मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

     🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳
आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर्षानंतर, गुलामगिरीच्या उद्बोधक चटक्यांच्या चिंगाऱ्यांनंतर मान उंचावेल अशा तिरंग्याचे '१५ ऑगस्ट १९४७' ला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले अन् 'भारत' एक स्वतंत्र भारत झाला!
ना कुणाचा चाकर, ना कुणाचा गुलाम,  इथे फडकला फक्त अन् फक्त देशभक्तीच्या उत्साहात लोकशाहीचा सलाम!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावन भुमी. त्यांनी रयतेच्या एकजुटीतून मुघलांच्या, शायिस्तेखान, अफजलखानासारख्या मातब्बर शञुंच्या तावडीतून राष्ट्र सोडवत स्वराज्याचा पारिजात उभा केला. आदर्श रयत, आदर्श  राज्य, आदर्श राजा अशी सुसूत्र लोकशाहीतली मांडणी म्हणजे छञपती शिवाजी राजे, पण राजांच्या या स्वराज्याला काही दशकांनंतर कळ लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून, व्यापाराच्या मुद्द्याने घुसखोरी केलेल्या गोऱ्यांनी 'तोडा, फोडा आणि राज्य करा' या तत्वावर भारतीय सल्तनतीला गुलामीच्या बेड्या ठोकल्या. देशाला. देश बिथरला, विभागला गेला, जात ,धर्म, प्रांत, वर्ण, व्यंग हे व्याभिचारी विचार इंगळीसारखे माणसाच्या मनाला इतके चिकटत गेले की, अखंड स्वराज्य असणारा आपला "देश" च आपला धर्म! हा विचार कुठेतरी मागे सरत गेला.  इंग्रजांचा हा चक्रव्यूह भेदत आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांनी, लोकनायकांनी १५० वर्षांचा सत्तासंघर्ष करुन, कारावास भोगून १९४७ च्या सुर्याला आपल्या देशात स्वातंञ्याची पहाट उगवण्यास भाग पाडले. त्यांचे कष्टही त्या तळपत्या सुर्यासारखेच; पाऊल चुकले तर त्यांच्यासह हातातोंडाशी आलेला स्वातंञ्याचा घास भस्म होऊ शकला असता, पण शेवटी त्यांची वाट स्वातंञ्याच्या वळणावर येऊन ‌विसावलीच. 


आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७७ व्या स्वातंञ्यदिनाच्या या पहाटेला मागे वळून बघतांना इतिहासाची भरभक्कम, स्फूर्तिदायक पाने आत्मासात केल्याशिवाय आपल्याला  मिळालेल्या स्वातंञ्याची व्याख्या आपल्यात व आपल्या येणाऱ्या पिढीच्या मनात रुजणारच नाही. आपल्याला मिळालेली अभिव्यक्ती, सारं वैभव हे स्वातंञ्याचं देणं आहे, क्रातीवीरांनी केलेल्या सत्तासंघर्षाचं, दिलेल्या बलिदानाचं! ते अमृत आहे, आपल्या जगण्याचं, वैचारिकतेचं अन् मुळाने केलेल्या कष्टाचं. म्हणून ते कायम आपल्याला आत्मसात असावं एवढं नक्की!

मागचं संपूर्ण वर्ष हे भारतात स्वातंञ्याचं गुणगान गाणारं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. याच अमृतमहोत्सवी वर्षात अनेक ऐतिहासिक घटना, निर्णयाने देशाच्या वाटचालीत अमृताचे कलश स्थापिले गेले. एकेकाळी देशाच्या राजकारणाची घडी बसवू बघणारा आपला भारत देश आज आंतरराष्ट्रीय राजकारणात हुकमी एक्का बनलेला आहे. भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपतीपदी "द्रौपदी मुर्मू" या आदिवासी महिलेची वर्णी लागली. त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणं देशासाठी गर्वाची गोष्ट ठरली‌. या ७६ वर्षात विज्ञान- तंञज्ञान ,आयटी क्षेञाच्या जोरावर भारताने प्रगतीची कमान भक्कमपणे उभी‌ केली. स्ञीशिक्षणाने अमुलाग्र प्रगती साधत अंतराळासह जल, वायु, अग्नी व इतर सर्वच क्षेञात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. स्ञीने सामर्थ्यातून इतिहासात केलेल्या पराक्रमाची गुरुकिल्ली आपल्या हाती बाळगली‌ आणि बिकट प्रसंगांना तडीपार करत आपणही या देशाचा भक्कम पाया आहोत हे पटवून दिले. आजही देशकार्यात अविरत कष्ट त्या करत आहेत. 'हर तरफ महिलाराज, सारी श्रृष्टीपर महिलाराज'! असं चिञ पाहून समाधान वाटतं. कारण जी 'स्ञी' आपलं घर सांभाळू शकते तीच 'स्ञी' कधी अर्थव्यवस्था डळमळली तर ताळेबंदही सावरण्याची ताकद ठेवते हे ञिकालाबाधित सत्य आहे. 

तृतीयपंथी हा समाजातीलच एक घटक असला तरी समाजानेच समाजाबाहेर टाकलेला हा वाळीत समाज. जगावं तरी कोणासाठी? जगावं तरी कशासाठी? संघर्ष त्यांच्या ठायी -ठायी, फक्त पोटाच्या भाकरीसाठी. असा हा माणुसकीहीन लोकांच्या अर्धज्ञानामुळे मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला तृतीपंथीयांचा गट प्रवाहात येण्यासाठी  स्वत:ची नदी करत अस्तित्वाच्या संघर्षासाठी रस्त्यावर उभा ठाकला. स्वातंञ्य तर मिळालं होतं त्यांना, तरीही पारतंञ्यात असल्यागत आपल्याच स्वतंञ झालेल्या देशात ते लोकांच्या नजरेतल्या बेड्यांमध्ये बंदिस्त होते. अजूनही म्हणावं तसं त्यांना स्वीकारणं कठीणच जातंय की, या माणुस नावाच्या वैचारिक प्राण्याला. परंतु कुठेतरी काळ बदलतांना दिसतोय. कायदा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या हाकेला साद घालतोय. छोटीशी आशा पल्लवित झाली आहे. पोलीस दलात तृतीयपंथी कर्तव्य बजावतांना आढळून येता आहेत. याचबरोबर नुकतीच पुणे महानगरपालिकेने तृतीयपंथीयांवर विविध पदांची जवाबदारी सोपवत एक नवा पायंडा देशासमोर स्थापित केला ही खरंच सुखावणारी बाब वाटली. असाच देश अपेक्षित आहे भारत मातेला. नाही का? 


भारतीय स्वातंञ्योंत्तर कालखंडातील बैलगाडीने मैलोनमैल केलेले दळणवळण आता मेट्रोपर्यंत आलेले आहे. एवढेच नव्हे तर मेट्रोपुढील तंञज्ञानाचेही संशोधन जोरात चालू आहे. गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेचे जाळे चांगलेच विस्तारले आहे.यामुळे प्रगतीच्या वाटेत रेल्वेचा सुसाट वेग वेग विस्तारला आहेच. अतंराळातही भारतीय संशोधन यंञणेने विशेष छाप पाडली आहे. मंगळ आणि चंद्र आपल्या कवेत घेऊन इतरही ग्रहांवरती दृष्टी ठेवलेली आहे. अंतळरातलं हे  भारतीय  वैभवही आपल्याला स्वातंञ्याचंच तर देणं आहे. 

अंतराळ संशोधन म्हटलं की, विकसित देशांनीच हे शिवधनुष्य पेलावं असा नियम होता. पण याच अंतराळातील घडामोडींवर जगाची असलेली मक्तेदारी इस्रोच्या माध्यमातून भेदत भारताने अंतराळात सरकन गगनभरारी घेतली. अपयशातून यशाचे शिखर गाठत आज आपल्या देशाचे तिसरे चंद्रयान चंद्रापासून हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेय. अन् या सफल प्रयत्नानंतर आपला देश माणसांना घेऊनही चंद्रावर पाऊल टाकेल तो दिवस नक्कीच जवळ असेल. संशोधन क्षेञाने आपले कार्यक्षेत्र देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्यापक केले आहे.  शुन्यातून निर्माण केलेले वैभव आज भारताला संपन्नतेकडे घेऊन चाललेय खरे.


 बळीराजाचा देश म्हणून जगभर ख्याती असलेला भारत देश आधुनिक शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग शेतीशास्ञात अबलंबवत गेला. शेतीपूरक व्यवसायांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एककीडे सुधारत आहे. दुसरीकडे शहरांचे स्मार्ट सिटीमध्ये जागतिकीकरण झाले. खेडे डिजिटल खेडे म्हणून ओळखले जाऊ लागले. असे अनेकांविध प्रकल्प देशाच्या आजच्या स्थितीसाठी पोषक ठरले. एकूणच काय तर आजपर्यंत देश अनेक अंगांनी बदलला गेला हे‌ नाकारता येणारच नाही. मग ते सामाजिक असो, शैक्षणिक,असो बौध्दिक असो का राजकीय पातळीवरुन असो, पण "सुख, सोयी, सुविधांचा संचार जेव्हा मुक्तपणे जगण्यात व्हायला लागतो ना तेव्हा त्याची किंमत अधिक मौल्यवान होण्याऐवजी ती धूसर व्हायला लागते". हे वाक्य  सगळ्याच अंगांना लागू पडते ही दुर्दैवाची बाब आहे. याच वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतोय पण याची आपल्याला जाणीव नाही किंवा आपण कानाडोळा करतोय अशी गत झालीय आपली. विकास होत असतांना नैतिक मुल्यांचा विसर आपल्या देशातील नागरिकांना पडलाय हे स्पष्ट जाणवते. एकीकडे स्वच्छतेचा संदेश देणारे आपण दुसरीकडे नद्या प्रदुषित करतोय. एकीकडे प्रदुषण होतंय, महागाई वाढलीय, रस्त्यांवर खड्डे पडलेय, सांडपाण्याचा निचरा होत नाही ये, आजार पसरलेत म्हणून टिकास्ञ सोडणारे आपण आपल्यासाठी केलेल्या सुविधांना  पायदळी तुडवतो, भरधाव वेगाने गाड्या चालवत रस्त्याची चाळण आपण करतो, कचरा गाडी आली तरी कचरा गाडीत कचरा न टाकता रिकाम्या जागेवर कचरा नेऊन टाकतो. याचे आत्मभान आपल्याला कुठलीही मागणी करतांना, कृती करतांना असायला हवे.  


