"अनाथांची माय सिंधुताई सपकाळ"
💗"तिचं जग"💗
एक स्ञी आपल्या आयुष्यात किती त्याग करते याचा थांग लागणे खरच शक्य नाही. तिचं मातृत्व आणि कर्तृत्व हे या जीवसृष्टीतील चराचरात अजरामर आहे.याच स्ञी कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महिला दिन विशेष आठवडा साजरा करायचं ठरवलय "तिचं जग" या खास ब्लॉगच्या माध्यमातून. आज पासून रोज ऐका नवीन क्षेञातल्या रणरागिणीचा प्रवास मी तुमच्या समोर मांडणार आहे ; जी खरच कौतुकास पाञ आहे.तिच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा आढावा नक्कीच आपल्यातील स्ञियांना स्वकर्तृत्व गाजवण्याची उभारी देईल. आज १ मार्च! पहिला ब्लॉग अखंड भारताची जननी अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला समर्पित. ज्या मायेच्या वलयात आपण अंतर्मुख होतो ते वलय आहे भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात...
अनाथांची माय, गरिबांच्या दुधावरची जाळीदारसाय साय!
दि.४ जानेवारी २०२२ सकाळपासूनच भयाण वाटत होतं. काहीतरी होणार आहे याची चाहुल लागलेली पण मनात एक आशा जी शेवटपर्यंत आस जागवून होती. अचानक ८ वाजुन १० मिनिटांनी टिव्ही लावताच काही क्षण सगळं सुन्न झालं. गॅलॅक्सी रुग्णालयातून बातमी वाऱ्यासारखी परसली. अनाथांची माय निवर्तली. जन्मापासून सुरु असलेला एकपाञी संघर्ष अनेक पाञांना आधार देवून शेवटाकडे वळाला. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने अख्खं विश्वच पोरकं झालं असलं तरी त्यांचा प्रवास हा त्या विश्वाला परत नव्याने संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद देईल एवढा तो कणखर कणा होता.
दि.१४ नोव्हेंबर १९४८. वर्धा जिल्ह्यातील ,पिंप्री मेघे आणि गावातील ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी आईवडीलांना नकुशी असणारी एक मुलगी जन्माला आली. म्हणून तिचं नाव चिंधी ठेवलं. पण पुढे जावून ह्याच चिंधीच्या ठिगळाने कित्येकाच्या आयुष्याची गोधडी उबदार होणार आहे याची कल्पना त्यावेळेला त्यांच्या आईवडीलांना नव्हती. जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा संघर्ष वयाच्या ९ व्या वर्षीपासून आणखीनच कठीण झाला जेव्हा २६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याची त्यांचा विवाह झाला. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि उमलत्या वयात लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता पुर्ण झाल्यानंतर शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगावात गेल्या. भातुकलीच्या वयात सिंधुताईंवर खऱ्या संसाराची जवाबदारी पडली. घरी प्रचंड सासुरवास होता .कुटूंबात शैक्षणिक वातावरण नाही. माईंना माञ शिक्षणाची आवड. जंगलात लाकुडफाटा शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणून उंदराच्या बिळात लपवून ठेवत. क्वचितच घरी एकट्या असल्या की त्या अभ्यास हा करायच्या. हे लग्न फार काळ टिकले नाही. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. माञ चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्याच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी असणाऱ्या गुरांचेशेण काढता काढता बायांचे पार कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या माञ त्याचा काहीही मोबदला मिळत नसे. या शेणाचा लिलाव वनखात्यातील अधिकारी करायचे. इथेच सिंधुताईंनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारला आणि याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक लढा सुुुरू झाला. याच लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली.
हा लढा त्या जिंकल्या पण त्याची माञ त्यांना जबर किंमत चुकवावी लागली. एका बाईने दाखवलेल्या धैर्याने गावातील दमडाजी असतकर दुखावला गेला आणि सिधुंताईच्या पोटातील मुल आपले आहे असा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चारिञ्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पुर्ण दिवस भरलेल्या गर्भवती माईंना त्याने बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. तशाच बिकट अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले आणि तिथेच त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने टाकून दिलेली बाई म्हणजे आपल्या समाजाच्या मार्गात अडसरच ना! अशा अस्पृश्य विचारसरणीच्या गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिले. सासरमधून बाहेर पडलेल्या माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही आणि त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्थानकावर त्या चतकोर भाकरी साठी, एखाद्या उष्ठ्या फळासाठी पोटाची खळगी भरावी म्हणुन भिक मागत हिंडायच्या. या सगळ्या ञासाला कंटाळुन एक दिवस त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ;पण तान्हुल्या लेकीकडे पाहून परत मागे फिरल्या. दिवसभर त्या भीक मागायच्या आणि राञी स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधीच एकटे खाल्ले नाही.सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि सगळे भिकारी एकञ मिळून जेवणाचा आनंद घेत असत. याच भिकाऱ्यांनी २१ वर्षाच्या सिंधुताईला संरक्षण दिले. दोन दिवस माञ काहीच मिळाले नाही तेव्हा माञ त्यांच्या लक्षात आले तिथे कायम राहता येणार नाही. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी थेट स्मशान गाठले. जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजत त्यांनी त्या चितेलाही पविञ्याची शाल पांघरली. समोर आलेल्या धकधकत्या संकटांच्या छाताडावर बसून त्यांनी वाट रोखली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं.
