌. विद्यार्थी माञ हिरमुसले; संपुर्ण शाळेचं प्रांगण जणु स्तब्ध झालं होतं. पण विद्यार्थ्यांनी मॅडम परत या ची दिलेली हाक खरच देवाने मंजूर करावी अशी झाली आणि पुढच्या दोनच दिवसात मॅडम पुन्हा आपल्या केंद्रीय प्रशालेला उंडणगाव मध्ये रुजू झाल्या. कटु आठवण गोड आठवणीत चुटकीसरशी बदलली. कारण गाव, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागणीतून परत मॅडम आपल्या मुळ ठिकाणी परत आल्या होत्या. हा अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी कौतुकाची थाप होती हे सांगतांना त्यांच्या अनेक शालेय आठवणींना उजाळा मिळाला. 

शिक्षण क्षेञात वरिष्ठांकडून मिळणारी कौतुकाची थाप आपल्याला ज्ञानदान करण्यास प्रोत्साहन देते. आपण अथक परिश्रम घेत‌ शिक्षणाचे समाजकार्य करत असतो आणि एक दिवस आपल्या कार्याला परिपुर्णता प्राप्त होते. लहानपणी बघितलेले स्वप्न सत्यात उतरुन ते निवृत्तीच्या दिशेने कधी सरसावले याची काडीमाञ जाणीव मॅडमला आपलं कार्य करतांना झाली‌ नाही. अखेर २८ फेब्रुवारी २०१० ला आदर्श शिक्षिका प्रतिभा प्रकाश कुलकर्णी यांच्या नावापुढे निवृत्त हे नाव‌ लागले आणि शिक्षणाचे बाळकडू त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडे देत खडू खाली ठेवला. त्यांचे दोंन्ही मुलं आणि एक मुलगी आज उच्चशिक्षित होवून आपापल्या क्षेञात‌ कार्यरत आहेत तर मोठा मुलगा हा प्राध्यापक आहे. निवृत्त १२ वर्षे होवून देखील‌ विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची धडपड त्यांची आजही चालू असते. त्यांच्या आई-वडीलांच्या नावाने त्या दरवर्षी गुणवंत शालेय‌ विद्यार्थ्यांना पारितोषिक पर रक्कम देतात; जेणेकरून तेवढीच त्यांना शिक्षणाला उभारी मिळेल.अनेक शालेय कार्यक्रमात ‌त्या आवर्जून सहभागी होत‌ विद्यार्थ्यांचे आजही मनोबल‌ वाढवतात. 

सौ.प्रतिभा कुलकर्णी मॅडम आजच्या काळातील ‌विद्यार्थी पालकांचा खाजगी शालेय संस्थांकडे वाढणारा कल बघतांना म्हणतात की‌, जिल्हा परिषद शाळा या खऱ्या‌ अर्थाने‌ शिक्षणासाठी परिपुर्ण असतांना त्यांची सद्यस्थितीला असणारी दयनीय अवस्था न बघवणारी आहे. जर‌ जिल्हा परिषद शिक्षकांनी झोकुन देवून काम करत परत एकदा उत्तम दर्जाचे ‌शिक्षण देत विश्वास संपादन केला तर नक्कीच विद्यार्थी परत एकदा सरकारी शाळेकडे वळतील. खंत वाटते की आज जिल्हा परिषद‌ शाळेला विद्यार्थी नाहीत; ओस पडलेल्या शाळेत बसायला व्यवस्थित वर्ग नाही. मी निर्माण केलेली शाळा आता मला कुठेच दिसत नाही हे विचार‌ मांडतांना त्या माञ भावूक झाल्या. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाले आणि‌ विद्यार्थ्यांची शाळेची नाळ तुटली. 

'विद्येचे मंदिर ते विद्येचेच असते'.

घरी बसून कितीही विद्या ग्रहण केली तरी शाळेची मज्जा काही औरच असते. यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेचे धडे मिळणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर‌ विद्यार्थ्यांमधील एकलकोंडेपणा वाढेल असेही त्या म्हणाल्या. आजही त्या शिक्षण क्षेञाच्या बाबतीत मिळेल त्यावेळेला काम करत असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. आजही कुलकर्णी मॅडम या सगळ्यांच्या तितक्याच‌ लाडक्या अध्यापिका आहेत. त्यांचा गोड मार‌ खावून आज मोठ्या पदापर्यंत मजल मारणारे विद्यार्थी ही अनेक आहेत. तो मार खरच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

अशा या उंडणगावच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ निवृत्त आदर्श शिक्षिका 'सौ.प्रतिभा प्रकाश कुलकर्णी मॅडम' यांना महिला दिनाचा सलाम! तुमच्यासारख्या प्रामाणिक शिक्षिका घडल्या तर‌ देशाचे भविष्य सुरक्षित हातात असेल ही अगदी काळया दगडावरची पांढरी रेघ आहे!तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
        ‌‌
                               🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

           "अनाथांची माय सिंधुताई सपकाळ"

                          💗"तिचं जग"💗


 एक स्ञी आपल्या आयुष्यात किती त्याग करते याचा थांग लागणे खरच शक्य नाही. तिचं मातृत्व आणि कर्तृत्व हे या जीवसृष्टीतील चराचरात अजरामर आहे.याच स्ञी कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महिला दिन विशेष आठवडा साजरा करायचं ठरवलय "तिचं जग" या खास ब्लॉगच्या माध्यमातून. आज पासून रोज ऐका नवीन क्षेञातल्या रणरागिणीचा प्रवास मी तुमच्या समोर‌ मांडणार‌ आहे ; जी खरच कौतुकास पाञ आहे.तिच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा आढावा नक्कीच आपल्यातील स्ञियांना स्वकर्तृत्व गाजवण्याची उभारी देईल. आज १ मार्च! पहिला ब्लॉग अखंड भारताची जननी अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला समर्पित. ज्या मायेच्या वलयात आपण अंतर्मुख होतो ते वलय आहे भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात...

अनाथांची माय, गरिबांच्या दुधावरची जाळीदारसाय  साय!

दि.४ जानेवारी २०२२ सकाळपासूनच भयाण वाटत होतं. काहीतरी‌ होणार आहे याची चाहुल लागलेली पण मनात एक आशा जी शेवटपर्यंत आस जागवून होती. अचानक ८ वाजुन १० मिनिटांनी टिव्ही लावताच काही क्षण सगळं सुन्न झालं. गॅलॅक्सी रुग्णालयातून बातमी वाऱ्यासारखी परसली. अनाथांची माय निवर्तली. जन्मापासून सुरु असलेला एकपाञी संघर्ष अनेक पाञांना आधार देवून शेवटाकडे वळाला. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने अख्खं विश्वच पोरकं झालं असलं तरी त्यांचा प्रवास हा त्या विश्वाला परत नव्याने संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद देईल एवढा तो कणखर कणा होता.

दि.१४ नोव्हेंबर १९४८. वर्धा जिल्ह्यातील ,पिंप्री मेघे आणि गावातील ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी आईवडीलांना नकुशी असणारी एक मुलगी जन्माला आली. म्हणून तिचं नाव चिंधी ठेवलं. पण पुढे जावून ह्याच चिंधीच्या ठिगळाने कित्येकाच्या आयुष्याची गोधडी उबदार होणार आहे याची कल्पना त्यावेळेला त्यांच्या आईवडीलांना नव्हती. जन्मापासून‌ सुरु झालेला चिंधीचा संघर्ष वयाच्या ९ व्या वर्षीपासून आणखीनच कठीण झाला जेव्हा २६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याची त्यांचा विवाह झाला. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि उमलत्या वयात लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता पुर्ण झाल्यानंतर शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगावात गेल्या.   भातुकलीच्या वयात सिंधुताईंवर खऱ्या संसाराची जवाबदारी पडली. घरी प्रचंड सासुरवास होता .कुटूंबात शैक्षणिक वातावरण नाही. माईंना माञ शिक्षणाची आवड. जंगलात लाकुडफाटा शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणून उंदराच्या बिळात लपवून ठेवत. क्वचितच घरी एकट्या असल्या की त्या अभ्यास हा करायच्या. हे लग्न फार काळ टिकले नाही. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली.   माञ चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्याच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे‌ वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी असणाऱ्या गुरांचे‌शेण काढता काढता बायांचे पार कंबरडे‌ मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या माञ त्याचा काहीही मोबदला मिळत नसे‌. या शेणाचा लिलाव वनखात्यातील अधिकारी करायचे. इथेच सिंधुताईंनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारला आणि याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक लढा सुुुरू झाला. याच लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. 

हा लढा त्या जिंकल्या पण त्याची माञ त्यांना जबर किंमत चुकवावी लागली. एका बाईने दाखवलेल्या धैर्याने  गावातील दमडाजी असतकर दुखावला गेला आणि सिधुंताईच्या पोटातील मुल आपले आहे असा प्रचार  सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चारिञ्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पुर्ण दिवस भरलेल्या गर्भवती माईंना त्याने बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. तशाच बिकट अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले आणि तिथेच त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने टाकून दिलेली बाई म्हणजे आपल्या समाजाच्या मार्गात अडसरच ना! अशा अस्पृश्य विचारसरणीच्या गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिले. सासरमधून बाहेर पडलेल्या माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही आणि त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्थानकावर त्या चतकोर भाकरी साठी, एखाद्या उष्ठ्या फळासाठी पोटाची खळगी भरावी म्हणुन भिक मागत हिंडायच्या. या सगळ्या ञासाला कंटाळुन एक दिवस त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ;पण तान्हुल्या लेकीकडे पाहून परत मागे फिरल्या. दिवसभर त्या भीक मागायच्या आणि राञी स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधीच‌ एकटे खाल्ले नाही.सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि सगळे भिकारी एकञ मिळून जेवणाचा आनंद घेत असत. याच भिकाऱ्यांनी २१ वर्षाच्या सिंधुताईला संरक्षण दिले. दोन दिवस माञ काहीच मिळाले नाही तेव्हा माञ त्यांच्या लक्षात आले  तिथे कायम राहता येणार‌ नाही. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी थेट स्मशान गाठले. जळणाऱ्या‌ चितेवर भाकरी भाजत त्यांनी त्या चितेलाही पविञ्याची शाल पांघरली. समोर आलेल्या धकधकत्या संकटांच्या छाताडावर बसून त्यांनी वाट रोखली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. 