एकीकडे देश प्रगतीच्या उंबरठ्यावर असतांना दुसरीकडे देश अनेक समस्यांना झुंजही देत आहे. पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्याची दैना झाली, गरिबांची लाचारी वाढली, गावाची तहान व्याकूळली, विजेनी तारा मोडल्या, शिक्षणाची वाट तुटली, रोगराईने आव पसरला अशा अनेक समस्यांनी सामान्य माणूस होरपळतोय. अजूनही तो लोकशाहीत तर आहे पण तरीही  लोकशाहीबाहेर पडल्यागत त्यांची अवस्था झाली आहे. खेडयांचा विकास होतांना कुठेतरी शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि पायाभूत सोयीसुविधांअभावी  ग्रामीण भाग दुर्लक्षित होतोय असे चिञही आज बघायला मिळतेय. कागदावर असणारी आदर्श गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास काही प्रमाणांत अडसर निर्माण होत आहे. यासाठी जरा बारकाव्याने खेड्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

विकासाच्या आड येणाऱ्या या सगळ्या गोष्टींना आजची राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे‌. राजकारणात निर्माण झालेला द्वेष, स्वार्थ, ईर्षा, सत्तासंघर्ष या अवगुणांनी जखडलेले राजकारण कुठेतरी समाजकारणापासून दुरावले आहे. याची साखळी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे फोफावली अन् यात कुठेतरी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. मग ते महिलांवरील  वाढते अत्याचार असो , जातीधर्मावरुन पेटणाऱ्या दंगली असो वा उध्दवस्त होणारी शहरे असो. सगळ्या गोष्टींची सुरुवात ही राजकीय व्यवस्थेतून पेटलेल्या ठिणग्यांतूनच होते. देशाच्या राजकारणाचा फटका खेड्यातील मारोतीच्या पारावरही सपकन बसतो. खरंतर असं खेड्यातलं राजकारण हे देशपातळीवर राजकारणापेक्षाही जास्त किचकट आणि गलिच्छ स्वरुपाचं असतं. हे वाक्य तिथल्या परिस्थितीत राहुन प्रत्ययास येते. याला काही गावं, काही माणसंअपवाद ठरतात. म्हणून आजही खेड्यांचा म्हणवणारा देश हा कुठेतरी दुर्गम भागातील खेड्यांकडे दुर्लक्षित झाल्यागत आहे. देशाची जनता तर पुरती हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करतेय. लोकशाहीचा महत्वाचा हक्क असणारी भारताची रयत मत पैशाने विकत देशाला बिकट अवस्थेत ढकलण्यात हातभार लावते फक्त. रयतेचे आत्मभान जागृत करुन ते आत्मसात करण्याची ताकद‌ आता फक्त जनतेतच आहे. नाहीतर सामाजिकता फार दबून जाईल या राजकीय स्वार्थाखाली.

राजकारण हे सारीपाटाच्या खेळासारखं आहे. फासे पलटले की, डावपेच बदलले जातात, पण तेच डावपेच जर जनतेच्या भल्याचे समाजात निर्माण झालेल्या तेढीला लगाम लावणारे असतील तर नक्कीच स्वतंञ झालेला भारत, विकासाच्या शर्यतीत असलेला सुजलाम् सुफलाम भारत मागे खेचला जाणार नाही. देशाची व्यवस्था बघणाऱ्या देशाच्या सर्वच नागरिकांना एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 
 

आपल्याच देशाच्या या दोन रुपांनी आपल्या राष्ट्राला विभागून सार्वभौमत्वापासून लांब ठेवलंय. कुठेतरी ही दरी भरुन निघायला हवी. अखंड अभिमान वाटावा असा आपल्या देशाचा तेजस्वी सुर्य जागतिक  पातळीवर  तळपायला हवा अशी मनोमन इच्छा या स्वातंञ्यदिनाच्या मंगलपर्वावर एक भारतीय नागरिक म्हणून वाटते.
स्वातंञ्यासोबत येते ते कर्तव्य ,कर्तृत्व आणि त्याला अबाधित ठेवण्याचे कार्य.....
नुसतं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवीरांनी खस्ता खाल्ल्या नाही तर त्या स्वातंञ्यासोबत एकवटलेला देश सदैव एकजूटीने नांदावा अन् देशाकडे पुन्हा तिरकस नजरेने बघणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता यावं हा विचार राष्ट्रात रुजावा यासाठीही त्यांनी जीवाचं रान केलं.....
त्यांनी आपल्याला मिळवून दिलेले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांच्या गुलामीत जाऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून आपण सावध रहायला हवं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यापुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत'. या सर्वव्यापी प्रतिज्ञेवर आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. 'सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचा आपल्याला अभिमान आहे. याच आपल्या मातीतल्या देशाने कायम अखंडित, अबाधित आणि संघटितच असायला हवं.... यासाठी अप्रत्यक्षपणे  कार्य करण्याची शपथ आपण आजच्या दिवशी घेऊयात. देशाच्या सीमेवरचे जवान प्राणाची खिंड लढवत देशाचे रक्षण करतात. आपणही आपल्या देशाच्या अंतर्गत विकासासाठी सदैव कार्यरत राहुयात. देशाप्रती आपले कर्तव्य, निष्ठा पार पाडण्याचा 'प्रण' करुयात!
हे भारताच्या लेकरा...
रुजव तुझ्या मनात या देशसेवेचे गारुड...
आत्मसात कर स्वातंञ्याचे तेजस्वी भारुड....🇪🇬🇪🇬
 
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.....!

जय हिंद, जय भारत 
#शब्दप्राची🖋️🖋️


                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

रविवार, १८ जून, २०२३

😂👑❤️बाबा❤️👑❤️

              ❤️👑❤️बाबा❤️👑❤️


बाबा
जगण्याच्या वर्तुळातला एक अव्यक्त कोपरा! बाबा लिहायला घेतला तरी पेन जड होतो असं वलय. बाबा कष्टानं माखलेला धगधगता अग्निकुंड आणि आपण आदबीनं रहावं म्हणून स्वभावात आणलेला कडकपणा. खरंच बाबा असा आहे का? बाबा‌ म्हणजे आपल्या मुलांसाठी नेहमीच नारळ ते टणक. पण या टणक नारळाकडे बघतांना आपण त्यातंल पाणीदार गोड खोबरं माञ विसरत चाललो आहोत.
कविता करणं सोप्पं असतं का बाबावर
कविता चुकलीच तर कागद फाडताही येईल
माञ तुटलेल्या बाबाला सावरण्याचं बळ आहे कोणाकडे?
आपल्याला कधी बाबा 
सापडलाच नाही का? ९ महिने आईच्या पोटात असलेलं बाळ जन्माला आल्यावर आईसोबत आपल्या बाबाचाही स्पर्श ओळखतो. कारण ९ महिन्याच्या त्या काळात बाबानेही त्याच्याशी गुजगोष्टी केलेल्या असतात. जगात न आलेल्या तान्हुल्यासाठी आर्थिक तजवीज करण्यात तो तेव्हापासूनच गुंतलेला असतो. बाळाचा जन्म होतो. पानावतात त्याचे डोळेही पण पुन्हा बाबाची जागा एका जवाबदार बाबा घेतो अन् अश्रू सुके पडतात तिथे. 
आपलं हे तान्हुलं.....अरे 
खेळाचंय तुझ्याशी मोकळं
आणायचाय तुझ्यासाठी चंद्र चांदण्यांचा गाडा
व्हायचंय तुझ्यासाठी बालपणातला तो म्हातारा घोडा 
अन् फिरवायचं तुला घरभर‌ अगदी जग फिरवल्यासारखं
मी येईल अ...... 
बाळा हे सगळे खेळ खेळायला तुझ्या मामाच्या घरी..
आठ दिवसातून मारेल जमलीच एखादी चक्कर तर तुला गोंजारायला माझ्या उरी
पण तु रडू नको आ... मी आलोच नाही तर.... 
तुझा बाबा तुझा असला तरी तुझ्याचसाठी सारे करण्याचा त्याचा अट्टाहास दुसऱ्यांच्या वेळेनुसार चालतो रे.
समजून घेशील ना.....?माझ्या चिमुरड्या....
येईल मी नक्कीच येईल...
तो पर्यंत विसरु नको अं... तुझ्या बाबाला
 हे त्याच्या मनातले खेळ असतात. आपल्या लेकराशी साधलेला त्याचाच स्व-संवाद. त्याच्या कपाळावरील प्रत्येक आठी या सगळ्या भावनांना व्यक्त करत असते. आपण माञ बाबा या शब्दमागचा तो संवेदशीलपणा घेरण्यात कमी पडतो.
  तो मरमर मरत असतो फक्त. 
  कष्ट करुन झिजत असतो फक्त. 
 
मुलांची बालपणं ते त्यांचा संसार आणि त्यांच्या अवतीभोवती बांधलेली अनेक नात्यांची दोरी. यात कुटूंबाची तिजोरी सांभाळत फक्त जमवाजमव करत असतो. या साऱ्यात कुठेतरी बाबा हरवत जातो. बाबासाठी नाही तर‌ मुलांसाठी. आजकाल त्यांच्यासाठी बाबा म्हणजे फक्त एटीएम आपल्या सुखसुविधांचं. बाकी त्यांनी आपल्यासाठी उपसलेले कष्ट, त्यांनी मारलेल्या त्यांच्या इच्छा याची तिळमाञही जाणीव मुलांना ‌नसते. अत्यंत गरीब परिस्थितीत मोलमजुरी करणारा बाबा आपल्या मुलांनी चॉकलेटसाठी मागितलेला एक रुपयाही मोठ्या आनंदाने त्याच्या हातात ठेवतो. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तो माञ ऐकवेळ उपाशी राहतो. असा असतो बाबा! अव्यक्त बाबा. मोठे होऊन माञ तोच मुलगा/मुलगी...
काय तुमचे दवाखाने, वीट आलाय मला....
एक- एक रुपयाचे त्यांचे कष्ट गेलेत हो‌ पाण्यात.
बाबाला आपण कळत नकळतपणे असेच धक्के देत असतो. तो माञ अव्यक्तपणे गुरफटत असतो तरीही आपल्याच काळजीच्या स्वरात. 
असा असतो बाबा! कधी समजलाच नाही नं आपल्याला.....