आपल्या मुलीवर आलेली वेळ कोणावर येवू नये या विचारात आपल्या तान्हुल्या लेकीची आई हजारोंची माई बनली. अनाथ मुलांना सांभाळुन त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील 'कुंभारवळण' या गावात "ममता बालसदनची" स्थापना केली आणि त्या अनाथ आणि बेवारस मुलांच्या आयुष्याचा साचा बनल्या. या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. एवढ्यावरच थांबतील त्या माई कसल्या. आर्थिक दृष्ट्या स्वयंपुर्ण झाल्यावर या युवक युवतींचे योग्य जोडीदार बघून माईंनी स्वतः कन्यादान केलं. आपली कन्या ममता हिला दगडुशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्या इथवरच थांबल्या नाहीत तर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी संकलन करण्यासाठी त्यांनी "मदर ग्लोबल फाऊंडेशनची" स्थापना केली. यातून अनेक परदेश दौरे करत त्यांनी आपल्या काव्यातून आणि बोलण्यातून समाजप्रबोधन केले. त्याच्या कार्याचा उत्तुग असा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात जावून समाजमनावर बिंबवला गेला तो त्यांच्या "मी सिंधुताई सपकाळ" या त्यांच्या जीवनपटातून! तसेच "अनाथांची यशोदा" या नावाचा २०१४ साली प्रदर्शित झालेला अनुबोधपटही त्यांच्या जीवनाचा ठाव घेण्यास उद्युक्त करतो. त्याच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण जेव्हा २०२१ साली महाराष्ट्राच्या लाडक्या माईंना "पद्मश्री सिंधुताई सपकाळ" असे भारदस्त नाव मिळाले तेव्हा माञ मनामनांत माईंचा अभिमान वाटावा असा क्षण सगळ्या जनमानसाने अनुभवला. आजही माईंचे जुने भाषण काढुन ऐकायला घेतले तरी अंगावर शहारा येतो. मनात समाजसेवेची मशाल पेटते आणि समाजकार्यासाठी प्रेरणा मिळते.
आज ही संघर्षाची मशाल थंडावली. माञ तिचा प्रकाश हा सदैव या आयुष्याच्या खुल्या रंगमंचावर आपल्याला वाट दाखवत पडत राहणार आहे. माईंच्या जीवनाची सुरुवात ही नकुशी या शब्दाने झाली, चिंधी या नावाने झाली. नंतर त्यानी अग्निदिव्यातून जात संघर्ष करत केवळ स्वत:चच नाही तर हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. आपलं आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालते पण तिचं आयुष्य माञ निराधारांच्या वेळापञकावर चालले. याच अनाथांच्या यशोदेचं असं अचानक सोडून जाणं असह्य असलं तरी...
माई म्हणजे अथांग असा कधीही न आटणारा असा मायेचा समुद्र आहे...
वरुन जरी शांत दिसत असला तरी आत अख्या जगाचं चक्र चालवणारा समाजकार्याने झपाटलेला अनाथांचा आधार आहे...
माई म्हणजे कधीही थांग न लागणारा अथांग असा सागर आहे अथांग असा सागर आहे...
माई आहेत आणि असणार आहे त्यांनी घडवलेल्या अनाथांच्या संस्कारात...
माई आहेत आणि असणार आहेत त्यांनी रोवलेल्या समाजसेवेच्या बीजारोपणात...
माई आहेत आणि असणार आहेत प्रत्येक भारतीयांच्या कणा कणात आणि मनामनात...
माईंच्या या संघर्षमय वाटचालीला सलाम..!आपण त्यांच्या इतका मोठा पदर तर नाही मारू शकत कारण माय ती मायच असते' परंतु आपणा ज्यांना शक्य असेल त्यांनी एका अनाथास दत्तक घेतले अथवा त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली तर ती नक्कीच ताईंना खरी श्रद्धांजली असेल! स्ञी जीवनाचा आदर्श आधारस्तंभ म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्या आज नाहीत पण त्यांचे कार्य माञ यापुढील अनेक पिढ्यांना घडवणार आहेत.!
🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️