आपल्या मुलीवर आलेली वेळ कोणावर येवू नये या विचारात आपल्या तान्हुल्या लेकीची आई हजारोंची माई बनली. अनाथ मुलांना सांभाळुन त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर‌ तालुक्यातील 'कुंभारवळण' या गावात "ममता बाल‌सदनची" स्थापना केली आणि त्या अनाथ आणि बेवारस मुलांच्या आयुष्याचा साचा बनल्या. या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. एवढ्यावरच थांबतील त्या माई कसल्या. आर्थिक दृष्ट्या स्वयंपुर्ण झाल्यावर या युवक युवतींचे योग्य जोडीदार बघून माईंनी स्वतः कन्यादान केलं. आपली कन्या ममता हिला दगडुशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्या इथवरच थांबल्या नाहीत तर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी संकलन करण्यासाठी त्यांनी "मदर ग्लोबल फाऊंडेशनची" स्थापना केली. यातून अनेक परदेश दौरे करत त्यांनी आपल्या काव्यातून आणि बोलण्यातून समाजप्रबोधन केले. त्याच्या कार्याचा उत्तुग असा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात जावून समाजमनावर बिंबवला गेला तो त्यांच्या "मी सिंधुताई सपकाळ" या त्यांच्या जीवनपटातून!  तसेच  "अनाथांची यशोदा" या नावाचा २०१४ साली  प्रदर्शित झालेला अनुबोधपटही त्यांच्या जीवनाचा ठाव घेण्यास उद्युक्त करतो. त्याच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण जेव्हा २०२१ साली महाराष्ट्राच्या लाडक्या माईंना "पद्मश्री सिंधुताई सपकाळ" असे भारदस्त नाव मिळाले तेव्हा माञ मनामनांत माईंचा अभिमान वाटावा असा क्षण सगळ्या जनमानसाने अनुभवला. आजही माईंचे जुने भाषण काढुन ऐकायला घेतले तरी अंगावर शहारा येतो. मनात समाजसेवेची मशाल पेटते आणि समाजकार्यासाठी प्रेरणा मिळते.

आज ही संघर्षाची मशाल थंडावली. माञ तिचा प्रकाश हा सदैव या आयुष्याच्या खुल्या रंगमंचावर आपल्याला वाट दाखवत पडत राहणार आहे. माईंच्या जीवनाची सुरुवात ही नकुशी या शब्दाने झाली, चिंधी या नावाने झाली. नंतर त्यानी अग्निदिव्यातून जात संघर्ष करत केवळ स्वत:चच नाही तर हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. आपलं आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालते पण तिचं आयुष्य माञ निराधारांच्या वेळापञकावर चालले. याच अनाथांच्या यशोदेचं असं अचानक सोडून जाणं असह्य असलं तरी...

माई म्हणजे अथांग असा कधीही न आटणारा असा मायेचा समुद्र आहे..‌‌.

वरुन जरी शांत दिसत असला तरी आत अख्या जगाचं चक्र चालवणारा समाजकार्याने झपाटलेला अनाथांचा आधार आहे...

 माई म्हणजे कधीही थांग न लागणारा अथांग असा सागर आहे अथांग असा सागर आहे...

माई आहेत आणि असणार आहे त्यांनी घडवलेल्या अनाथांच्या संस्कारात...

माई आहेत आणि असणार‌ आहेत त्यांनी रोवलेल्या समाजसेवेच्या बीजारोपणात...

माई आहेत आणि असणार‌ आहेत प्रत्येक भारतीयांच्या कणा कणात  आणि मनामनात...

    माईंच्या  या संघर्षमय वाटचालीला सलाम..!आपण त्यांच्या इतका मोठा पदर तर नाही मारू शकत कारण माय ती मायच असते' परंतु आपणा ज्यांना शक्य असेल त्यांनी एका अनाथास दत्तक घेतले अथवा त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली तर ती नक्कीच ताईंना खरी श्रद्धांजली असेल!  स्ञी जीवनाचा आदर्श आधारस्तंभ म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्या आज नाहीत पण त्यांचे कार्य माञ यापुढील अनेक पिढ्यांना घडवणार आहेत.!

                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

मराठी भाषा गौरव दिन..,

                 ......गोष्ट मराठी भाषेची......


मुहूर्त २७ फेब्रुवारीचा! 'विष्णू वामन शिरवाडकर'अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती.नाटककार,लेखक,कविवर्य अशा थोर व्यक्तीचिञातून मराठी भाषेला विविधता प्राप्त करून देत मातीतून मनात रुजवणारे आपले लाडके कुसुमाग्रज.त्याच्या स्मरणार्थ २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.आपली मराठी भाषा ,मराठी साहित्य‌ हे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. संतांनी निर्माण केलेल्या विपुल‌ साहित्याची देणगी म्हणजे आपली माय मराठी...आणि याच आपल्या अभिजात मराठीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणिअसायलाच हवा.आपली मराठी भाषा जपायची असेल तर ती आपण ऐकलीच पाहिजे,वाचलीच पाहिजे,बोललीच पाहिजे आणि क्षणाक्षणाला आचरणात आणलीच पाहिजे आणि ती वाढती ठेवली पाहिजे.आपल्या मातृभाषेतून आपण व्यक्त व्हायलाच हवं ....अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा आणि त्याच माझ्या मायबोलीत मी आज माझ्याच मराठीला काव्यबध्द करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे... सादर करते... एक मराठीमय कविता...


मी मराठी


गर्व मराठी, सुर मराठी‌

राजभाषा मराठी
रुपारुपांतून बहरत जाते,मायबोली मराठी
इतिहासाच्या पटलावरची श्रेष्ठ भाषा मराठी
आचरणातून समृध्द व्हावी मायबोली मराठी
एकच नारा मराठीबाणा हेच स्वप्न उराशी!


 मृदेतून जन्मणारी मृदू भाषा मराठी

 संतंमहतांच्या वाणीतूनी गर्जणारी मराठी
 धगधगत्या लाटेतून आली माय माझी मराठी
 आचरणातून आता रुजावी महाराष्ट्रात मराठी!

गर्व असा मी मराठीचा,अभिमान असावा मी मराठीचा

दारावरच्या पाटीवरही माज दिसावा मी मराठीचा
भाषेतून भाषा उसळत जावी ,हा असावा ध्यास मी मराठीचा!

 दर्जा अभिजाततेचा उसळावा सळसळत्या रक्तापरी

 आचरणातून समृध्दीचा मार्ग सापडावा मी मराठी...
जेव्हा आचारणातून दिसेल आपली अभिजात मराठी
तेव्हाच आर्त साद जाईल तनमन धनातून मी मराठी मी मराठी मी मराठी...!

बघतोयस का माझ्या मराठीची पुण्याई..

अभिजात दर्जा नसुनही गुंजतेय ती मरीठीची शहनाई!

गोफ मराठीचा गुफंताना

मराठी साहित्याला स्मरतांना
आवाज निघतो उरातून 
माझ्या माय मराठीला मिळावा
अभिजात‌ दर्जा मनातुन‌आणि अखंड महाराष्ट्रीयन जनतेच्या आचरणातून .....
माझ्या माय मराठीला मिळावा 
अभिजात दर्जा मनातून आणि अखंड महाराष्ट्रीयन जनतेच्या आचरणातून..!

                     ‌‌‌‌       🖋️‌‌ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

 
 