बाबा आपल्या मुलीसाठी हळवा आणि मुली आपल्या बाबाच्या काळजातला सगळ्यात सौम्य असा कोपरा. आपल्या आईनंतर आईच्याच जागी आपल्या लाडक्या लेकीला पाहणारा बाबा तिच्यासाठी ढाल असतो. आता सहज व्यक्त होता येतं, मुलींना आपल्या बाबाबद्दल , बाबाला आपल्या मुलीबद्दल. इतके ते नातं बापलेकीचं घट्ट झालंय. पण ग्रामीण बाबा माञ अजूनही आपल्या लेकीवर मायेचा हात फिरवण्यासाठी कष्टाच्या भाकरीचाच घास भरवतो. तिच्या बालपणात तिला चिऊकाऊचा घास घालत घरभर फिरणारा बाबा तिच्या भातुकलीच्या खेळात बाहुला बाहुलीचं लग्न लावतांनाही गुपचूप रुमालाच्या आडोशाने डोळे पुसतो. जशी‌जशी त्याची बाहुली मोठी होते तसतसे समजदारीचं शहाणपण अंगी उतरतांना ती तिच्या कष्टाळू बाबाला मदतीचा हातभार लावते. बाबा थांबवतो तेव्हा लेक उत्तरते...

कष्ट तु सोसावे का तर माझा हुंडा द्यावा
घर तु विकावं का तर माझं घर सजावं
लेक ना मी तुझी? धनाची पेटी ना?
तुझा घास ओरबाडून राहील का रे मी सुखी?
तुझं घर का नसावं माझं? मी का नाही जगावं माझ्या बाबा साठी?
मी रहावं तिकडं खुशीत अन् तु झिजावं माझ्या उंबरठ्यासाठी?
ही का रीत झाली?

लेकीचं हे निरागस बोलणं बाबा नेहमीच ऐकत असतो. लाडक्या लेकीला निरुत्तरपणे नेहमीच सासरी पाठवत असतो. तेव्हाही बाबाच्या डोळ्यात पाणी असतं. तो माञ अव्यक्तपणे कोपरा गाठून आपल्या लेकीचा विरह मोकळा करीत असतो. असा असतो बाबा! खंबीर पण मलूल, कडक पण संवेदनशील. आयुष्यभर जगतो तो स्वत:साठी नव्हे तर त्याने निर्माण केलेल्या घरट्यासाठी....
हो असाच असतो बाबा....
जगण्याच्या वर्तुळातील अव्यक्त कोपरा.......
हो असाच असतो बाबा....

                🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

G 20 चा वसा टाकू नको!


                "G 20 चा वसा टाकू नको!"

G२०
, G२० आणि फक्त G२० औरंगाबाद जिल्हा आणि आता नव्यानेच घोषित झालेले छञपती संभाजीनगर नुसतं या नावाच्या पटलावर सुक्ष्म ते लघु या आकाराच्या लाईट्समध्ये दैदिप्यमान रोशनाईत नुसतं उजळून निघालंय!

कचऱ्यात माखलेल्या रस्त्यावरुन गुळगुळीत सपाट आरामदायक रस्त्यावर आल्यावरची मनाला मिळणारी अपार शांतता ही छञपती संभाजीनगरची ओळख ठरतेय.  G२० आणि W२० च्या निमित्ताने साऱ्या शहराचे रुपडे पालटण्यात छञपती संभाजीनगर अत्यंत यशस्वी ठरले आहे हे मानलेच पाहिजे. मागच्या२ महिन्यांपासून ज्या पध्दतीने शहरात सृजशीलतेचं रूपक वातावरण, आकृत्या, देखावे दिसत आहे ते खरच वाखाणण्याजोगे आहे. शहर सुशोभित झालं, रस्ते चकाचक झाले आणि ऐतिहासिक शहर परत एकदा नव्याने एक वेगळाच ऐतिहासिक वारसा लिहिण्यासाठी सज्ज झाले. या सगळ्या झगमगाटात मला माञ  कधीतरी अभ्यासात वाचलेल्या G२० या संकल्पनेविषयी जाणून घेण्याची चुनूक लागली आणि पहिला मुद्दा समोर आला तो म्हणजे असा की, एकूण २० राष्ट्रांचा  समुह मिळून तयार झालेली परिषद म्हणजे जी २० परिषद. १९९९ मध्ये जागतिक आर्थिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी G२० परिषदेची स्थापना करण्यात आली. यातूनच विविध देशांतील समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे काम करणारी संस्था म्हणून G२० ची ओळख निर्माण झाली. 
 
G२० मध्ये जागतिक स्तरावरील शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार, कृषी, आपत्तीव्यवस्थापन यासारखे अनेक मुद्दे आर्थिक दृष्टीकोनातून हाताळण्यात येतात. दरवर्षी याच मुद्याना केंद्रस्थानी ठेवून G२० परिषद एका देशाला भेट देते. या वर्षी ते यजमानपद भुषविण्याची संधी भारताला मिळाली आणि महाराष्ट्रातील चार निवडलेल्या शहरांपैकी 'छञपती संभाजीनगर' प्रामुख्याने घेण्यात आले. इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवणारे छञपती संभाजीनगर G२०मय तर झालेच पण त्यात भारताने W२० चा नारा लगावत एक वेगळेच भुषण या परिषदेला प्राप्त करुन दिले. W२० म्हणजे 'वुमन्स २०' जगाची निर्मिती करणारी महिला व तिच्या प्रश्नांचा पाऊस, तिच्या कर्तृत्वाच्या धारा आणि  स्ञी सक्षमतेचा नारा  या  चतु: सुञींवर आधारलेली G२० आणि W२० परिषद सध्या चांगलीच गाजते आहे. 

भारतात पार पडत असलेल्या या G२० परिषदेचा मुख्य हेतू 'वसुधैव कुटुंबकम' या संस्कृत वचनाचा पुरस्कार करतांना दिसत आहे. म्हणजे या पृथ्वीवरील सर्व प्राणीमाञ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या विचारधारेच्या साखळीचा भाग आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच विचारधारेतील घटकांवर यावर्षीची G२० परिषद आपले मुद्दे मांडते आहे.  जागतिक स्तरावरील सदस्यांसमोर महिलांचे प्रश्न मांडले जाणे यापेक्षा सार्थकी गोष्ट नाही. कारण स्ञी वर्ग हा जगाच्या रथावर जरी पोहोचला तरी तिच्याकडच्या नजरा माञ अजूनही सुरक्षिततेचा निःश्वास सोडू देत नाही. त्यात आपल्या देशात आणि परिणामी छञपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात महिलांवरील वाढते अत्याचार काहीही करुन थांबता थांबत नाही आहेत. याची साक्ष म्हणजे रोजचे वर्तमानपत्र, डिजिटल मिडिया यांवरती झळकणाऱ्या बातम्या आणि कोर्टात रखडलेल्या कित्येक केसेस आहेत. 

याच पार्श्वभूमीवर हा विषय G२० मध्ये W२० च्या शीर्षकातून महिलांचे प्रश्न उचलून धरण्यात  आले आहेत, म्हणून कुठेतरी परत एकदा बदलांच्या आशा पल्लवित झाल्याची भावना निर्माण झाली आहे. यातून नक्कीच महिलांमध्ये उपजत असणारा नेतृत्वगुण अधिक वृध्दींगत होण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलली जातील. त्यासोबतच लिंगभेद टाळून एका समान पातळीवर महिलांच्या सक्षमतेला मान्य करण्याची हाकही या परिषदेचा आवाज ठरेल हे नक्की. मुख्य म्हणजे यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक ही छञपती संभाजीनगरात पार पडली आणि यातून देशासह शहरातील महिल्यांच्या हितप्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला हे महत्वाचे. G२०परिषदेत महिलांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारने या परिषदेला एक वेगळे वळण प्राप्त करुन दिले. परंतु याव्यतिरिक्त शहरातील प्रशासन यंञणेत आलला सुरळीतपणा सध्या लक्ष वेधून घेत आहे. G२०परिषदेच्या निमित्ताने रखडलेली कामे मार्गी लागली, कित्येक वर्ष अतिक्रमणामुळे गुदमरलेले रस्ते आता मोकळे श्वास घेऊ लागले आहेत. शहराच्या दुतर्फा असणारे कचऱ्याचे साम्राज्य आज कचरापेटीत बंद झाले.  संपुर्ण शहरातील भिंती आतापर्यंत एक तर जाहिरातींनी सजल्या होत्या किंवा त्या व्यतिरिक्त लोकांच्या धुम्रपानाच्या पिचकाऱ्यांनी सजल्या होत्या. परंतु आज संपूर्ण शहर चिञकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अनेक चिञशैलीतून जिवंत दिसते आहे. अगदी बारकाईने प्रत्येक चिञांतून पारदर्शक सुचना, मनोरंजन, संस्कृती, निसर्ग, देशप्रेम यासांरखे अनेक विषय चिञित करण्यासाठी हजारो चिञकारांनी उन्हातान्हात फक्त  G२० ला अग्रस्थानी ठेवत शहराला चिञांतून नवसंजीवनी देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. छञपती संभाजीनगरची एकही भिंत कोरी न ठेवण्याचे व्रत त्यांनी घेतले आणि ते विश्वविक्रमाच्या नोंदीसह पुर्णत्वास नेले ही विशेष बाब. 

