💗 "तिचं जग"💗
मुहूर्त जागतिक महिला दिनाचा! तिचं जग हे खास सदर सुरू असतांना माझ्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपण रोज वेगवेगळ्या महिलांच्या विश्वात शिरुन तिच्याशी गुजगोष्टी करतो आहोत. तिची संघर्षातून यशाकडील वाटचाल, तिचं समाजकार्य, तिचं जीवन हे सगळंंच अगदी भारावून टाकणारं आहे. खरतर सगळ्याच महिलांचे त्यांच्या नियमित आयुष्याव्यतिरिक्त त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे प्रत्येकीला एकमेकींशी जोडणारं पण तरीही वेगळं असं काहीसं आहे. अशी महिला जी या सगळ्या महिलांच्या कार्याचा भाग असेल ती जर महिलादिनाच्या दिवशी असेल तर 'तिचं जग' या सदराचा शेवट गोड नक्कीच होईल. आणि विचारांच्या कल्पनेतून आकृती उभी राहिली एका बहारदार, भारदस्त महिला व्यक्तिमत्त्वाची.
तु कल्पना नवनिर्मितीची...
पेटावी जणु मशाल स्वप्न आर्ततेची...
एक दिशा, एक आशा तु या ऐतिहासिक शहराची...
ओळख तुझ्या परिचयाची, जिल्ह्याची आई
'अंजली' धानोरकरांची...
हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच एक चमक येईल. काम करण्यापेक्षा काम बोललं की, त्या पदावरील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच बोलायला लागते. औरंगाबाद जिल्ह्याचा अतिशय सराईतपणे आपल्या प्रसन्न मुद्रेने पदभार सांभाळणारे लेखक, पञकार, साहित्यिक, अभिनेञी, वत्कृत्व, सॉफ्टस्कील ट्रेनर, कर्तव्यदक्ष अधिकारी असे सप्तरंगांची उधळण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर. महिलादिनी बघुयात अंजली धानोरकरांचं 'तिचं जग'!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १९९८ सालच्या त्या वर्ग-१ च्या अधिकारी. अंजली धानोरकर यांचा जन्म जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे झाला. त्यांचे वडील हे तेथील एका बॅंकेत कार्यरत होते तर आई ही गृहिणी. त्यांचं मुळ गाव हे आताचं तालुका असणारं बदनापूर हे आहे. तेव्हा माञ ते छोटसं खेडं गाव होतं. त्यांचे ९ वी पर्यंतचे शिक्षण हे पैठण येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत झाले. त्यामुळे बालपणाचे टप्पे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवले. १० वी ची परिक्षा त्या परभणीच्या बाल विद्यामंदिरातून चांगल्या गुणांकाने उत्तीर्ण झाल्या. नंतर अंबडच्या मत्स्योदरी महाविद्यालयात १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपरोक्त महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. लहानपणापासून त्या अतिशय चंचल आणि अभ्यासू होत्या. त्यांच्यातील तेच गुण हेरुन वडीलांनी त्यांना वाचनाची सवय लावली. १२वीत गुणतालिकेत छान क्रमांक असूनही मनाचा ध्यास घेत त्यांनी कलाक्षेञात प्रवेश निश्चित केला. आईवडील पाठीशी असल्यामुळे बाकीच्यांचा विरोध कारणी लागला नाही. पदवीनंतर समंजस आणि परखड विचारांच्या अंजली धानोरकर यांनी आपल्या याच विचारांना योग्य दिशा मिळावी, योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अभ्यासू वृत्तीतून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. याच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अक्षरशः पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण करत त्या शासकीय महसूल सेवेत तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. पञकारीतेतून थेट अधिकारी पदी त्यांनी झेप घेत आपली जिद्द पुर्ण केली होती. आता वेळ आली होती स्वत:ला सिद्ध करण्याची. कारण त्या काळी प्रशासकीय अधिकारी म्हणून स्ञियांचे प्रमाण अगदी नगण्य होते. पुरुषीमक्तेदारी असणाऱ्या कार्यालयात ही महिला काय काम करणार? असा दृष्टिकोन सुरुवातीला तिथल्या कर्मचाऱ्यांचा असायचा. पण आपली जिद्द, बोलण्यातील आपुलकी आणि नियोजनबद्ध काम या पध्दतीने त्यांनी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांची वाटचाल नुसतीच यशस्वी नाही तर दिमाखात सुरू आहे. तहसीलदारापासून सुरु झालेल्या त्यांच्या कार्याचा आलेख विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी चे झेंडे रोवत औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.
तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना घरच्यांनी जेव्हा त्यांच्या लग्नाचं बाशिंग काढलं तेव्हा येणाऱ्या स्थळांना अंजली धानोरकरांची नोकरी मंजूर नव्हती. मुळातच पुरोगामी विचारसरणीच्या अंजली यांनी स्पष्टपणे त्या स्थळांना नकार देत मुलगी ही चार चौकटीच्या बाहेरही स्वत:चे अस्तित्व घडवू शकते असे सांगितले. इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल माञ कष्टाने मिळवलेली नोकरी तर सोडायची नाही याची त्यांनी मनाशी गाठ बांधली. समाजाची दुसरी बाजू तितकीच मजबूत आहे जिला मुलगी ही अभिमान वाटते. तसच काहीसं अंजली धानोरकरांबाबत झालं. खरतर एक सोपोस्कार म्हणून त्यांनी ठिकाण बघितले कारण पुर्व अनुभवानूसार तर आपण नकारच देणार असं त्यांना माहित होतं. माञ त्यांची गाठ ही अभय धानोरकरांशीच बांधलेली असावी. अभय धानोरकर आणि त्यांच्या आईवडीलांना अजंली धानोकरांच्या कामाचा अभिमान वाटला. कमी वयात त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल, त्यांच्या कर्तबगारीबद्दल पेशाने डॉक्टर असणाऱ्या अभय धानोरकरांना फार कौतुक वाटले. आणि अंजलींना 'धानोरकर कुटूंबात' येवून त्यांच्या या ध्येयाला खंबीर साथ लाभली.
त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतांना त्यांच्या कर्तबगारीचे, खमक्या निर्णयप्रक्रियेचे अनेक पैलू आपल्याला उलगडत जातात. आणि सुखाचा धक्का देत जातात. ज्या क्षेञात त्यांनी पाऊल टाकले त्या क्षेञाचे नंदनवन त्यांनी केले. त्यातलेच एक वन खात्यात वन उपजिल्हाधिकारी व वनजमावबंदी अधिकारी पदावर कार्यरत असतांना हा विभाग अगदी अडगळीत पडलेला होता;अधिकाऱ्यांमध्ये शिस्त नव्हती. त्यातील एकाने मॅडमला सल्ला दिला, काय तुम्ही, इथे येवून फायदा नाही. इथे काही काम चालत नाही. त्यावेळस अतिशय आत्मविश्वासाने त्या अधिकाऱ्याला त्यानी खडसावत सांगितले. " सर मी या खुर्चीवर बसून एवढे चांगले काम करुन जाईल की परत इथे येण्यासाठी अधिकारी तुम्हाला विनंती करतील". त्यावेळेस कदाचित त्या अधिकाऱ्यांना ते हास्यास्पद वाटले असेल माञ योग्य नियोजन पध्दतीने, उत्कृष्ट कार्यप्रणाली राबवत तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यातींल कार्यक्षमता त्यांनी ओळखली. त्यानुसार त्यांनी कामाचे वर्गीकरण केले. कष्टातून बदल दिसून आला आणि काय तर औरंगाबाद वनजमावबंदी कार्यालय 'आयएसओ' नामांकन मिळणारे महाराष्ट्रातील पहिले वन कार्यालय ठरले. त्यांनी त्यांचा दिलेला शब्द खरा ठरवला. अशा पध्दतीचे आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त करून देणं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरव आहे. आणि या गौरवात खारीचा वाटा हा अंजली धानोरकरांनाच जातो.