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

राजं🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

राजं
                       🚩🚩राजं🚩🚩

बलदंड असा हा शिव‌ पहा..... !
सशस्त्र असा हा शिव‌ पहा....!
 राजं तुम्ही आलात.... !
असंख्य जनसमुदायाचा निश्चयाचा महामेरू, अखेर त्या ११ च्या ठोक्याला अश्वारूढ होऊन साक्षात अवतरला....
राजं तुम्ही आलात....!तुमच्या संभाजीच्या नगरात दिमाखात आलात....राजं तुम्ही आलात... !
अंधारातून जसा तळपता सुर्य क्षणात उगवावा आणि साऱ्या विश्वास अंधकार बाजूला सारून‌ प्रकाशाचा उदय व्हावा तसे तुम्ही आलात....
राजं तुम्ही आलात...!
तुमच्यानंतर स्वातंञ्याच्या नावाखाली असंख्य बेड्यामध्ये अडकलेल्या तुमच्या प्रजेला मुक्त करण्यासाठी आलात....
राजं तुम्ही आलात......!
राजं तुम्ही आलात....!
अगदी असाच साक्षात्कार काल‌राञीच्या त्या अदभुत, अनाकलनीय सोहळ्यात झाला.कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तो डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा काल १८ फेब्रुवारी राञी ११ वाजता पार पडला.लाखोंच्या नजरा आतुरतेने एकच दृश्य पाहण्यास अत्यंत आतूर झाले होते
संपुर्ण शहर जणु त्या भगव्या रंगाच्या छटेत तल्लीन होऊन अर्ध्या रात्री ढोल ताश्यांच्या तालावर ठेका धरत होते...
कित्येक पिढ्या क्रांती चौकाच्या परिसरात ओलांडल्या या एका पिढीचा इतिहास जपण्याच्या नादात , या अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळ्यात सामील मानव रूपी गर्दी केवळ त्या एका नावासाठी आली होती.. त्या जाणत्या राजासाठी ओथंबली होती ...जागा मिळेल तिथून आपल्या राजाचं अश्वारूढ स्वरुप डोळ्यात साठवून घेत होती. "न भूतो न भविष्यती"! असा हा डोळ्याचे पारणं फेडणारा अनावरण सोहळा खरच संभाजी नगरच्या इतिहासाचं वैभव असणार ये. तो अनुभव तेजोमय दिव्यत्वाची प्रचिती देणारा ठरला.साक्षात छत्रपती अश्वारूढ होऊन आले.एवढ्या अलोट जनसागरातही उभ्या जागेवरुन महाराज‌ सगळ्यांना भेटले.नजरेनी ते दिव्यत्व क्षणार्धात टिपले अन् खरच तिथे महाराजांचा भास झाला.देशातील सर्वात उंच मुर्ती आपल्या सर्वश्रेष्ठ राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची, ती ही ऐतिहासिक शहरात !खरच.... अभिमानाने ऊर भरून यावा असा हा सोनेरी क्षण....!
कर्तृत्वाने जग जिंकलं जातं याचं सर्व श्रेष्ठ उदाहरण म्हणजेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज...! आपल्या संभाजीनगरच्या क्रांती चौकात आता शिवतीर्थ अवतरले...
हिम्मत ना कोण्या शञुची ना देशद्रोह्याची 
कारण आगमनानेच किर्ती झाली झाली ,
अश्वारूढ ढाण्या वाघाची...
छञपती शिवरायांचा ध्यास हाच प्रजेचा अखंड श्वास हे महाराजांच्या पुतळ्याकडे बघता क्षणीच जाणवते. किर्तीवंत राजाची मुर्तीवंत रुपातील मुर्ती जगभर किर्तीचा विषय ठरतेय. या पुतळ्याची उंची २१ फुट,चौथऱ्याची ३१ फुट तर या पुतळ्याचे वजन हे सुमारे ७ मेट्रिक टन असुन पुतळ्यावर २४ कमानीत महाराजांचे २४ मावळे त्यांना पहारा देत शानेने उभे आहेत.गेल्या चार‌ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या या पुतळ्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
अन्
  संपुर्ण वातावरण शिवमय समुद्रात अथांग खोलवर गेले. ढोलपथकांचा दांडगा उत्साह, 
आसमंतातील शिवघोष , भगव्या झेंड्याचा मंडप आणि 

अमाप शिवप्रेमी जनसागर...काय तो नजारा काय तो डोलारा, शिवदंग शिवगुंग ,शिवरंग झाला खुला नभी आसमंत सारा

शिवनेरीवर राजा जन्मला,किल्यावर आनंद पसरला
शिवबा तो जन्माला आला,स्वराज्य रक्षक पुढे बहरला

निधड्या छातीने वार झेलणारा ,दिनदुबळ्याचा सळसळणारा वारा, शिवराय म्हणजे मराठी मनामनांचा एक लखलखणारा तेजस्वी ध्रुव तारा..

शिवरायांची तलवार , तळपणाऱ्या आगीतून चढलीय तिला चांगलीच धार...
अश्वारूढ होऊनी निघतो तो ,रयतेच्या कल्याणासाठी
रक्तांच्या थारोळ्यातही लढतो ,फक्त आणि फक्त देशप्रेमापोटी....


हा सोहळा बघून रयत धन्य झाली. पण महाराजांची किर्ती अशी एका दिवसाने नाही न साधता येणार. शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयांचे आदर्श आहेत.त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकत‌ आपण मोठे झालो. इयत्ता चौथीचं फक्त एक पुस्तक महाराजांच्या आयुष्याची संपूर्ण ओळख करुन देते. पण शिवाजी महाराज‌ हे वलय आपल्यात आहे का? हे आपल्या अंतर्मनात आपण कधी डोकावून पाहिलंय?

 निश्चयाचा महामेरू ,बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी...!
हे आपलं राजं.....!
प्रत्येकाला शिवाजी महाराजांचा आदर्श वाटतो, जिजाऊच्या संस्काराची किमया वाटते.आपण सहज महाराजांचं उदाहरण देतो, एवढा त्यांचा इतिहास आपल्या मनावर‌ बिंबवला गेला आहे.‌ माञ, आजच्या युगात प्रत्येक आईला वाटतं शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात. जिजाऊंच्या हातुन शिवबा सारखा पुञ घडावा तो‌ दुसऱ्यांच्याच घरात.अन्यायाने पाखडली जाणारी जनता दिसतेय, सिमेवर शहीद होणारे जवान दिसताय माञ, शिवाजी दुसऱ्यांच्याच घरात‌ जन्माला यावा. स्वतंञ राष्ट्रात अंतर्गत हितशञुच देश पोखरताय, आयाबहिणींच्या इज्जतीचे भर रस्त्यात वाभाडे निघता आहेत. माञ, शिवाजी दुसऱ्यांच्याच घरात जन्माला यावा. भ्रष्टाचार, बेरोजगारी, लाचारी,बेकारी याने देश देशोधडीला लागावा माञ शिवाजी दुसऱ्याच्याच घरात जन्माला यावा. कित्येकांना टोचेल ,कित्येकांना पटेल माञ, ही भुमी तेव्हाच पावन होईल जेव्हा प्रत्येक आई म्हणेल माझा मुलगा शिवरायांसारखा शञुला मगरमिठी मारुन लढेल. नुसतं शिवाजी नाव धारण करून होत नाही तर त्यांच्या अंगातील प्रत्येक रक्तपेशीतील रक्तात  देशप्रेम, रयत प्रेमाचं वास्तव्य असावं जे छञपती शिवाजी महाराजांच्या रोमारोमात होतं. 

शिवाजी महाराजांनी देश घडवला, त्यांच्या छञछायेखाली संपुर्ण रयतेला सुरक्षिततेचा पहारा दिला. समान न्याय, एक धर्म, एक राष्ट्र या एकत्वाची भक्ती , जगदंबेच्या आशिर्वादाने रयतेच्या मनमनात रुजवली तेव्हा तो राजा श्रेष्ठ ठरला. पण आपण माञ‌ देशसेवेत सैनिक म्हणून रुजू व्हायला घाबरतो, सैन्यात भरती होणाऱ्याची वाट रोखतो. तिथे मग देशप्रेमाच्याही वर पुञप्रेम, नाते वरचढ ठरते. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणाऱ्या तरुण पिढीलाही मागे खेचण्यात आपणच अग्रेसर‌ असतो. आपल्याला देशातील सुव्यवस्थेपेक्षा, जागोजागी होणाऱ्या भ्रष्टाचारापेक्षा आपला जीव आणि पैसा महत्वाचा वाटतो. असे आम्ही शिवाजीचे मावळे.जगणं असह्य व्हावं असा क्षण आला तरी आपल्यातील शिवमावळा लपून बसेल असे आपण शिवप्रेमी. नुसते जयघोषातून शिवप्रेम दाखवणारे. आपल्या देशात कित्येक गैरव्यवहार होत असतात, सुडाचे‌ राजकारण गल्लोगल्ली चालू असते. कित्येक गुन्हे डोळ्यासमोर‌ घडतात, पण तेव्हा माञ आपल्यातला शिवाजीचा मावळा सगळ्या गोष्टी नजरेआड टाकत नुसता अन्यायाच्या छञाखाली जगत राहतो. 

आज आपण रयतेच्या राजाची श्रीमंत योगी छञपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती साजरी करतो आहोत. ३९० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी केलेल्या अफाट कार्याचा वेध आपण आजही घेत असलो तरी, आपण त्यांच्या कार्याला जागत आहोत का? त्यांनी दिलेले सुसज्ज, सुव्यवस्थित, शांतताप्रिय साम्राज्याचे धडे आपण गिरवत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला एकदा तरी विचारून बघावा. आपण चुकतोय, आपण भरकटलोय म्हणून आज साक्षात महाराजांना अश्वारूढ होऊन यावं लागलं. हे त्या बोलक्या मुर्तीकडे एकटक बघितल्यावर जाणवतं. हात आपोआपच जोडले जातात, पण राजं, तुमच्या नजरेत बघायला लाज वाटते कारण, तुम्ही आलात माञ तुम्ही निर्माण केलेली गुंतवणूकदार प्रजा, शांतताप्रिय प्रजा, आज्ञाधारक प्रजा माञ राहिली नाही हो. अखंड तुमच्या नावाचा जयघोष दुमदुमतो आहे. रोमारोमातून शिवप्रेम ओसंडून वाहत आहे माञ जगण्यात, आचरणात जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा तुमची खरी शिवजयंती असेल. जेव्हा सगळा ताण विसरुन शिवाजीचा मावळा हर हर महादेव !च्या गजरात तुम्हाला आत्मसात करेल, तेव्हा देशातील अनैतिक गोष्टींना कायमचा आळा बसेल आणि प्रत्येकाच्या मनमनात खरी शिवजयंती साजरी होईल. "छञपती शिवाजी महाराज" होणं हे अत्यंत जोखमीचं कारण, शिवाजी महाराज घडवायचे असतील तर जिजाऊंसारख्या महान आईसाहेबांना जन्म घ्यावा लागेल. परंतु आपण शिवराय नाही तर‌ शिवरायांचे मावळे बनून ह्या देशात चालणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा अंत नक्कीच करु शकतो.