बीबी का मकबऱ्याला लाईंटींगचा साज चढवणं असो की, ५२ दरवाज्याचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या दरवाजांचे त्या निमित्ताने केलेले पुनरुज्जीवन असो. या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. अजिंठा-वेरुळ महोत्सवाने या सगळ्या एकसुञात बांधलेल्या वातावरणाला एका वेगळ्या सप्तसुरात बांधले ही सुध्दा मेजवानीच ठरली. या सगळ्या सुशोभीकरणाचा भर शाश्वत विकासासह जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टीकोनाचा होता याचा प्रत्यय शहरात फेरफटका मारतांना आपल्याला जाणवतो. शेवटी शाश्वत विकासावर भर दिला तरच पर्यावरणाशी संधान साधता येईल ही गरज प्रशासनानं घेरली व त्या माध्यमातून उपक्रम राबवलेत ही प्रंशसनीय गणना आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे G२०परिषदेच्या निमित्ताने का होईना, छत्रपती संभाजीनगरकरांना आपलेच शहर इतके सुंदर वाटू लागले की नागरिकांनी अक्षरशः रस्त्यांवर सेल्फी, फोटो काढण्यासाठी गर्दी केली. याला कारणही असेच, पुर्वीचे औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात जी कामे झाली नाहीत, ती या G२०परिषदेच्या निमित्ताने शहरात झाली. त्यामुळे अशीही कामे आपल्या शहरात होऊ शकतात हे शहरवासीयांनी प्रत्यक्ष अनुभवले. G२०परिषदे मुळे छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक वारसा साता समुद्रापार जाणार हे नक्की असले तरी यामुळे अवघ्या शहराचा कायापालट झाला हेही तितकेच खरंय. आपला देश 'वसुधैव कुटंबकम' या वचनाचे जसे पालन करतो तसेच 'अतिथी देव भव:' या वाक्यासही जागतो. पाहुण्यांसाठी केलेला हा अट्टाहास खरं तर आपल्या भौतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा पाया आहे हे ही तितकंच शाश्वत सत्य आहे. म्हणूनच ते शाश्वत सत्य टिकवून ठेवणं हे छञपती संभाजीनगर वासियांचं आद्य कर्तव्य आहे ‌. म्हणूनच आता छत्रपती संभाजीनगरच्या सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन झालेला शाश्वत विकास  अबाधित ठेवला म्हणजे मिळवलं. 

शहराचे नाव बदलल्याप्रमाणे शहरातील नागरिकांमध्येही बदल झाला म्हणजे G२० छत्रपती संभाजीनगरला पावली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. पाहुणे आलेले असतात तेव्हा घरातले सगळेच गुणी वागतात पण पाहुणे गेले की खरे गुण बाहेर येतात आणि प्रशासनाने नागरिकांसाठी केलेला हा विकास केव्हा पायदळी तुडविला जातो याचे भानही नागरिकांस उरत नाही. म्हणजे आपले असे. केलं नाही तिकडून बोल लावावे आणि केलं तर तिकडूनही बोल लावून आपणच त्याची राख रांगोळी करावी आणि वरतून आपलीच मक्तेदारी, प्रशासनाला सातत्य राखण्यात अपयश आले. विकास हा सहकार्यातून आणि दोन्ही बाजूने साकारता येतो. त्यांनी मेहनत केली आपण तो टिकवून धरावा एवढंसं साधं गणित आपल्याला बस उमगावं. म्हणजे कोट्यावधींच्या खर्चातून साकारलेले नवे नाव घेऊन नव्याने उभे राहिलेले हे 'छञपती संभाजीनगर' जगासमोर आपल्या देशाच्या शिरपेचातील मानाचा तुरा असेल. या तुऱ्याला धक्का लागेल असे कुठेलेही कार्य शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या हातून घडणार नाही याची आजपासून आपण सगळे मिळून काळजी घेऊयात आणि जगभर‌ खाञीलायक सांगूयात आमच्या संभाजीनगरचं ऐतिहासिक नव्या पेहरावातील दिमाखदार वैभव पाहण्यासाठी एकदा येऊन तर बघा! कारण प्रत्येक पाहुण्याचं इथे तितक्याच आपुलकीने स्वागत होईल जितक्या आपुलकीने G२० परिषदेचे झाले. 

तर मग नक्की भेट द्या  छञपती संभाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीला व एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार व्हा. कारण तुम्ही अनुभवलेली इथली प्रत्येक वास्तू आता नव्याने तुमच्याशी हितगुज करेल आणि G२० परिषदेचे पडसाद तुम्हाला त्यावर नक्कीच दिसतील. शेवटी नव्याचा श्रृगांर हा जास्त मनमोहक आणि व्यापक दृष्टीकोनाचा असतो, यावर आज शिक्कामोर्तब झाला हे माञ खरं. G२० चा इथला सहवास छञपती संभाजीनगरासाठी नवनव्या वाटांचा धनी असावा हीच आशा बाळगून थांबते!


                         🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

'स्त्री "मुक्ती " दिन' खरंच?

      'स्त्री "मुक्ती " दिन' खरंच? ३ जानेवारी १८३१ ही तारीख संपूर्ण भारतवर्षात अजरामर ठरली. कारणही तसेच. त्या तारखेला जन्मलेली एक स्ञी संपुर्ण स्ञीयांच्या स्ञीमुक्तीचा महामार्ग निर्माण करणारी क्रांतीज्योती झाली. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले'‌. अंधकार हा शब्द स्ञी च्या आयुष्याला असा चिकटलेला होता की, चुल आणि मुल यापलिकडे‌ या समाजात ती शुन्यात गणली जायची. जातीचाच विचार केला तर त्यावेळच्या जातीव्यवस्थेतील सर्वात उच्च जातीच्या स्ञीचेही हात दगडाखालीच होते. शिक्षण हा शब्द थोडा जरी तिच्या कानी असला तरीही त्याची कवाडं कुठे असतात? कसे उघडतात? याचा दूरपर्यंत थांगपत्ताही तिला लागला नसावा. मग इथेच ही अशी परिस्थिती तर बाकी स्ञियांचे आयुष्य हे अजून हातोटीचे. गावकुसाबाहेर ठेवल्या जाणाऱ्या अस्पृश्यांना साधी भाकरी मिळविण्यासाठीसुध्दा "जोहार माय बाप जोहार" म्हणून भीक मागावे लागत असे. जिथे पुरुषांना शिक्षणासाठी कष्ट उपसावे लागलेत तिथे त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या स्ञियांचे तर शिक्षणाच्या महायज्ञात नामोनिशाण असणं ही अशक्य बाब होती पण याच अशक्यप्राय गोष्टीला शक्यतेचा कळस दाखविला तो त्यांच्यातल्याच एक धाडसी साविञीने. 

आज अजुनही सौम्य प्रमाणात का होईना स्ञियांना आपल्या स्व-अस्तित्वासाठी विविध समस्यांना सामोरे जात लढावे लागते. काळ बदलला माञ स्ञी ची प्रतिमा आजही समाजातील विशिष्ट घटकांच्या नजरेतून विषमच मानली जाते. त्याचा ञास त्यांना होतोच पण त्यावेळेस तो विरोध‌ ऐवढा तीव्र होता की, स्ञी ने माजघराची चौकटही ओलांडू नये. या अशाही बिकट परिस्थितीत ज्योतिरांवाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी स्वत: शिक्षणाचे धडे घेत समाजाच्या नियमांना फाट्यावर मारत मुलींना घराच्या उंबरठ्यातून मुक्त केले व लेखणीच्या बंधनात अडकवले. काय धाडस म्हणावं या धिटाईचं. म्हणूनच आज त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन तसेच महिला मुक्तीदिन म्हणून साजरी केली जाते. 

साविञीबाईंनी हे कार्य सुरु करुन आज शतकवरही उलटून गेले. शिक्षणाचा लढा यशस्वी झाला. त्याचे अफाट स्वरूप आपण सध्याच्या शाळा- महाविद्यालयात मुलींची पटसंख्या बघून प्रत्यक्षदर्शी अनुभवतोय. परंतू अजूनही मला एक प्रश्न पडतो. खरच आजची स्ञी मुक्त आहे का? संविधानाने जर तिला स्वातंञ्य दिलं असलं,  तिने तिच्या याच स्वातंञ्याच्या अभिव्यक्तीच्या जोरावर दाही दिशांत उच्चपदावर आपल्या यशाचा इंद्रधनुष्य पसरवला असला तरीही ती आज स्वतंत्र आहे का? पर्यायाने या समाजाने तिला स्वतंञता दिलीय का? रोज मला हा प्रश्न पडतो? का? 'माहित नाही'. हेच उत्तर इतके दिवस माझी मनस्थिती मला देत होती. आज माञ माझं मन मला  स्पष्ट उत्तर जरी देत नसेल तरी या प्रश्नाकडे बघण्याचा एक विचारशील दृष्टोकोन माञ माझ्यात नक्कीच निर्माण करतो. अनेक घटनांचा माझ्या मनावरचा परिणाम म्हणजे हे प्रश्न एवढं नक्की उमगलं.

 खूप गांभीर्याने विचार केला. हे जग ना, फार पुढे गेलंय पण काही रुढी, परंपरा, अनिष्ट चालीरीतींशी इतकं जखडून बसलंय ना की, आता त्याचाही श्वास कोंडतोय माञ मुक्तीची वाट दिसतच नाही. यात मुख्यत्वेकरून स्ञियांचीच जखडण होतांना दिसते. कारण आजची स्ञी म्हणजे चुल आणि मुल च्या पलिकडे गेली असली तरी चुल आणि मुल सांभाळून बाहेरचं जग आणि त्यात सांसारिक जवाबदाऱ्या हे सगळं करणार फक्त स्ञी आणि तेही एकहाती. हे विदारक असलं तरी अजूनही वास्तव आहे याचं माञ वाईट वाटतं. स्ञीसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा असला तरी अहवाल काढून बघा. ग्रामीण भागात किती प्रमाणात स्ञिया १० वी नंतर पुढे शिक्षण घेतात. घेतलं तरी कितींना घरी बसून घ्यावं लागतं आणि किती मुलींचे लग्न बस लिहिता वाचता येतं नं; झालं संपलं. शेवटी स्ञिचीच जात ती, आज ना उद्या लग्न करुन संसारच थाटणार, मग कशाला लागतया शिक्षण? या निकषावर चक्र चालतं. दुसरीकडे लग्नानंतरही स्ञियांमध्ये शिक्षणाची जाणीव जागृत होऊन त्या शिक्षण घेता आहेत ही गोष्ट या गोष्टीवर पांघरुण घालते. पण मुद्दा स्वातंञ्याचा येतो. सावित्रीबाईंनी स्ञीमुक्तीचा लढा दिला तो फक्त शिक्षणापुरता नाही तर त्या शिक्षणातून जाणीव निर्माण होऊन स्ञीला स्व-स्वातंञ्याचं महत्व उमगावं यासाठी सुध्दा. परंतू आजही माझी स्ञी स्वत:मधलं सामर्थ्य ओळखू शकली नाही ये. स्वातंञ्य म्हणजे बाहेर फिरणं नसतं तर स्वातंञ्य समान विचारात असतं. स्वातंञ्य मत मांडण्यात असतं. स्वातंञ्य कुटूंबातही असतं पण स्ञीने स्वत:ला इतकं संवेदनशील आणि दुबळं करुन ठेवलंय नं की, ती स्वतः कितीही ञासातून गेली तरी चालेल पण तिचे कुटूंब, नातेवाईक दुखावले जायला नको.