सन २०१७ मध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रत्येक कामातील वेगळेपण घेरुन त्यात आपली छाप कशी उमटवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजली धानोरकर. इथेही त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत आपलं नाव इतिहासाच्या पानावर भल्यामोठ्या अक्षरात कोरलं. जगप्रसिद्ध वेरुळ येथील चारही केंद्रावर त्यांनी महिलांना प्रशिक्षण देत महिला जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेञीय अधिकारी, मतदान केंद्राधिकारी, केंद्राध्यक्ष, BLO या सर्व पदावर त्यांनी महिलांची नियुक्ती केली. एवढेच नाही तर सुरक्षेसाठीही महिलापोलिसांचीच नियुक्ती त्याठिकाणी करण्यात आली होती. अंजली धानोरकरांच्या मते जर देशाच्या सर्वोच्च पदी महिला असू शकतात तर मग निवडणूक प्रक्रिया त्या का सुव्यवस्थित पार पाडू शकणार नाही. सुदैवाने जिल्हाधिकारी ही त्यावेळेला महिलाच होती त्यामुळे त्यांनी हा उपक्रम राबवला. अगदी मशीन ऑपरेट करण्यापासून ते पोलिंग एजंटपर्यंत सगळंच महिलाराज होतं. हे पाऊल उचलून त्यांनी जोखीम तर पत्करली होती; कारण ही भारतातील पहिली घटना होती. माञ अजंली धानोरकरांच्या अखत्यारीत ही निवडणूक अगदी लिलया पार पडली. महिलांची अशी प्रशासकीय व राजकीय साखळी संपूर्ण भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा घडून आली. आणि हा मैलाचा दगड यशस्वीपणे पेलला तो अंजली धानोरकरांनी. प्रशासकीय अधिकारी कसा असावा? या वाक्याचं दोनच शब्दात उत्तर म्हणजे 'अंजली धानोरकर'.
दबंग हा शब्द पोलिस महिलेला वापरत असले तरी हे विशेषण त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला अगदी चोखपणे लागू होते. कारण त्या कामातून जनतेपर्यंत पोहोचतात.
एक महिला जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या उपजिल्हाधिकारी पदावर. ना मागे ना पुढे ,काम थेट तोंडावर! एवढा मोठा जिल्ह्याचा सांभाळ करतांना स्वत:साठी वेळ काढणं हे खरच अवघड आहे. माञ या वाक्याला अंजली धानोरकर अपवाद ठरतात. एवढ्या व्यापातूनही त्यांनी स्वत:ला कलाक्षेञाशी अगदी सराईतपणे जोडून ठेवलय. त्यांच्यातील साहित्यिका जेव्हा- जेव्हा बाहेर पडली तेव्हा- तेव्हा साहित्यक्षेञासाठी ती देणगी अनमोल ठरली. 'गट्टीफु' हा त्यांचा बालकवितासंग्रह फार प्रसिद्ध असून त्यांनी चौथ्या आवृत्तीपर्यंत मजल मारली. 'मनतरंग या त्यांच्या ललितलेखासंग्रहाने तर अशी कमाल केली की, त्यातील 'काहूर' हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीएससी, बी. एस.डब्ल्यु व बी.एफ.ए च्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात सन २०१२-१३ पासून समाविष्ट आहेत. त्या स्वतः सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. याचसंदर्भातील व्यक्तीमत्व विकासासाठी सॉफ्टस्किल हे त्यांचे पुस्तक वाचनीय आहे. विविध शासकीय प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्कील मधील विविध विषयांवर प्रशिक्षण दिले तर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, कॉर्पोरेट विभाग अशा अनेक क्षेञांसाठी वेळ काढत त्यांनी सॉफ्ट स्कीलचे धडे दिले. यासोबत 'मला आयएएस व्हायच' हे त्यांच अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे. साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' या पुस्तकाच्या अभिवाचनाची त्यांच्या मधूर आवाजात रेकॉर्डींग ऐकली की आई-मुलाच्या नात्यातील तो निरागस संवाद डोळ्यासमोर चिञ उभे करतो. नामांकित वृत्तपञ मासिकातील त्यांचे स्तंभ लेखन तर पर्वणी ठरते. साहित्यवेड्या अंजली धानोरकरांच्या लेखणीने त्यांना खरच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेपले आहे. स्वत:ला काळाबरोबर त्या कशाप्रकारे सुसंगत ठेवतात याचा प्रत्यय 'Lets Talk Anjali' या त्यांच्या युट्यूब चॅनलवर येतो. त्या कामातून वेळ काढत स्वत;ची आवड जोपासतात. 'जिंदगी मिलेंगी ना दोबारा, मनभर इसे जिले यारा' ह्या ओळींमधील ओवी म्हणजेच अंजली धानोरकर.