आपल्या शिवरायांसारखी तलवारीने रक्तरंजित होळी खेळायची नाही तर लोकशाही अस्ञ वापरुन शञुंचा नायनाट करायचा आहे. महाराजांची कृपा म्हणून आपण हुकमशाहीच्या दोऱ्यांतून सुटलो, पण लोकशाहीच्या स्वतंञ दोरीचा हुकूमशाहीत दोरखंड व्हायला वेळ नाही लागणार, जर आत्ताच आपण सावरलो नाही तर‌ ......! महाराजांना शञूची चाहूल लागत होती. त्यांना शञुला निरखुन बघताच शञुंची चाल कळत असे. माञ, आपल्या देशात एवढे हितशञू आहेत की ते बाजूला असूनही वार केल्याशिवाय समजत नाही. केव्हा आपण जागे होणार? 'जय भवानी, जय शिवाजी' गर्जनेतून मिळणारी ऊर्जा सामाजिक कार्यात खर्ची घालायला हवी. नुसत्या रॅल्या काढुन एक दिवस गाडीवर फिरल्याने समाजात बदल घडणार नाही. त्यासाठी शिवाजी महाराजांचे मावळे बनावेच लागेल. एकदा स्वत: ला शिवभक्त म्हणवून घेतांना माझ्यात शिवाजी महारांनी शिकवलेले गुण आहेत का?....शिवाजी महाराजांनी आखुण दिलेल्या रस्त़्यावर चालत आलो आहे का? हे विचारा...जर उत्तर हो असेल तर मग मनाच्या आणि पोटाच्या आतड्यांपासून ओरडून, जिवाच्या आकांताने,  निधड्या छातीने शिवरायांचा जयघोष करा.....

'जय भवानी जय शिवाजी'..... 

आणि तोच खरा मावळा असेल....;इतिहासाच्या पानावर‌ असणारा राजा मनात मुखोद्गत करत, घ्या ढाल‌ हातात आपल्या देशातील समस्यांना संपवण्यासाठी...! महाराज आहेतच पाठीशी....जेव्हा गरज पडेल तेव्हा महाराज‌ स्वत: तलवार घेवून आपल्याला संकटातून बाहेर काढतील. पण आता लढायची गरज आहे. महाराजांच्या युक्त्या, महाराजांचा इतिहास जल्लोषापुरता उघडण्याची वेळ आता निघून गेलीय. आता तो इतिहास वर्तमानात बदलून महाराजांना शरण जात त्यांच्याकडून बदलाची तलवार घेवुन लागा कामाला....संकट तडीपार होईल, तेव्हाच छञपतींची खरी शिवजयंती होईल.....!

संभाजीगरच्या इतिहासतलं हे लखलखतं सोनेरी पान अश्वारूढ महाराजांनी घेरलं. धन्य झाली ही नगरी जिच्यावर शिरस्ता असणार‌ आहे, साक्षात रयतेच्या राजाचा...
नमन त्या किर्तीवंत शिवरायाला, शतश: नमन.....

राजं मुजरा....🙏🙏🙏


   ‌                राजं......
                🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️ 




शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

औरंगाबादचा सोनेरी नजराणा.....

औरंगाबादचा सोनेरी नजराणा......

औरंगाबाद म्हणजे 52 दरवाज्यांचे शहर, औरंगाबाद म्हणजे हिमरू शालीची बाजारपेठ, औरंगाबाद म्हणजे इतिहासातील महत्त्वपुर्ण घडामोडींची साक्ष देणारे शहर.औरंगाबाद म्हणजे अजिंठा एलोरा पर्यटन केंद्राचा केंद्रबिंदू . महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे औरंगाबाद.आणि संभाजी नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच औरंगाबादची विशेष ओळख म्हणजे ऐतिहासिक शहर.पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर इतिहासाच्या भक्कम पाऊलखुणा घेऊन ताठ मानेनं उभं आहे.आणि नुसतं उभंच नाही तर त्याने तो वारसा अगदी सराईतपणे जपुन ठेवलाय.याच वारस्याचा अभ्यास आतापर्यंतच्या सगळ्याच पिढ्या करत आहेत त्या ऐतिहासिक ठेव्याला जिंवत ठेवत आहेत.

त्याच पिढीतली मी एक.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे उगवत्या पञकारितेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून अभ्यासावर आधारित सहल आयोजित करण्यात आली होती.त्याच संदर्भातील माझा अनुभव.औरंगाबादचे विविध पैलू उलगडतांना आपल्याला एक महत्वाचा असा पैलू सापडतो .तो म्हणजेच सोनेरी महल. "The golden Place". ही ऐतिहासिक वस्तु औरंगाबाद शहरातील सातमाळा या नयनरम्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात स्थित आहे.वास्तुसमोर उभं राहताच एखाद्या चिञकारानं रेखाटावं असं विहंगम दृश्य आपले पाय जागेवरच थबकवून ठेवते. मागच्या बाजूला झाडे-वेली पाना फुलांनी सजलेले डोंगर आणि पायथ्याशी हा महल.एक वेगळीच प्रसन्नता वाटते.अभ्यासाच्या दृष्टीकोनातून आम्ही सगळे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरती बारीक नजर ठेवून होतो.इथे आल्यावर पहिला प्रश्न याला सोनेरी महलच का म्हणतात ?असा पडणे अगदी सहाजिकच आहे. तर सोनेरी महालाच्या तळमजल्यावर दरबार महालातील चिञे ही खऱ्या अर्थाने सोन्याचा मुलामा देवून रंगवलेली आहे.म्हणूनच या आयताकृती वास्तूला सोनेरी महल असे नाव पडले. ही वास्तू दुमजली असून उंच चौथऱ्यावर अगदी शोभून दिसते.आपण जेव्हा सोनेरी महालाच्या भव्य प्रवेशद्वारातून आणि पुर्वीच्या नावाप्रमाने हाथीखाण्यातून प्रवेश करतो तेव्हा या वास्तूची मजबूत अशी तटबंदी बघायला मिळते. या वास्तुला चारही बाजूंनी सुरक्षा भिंत आहे. या हाथीखाण्याचे भव्य बांधकाम,निमुळत्या कमानी आणि कोरीव.नक्षीकाम खरच वास्तुच्या सौंदर्यात भर घालते. याच हाथीखान्यातून प्रवेश केल्यावर एक मार्ग हा महालाकडे जातांना दिसतो. आणि याच रस्त्याच्या मधोमध एक लंबाकार जलाशय आपल्या नजरेस पडतो.मिळालेल्या माहितीनुसार मुघल‌ स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणजे हा जलाशय.यात असंख्य मासे आहेत जे अजून त्या जलाशयाच्या सौंदर्यात भर घालतात.पुढे वरती चोथरा चढल्यावरती आपल्याला जलाशयाची एक वेगळीच बाजू कळते. ती म्हणजे याचे बांधकाम हे पाटाच.या पध्दतीने केले आहे.म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वरच्या पसरट भागातून ते पाणी लंबगोलाकार जलाशयात साठवले जाते .आणि हेच पाणी दोन्ही बाजूंनी असलेल्या बांगांना पुरवले जाते.पावसाळ्यात छोट्या धबधब्या परी वाहणारं हे पाटाचं पाणीबघण्याची मज्जा येथे काही औरच असते.त्या काळातही शाश्वतता किती छान पध्दतीने जोपासली हे आपल्याला जाणवते.

सोनेरी महालाच्या दर्शनीय भागात 'लाला हरदौल' यांची समाधी सुमारे५० मीटर अंतरावर आहे.हे बुंदेलखंड ओरशा नरेश वीरसिंहदेव यांचे पुञ व पहाडसिंगराजा यांचे भाऊ होते.लाला हरदौल हे बुंदेलखंडातील महान स्वतंत्र सेनानी व कुशल योध्दा होते.त्यांची समाधी ही चौरस आकाराची असुन समाधी परिसरात दगडी पायऱ्यांची विहीर आहे. संपुर्ण वास्तुचे बांधकाम हे दगड,लाखोरी विटा आणि ,चुन्याचे आहे.खालच्या मजल्यावर एक स्तंभबध्द दालन व चार अन्य खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर मध्यभागी एक दालन असून चार कोपऱ्यात चार खोल्या आहेत. वास्तुच्या पहिल्या दालनात १८व्या शतकातील चिञकलेचा ठेवा बघायला मिळतो. हे चिञ लाकडावर कोरले गेलेले असून यात मुख्य म्हणजे फुलापानांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगछटांचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो.रामायणातील दृश्य,वराह अवतार,कृष्णाची रासक्रिडी असे अनेक प्रसंग त्या चिञांतून जिवंत करण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.त्यापुढील दालनात लाकडांवर कोरलेली चिञ आपल्या डोळ्यात जणु तेज आणतात.गजलक्ष्मी असो वा विष्णुच्या युगातील प्रसंग.ती पेंटीग आपल्याशी हितगुजच करते. त्याच्याच बाजूला काचपेंटींग आहेत.ज्या ८० च्या दशकांपासून सोनेरी महलाचे सौंदर्य वाढवत आहेत. याच वास्तुच्या पहिल्या मजल्यावरील पुढच्या दालनात १९७९ साली प्रादेशिक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले. ज्यात पुरातन कलावस्तूंचा सग्रह करण्यात आला आहे.यात उत्खननात सापडलेल्या प्राचीन मुर्ती,चिञे,भांडी, दागिने,शिल्प,,शस्ञे असे विविध प्रकार संग्रहित आहे. तेर , उस्मानाबाद येथील उत्खननातून सापडलेली भाजलेल्या मातीची भांडी, कलावस्तू,लाकडी फळीवर व काचेवर रेखाटलेली चित्रे, मराठवाड्याच्या विविध भागांतून प्राप्त दगडी शिल्पे याचा अनमोल ठेवा आपल्याला बघायला मिळतो.तसेच जुन्याकाळातील मुदपाकखान्यातील भांड्यांचे केलेले जतन आपल्याला त्या काळात घेवून जातात.याच संग्रहात एक तिजोरी आपल्या दृष्टीस पडते.ती१८७०मध्ये वैजापुर मध्ये सापडली.तसेच येथे कागदी लगद्यापासून बनवलेल्या वस्तुंचाही संग्रह आहे..त्या काळात संदेश पोहोचवण्यासाठी . वापर‌ केला जात असे.म्हणजे यावर संदेश लिहून तो राजापर्यत पोहोचवला जात होता.यावर देवनागिरी आणि मोडी लिपीचा वापर केलेला असल्यामुळे आपल्याला ती लिपी समजत नाही. त्या काळातील दिव्यांचा अलौकिक संग्रही या दालनात आपले लक्ष‌ वेधतो.त्यावरील नक्षीकाम हे आजघडीला ही जमणं खरच शक्य नाही .