 लग्न होणं म्हणजे खरंतर नियमाच्या गराड्यात अडकनं नसतं पण आज तोच अर्थ काढला जातो. आईबापाकडून दुसऱ्यांच्या घरात ती मुलगी पाऊल टाकत असते पण इकडे रुबाब दाखविणारी पोर माञ आईबाप समोर असले तरी त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलायलाही सासू-सासरे, नवरा यांची अनुमती घेते. मी म्हणते का असं असावं. तिने तिचं व्यक्तिस्वातंत्र्य बाजूला ठेवून का हे हात पाय नसलेले नियम पाळावेत. ती काय मोलकरीण आहे की बंदिस्त गुन्हेगार? पण हा प्रश्न त्या शोषित स्ञीला पडतच नाही. मुकाट्याने एखादी शिकलेली मुलगीही सासरची मंडळी म्हणून हे नियम पाळत असते. परंपरागत चालत आलेल्या कुटूंबाच्या नियमात बसून सुनेने वागावं. यालाच खरं तर कौटूंबिक भाषेत स्वातंत्र्य म्हणतात. अजून एका वाक्याची मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते. मुलीला उत्तम स्थळ आले. मुलगा शिकलेला तर आहेच त्याचबरोबर घरी इतकी गडगंज संपत्ती आहे हे की, मुलीच्या पायाशी सुख लोळण घालेल. ही बातमी साऱ्या गावात हर्षानं सांगताना आईवडील म्हणतात, मुलाकडची मंडळी म्हटली की, आमच्याकडे तुमच्या मुलीला  घराबाहेरही पडण्याची गरज नाही. तिला सगळं हातात मिळेल. आमची  मुलगी घरात राज्य करेल. हे वाक्य म्हणतांना ते आनंदी होतात. माञ एका वडीलांचा पिता म्हणून, एक पुरुष म्हणून आणि एक स्ञी म्हणूनही या वाक्याची लाज वाटावी. जर त्या मुलीला शिकून सवरुनही फक्त गडगंज श्रीमंती आहे म्हणून  सगळी सुखं घरातच मिळणार असतील तर त्या सुखाचं मोलच काय; अडकणार ती चौकटी आतच.अपेक्षा काय फक्त मुलीनी सगळा संसार सांभाळून घ्यावा. त्याउपर शिकलेल्या मुलाला त्याच्या तोलामापाचा हुंडा द्यावा लागतो हा विषयच वेगळा. हुंडा देतांना आणि घेतांना माञ शिक्षणाच्या बदल्यात शिक्षण बघितलं जात नाही. परिणामी हा विचारही कोणाच्या डोक्यात येत नाही. मग मुलगी उच्चशिक्षित असली तरी फरक काय पडतो. यात काही नवल नाही. कारण आपल्याकडे असा दुरगामी विचार कुणी रुजवलाच नाही. कोणी रुजवायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यावर बोटच उगारले जातात. मग अगदी स्पष्टोक्तीने सांगायचं झालं तर एवढं शिकून सवरुन तुम्ही घरातच राहिला आहात आणि घरातील सगळी जवाबदारी सांभाळता आहात तर तुम्ही मोलकरीण म्हणूनच तिथे जगता आहात. मग एवढं सगळं बारा महिने अठरा काळ करून मिळतंय काय तर दोन वेळचं खायला जेवण आणि खर्चासाठी चार पैसे. त्यातही हिशोब विचारला जाणार. काय अर्थ त्या चार भिंतीला. पैसा, श्रीमंती सर्वस्व नसतं तर‌ स्व-स्वातंञ्य आणि समाधान महत्वाचं असतं माञ ज्या एका वाक्यासाठी आपल्याला आनंद मिळतो तो आनंद म्हणजे पुढे चालून आपल्यासाठी उबंरठ्यात अडकलेले पाऊल होतो. याची तसूभरही जाणीव सुरुवातीला आपल्याला होत नाही. 

विषय जवाबदारीचा नाही तर मोकळीकतेचा, विचारसरणीचा आणि लादलेल्या विषमतेतील अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा आहे. म्हणजे आजही जर कौटूंबिक पातळीवर, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर स्ञीच्या मागचा "अबला नारी" हा शिक्का अधिकच घट्ट होत असेल तर मग पुनश्च साविञीबाईंना नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. आज जेव्हा एखादा नवरा लग्न झाल्यावरही आपल्या पत्नीवर संशय ठेवून तिला एकटीने बाहेर जाण्यास, मिञमैञिणींशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करतो तेव्हा तो नियम त्याच्यासाठीही वर्ज्य असावा असं तिला वाटतही नाही. एक प्रसंग असा की, रोज नोकरीवर जाणारा नवरा आपल्या मुलांना शाळेत सोडवून रोज बाहेर जातांना घराला बाहेरुन टाळा ठोकून जातो. तोंड दाबून ती बुक्क्याचा मार सहन करते. कसलीही चुक नसतांना. काय म्हणावं अशा विकृतीला तेही २१ व्या शतकात. हे ऐकतांना जितकं वाईट वाटतं त्यापेक्षाही भयकंर हे वास्तव आहे. त्या महिलेची या गोष्टी सहन करण्याची सहनशील वृत्ती स्वत: मध्ये अंगिकारावी की तिचा खेद व्यक्त करावा. याचं उत्तर कोणीतरी द्यावं. अंगावर काटा येतो हे असं वास्तव ऐकतांना.‌ पण दुर्दैवाने या काट्याचं कुंपण तोडण्याची बुध्दी माञ त्या स्ञियांना होत नाही. कारण इतकी वर्ष त्या काट्यांचे रुतणे आणि त्यांच करुप होऊन त्यानिशी वावरणं त्यांना कधीच चुकीचंच वाटलं नाही. रीतच ती म्हणून मलम लावून आभासी स्वातंञ्याच्या पारतंञ्यात त्या हसत-हसत आयुष्य जगत आहेत. मी माञ गुरफटलेय त्यांच्याच प्रश्नात. 

सरकारी हुद्यावर खुर्चीत  बसली असती का?
फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?

हे गाणं आज जोरात वाजतंय पण या मुली ज्यांच्यामुळे शिकल्या त्यांनी सगळ्या बंधनांना झुगारुन आपली वाट घडवली. शेणाच्या गोळ्यांनी साडीवर एकेका मुलीच्या जीवन उध्दाराच्या फुलांचे नक्षी त्यांनी कोरले. दगडाचे वार पाटीवर खडूने ज्ञान गिरवून ढालीप्रमाणे झेलून परतावून लावलेत. हे सगळं त्यांनी पारतंञ्याच्या काळात केलं. 'स्व'ची जाणीव करुन घेतली. त्याही स्वार्थी झाल्या पण का? तर स्वत:ला घडवून दुसऱ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी. मग आज तर त्या मानाने सगळं सोप्पं आहे. मुख्य म्हणजे संविधानाचा आधार पाठीशी आहे. अधिकार माणसांनी, समाजाने नाही तर संविधानाने दिलेत ते सर्वांसाठी समान असूनही आज आपण स्ञी म्हणून वेगळेच नियम का पाळतो? कोणताही निर्णय घेण्याआधी सगळ्यांचीच गरज नसतांना अनुमती का घ्यावी लागते? असे प्रश्न विचारा कधीतरी स्वत:ला. आहे नं मी ही माणूस? सृष्टीची निर्माती मीच नं? मग मी का? नाही स्वत:साठी, स्वत:च्या आरोग्यासाठी थोडं स्वार्थी व्हावं. का? नाही मी कधीतरी  स्वत: सोबतच कोणालाही नं सांगता वाटेल तिथे जाऊन वेळ घालवावा? आज खरच समाजाच्या आतच्या या अक्राळविक्राळ विचारप्रवाहात अडकलेल्या लोकांना खऱ्या प्रवाहात आणण्याची गरज आहे जो साविञीबाईंनी स्ञियांसाठी वाहता केला. त्यात पडलेले बांध जेव्हा तुटतील ना तेव्हा साविञीबाईंसारख्या अनेक स्ञिया सक्षमपणे  जगाचा डोलारा पुढे नेण्यात मोकळीकतेने हातभार लावतील. 

