"G 20 चा वसा टाकू नको!"
कचऱ्यात माखलेल्या रस्त्यावरुन गुळगुळीत सपाट आरामदायक रस्त्यावर आल्यावरची मनाला मिळणारी अपार शांतता ही छञपती संभाजीनगरची ओळख ठरतेय. G२० आणि W२० च्या निमित्ताने साऱ्या शहराचे रुपडे पालटण्यात छञपती संभाजीनगर अत्यंत यशस्वी ठरले आहे हे मानलेच पाहिजे. मागच्या२ महिन्यांपासून ज्या पध्दतीने शहरात सृजशीलतेचं रूपक वातावरण, आकृत्या, देखावे दिसत आहे ते खरच वाखाणण्याजोगे आहे. शहर सुशोभित झालं, रस्ते चकाचक झाले आणि ऐतिहासिक शहर परत एकदा नव्याने एक वेगळाच ऐतिहासिक वारसा लिहिण्यासाठी सज्ज झाले. या सगळ्या झगमगाटात मला माञ कधीतरी अभ्यासात वाचलेल्या G२० या संकल्पनेविषयी जाणून घेण्याची चुनूक लागली आणि पहिला मुद्दा समोर आला तो म्हणजे असा की, एकूण २० राष्ट्रांचा समुह मिळून तयार झालेली परिषद म्हणजे जी २० परिषद. १९९९ मध्ये जागतिक आर्थिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी G२० परिषदेची स्थापना करण्यात आली. यातूनच विविध देशांतील समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे काम करणारी संस्था म्हणून G२० ची ओळख निर्माण झाली.
G२० मध्ये जागतिक स्तरावरील शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार, कृषी, आपत्तीव्यवस्थापन यासारखे अनेक मुद्दे आर्थिक दृष्टीकोनातून हाताळण्यात येतात. दरवर्षी याच मुद्याना केंद्रस्थानी ठेवून G२० परिषद एका देशाला भेट देते. या वर्षी ते यजमानपद भुषविण्याची संधी भारताला मिळाली आणि महाराष्ट्रातील चार निवडलेल्या शहरांपैकी 'छञपती संभाजीनगर' प्रामुख्याने घेण्यात आले. इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवणारे छञपती संभाजीनगर G२०मय तर झालेच पण त्यात भारताने W२० चा नारा लगावत एक वेगळेच भुषण या परिषदेला प्राप्त करुन दिले. W२० म्हणजे 'वुमन्स २०' जगाची निर्मिती करणारी महिला व तिच्या प्रश्नांचा पाऊस, तिच्या कर्तृत्वाच्या धारा आणि स्ञी सक्षमतेचा नारा या चतु: सुञींवर आधारलेली G२० आणि W२० परिषद सध्या चांगलीच गाजते आहे.
भारतात पार पडत असलेल्या या G२० परिषदेचा मुख्य हेतू 'वसुधैव कुटुंबकम' या संस्कृत वचनाचा पुरस्कार करतांना दिसत आहे. म्हणजे या पृथ्वीवरील सर्व प्राणीमाञ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या विचारधारेच्या साखळीचा भाग आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच विचारधारेतील घटकांवर यावर्षीची G२० परिषद आपले मुद्दे मांडते आहे. जागतिक स्तरावरील सदस्यांसमोर महिलांचे प्रश्न मांडले जाणे यापेक्षा सार्थकी गोष्ट नाही. कारण स्ञी वर्ग हा जगाच्या रथावर जरी पोहोचला तरी तिच्याकडच्या नजरा माञ अजूनही सुरक्षिततेचा निःश्वास सोडू देत नाही. त्यात आपल्या देशात आणि परिणामी छञपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात महिलांवरील वाढते अत्याचार काहीही करुन थांबता थांबत नाही आहेत. याची साक्ष म्हणजे रोजचे वर्तमानपत्र, डिजिटल मिडिया यांवरती झळकणाऱ्या बातम्या आणि कोर्टात रखडलेल्या कित्येक केसेस आहेत.
याच पार्श्वभूमीवर हा विषय G२० मध्ये W२० च्या शीर्षकातून महिलांचे प्रश्न उचलून धरण्यात आले आहेत, म्हणून कुठेतरी परत एकदा बदलांच्या आशा पल्लवित झाल्याची भावना निर्माण झाली आहे. यातून नक्कीच महिलांमध्ये उपजत असणारा नेतृत्वगुण अधिक वृध्दींगत होण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलली जातील. त्यासोबतच लिंगभेद टाळून एका समान पातळीवर महिलांच्या सक्षमतेला मान्य करण्याची हाकही या परिषदेचा आवाज ठरेल हे नक्की. मुख्य म्हणजे यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक ही छञपती संभाजीनगरात पार पडली आणि यातून देशासह शहरातील महिल्यांच्या हितप्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला हे महत्वाचे. G२०परिषदेत महिलांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारने या परिषदेला एक वेगळे वळण प्राप्त करुन दिले. परंतु याव्यतिरिक्त शहरातील प्रशासन यंञणेत आलला सुरळीतपणा सध्या लक्ष वेधून घेत आहे. G२०परिषदेच्या निमित्ताने रखडलेली कामे मार्गी लागली, कित्येक वर्ष अतिक्रमणामुळे गुदमरलेले रस्ते आता मोकळे श्वास घेऊ लागले आहेत. शहराच्या दुतर्फा असणारे कचऱ्याचे साम्राज्य आज कचरापेटीत बंद झाले. संपुर्ण शहरातील भिंती आतापर्यंत एक तर जाहिरातींनी सजल्या होत्या किंवा त्या व्यतिरिक्त लोकांच्या धुम्रपानाच्या पिचकाऱ्यांनी सजल्या होत्या. परंतु आज संपूर्ण शहर चिञकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अनेक चिञशैलीतून जिवंत दिसते आहे. अगदी बारकाईने प्रत्येक चिञांतून पारदर्शक सुचना, मनोरंजन, संस्कृती, निसर्ग, देशप्रेम यासांरखे अनेक विषय चिञित करण्यासाठी हजारो चिञकारांनी उन्हातान्हात फक्त G२० ला अग्रस्थानी ठेवत शहराला चिञांतून नवसंजीवनी देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. छञपती संभाजीनगरची एकही भिंत कोरी न ठेवण्याचे व्रत त्यांनी घेतले आणि ते विश्वविक्रमाच्या नोंदीसह पुर्णत्वास नेले ही विशेष बाब.