सोनेरी महालातील एक सगळ्यात लक्षवेधी दरबार दालन हे भिंतीवरील‌ चिञांचे आहे . या चिंञांमध्ये निसर्गाचे प्रतिबिंब आपल्याला आढळतेे. या चिंञांमध्ये मुघल चिञशैलीचे दर्शन घडते.वनस्पती वास्तुशास्ञाशी संलग्न असलेल्या कलेत झाडे,पाने,फुले,फुलदाण्या यांनी सुशोभित केलेल्या भिंती खरच भारी वाटतात.बारीक निरीक्षण केल्यास गुलाब आणि लिली या फुलांची चिञे त्या भिंतीवर रेखाटलेली दिसतात.तसेच याच भिंतींना सोन्याच्या पाण्यानी मुलामा दिलेला आहे.पण असं म्हणतात की त्या काळात हे सोने चोरुन नेले असल्याने तिथे आता खुप कमी प्रमाणात सोने जाणवते. याच दालनात दिव्यांची प्रकाशव्यवस्था अशा पध्दतीने केली की तो प्रकाश पडताच ती सोन्याची दालने सुवर्ण प्रकाशात उजळुन निघतात.या सोन्याच्या महालामध्ये पारसिंग राजा,पद्मसिंग राजा,जयसिंग राजा,भावसिंग राजा यांचे दरबार भरत असे.हा महल‌ जवळपास ३००ते ३५० वर्षापुर्वीचा आहे.हा सोनेरी महल हा औरंगजेबासोबत दख्खनमध्ये आलेल्या बुंदेलखंडाच्या सरदाराने बांधला आहे.याच दरबारा बालााजीची तांब्याचीसुंदर मुर्ती आहे जी १९व्या शतकात औरंगाबादच्या उत्खननातून सापडली.

यानंतर दगडी शिल्प दालनात आम्ही प्रवेश केला.या दालनात एकूण तेहतीस मुर्ती आहेत.त्यात काही अरेबिय, उर्दू ,पार्शियन अशा विविध भाषेतील शिलालेख आहेत.याच दालनात अखंड लाकडापासून तयार करण्यात आलेला सुंदर असा अष्टभुजा गणपती आहे. वेरुळ मधील दवणे यांच्या सागवान वाड्याचे अवशेष येथे आणुन त्याचे रुपातंर नक्षीदार मंदिरात केलेले आढळते.आणि याच गणेशाच्या बाजूला राधाकृष्णाची मार्बलची रेखीव मुर्ती आहे.या लाकडी ठेव्याला किड वगैरे लागु नये म्हणून वेळोवेळी विशिष्ट केमिकलचा वापर करुन त्याची देखरेख केली जाते.यानंतर विरूद्ध बाजूला असणाऱ्या सोनेरी महलच्या शस्ञास्ञ दालनाात प्रवेश करताच आपल्याला तोफा बघायला मिळतात.यातील काही तोफा या औरंगजेबाच्या काळातील आहेत तर काहींचे अवशेष हे उत्खननातून सापडलेले आहे.इथे आपल्याला विविध प्रकारचे तोफगोळे ,शस्ञांस्ञांचा संग्रह बघायला मिळतो.याच दालनातील पुढील बाजुस वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आहेत.त्याचबरोबर त्याकाळातील शोभेच्या वस्तुंचा खजिनाही इथे दिसतो.याच दालनातून वरच्या मजल्यावर सोनेरीमहल देखरेख कार्यालयात आहे.आपल्याकडे जर ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असेल तर संपर्क साधून आपणही एक पाऊल ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने टाकू शकतो.

खरच सोनेरी महल‌ म्हणजे औरंगाबादचा अभिमान वाढवणारा अमुल्य खजिना आहे.येथे मिळालेली माहिती आमच्यसाठी जणु दैवी  देणगी आहे.अशा वास्तुंचं जतन आपल्या पुढच्या हजारो पिढ्यांना सदन बनवू शकते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.तिथे गेल्यावर एक गोष्ट माञ पोटतीलकेने जाणवते.अजूनही गरज आहे ह्या वास्तुचे संवर्धन करण्याची. वास्तूकडे येणारा रस्ता हा अजून व्यवस्थित हवा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या वास्तुचा इतिहास पोहोचायला हवा.या वास्तुकलेने आजपर्यंत खुप संघर्ष बघितले,मोठमोठे उत्सव साजरे केले . ऊन, वारा, पाऊस झेलले तरी ती तटस्थ उभी आहे.आपला इतिहास जागता ठेवत! सगळ्यांना हीच विनंती नक्की सोनेरी महलला भेट द्या आणि ह्या दिव्य वास्तुचा अभ्यासात्मक आणि संशोधनात्मक दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करा .काही तरी दिव्य हाती लागल्या शिवाय राहणार नाही!

                              🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

स्वातंञ्याची पंचाहत्तरी

स्वातंञ्याची पंचाहत्तरी
                      स्वातंञ्याची पंचाहत्तरी
पुर्वसंध्या स्वातंञ्यदिनाची, नांदी असावी ही एका नव्या कोरोनोत्तर पर्वाची 

भारतमाते जननी आमुची,तुच रक्षिणी या धरतीची
मोड मान या कोरोनाची नव्याने रच कहानी या पावन भारतभुमीची

वंदुनी तुजला साक्ष देते वचनाची 
जपेल तुला चाहुल लागताच संकटाची 

काळजी घेईल ग तुझ्या नैसर्गिक संपत्तीची 
हे माते गिळंकृत कर मती कोरोनाची.....