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

 सावित्रीबाईंनी बाईंचे हे उदगार आज चौकटी आत नसलेले नियमही डोळ्यांवर झापड टाकून पाळणाऱ्या स्ञियांना व विषमतेच्या दृष्टचक्रात अडकून राहिलेल्या समाजवर्गाला तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच एक स्ञी जेव्हा संपूर्ण स्ञी जातीसाठी मागे पुढे न पाहता उभी राहिली तेव्हा तिने कुठल्याही विशिष्ट समाजासाठी नव्हे तर फक्त स्ञी जातीसाठी उभी ठाकली. विशेषतः त्यांच्यासाठी तेव्हाची ती स्ञी जात म्हणजे अजात होती. म्हणजे कुठलाही जातीभेद त्यांनी मान्यच केला नाही. म्हणून त्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका "क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले" म्हणून अजरामर झाल्या. आज प्रत्येक घरात शिक्षित सावित्री आहे ती याच साविञीमुळे. लक्षात ठेवा तुमची मुलगी ही तुमचं प्रतिरुप असते. तुम्ही तिला जे दाखवाल त्याच विचारांचा पगडा तिच्यावर असेल. त्या मातीच्या गोळ्याला स्व-स्वातंञ्याचा आकार‌ द्या तुम्हीही तसंच जगा म्हणजे तिचं‌ जगणं सोहळा असेल. मग ती स्वच्छंदी होऊन, अजात होऊन पारदर्शकरित्या हे जग बघेल. सगळं सांभाळेल‌ पण स्वत:ला नं गमावता. त्या दिवशी माञ हे विश्व कधीही मागे वळून बघणार‌ नाही कारण त्याचं सारथ्य करणारा स्ञी वर्ग आणि पुरुषवर्ग एका समान विचारधारेवर समन्वय साधणारा असणार...
 शेवटी फक्त इतकेच मनापासून सांगू इच्छिते की, साविञीबाई हे नाव फक्त आठवणीत न ठेवता स्ञी म्हणून पुनश्च विचाराने जन्म देऊन प्रत्येक स्ञीच्या आचरणातही जन्म द्यायला हवा. हेच साविञीबाईंना खरे अभिवादन ठरेल!

                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

पुरुष सत्ताक समाज???

         
               पुरुष सत्ताक समाज???

लेखाची सुरुवात कशी करु मला काही उमजेना, काट्याकुट्यातल्या  पुरुषाला  जाणणं मला काही समजेना...!
अशाच भावना असतात ना आपल्या पुरुषांविषयी. पुरुषांचं जीवन हे काट्याला समर्पक आहे. काटा नेहमीच आडवळणात वाट अडवतो, लक्ष नसलं तर‌ तो कचकन टोचतो. माञ, पुढे पाहिलं तर त्या काट्याचं टोचणं काही क्षण झोंबतं, कारण त्याने पुढच्या संकटापासून आपल्याला सावध केलेले असते. काट्याच्या रस्त्यावर काट्यांचेही फुलं करणारे हात आपल्याला अलगद रस्ता पार करवून देतात अन् स्वत: माञ‌ तो होतो काट्याकुट्यातला पुरुष आपल्याचसाठी! आजच्या जगातलं वातावरण इतकं गढूळ झालंय ना की, येथे होणारे प्रदूषित वातावरण हे मानवाच्या अविचारीपणाच्या, तर्कटी स्वभावाच्या आणि द्वैषभावनेच्या वृत्तीमुळे आहे. या प्रदूषणाने डोळे इतके अंधारले आहेत ना की, त्यामुळे नेमकं चांगलं काय अन् वाईट काय ही समजण्याची प्रवृत्तीच लोकांमध्ये उरलेली नाही. ते म्हणतात ना, गव्हासोबत किडेही रगडले जातात, तश्यातलंच हे. 

पुरुष जात म्हणजे वाईटच, पुरुष जात म्हणजे वर्चस्व आणि पुरुष जात म्हणजेच जबरदस्ती साधारण असा समजच सर्वश्रूत आहे. यामुळे त्यांना समजून घेण्याआधीच त्यांचा निकाल लावून आपण मोकळं होऊन जातो. परंतू नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत तशाच या सृष्टीचक्राच्या दोन बाजू म्हणजे स्ञी आणि पुरुष. या जगाच्या पाठीवर स्ञी आणि पुरुष असे दोन‌ मानवरुप आहेत. पुरुष ही त्यातील जमेची बाजू. सगळं सांभाळूनही अलिप्त असणारा व्यक्ती म्हणजे पुरुष. आपण सहज बोलून जातो; ती काय त्यांची जवाबदारी होती. तो घरातला कर्ता पुरुष, तो नाही सांभाळणार तर मग काय गाव लोकं येतील? बस सपलं. असे दुषणं देत पुरुषाच्या मेहनतीला जवाबदारीचं ओझं लावतो अन् साधे त्याला दोन धीराचे शब्दही देत नाहीत. 

स्ञीला जसे जन्मापासून कष्टच असतात तेच कष्ट अगदी पुरुषाच्याही मार्गात‌आहेच की, छोट्याशा वयात आईला घरातल्या कर्त्यासारखं दळणाचा डबा आणण्यापासून मदत करत तो जवाबदारीच्या संस्कारात घडतो. पुढे तोच आई बाबांचा आधार‌ ते भाऊ बनून आपल्या बहिणीचा पाठीराखा होतो. गृहस्थाश्रमात प्रवेश करतांना आपल्या कुटूंबासह आपल्या सहचारिणीच्या कुटूंबाचीही जवाबदारी स्वीकारुन त्यासाठी मेहनतीची कसोटी लावणारा तो नवरा, जावई अशा अनेक नात्यांच्या बंधनांचा हसतमुखाने स्वीकार करतो. पुरुष म्हणजे नारळासारखा टणक आणि आतून नरम असा उल्लेखला जातो. माञ यात मला पुर्णतः विरोधाभास जाणवतो. खरतर पुरुषांपेक्षा हळवं या जगात कोणीच नाही. अगदी स्ञीसुध्दा याबाबतीत मागे पडते. हे नुसतं वाक्य नाही तर ही अनेक सर्वेक्षणातून  समोर आलेली बाब आहे. तसेच आपल्यातली निरीक्षणक्षमताही आपल्याला याचा ठाव देते. फक्त फरक एवढाच की, तो आतून रडतो. तो आतून तुटतो, तोही थकतो माञ तो ते सारं काही लपवून ठेवतो आपल्या जवाबादारीच्या डोंगरापल्याड. कसा ठाव लागेल सांगा? 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्ञीशक्ती असते माञ माझ्या मते प्रत्येक स्त्रीच्या यशस्वी कारकिर्दीच्या पुढे पुरुष असतो असं म्हटंल तरी वावगं ठरणार नाही. कारण लग्नाआधी एक बाप म्हणून तो आपल्या मुलीला शिक्षणाची वाट दाखवतो. मिञ म्हणून  तो अडचणीत कामी येतो. प्रियकर बनून हट्टही पुरवितो आणि नवरा होऊन तोआयुष्यभराच्या सोबतीत पावलोपावली हातात हात घेऊन आयुष्याची सफर घडवून आणतो. थोडक्यात जी पुरुषीवृत्ती वाईट मार्गाला जावून स्ञियांच्या चारिञ्याची विटंबना करते त्याच विटबंना करणाऱ्यांचे हात काढून हातात देणाराही सत्पुरुष असतो. हे आपण विसरतोच. एक शरीराचा एक भाग निस्तेज असला तरी दुसरा तेजोमय असतोच तसंच पुरुषजातीचं. अज्ञानाच्या अंधकारात स्ञियांना शिक्षणाच्या प्रकाशात चुलीच्या धुरापलीकडेही जग दाखवलं ते पुरुषांनीच. अगदीच छञपतींच्या काळात शुरवीर रणरागिनींनी योध्दाभ्यासातून रणांगण गाजवले तेही पुरूषांमुळेच. 

पुरुष म्हणजे जळत्या निखाऱ्यावर चालणारा युग पुरुषच. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजेच खरा पुरुषार्थ. पुरूष हा या पुरुषार्थाच्या या पायऱ्यांचे पालन करत असतो. धर्म म्हणजे जात नव्हे तर कर्तव्य. बालवयात बुध्दीचे ग्रहण करणे, विद्याप्राप्तीसाठी श्रम घेणे व कुठल्या स्ञी वर वाईट नजर न टाकणे तसेच अंगात ताकद असतांनाही स्वत:वर ताबा ठेवून परिस्थिती समजून घेऊन मार्ग काढणे हा पुरुषार्थाचा परमधर्म आहे. अर्थ म्हणजे पैसा. अन्न, वस्ञ आणि निवारा या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी व कुटूंबाला सुखी ठेवण्यासाठी सरळमार्गाने अर्थार्जन करणे हे पुरुषार्थाचे दुसरे लक्षण. तसेच अर्थ म्हणजे पैसा कमावणे होत असले तरी नाती असेल विद्या असेल ते  कमावून त्यांना जपणं हे ही याच पुरुषार्थात मोडते. काम म्हणजे उत्पत्ती अर्थात निर्मिती. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या जगाचे चक्र चालू राहण्यासाठी आपल्या कुटूंबाची वंशवेल वाढविणे व त्याचे संगोपन करणे हे पुरूषाचे आद्य कर्तव्य मानले जाते. या सगळ्यांचा शेवट म्हणजे मोक्ष अर्था‌त मृत्यू. या जगाचं एकमेव सत्य म्हणजे जन्म आणि मृत्यू. स्ञीत्व आणि पुरुषत्व हे आपल्या कर्तव्याच्या परिसिमा गाठल्यानंतर मोक्षाच्या दिशेने प्रस्थान करतात. हा पुरुषार्थाचा चारचाकी रथ हाकणारा  पुरूष खरच आयुष्यभर गुरफटलेला असतो तो आपल्या कर्तव्याच्या गर्तेत. हालाकीच्या परिस्थितीतही संध्याकाळी भाकरीसाठी ज्वारी आणतो. नसतांनाही पैसे कोठून आणतो? कळत नाही पण आणतो. मुलीचं लग्न हुंडा देत दणक्यात करतो खरं पण; नंतर  पोटाला चिमटा देत कर्ज फेडतो. शेतात पिक बहरतांना पाहतो, लेकरांना आनंदात पाहतो, अन् पिक कोलमडतांना स्वत: कोलमडतो पण तरीही लेकरांचा आनंद हरवू देत नाही तेव्हा तो शेतकरी बापही पुरुषच असतो. शहरात जावून नोकरी करतो, तिथे भलेही फुटपाथवर राहतो अन् दर महिन्याला घरी खुशाली सांगत पैसे पाठवतो तेव्हा तो पुरुषच असतो. अशा असंख्य छटा पुरुषांच्या आहेत. शेवटी काय तर स्ञिया रडून मोकळं होतात. पुरुषही रडतात, त्यांच्याही भावनांचा बांध फुटतो. माञ ते गांभीर्याने परिस्थिती हाताळतात. सगळं अगदी एकेरी सांभाळून घेतात. कारण पुरुष हे एक तत्व आहे. पुरुष भरलेल्या डोळ्यांमधील अश्रू ढासळत नाही तर ते पिऊन घेत खंबीरता दाखवतो. म्हणजे काय तर त्या झालेल्या अश्रुंचे तो विष पितो आणि रोज थोडं थोडं मरत जगत असतो. जगण्यातलं हे विष तो पितो‌ म्हणूनच बाकीच्यांना अमृताचा प्याला रिचवता येतो आणि याच विषातून अमृत वेगळे करतांना तो माञ एक दिवस विषामुळे धारातीर्थी पडतो. 