बीबी का मकबऱ्याला लाईंटींगचा साज चढवणं असो की, ५२ दरवाज्याचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या दरवाजांचे त्या निमित्ताने केलेले पुनरुज्जीवन असो. या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. अजिंठा-वेरुळ महोत्सवाने या सगळ्या एकसुञात बांधलेल्या वातावरणाला एका वेगळ्या सप्तसुरात बांधले ही सुध्दा मेजवानीच ठरली. या सगळ्या सुशोभीकरणाचा भर शाश्वत विकासासह जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टीकोनाचा होता याचा प्रत्यय शहरात फेरफटका मारतांना आपल्याला जाणवतो. शेवटी शाश्वत विकासावर भर दिला तरच पर्यावरणाशी संधान साधता येईल ही गरज प्रशासनानं घेरली व त्या माध्यमातून उपक्रम राबवलेत ही प्रंशसनीय गणना आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे G२०परिषदेच्या निमित्ताने का होईना, छत्रपती संभाजीनगरकरांना आपलेच शहर इतके सुंदर वाटू लागले की नागरिकांनी अक्षरशः रस्त्यांवर सेल्फी, फोटो काढण्यासाठी गर्दी केली. याला कारणही असेच, पुर्वीचे औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात जी कामे झाली नाहीत, ती या G२०परिषदेच्या निमित्ताने शहरात झाली. त्यामुळे अशीही कामे आपल्या शहरात होऊ शकतात हे शहरवासीयांनी प्रत्यक्ष अनुभवले. G२०परिषदे मुळे छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक वारसा साता समुद्रापार जाणार हे नक्की असले तरी यामुळे अवघ्या शहराचा कायापालट झाला हेही तितकेच खरंय. आपला देश 'वसुधैव कुटंबकम' या वचनाचे जसे पालन करतो तसेच 'अतिथी देव भव:' या वाक्यासही जागतो. पाहुण्यांसाठी केलेला हा अट्टाहास खरं तर आपल्या भौतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा पाया आहे हे ही तितकंच शाश्वत सत्य आहे. म्हणूनच ते शाश्वत सत्य टिकवून ठेवणं हे छञपती संभाजीनगर वासियांचं आद्य कर्तव्य आहे . म्हणूनच आता छत्रपती संभाजीनगरच्या सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन झालेला शाश्वत विकास अबाधित ठेवला म्हणजे मिळवलं.
शहराचे नाव बदलल्याप्रमाणे शहरातील नागरिकांमध्येही बदल झाला म्हणजे G२० छत्रपती संभाजीनगरला पावली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. पाहुणे आलेले असतात तेव्हा घरातले सगळेच गुणी वागतात पण पाहुणे गेले की खरे गुण बाहेर येतात आणि प्रशासनाने नागरिकांसाठी केलेला हा विकास केव्हा पायदळी तुडविला जातो याचे भानही नागरिकांस उरत नाही. म्हणजे आपले असे. केलं नाही तिकडून बोल लावावे आणि केलं तर तिकडूनही बोल लावून आपणच त्याची राख रांगोळी करावी आणि वरतून आपलीच मक्तेदारी, प्रशासनाला सातत्य राखण्यात अपयश आले. विकास हा सहकार्यातून आणि दोन्ही बाजूने साकारता येतो. त्यांनी मेहनत केली आपण तो टिकवून धरावा एवढंसं साधं गणित आपल्याला बस उमगावं. म्हणजे कोट्यावधींच्या खर्चातून साकारलेले नवे नाव घेऊन नव्याने उभे राहिलेले हे 'छञपती संभाजीनगर' जगासमोर आपल्या देशाच्या शिरपेचातील मानाचा तुरा असेल. या तुऱ्याला धक्का लागेल असे कुठेलेही कार्य शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या हातून घडणार नाही याची आजपासून आपण सगळे मिळून काळजी घेऊयात आणि जगभर खाञीलायक सांगूयात आमच्या संभाजीनगरचं ऐतिहासिक नव्या पेहरावातील दिमाखदार वैभव पाहण्यासाठी एकदा येऊन तर बघा! कारण प्रत्येक पाहुण्याचं इथे तितक्याच आपुलकीने स्वागत होईल जितक्या आपुलकीने G२० परिषदेचे झाले.
तर मग नक्की भेट द्या छञपती संभाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीला व एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार व्हा. कारण तुम्ही अनुभवलेली इथली प्रत्येक वास्तू आता नव्याने तुमच्याशी हितगुज करेल आणि G२० परिषदेचे पडसाद तुम्हाला त्यावर नक्कीच दिसतील. शेवटी नव्याचा श्रृगांर हा जास्त मनमोहक आणि व्यापक दृष्टीकोनाचा असतो, यावर आज शिक्कामोर्तब झाला हे माञ खरं. G२० चा इथला सहवास छञपती संभाजीनगरासाठी नवनव्या वाटांचा धनी असावा हीच आशा बाळगून थांबते!
🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️