 नमस्कार मंडळी...अहो आपला भारतदेश म्हणजेच हिंदुस्तान म्हणजेच इंडिया आणि म्हणजेच भारताच्या आधीचेही आर्यवर्त;आज आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय.अत्यंत बिकट परिस्थितीतुन हाडाची काडी करत तर कधी मोठी खिंड लढवत छत्रपती शिवाजी महाराजांपासुन ते पेशवे त्यानंतर आपल्या मातृभक्तांनी, स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावुन प्रसंगी बुध्दीचातुर्यातुन ब्रिटिश सरकारला सळो की पळो करु सोडले व आपल्या अतिप्रिय अशा मातृभुमीला पारतंत्र्याच्या बेड्यांतून मुक्त कले....तो दिवस म्हणजे १५ आगस्ट १९४७...हाच तो दिवस ज्या दिवसाच्या पहिल्या ठोक्याला म्हणजेच रात्री 12 वाजता...स्वतंत्र भारताचे बिंग फुटले..आणि पाऊलवाट सुरु झाली ती विकसनशील भारताकडे.आणि आज 75 वर्षे पूर्ण होऊनही ती चालूच आहे.आपला भारत देश म्हंटला की डोळ्यांसमोर दृश्य उभे रहते ते दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या,हिरवागार समृद्ध असा निसर्ग, ऐतिहासिक वारसा लाभलेले मोठमोठे गडकिल्ले,मंदिरे,लेण्या,त्याचबरोबर विविध भाषा,संस्कृती ,धर्म,संतांची शिकवण यांचा एकत्रित संगम म्हणजेच. आपला भारत देश. 
 काय वर्णावे तुझे रूप
अमाप अखंडित भारता तुझे स्वरूप....!
आपल्या भारताने न मोजता येतील एवढे संकटे झेलली ,पण संकटावर मात करत जो मोठ्या शानेने तिरंगा फडकवतो ,त्याचेच नाव म्हणजे भारत!
भारताला पूर्वापार मिळालेले गतवैभव हे भारताचे खरे अस्त्र आणि खरी संपत्ती आहे.75 वर्षात भारत देश हा अफाट आणि अमाप बदललाय'अगदी सगळ्याच पैलुतून विचार केला तर कमी असे इथे काहीच नाही.एवढी आपली भारतभूमी सुसज्ज आहे.अगदी सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् या गाण्यात रवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या शब्दारचनेसारखी.आपली भूमी ब्रिटिश तावडीतून सोडणुकीसाठी जितके प्रयत्न झाले त्यानंतर तितकेच ती भूमी एक राष्ट्र म्हणून उभे करण्यात घेतले गेले.एकापेक्षा एक कार्य हाती घेण्यात आले. यातली सर्वात मोठी देणगी म्हणजे संविधानरुपी मिळालेले सामान्य जनतेला अधिकार आणि त्यातून पुढे झालेली उन्नती. लोकशाहीचा अधिकार व त्यातून देशोन्नती साठी निर्माण झालेले सुपुत्र ज्यांनी आपल्या देशाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज आपल्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे स्मरण करणे अगत्य आहे.
आज मागे वळून बघताना,मनात प्रश्न पडत आहेत आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे उलटली तरी आपला देश जगात कुठे आहे?भारत सगळ्याच गोष्टीत आघाडीवर आहे तरी माझा भारत देश मागे का रहतो? तर तो मागे राहत नाही तर त्याला मागे ओढले जाते असे मला वाटते.देश हा समुदायाने बनतो आणि त्यातूनच पुढे जातो आणि आपल्या देशाचा प्रचंड जनसमुदाय हा जसा आपला देशाच्या प्रगतीचे कारण आहे तसाच तो आपल्या देशाला अधोगतीकडे नेण्यासाठी जवाबदार आहे.ही अत्यंत टोकाची भूमिका वाटेल पण बघा.आपला भारत म्हणजे जात,धर्म,लिंग या समीकरणाच्या पलीकडे जाऊन एक्याभावना जपणारा देश! इथे जात म्हणजे एकच ती म्हणजे माणुसकी! पण काळाच्या चक्रात आणि सत्ताकारण ,श्रीमंतीच्या लालसे पोटी कुठे नेऊन ठेवलाय आपला भारत देश ?असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता तर सर्व जातीवर येऊन थांबलं आहे.जातीयवादावरुन दंगली होतांना दिसतात.आणि हीच जात शिक्षण,राजकारण इथपर्यंत पोहचत अख्खं वाटोळं झालेलं बघायला मिळतय.शिक्षणात आर्थिक मदत आणि भरती ही विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांकनावरून नाही तर जातीवरून मिळते.राजकारणात मत हे जातीवरून मिळते ना की व्यक्तीच्या नेतृत्वगुण आणि हुशारीवरून.असे चित्र मागच्या 15 _२० वर्षापासून दिसायला लागले.आधीही लोक होते ज्यांच्याकडे सत्ता होती आणि श्रीमंतीही होती पण त्यांनी कधीच ती स्वतःवर हावी होऊ दिली नाही.देश हा सर्वोच्च स्थानावर ठेवला.राजकारणही समाजासाठी केलं आणि विरोधही केला तरी मर्यादा ओलांडली नाही. पण आता सर्व या उलट. आपला देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला याचं कारण मुळात देशाचा योग्य दिशेने न होणारा विकास,लोकसंख्या अश्या विविध गोष्टी असल्या तर योग्य ती दिशा न मिळाल्याने देश मागे राहतोय.एका विशिष्ट वर्गालाच सर्व सुविधा प्राप्त होतात आणि ग्रामीण भाग,अती ग्रामीण भाग मात्र अजुनही देश स्वतंत्र झाला तिथेच आहे .हुशारी,बुद्धिमत्ता तिथेही आहे पण त्यांना त्या सुविधा असून त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाही.आपल्या देशातील नागरिकांची सर्वात कमजोर नस म्हणजे पैसा.पैशावर देश विकायला निघालेल्यांची संख्या काही कमी नाही.लोकशाही ने सर्वात मोठा दिलेला अधिकार म्हणजे मतदान, अपल्या देशासाठी योग्य तो निर्णय घेतील असे उमेदवार निवडून देणे.पण या सर्वात मोठ्या अधिकारामुळे लोकशाही म्हणजे पैसा कमविण्यासाठी चे साधन.500 रुपयांसाठी पाच वर्षे गुलामगिरी स्वीकारून राजकारण्यांची चाकरी करणारे आपल्या देशाचे सुजाण नागरिक.परत विकास झाला नाही की बोंबलत आणि त्याच 5०० रुपयांची आठवण काढून मूग गिळून गप्प राहतात. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण,खुर्ची कारण मीच कसा मोठा हे दाखवण्याचे बनलेले ठिकाण.75 वर्षात जे करू शकले नाही ते जर इमानदारीने देशभक्ती मनात ठेऊन जर देशाच्या नेतृत्वाने केले तर नक्की देश या सर्व गोष्टींपलीकडे जाईल. कोरोना विषाणूने अचानक येऊन घाला घातला,देश ताळेबंद झाला आणि देशाची आरोग्य यंत्रणा जागी झाली. आपला देश परत एकदा विळख्यात सापडला.अजुनही सत्र चालूच आहे.देशातील आरोग्य विभागाने आर्मी सारखे अहोरात्र काम करत देशसेवेचे एक वेगळे उदाहरण स्थापित केले.कित्येक कोरोना योद्धे जन्माला आले.तर काहींनी यातही चुकीचे कामे करत आरोग्य यंत्रणेला काळीमा फासली.एखादी महामारी येते तेव्हा देशात आरोग्यात्मक विकास कसा आहे हे खऱ्या अर्थाने जनतेसमोर येते. ऑक्सिजनची कमतरता, कित्येक दिवसांपासून धूळखात पडलेली वेगवेगळी मशिन्स,त्यात झालेली बिघाड,काही काही आरोग्य केंद्रांना यंत्रसामग्री नसल्याकारणाने गेलेले जीव हे सर्व एकूणच विदारक आहे.अजुनही आपल्या देशाची आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे. ऑलम्पिकमध्ये आपल्या देशाच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली.त्यांच्या जिद्दीला, खेळा ला सलाम. ऑलिम्पिकच्या गुणतालिकेत भारत 41
व्या क्रमांकावर आला.काही पदके थोडक्यात निसटली.बाकीच्या देशांच्या तुलनेत का बरं आपला देश एवढे उत्कृष्ट खेळाडू असताना मागे राहतोय? तर ते मागे राहता आहेत फक्त त्यांच्या मानसिकतेमुळे.त्यांना जो विश्वास हवा असतो तो कदाचित आपल्याकडुन‌ त्या खेळाडुंना मिळत नसावा. आपल्या देशातील युवापिढीतप भयानक ताकद आणि जिद्द आहे. जर त्यांना योग्य मार्गदर्शनातून मार्ग दाखविला तर विकसनशील देशातून विकास झालेल्या देशांच्या यादीत आपला देश लवकरच पाऊल टाकेल. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती.पण परत एकदा ती सावरते आहे.भारतात आर्थिक गरिबी असण्याचे कारण म्हणजे पैशाचा चुकीच्या पद्धतीने वारेमाप वापर.पण नक्कीच या कोरोनाकाळात सगळ्यांनाच घरी बसल्यावर त्याचे महत्त्व कळालेच असणार यात तसूभरही शंंका नाही.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारतात जवळ जवळ 80%लोक हे शेतकरी आहे.परंतु आताच्या काळात निसर्गाची अवकृपा म्हणावी का? मानवनिर्मित संकट...शेतकरी राजा ,देशाचा पोशिंदा मात्र चांगलाच संकटात सापडला आहे. दुसरा काही जोडधंदा नाही म्हणून या वाईट परिस्थितीतून ते मात्र आत्महत्येचा सहारा घेत स्वतःला संपवत आहे.शेती हा आपला कणखर पैलू आहे.शेती आहे तर भारत देश आहे!पण आपल्याच हव्यासापोटी, सोयीसुविधांसाठी आपण त्या निसर्गावरच घाला घालत आहोत.जिथून ही सुंदर सृष्टी निर्माण झाली.ज्या डोंगर दऱ्या आपलं पालन पोषण करताय त्यांच्यावरच आपण कुऱ्हाड चालवतोय.नद्यांना तर नाल्याचं स्वरूप देवुन त्यांचे अस्तित्वच त्यांच्याकडुन हिरावुन घेतोय.
अजुनही निसर्ग आपल्याला खुणावतोय वेळ गेलेली नाही; देश तिथेच आहे आपणही तिथेच आहोत.परत एकदा चक्रव्यूहाच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या मातृभुमीला सोडवण्यासाठी हातभार लावा.आपला भारत म्हणजेच विविधतेत एकता.लोकशाहीत जनताच राजा असते.आपल्याच हातात आहे आपला देश विकासाच्या दिशेने नेण्याची.जे लोक आपल्या देशाला भ्रष्टाचार,जातीय वाद, गुन्हेगारी,लाच,महामारी या सगळ्यात ढकलण्याचा प्रयत्न करताय त्यांना फरपटून आपल्या मार्गातून बाहेर काढा.आणि आपल्या मायभूमी ,जन्मभुमीसाठी सैन्यदलातील सैन्यासारखे खिंड लढवा.आज या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतातील सर्व बाजूंच्या सीमारेषेवर अखंडित पहारा देणाऱ्या त्या वीर जवानांना यातून सलाम केला नाही तर या लेखाला रूपच येणार नाही. मानयलाच पाहिजे आपल्या देशातील सैन्यदलाला!आजच्या घडीला भारतासारखी आर्मी कुठेही नाहीत.भुदल, नौदल,वायुदल आणि आधुनिक अस्ञशस्ञांनी आपला भारत देश सुसज्ज आहे याचा मला अभिमान वाटतो. इथे आपल्या देशाची खरी ताकद कळते.
आजच्या या पंच्याहत्तरीतील भारत देशाला संबोधुन माझ्या प्रिय देशवासीयांना एवढेच सांगावेसे वाटतेय...आपला देश म्हणजे....
एक राष्ट्र
एक स्वप्न
एक संकल्पना
एक जात
एक भावना
आणि......
एक धर्म, राष्ट्र धर्म...
 या काहीच शब्दात मला काय बोलायचं आहे तुम्हाला नक्कीच उमगलं असेल....
 पंच्चाहत्तरीतला माझा भारत चिरायू होवो...एक नवे लक्ष गाठो, विकासाच्या मोतींनी सदैव धनसंपदा साठो...
 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षाच्या  शुभेच्छा...!