हे पुरुषांचं एकूणच जगणं असतं. मानसिकदृष्ट्या, शारिरीकदृष्ट्या, बौध्दिकदृष्टीकोनातून स्ञी-पुरुषांना समान पातळीवरच संघर्ष करावा लागतो पण; पुरुषांना आपण कधी समजूनच घेतलं नाही. कर्तव्य म्हणून आणि आपला कर्ताधर्ता म्हणून पुरुषांकडे बघण्याआधी एक माणूस म्हणून त्याच्या मनात शिरा. जेव्हा तो ढासळतो पण दाखवत नाही तेव्हा समजून घेऊन कधीतरी परिस्थिती बदलेल, असा आधार द्या. मग बघा न समजणारा पुरुषही आपले अंतरंग उलगडत कर्तव्यांपलीकडे जावून जगेल. 

आज जागतिक पुरुष दिनानिमित्त समस्त पुरुषवर्गाला  पुरुषदिनाच्या शुभेच्छा. गमतीत नेहमी म्हटलं जातं, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. पण; आज म्हणेल आणि मान्यही करेल जसं आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात ना तसं तुमची खंबीर साथ आहे म्हणून आम्ही आहोत आणि म्हणूनच या विश्वात झालेले सर्व बदल आहेत. पुरुषातल्या खेळकर मुलाला, मुलातल्या भावाला, मिञाला, प्रियकराला, नवऱ्याला अन् नवऱ्यातल्या बापाला व बापातल्या आजोबाला शतश्: नमन........!

        🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️

गुरुवार, ७ जुलै, २०२२

☔⛈️मन पाऊस पाऊस झाले...☔⛈️


          ☔⛈️मन पाऊस पाऊस झाले...☔⛈️

हा पाऊस मजला हरवून जातो पहिल्या वहिल्या भेटी
कोसळणाऱ्या धारांमधुनी जुळती शतजन्माच्या गाठी

मन पाऊस पाऊस झाले
मन तरंग पाण्यावरी न्हाले

माहित नाही काय ती जादू...पण पाऊस आणि माझं कनेक्शन काही वेगळंच भासतं मला. प्रत्येक पावसाची माझ्यासोबतची गाठभेट म्हणजे एक न्यारीच तऱ्हा.. रिमझिम पावसाने सुरुवात झालेल्या सरी मग हलकेच माझ्या मनालाही पावसाकडे चुंबकासारखं खेचतात... मीही ओढावले जाते नकळतच त्या बरसबरस बरसाणाऱ्या कोसळत्या पावसाच्या रागात. हळूच एक पाऊल टाकताच पहिल्या थेंबाच्या स्पर्शानेच जरा शहारायला होतं...माहित नाही का? पण तोही त्याच्या मुक्त बरसण्यातून माझ्याशी नुसताच बडबडत असतो. मीही एकून घेते. अलगद त्या थंड्यागार वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन पावसाच्या रागात मग्न होण्यासाठी सरसावते. आणि मनाच्या पटलावर उमटणाऱ्या रेखाटनात गुंग होतांना सभोवतालचा परिसर माञ माझ्यासाठी घुसर व्हायला लागतो. 
मग त्या पावसाच्या सरीत  बेधुंद बरसणारा धारांचा पाऊस आणि एकटीच मी....!
शांत तो एकांत, सोबतीला खुला आसमंत,
 निवांत क्षण आणि  आजूबाजूची निसर्गाची हिरवळ. त्यातच येणारा पावसाचा धाड धाड आवाज, 
डोलणाऱ्या  झाडांचा आपलाच एक हर्षोल्लास आणि त्या मनाच्या वलयात  निर्माण झालेल्या एकांताच्या रस्त्यात चेहऱ्यावर ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांनी शहाळलेली मी.......
बस्स! एक संवाद सुरू होतो...ना कोणाला समजणाऱ्या, ना कोणाला उमजणाऱ्या माझ्या मनाच्या हिरवळीत तो पाऊस स्थिरावतो. अनेक आठवणींच्या सरीत स्वत:लाच चिंब भिजवून घेतो. 
मनही माझेच आणि तो पाऊसही माझाच...

 उलट प्रश्नांची मग भरते जरा सभा. माझ्याच प्रश्नाची उत्तरे सापडण्यासाठी तो पाऊस राहतो तटस्थ उभा. प्रेम, मैञी माया, जीव, आयुष्य या सगळ्याच एकञित भावनांची माझ्यातलीच जाणीव मला करुन देण्यासाठी तोच पाऊस येतो. प्रत्येक वेळी येतो तेव्हा जरा वेगळा भासतो. मी माञ गुंतत जाते त्याच्या एक-एक थेंबात. हरवून घेते स्वत:ला त्याच्याच आवाजात...ना काळ न वेळेचे भान. असं वाटतं बस चिंब भिजावं आणि तसेच हात पसरवून गुज करावं माझ्या हक्काच्या पावसासोबत...
आभाळात कडाडणाऱ्या चमकदार विजांसोबत
अन् पावसाच्या प्रेमातून हिरवळ चढलेल्या त्या हिरवीशाल‌ पांघरलेल्या, नव्या नवरीचे रुप दाखवणाऱ्या लाजऱ्या बोजऱ्या निसर्गासोबत. या एकांतातल्याच संवादातून मग नकळत माझी कविता होते. अनेक पुसट  प्रश्नांच्या स्पष्ट दिसणाऱ्या उत्तरातून माझ्यातील नव्या भावनांची मलाच जाणीव व्हायला लागते. मग काय बरोबर, काय चूक या कसल्यास गोष्टींची तेव्हा तमा नसते. शेवटी मनच ते सैरावैरा पळणारे त्या पावसाच्या सोबतीने शांत होते. या सगळ्याच जाणिवेतून चेहऱ्यावर स्मितहास्य खुलते, मी माझ्यातच गुंग  होऊन माझी मलाच खुळी भासते. कवितेच्या ओळी मग झरझर येतात अन् पाऊस शमण्याच्या आत त्या पावसाचाच कागद होऊन ती  कविता चिंब भिजते. पावसाळा येतो, पावसाळा जातो पण मी माञ जेव्हा भिजते तेव्हा त्या पावसात शहारते. अंगावर आलेल्या काट्यांतून मनाच्या घट्ट कोपऱ्यात जावून सामावते. हे कधीतरीच होतं जेव्हा तो पाऊस बरसतो अन् त्या पावसात मी त्याची होऊन एकांतात मनाचा कोपरा शोधते. 
तो पाऊस थांबतो पण मी माञ तिथेच असते काही क्षण त्यातच अडकलेली. 
पावसाचे थेंब ओसरतांना माझ्याच मनाला सावरतांना..
तो भास आभासांचा खेळ खेळत सावरते त्या पावसातूंन अन् निघते मग त्या वाटेवरून एका कवितेचं देणं घेऊन... एक अलौकिक जाणिवेचं देणं...........
        
                            ‌‌🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

रविवार, ५ जून, २०२२

कचऱ्यात माखवलेला ऐतिहासिक वारसा......



काल मी आणि माझी मैञिण रसिका रोजच्या वळणापेक्षा थोडी आडवाट काढून विद्यापीठाकडे पानचक्की रस्त्याने जात होतो. घाटी पासून पानचक्कीचा रस्ता हा खरच आडवाटेसारखा चाळण झालेला आहे. मग काय, गाडीसोबत आम्हीही उड्या मारत मारत त्या रस्त्यावरुन जात होतो. रसिकाच्या भाषेत ये चल गं तु  एडवेंचर्स राईडची मजा घेत जाऊयात. मुळातच आम्ही पञकारितेच्या विद्यार्थिनी असल्याकारणाने बोलणार तरी दुसरं काय नं, आपोआपच आमच्या विचारांची देवाणघेवाण पञकाराच्याच नजरेतनं सुरु होते. 

ऐतिहासिक दरवाज्यांच्या शहरातील तो मोडकळीस आलेला त्यातला एक वारसा दिसला. अत्यंत संथ गतीने त्याचे पुनरुज्जीवन सुरू तर झाले आहे ,परंतू इतिहासाची ती पाऊलखुण नव्या रंगात येईल माञ, तो आतापर्यत जागा असणारा इतिहास पुढेही जागा राहील का ? हा प्रश्न आमच्या चर्चेचा पहिला भाग. सहजच ती म्हणते अगं तु पानचक्की बघितली आहेस का? म्हटलं नाही गं. एकलंय माञ भरपूर. आणि तिने चल तुला पानचक्की दाखवते म्हणत गाडीला ब्रेक लावला. आमचा दोघींचा संवाद ऐकून टिकीट घराचे काकाही आम्हाला दरवाज्याबद्दल माहिती सांगायला लागले. पोरींनो, हा दरवाजा मलिक अंबरच्या काकाच्या नावाने बांधला गेला. त्याकाळी चुना आणि त्यात समाविष्ट केलेल्या वेगवेगळ्या मिश्रणाच्या लगद्यातून हा दरवाजा उभा राहिला. म्हणून इतक्या वर्षांचे ऊन-पावसाळे त्याने सहज झेलले. मोठ्या प्रवेशद्वारातून आत जात मलिक अंबरची नहर असा उदघोष करत रसिकाने मला त्या जागेची ओळख करुन दिली. 
पण पण पण...बोलता बोलताच त्या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास ऐकत नहरच्या पानचक्कीच्या बाजूला पोहोचलो आणि त्याच इतिहासाला काळीमा फासत डाग लावणाऱ्या माझ्याच मनुष्यप्राण्याची मला भंयकंर चिड आली. रसिकाचा कॅमेरा सुरु झाला आणि अत्यंत गोड शब्दात तिने तिथले वास्तव दर्शन दाखवत औरंगाबादकरांनाच एक आरसा दाखवला. दृश्य असे की, भल्यामोठ्या त्या पाण्याच्या जलसाठ्यात, जो  जलसाठाच त्या पानचक्कीचे मुळ आहे त्यातच तुम्ही प्लास्टीकच्या बॉटल्स, काहीही खाल्लेला कचरा टाकता आहात? जमतं तरी कसं? ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, शहराची स्मार्ट सिटी करण्यासाठी, ५२ दरवाज्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी बेसुमार‌ पैसा खर्च होत आहे. आंदोलनं ही चालले आहेत. त्यात जर एखादा वारसा अजूनही समृध्द असेल‌ तर‌ त्यालाही पुनरुज्जीवनाच्या रांगेत उभं करणं यात कुठलं तथ्य आलं. त्यातील माशांना खाऊ घालण्याच्या तुमच्या आकर्षणापोटी त्या जीवांचा जीव कोदंट होत आहे. प्लास्टीकच्या तुकड्यातून कित्येक मासे मृत होऊ शकतात. एवढी साधी समज आपल्यात नसण्याइतपत मंद तर आपण नक्कीच नाही. 