त्यांच्या सामाजिक कार्याचा वेग जाणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त आहेत. २०१९ मध्ये फेमिना मासिकात त्यांच्यावर 'Pillar Of Democracy' म्हणजेच 'लोकशाही आधारस्तंभ' या शीर्षकाने लेख प्रसिद्ध झाला. तो क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. लोकशाहीचा आधारस्तंभ ही स्तुतीसुमनं खरच गगनभेदी आहेत. त्यांच्या किर्तीचे गोडवे सातासमुद्रापारही मोठ्या अभिमानाने गायले जातात. याचं उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या ‘Thrive Global’ या मासिकात त्यांच्यावर प्रसिद्ध झालेला लेख. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वृत्तपञातून त्यांनी आपले लेख जगात पोहोचविले. खरच एका महिलेनं मिळविलेलं हे क्षितीजापलिकडलं यश आपल्या भारताच्या कुठल्याच कोपऱ्यात न मावणारं आहे. त्याला सामावून घ्यायचं असेल तर मनच लागेल आणि जेव्हा ते प्रत्येकाच्या मनात उतरेल ना तेव्हा अंजली धानोरकरांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांसारखे अधिकारी तयार होऊन कायदा व सुव्यवस्थेतून कशा पध्दतीने विकास साध्य होतो. याची प्रचिती येईल. खडतर परिश्रम आणि मनात असणाऱ्या अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन प्रशासकीय सेवेबरोबरच विविध क्षेञाला आपल्या कलेतून संपन्न करत अंजली धानोरकर यांनी आपली विशेष छाप सोडली. कधीही न पुसणारी अशी. सह्याद्रीच्या उंचीसारखं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या या ध्येयवेड्या नारीशक्ती साठी भारतीयांच्या माना शानेनं आणि अभिमानानं उंचावतात. त्यांनी एवढी मोठी उंची गाठली आहे माञ त्यांचा निर्मळ स्वभाव हा सर्वसामान्यांनाही आपलंसं करुन घेतो. त्यांच्या दरबारी सगळेच एकसमान असून कोणी शेतकरी जरी आला तरी त्या वेळ काढून तितक्याच आपुलकीने विचारपूस करतात. याला म्हणतात पतंगाची झेप आभाळाला टेकली तरी डोर माञ जमिनीशी कायम संधान साधून असते.
अंजली धानोरकर सांगतात. " कायम कायद्याला धरुनच काम करायला हवं. आपली उंची गाठतांना अनेक प्रसंगांना महिला म्हणून सामोरं जावंच लागतं माञ ध्येय मनाशी पक्क असलं की आपल्यातील भुक वाढत जाते. आणि नकळत ती ताकद आपल्यात निर्माण होते कोणत्याही गोष्टीचा निडर होऊन सामना करण्याची. तुमच्यातील क्षमतांना ओळखा, नकारात्मक लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील माञ तेच बळ समजत वाटचाल करत रहा. यश तुमच्या पायाशी असेल. खरच अंजली धानोरकर म्हणजे प्रशासकीय क्षेञातील व्यापक असे विद्यापीठ. त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक महिलादिन पुरेसा नाही. प्रत्येक महिलादिनी गौरव व्हायलाच हवा अशी ही महिलांची शक्ती. प्रशासकीय क्षेञात पाऊल टाकू इच्छिणाऱ्या अनेक महिला, मुलींचं प्रेरणास्थान. या प्रामाणिकतेच्या चालत्याबोलत्या संवेदनशील पुतळ्याला महिलादिनी सलाम!
🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️