                             🖋️प्राची नाईक उंडणगावकर🖋️



रविवार, ३० जानेवारी, २०२२

उपेक्षित मराठवाड्याच्या अपेक्षा

उपेक्षित मराठवाड्याच्या अपेक्षा
उपेक्षित मराठवाड्याच्या अपेक्षा


आज कित्येक दिवसांनी माझा मराठवाडा अंधारातून लख्ख प्रकाशाकडे पाऊल टाकण्याचे दिशेने निघालाय असं मला वाटतंय...एका नवीन वळणावर विकासाच्या दिशेने आता आपल्या मराठवाड्याची रेल्वे धावणार..आता ती पेसेंजर सारखी संथ गतीने पळणार का मग सुपरफास्ट एक्स्प्रेसचा वेग घेणार हे तर वेळच ठरवेल.
   परिस्थिती कशी सतत बदलत असते याचा प्रत्यय माझ्यासह प्रत्येक मराठवाडा व औरंगाबादच्या जनसमुदायाला काल झालेल्या मोदी मंञिमंडळ पुनर्विस्तारातुन आलाच असेल.बघता बघता एक नाही तर दोन केंद्रीय राज्यमंत्री पदे आपल्या मराठवाड्याच्या वाटाल्या आले.आणि कित्येक वर्षांपासून डावलल्या गेलेल्या महाराष्ट्राला डॉ.भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रतीने केंद्रात सर्वात महत्वाचे असे अर्थ राज्यमंत्रीपद व रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले. अखंड मराठवाड्याच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्याय.बातमी ऐकल्यानंतर प्रत्येकालाच सुखाचा धक्का बसला असणार हे मात्र नक्की!
   
आतापर्यंत मुळातच मराठवाडा राजकीयदृष्टया वंचित राहिला आहे. त्यामुळे मनुष्यबळ, पाण्याची व जागेची उपलब्धता असुन देखील पुणे मुंबईच्या तुलनेत औरंगाबादचा विकास खुपच कमी झालेला आहे.
मोदी सरकारने केंद्रात एकाचवेळी मराठवाड्यातील दोन खासदारांना अर्थ राज्य व रेल्वे राज्य मंत्रिपद देऊन एकप्रकारे मराठवाड्यात एक राजकीय प्राण ओतला आहे.

रावसाहेब दानवेंनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लागावे तसेच प्रस्तावित मेट्रोमार्ग सुद्धा लवकर व्हावेत.  

औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी, वेरूळ, अजिंठा, दौलताबाद सारखी जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रे येथे आहे, तसेच अनेक पर्यटन क्षेत्रांचा विकास व्हावा व त्यांना रेल्वे पर्यटन नकाशावर स्थान द्यावे."Narrow gaje" रेल्वेलाईन बनवून ही अनेक स्थळे एकमेकांना जोडून पर्यटन कॉरिडॉर चा विकास करता येईल
 उद्योगांबरोबर औरंगाबाद ची ओळख असलेली हिमरू शाल, व्यवसाय यांचा विकास करणे करिता व्यवसाय कॉरिडॉर करता येऊ शकतो.पैंठणच्या पैठण्यांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल करण्यात आले तर ह्याही व्यवसायाची वृध्दी होईल व कारागीरांना सुगीचे दिवस येतील.


भागवत कराड स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्याकडून मराठवाड्यातील आरोग्ययंत्रणा चा विकास होणे, स्वतंत्र महिला रुग्णालय, औरंगाबाद शहरातील मिनिघाटीला निधी देऊन मिनी घाटी पूर्णक्षमतेने सुरू व्हावी तसेच मराठवाड्यातील सर्व तालुक्यात सक्षम घाटी सदृश्य सिटी, सिटी रुग्णालये उभारणे गरजेचे आहे.
अर्थराज्यमंत्री या नात्याने डॉ. भागवत कराड यांच्या कडुन सर्वांनाच अपेक्षा आहेत मग तो नव्याने उदयास येत असलेले व्यापारी व उद्योजक वर्ग असो वा रखडलेल्या योजनांत प्राण ओतण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक संस्था वा सामान्य नागरिक असो. ऑरिक सिटी या प्रकल्पाचे काम होऊन तीन वर्ष होत आली परंतु अजुन तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली नाही.याचे मुख्य कारण म्हणजे इथे कुशल कामगार वर्ग असला तरी मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या सुविधा म्हणजेच दळणवळणाची योग्य ती सोय आणि बऱ्याच समस्या आहेत. विमानतळ असले तरी तिथे मोठ्या प्रमाणात उड्डाण करण्याकडे डॉ कराड यांनी भर दयायला हवा. राज्यमंत्रीपद मिळण्याआधीच त्यांनी औरंगाबादच्या उद्योगनगरीला भेट देत सर्व गोष्टी जाणून घेतल्या व या गोष्टींवर भर देवु असेही मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बोलताना त्यांनी सांगितले.ही सुखद बाब. कराड यांना मिळालेल्या महत्वपूर्ण खात्याचे ते नक्कीच सोनं करतील व राज्य सरकार कडुन आल आलेली कामे आणि रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा निधी गोष्टींना निधी प्राप्त करून देण्यासाठी ते केंद्रात पाठबळ देतील अशी अपेक्षा....
अर्थ राज्य मंत्री यांनी विशेष पॅकेज देऊन मराठवाड्याच्या शेतकऱ्याला नेहमीच पडणाऱ्या दुष्काळी परिस्थितीतुन बाहेर पडायला मदत करावी.
 रेल्वे खात्यांतर्गत विशेष शेतकरी रेल्वे चे नियोजन करावे जेणेकरून मराठवाड्यातील पिकांना कालावधीत महाराष्ट्र व देशात जास्तीत जास्त मार्केट उपलब्ध होउ शकते।
रेल्वे राज्यमंत्रीपद या पदालाही न्याय देत रावसाहेब दानवे हे मराठवाड्याला अख्या महाराष्ट्राला रेल्वे रूळाच्या माध्यमातुन जोडतील व मुंबई,पुणेसारख्या शहरा़ची लाईफ लाईन असलेली आग गाडी आपल्या मराठवाड्याचीही जीवनवाहिनी व्हावी अशी आशा. रेल्वे रूळाचे दुहेरीकरण नसल्याकारणाने कित्येक रेल्वेंना येण्यास विलंब होतो... यामुळे बऱ्याचदा रेल्वेचे वेळापत्रक रखडते. मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. बहुतांशी मार्ग हे एकेरीच आहे.रेल्वेगाड्यांची संख्याही कमी असल्याने मराठवाड्याचा प्रवासाचा गाडा हा बऱ्यापैकी खाजगी वाहने व एसटी महामंडळावर अवलंबून आहे. अजूनही मराठवाडा हा रेल्वे संबंधीच्या प्रश्नांवरील उत्तराच्या प्रतीक्षेतच आहे.तर या महत्वाच्या प्रश्नांना दानवे लोकसभेत नक्कीच उपस्थित करतील व ते मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न करतील हीच महत्वाकांक्षा....
स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मराठवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केले.परंतु काळाच्या अकाली घावाने त्यांना हिरावले व आपला मराठवाडा पोरका झाला. डॉ. भागवत कराड हे पूर्णतः मुंडेंच्या छत्रछायेखाली शिकले व वैद्यकीय सेवेची जबाबदारी आपल्या पत्नीवर टाकत पुर्णवेळ त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोकुन दिले. आताच्या राजकीय ‌आलेखात मात्र महाराष्ट्र होरपळला जातोय.

डॉ.भागवत कराड व रावसाहेब दानवे हे सध्यघडीला मराठवाडा व औरंगाबाद साठी खुप महत्वाचे असे प्रतिनिधी आहेत...भाजपला मराठवाड्यात अजुन पाया भक्कम करण्यासाठी ही उत्तम संधी चालून आलीय. तसेच या दोघांनाही औरंगाबादच्या सर्व परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास आहे. दोन्हीही खात्यांमध्ये परस्परसंबंध आहेत. तर दोघांनीही एकमेकांच्या साथीने मराठवाड्याकडे विकास खेचुन आणला तर आपल्या मराठवाड्याच्या राजधानी सगट सर्व मराठवाड्याचे रूपडे पालटेल यात शंका नाही. आपसुकच याच परिणाम भाजपला होईलच . तर बघुयात या दोन राज्यमञ्यांची सांगड कशी जमतेय ते आणि यांच्या विकासाची रेल्वे मराठवाड्यात येवुन धडकते का? तसं याआधीही दानवेआणि कराड यांनी एकत्रितपणे कामे केली आहेत.आणि आता राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण खाते त्यांना मिळाली असुन आता ही समीकरणे कशापद्धतीने आता बदलतात व हे दोन मराठवाड्याचे चेहरे खांद्याला खांदा लावून, कशी जोडगोळी बनवताय व महाराष्ट्राकडे विकास खेचून आणतात यावर सगळ्यांचं लक्ष लागले असेल तरीही त्यांचे डोळे विकासासाठी आसुसले आहेत.राजकारण, सत्ताकारण, संघर्ष यातच आजपर्यंत मराठवाडा ओरबाडला गेला. विकास फक्त कागदावरच.मराठवाडा तर आधीपासूनच समृद्ध आहे, त्याच्या पराक्रमाने, लोकसाहित्यातील कलेने त्याने इतिहास गाजवला आहे.तरीही सर्व गुणसंपन्न असून योग्य ती दिशा न मिळाल्याने मराठवाडा काही बाबतीत मागे राहिला.आता बदलाच्या आशा उमलतांना दिसताय खऱ्या... बघुयात मिळतेय का आपल्या मराठवाड्याला आशा उद्याची.... शाश्वत विकासाची....
.
अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड व‌ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सदिच्छा..!
     ‌‌
                🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️ 

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

रंग मैत्रीचे...

मिञ... 

कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी 'ए भिडू' असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात आणि दु:खातही आपल़्या पाठीशी खंबारपणे उभा असतो तो मिञच... 
मैञी म्हणजे माणसाने कुटूंबापलिकडे बनविलेलं पहिलं आणि एकमेव नातं. आज ''रंग मैञीचे '' या माझ्या लेखाच्या माध्यमातून मी विशेषकरून  मुलींचे मैञीपलिकडचे नाते आणि मैञीचे रंग उलगडणार आहे. कारण सर्वच असं म्हणतात की,  मुलींची मैञी काय शाळेच्या उंबरठ्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त कॉलेजच्या गेट पर्यंत,नंतर काय एक तर लग्न होऊन जाते किंवा जबाबदारी मध्ये त्या अडकून जातात म्हणून ती मैञी कुठेतरी मागे पडते. ते थोड्या प्रमाणात खरेही, पण आता काळ बदललाय,  तशी मैञीची परिभाषा देखील बदलत चाललीय  कारण लांब असलो, तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून आम्ही कनेक्ट असतो. आणि यामुळेच एकमेकींना भेटण्याची धडपड कायम असते. खरच मैञीसारखं सुंदर नातं आणि वेगळेपण या जगात कुठेच नाही आणि हेच मी अनुभवतेय. 
मैञी ना समजवायची असते, ना गाजवायची असते, ती तर रूजवायची असते, मैञीत ना जीव घ्यायचा असतो, ना द्यायचा असतो, इथे जीव लावायचा असतो. ही  एक प्रामाणिक व तरल संकल्पना आहे . जिथं आपलं नातं व्यक्त करायला पुर्ण स्वातंञ्य मिळतं,तिच खरी मैञी..!आपल्या आयुष्यात खुप  मुली असतात, पण प्रत्येकच मुलगी ही आपली मैञीण नाही न होत.  हीच तर खरी गंम्मत  आहे. खऱ्या मैञिणी ओळखणं ही साधी गोष्ट नव्हे, पण एक माञ नक्की ज्यांना मैञीची गोडी चाखायला मिळते न ते खुपच नशीबवान असतात. 
मुलींच्या बाबतीत असं बऱ्याचदा होत असतं की, प्रत्येकच गोष्ट त्या आपल्या जवळच्या व्यक्तीला नाही सांगू शकत, कारण मनात एक भिती असते कि, ते आपल्याला समजून घेतील का?  तेव्हा ती गोष्ट मैञीणींना सांगते कारण तिला माहित असते,मैञी हे एक असं अढळ स्थान आहे जिथे तिला समजून घेतलं जाईल आणि मैञीसुध्दा निस्वार्थ असावी बरं का! कारण मैञीण जर चुकत असेल किंवा चुकीच्या वळणावर असेल तर तिला वेळीच सावध करणं हे खऱ्या मैञिणीचं कर्तव्य आहे. 
मुलींनो मैञी फक्त कॉलेजच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित ठेवू नका, तर त्या मैञीच्या सप्तरंगात न्हावुन निघा, तरच तुम्हाला खऱ्या मैञीची ताकद अनुभवायला मिळेल. जेव्हा मैञीण कॉलेजला येत नाही तर आपसूकच तिची कमी भासायला लागते. तिची आठवण येते, खुप काही सुटल्यासारखं वाटतं, कशातच मन लागत नाही हीच मैञीची भावना आहे. मैञी हे एक असं नातं आहे ,ज्याला कुठलही बंधन नाही, वेळ कशीही येवो, ती आपल्यासाठी हजर असते. एकच शब्द बोलते 'मी आहे ना'! तू कशाला काळजी करतेस. या एका ओळीत सर्व काही सामावलेलं असतं. 
मैञीविषयी लिहायला गेलं तर  वेळ ,शब्द ,सर्वकाही कमी पडेन.  "मैञीत एवढे काय विशेष असते ,तर मैञिणी या फक्त मैञीणीच असतात, त्या सख्या, चुलत,मावस अश्या काही नसतात, त्या डायरेक्ट मैञिणी असतात."
इंटरनेटवर बघितलं तर खुप काही लिहायला उपलब्ध असतं पण खऱ्या मैञीचं विश्लेषण करायला लागते ती अनुभवाची सांगड. आणि मी अभिमानाने सांगू शकते, कि मैञीची ती जादू मी अनुभवतेय, ती जगण्याची संधी मला मिळतेय आणि ती जीवापाड मैञी माझ्याकडे आहे. मला जीवाला जीव देणाऱ्या मैञीणी मिळाल्याय. मी खरच जर या माझ्या 'रंग मैञीचे 'या लेखात त्यांचा उल्लेख नाही केला तर तो अपुर्णच राहील, त्याला ते रूपत येणार नाही जे मसा हवे आहे. 
मी मैञीची चव अगदी बालवाडीपासून चाखतेय,आम्ही कधी भांडतो, कधी रागावतो, तर कधी एकमेकींची मजा घेत खळखळून हसतोसुध्दा. जस-जसे वर्षे वाढत गेले तस तशी आमची मैञीही घट्ट होत गेली, त्या शाळेतील प्रत्येक कोपऱ्यात आमच्या मैञीचा सुगंध दरवळतोय. आमचा सात जणींचा ग्रुप.तिथे आम्ही आमची मैञी जन्मभर टिकवून ठेवण्याचा निश्चय केलाय कारण आमचं आसुष्य एकमेकींशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आणि शाळेपासुन ते आतापर्यंत ती मैञीची डोर घट्टच होत गेलीय. 
मी नशीबवान आहे, की माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग माझ्या मैञीणी आहेत, माझ्या प्रत्येक निर्णयात त्या असतात. मुळात आमच्या मैञीची ताकद हा आमच्यातील विश्वास आहे न तशीच एक अजुन मोठी ताकद  ज्यानी  आमची मैञी एवढी घट्ट आहे. कारण ती आमच्या कुटूंबाने समजुन घेतलीय. खरच माझ्या 'सेव्हन स्टार' माझ्या आयुष्यात नसत्या तर मी अशी मुळीच नसते. त्यांनी मला खुप काही शिकवलय, आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण त्या  आहेत.मुख्य म्हणजे कोणीच कोणाला मागे खेचत नाही त्यामुळे प्रत्येकीचा गुण आत्मसात करण्याची संधी आम्हाला मिळाली. धन्यवाद! हा शब्द खुप छोटा आहे. मी रोज देवाला या एका गोष्टीसाठी धन्यवाद करते. आज मैञी दिन त्याबद्दल माझ्या लाडक्या सेव्हन स्टारसाठी मी बोलायलाच हवे...! 
तुम्ही माझ्यासाठी फक्त माझ्या मैञीणीच नाही तर प्रत्येक नात्याचा जिव्हाळा मला तुमच्यातुन मिळतो,प्रेम, आपुलकी, मैञी, भाव, विश्वास आणि या पृथ्वीवरील सर्वच आश्चर्य आणि पंचमहाभुतांचा संगम आहात तुम्ही, माझ्यासाठी आपली मैञी हे नातं म्हणजे माझं कुटूंबच आहे... मी कधीच तुम्हाला त्यापेक्षा वेगळं समजली नाही आणि समजणारही नाही... जीव आहात तुम्ही माझ्या.... मी सतत तुमच्यासाठी हजर असणार आहे, ही गाठ सर्वांनी पक्की बांधुन ठेवा...सेव्हन स्टारचे 7रंग नेहमी उजळच रहाणार.आपल्या मैञीचा इंद्रधनुष्य  सदैव रंगीतच रहाणार..! तर मैञिणींनो,माझ्या चांदण्याऩो...आपला मैञी दिवस तर रोजच असतो पण आज जरा महत्व आहेच तर HAPPIEST FRIENDSHIPDAY MY STARS MY FAMILY.... U GUYS ARE MY BREATH, MY SUNSHINE.. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सोनेरी पान म्हणजेच आपली मैञी, 7स्टार या नावालाच माझा सलाम...आता आपल्या आयुष्याला एक नवीनच वळण मिळणार आहे पण मला विश्वास आहे की तिथेही आपली मैञी टिकणार.... 
          पावसाच्या रागात एक सुंदर दिवसाची चाहुल लागली....आनंदाच्या वर्षावाने ही पृथ्वीही सुंदर न्हाली.. प्रेम, मैञीची साक्ष देणारा हा पाऊस स्पर्शुन मला म्हणाला.. नवी नाती, नवी स्वप्न आता एक नवीन पर्व... आयुष्याच्या या पर्वाला कडकडुन मिठी मार... बघ या पावसाच्या वर्षावात मागचाच राग परत येईल.. जुन्या सरींच्या सहवासाने नव्या इंद्रधनुलाही रंग चढतील...
प्रत्येक मुलीला अशी एक तरी हक्काची मैञीण मिळावी जन्मभरासाठी,तिच्यासोबत की एक वेगळ्या धाटणीचं आयुष्य जगू शकेल आणि उद्याच्या जगाचे स्वप्न पाहू शकेल. असेच माझ्यासारखेच तुम्हीही तुमच्या आयुष्यात मैञीचे रंग भरा आणि तिता वेल बहरू द्या. प्रत्येक नातं जपा पण मैञीला जरा जास्त जपा, आयुष्य खुप सुंदर होईल.

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...