आज जागतिक पर्यावरण दिन आणि आदल्या दिवशी ही पानचक्कीची मनाला कुनकुन लावणारी भेट. खरच अशाने पर्यावरण जपलं जाईल का ?हा  प्रश्न सकाळी उठल्या उठल्या कित्येकांचे स्टेटस बघून पडला आणि माझी लेखणी सरसावली ती, हा कल्लोळ शब्दबध्द करायला. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या सोबतच माणसाने पर्यावरणाशी पर्यावरणासम वागणे हा मुलमंञ आचरणात‌ आणणेच पर्यावरण अबाधित राखण्याची गुरुकिल्ली आहे. असो....माझं मन तर लिहून हलकं झालं माञ ऐतिहासिक स्थळी केलेल्या  कचऱ्यातून केव्हा प्रकाश पडेल याची शाश्वती माञ आता देणंच अवघड झालंय. आपण बघायला जाणाऱ्या ठिकाणीच कचरा करुन ती जागा सुशोभित करणे हे‌ ज्यांना पटतंय त्यांनी एकदा परत त्या ठिकाणी जावून स्वत:चं आत्मचिंतन‌ करावं...‌!
त्यातून जर काही चांगलं घडणार असेल‌ तर. जगाला ओरडून सांगायला विसरु नका‌.
बाकीच्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे अखंड जीवसृष्टीचा ऱ्हास एवढंच काय ते डोक्यात‌ घ्या. तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल.
रसिकासोबतची पानचक्कीची पहिली भेट माझ्यासाठी कचराभेट ठरली. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा कचरा बाजूला झालेला असेल‌ या आशेत....

                       🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
 

सोमवार, ७ मार्च, २०२२

💝💝^^^अंजली^^^💝💝

                      💗  "तिचं जग"💗
मुहूर्त जागतिक महिला दिनाचा! तिचं जग हे खास सदर सुरू असतांना माझ्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपण रोज वेगवेगळ्या महिलांच्या विश्वात शिरुन तिच्याशी गुजगोष्टी करतो आहोत. तिची संघर्षातून यशाकडील वाटचाल, तिचं समाजकार्य, तिचं जीवन हे सगळंंच अगदी भारावून टाकणारं आहे. खरतर सगळ्याच महिलांचे त्यांच्या नियमित आयुष्याव्यतिरिक्त त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे प्रत्येकीला एकमेकींशी जोडणारं पण तरीही वेगळं असं काहीसं आहे. अशी महिला जी या सगळ्या महिलांच्या कार्याचा भाग असेल ती जर महिलादिनाच्या दिवशी असेल तर 'तिचं जग' या सदराचा शेवट गोड नक्कीच होईल. आणि विचारांच्या कल्पनेतून आकृती उभी राहिली एका बहारदार, भारदस्त महिला व्यक्तिमत्त्वाची. 
तु कल्पना नवनिर्मितीची...
पेटावी जणु मशाल स्वप्न आर्ततेची...
एक दिशा, एक आशा तु या ऐतिहासिक शहराची...
ओळख तुझ्या परिचयाची, जिल्ह्याची आई
'अंजली' धानोरकरांची...

हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच एक चमक येईल. काम करण्यापेक्षा काम बोललं की, त्या पदावरील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच बोलायला लागते. औरंगाबाद जिल्ह्याचा अतिशय सराईतपणे आपल्या प्रसन्न मुद्रेने पदभार सांभाळणारे लेखक, पञकार, साहित्यिक, अभिनेञी‌, वत्कृत्व, सॉफ्टस्कील ट्रेनर, कर्तव्यदक्ष अधिकारी असे सप्तरंगांची उधळण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर.‌ महिलादिनी बघुयात अंजली धानोरकरांचं 'तिचं जग'! 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १९९८ सालच्या त्या वर्ग-१ च्या अधिकारी. अंजली धानोरकर यांचा जन्म जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे झाला. त्यांचे वडील हे तेथील एका बॅंकेत कार्यरत होते तर आई ही गृहिणी. त्यांचं मुळ गाव हे आताचं तालुका असणारं बदनापूर हे आहे. तेव्हा माञ ते छोटसं खेडं गाव होतं. त्यांचे ९ वी पर्यंतचे शिक्षण हे पैठण येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत झाले. त्यामुळे बालपणाचे टप्पे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवले. १० वी ची परिक्षा त्या परभणीच्या बाल विद्यामंदिरातून चांगल्या गुणांकाने उत्तीर्ण झाल्या. नंतर अंबडच्या मत्स्योदरी महाविद्यालयात १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपरोक्त महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. लहानपणापासून त्या अतिशय चंचल आणि अभ्यासू होत्या. त्यांच्यातील तेच गुण हेरुन वडीलांनी त्यांना वाचनाची सवय लावली‌. १२वीत गुणतालिकेत छान क्रमांक असूनही मनाचा ध्यास घेत त्यांनी कलाक्षेञात प्रवेश निश्चित केला. आईवडील पाठीशी असल्यामुळे बाकीच्यांचा विरोध कारणी लागला नाही. पदवीनंतर समंजस आणि परखड विचारांच्या अंजली धानोरकर यांनी आपल्या याच विचारांना योग्य दिशा मिळावी, योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अभ्यासू वृत्तीतून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. याच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अक्षरशः पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण करत त्या शासकीय महसूल सेवेत तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. पञकारीतेतून थेट अधिकारी पदी त्यांनी झेप घेत आपली जिद्द पुर्ण केली होती. आता वेळ आली होती स्वत:ला सिद्ध करण्याची. कारण त्या काळी प्रशासकीय अधिकारी म्हणून स्ञियांचे प्रमाण अगदी नगण्य होते. पुरुषीमक्तेदारी असणाऱ्या कार्यालयात ही महिला काय काम करणार? असा दृष्टिकोन सुरुवातीला तिथल्या कर्मचाऱ्यांचा असायचा‌. पण आपली जिद्द, बोलण्यातील आपुलकी आणि नियोजनबद्ध काम या पध्दतीने त्यांनी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांची वाटचाल नुसतीच यशस्वी नाही तर दिमाखात सुरू आहे. तहसीलदारापासून सुरु झालेल्या त्यांच्या कार्याचा आलेख विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी चे झेंडे रोवत औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

 तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना घरच्यांनी जेव्हा त्यांच्या लग्नाचं बाशिंग काढलं तेव्हा येणाऱ्या स्थळांना अंजली धानोरकरांची नोकरी मंजूर नव्हती. मुळातच पुरोगामी विचारसरणीच्या अंजली यांनी स्पष्टपणे त्या स्थळांना नकार‌ देत मुलगी ही चार चौकटीच्या बाहेरही स्वत:चे अस्तित्व घडवू शकते असे सांगितले. इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल माञ कष्टाने मिळवलेली नोकरी तर सोडायची नाही याची त्यांनी मनाशी गाठ बांधली. समाजाची दुसरी बाजू तितकीच मजबूत आहे जिला मुलगी ही अभिमान वाटते. तसच काहीसं अंजली धानोरकरांबाबत‌ झालं. खरतर एक सोपोस्कार म्हणून त्यांनी ठिकाण बघितले कारण पुर्व अनुभवानूसार तर‌ आपण नकारच देणार असं त्यांना माहित होतं. माञ त्यांची गाठ ही अभय‌ धानोरकरांशीच बांधलेली असावी. अभय धानोरकर‌ आणि त्यांच्या आईवडीलांना अजंली धानोकरांच्या कामाचा अभिमान वाटला. कमी वयात त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल, त्यांच्या कर्तबगारीबद्दल पेशाने डॉक्टर असणाऱ्या अभय धानोरकरांना फार कौतुक वाटले. आणि अंजलींना 'धानोरकर कुटूंबात' येवून त्यांच्या या ध्येयाला खंबीर‌ साथ लाभली. 
  
त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतांना त्यांच्या कर्तबगारीचे, खमक्या निर्णयप्रक्रियेचे अनेक पैलू आपल्याला उलगडत जातात. आणि सुखाचा धक्का देत जातात. ज्या क्षेञात त्यांनी पाऊल टाकले त्या क्षेञाचे नंदनवन त्यांनी केले. त्यातलेच एक वन खात्यात वन उपजिल्हाधिकारी व वनजमावबंदी अधिकारी पदावर कार्यरत असतांना हा विभाग अगदी अडगळीत पडलेला होता‌;अधिकाऱ्यांमध्ये शिस्त नव्हती. त्यातील एकाने मॅडमला सल्ला दिला, काय तुम्ही, इथे येवून फायदा नाही. इथे काही काम चालत नाही. त्यावेळस अतिशय आत्मविश्वासाने त्या अधिकाऱ्याला त्यानी खडसावत सांगितले. " सर मी या खुर्चीवर बसून एवढे चांगले काम करुन जाईल की परत इथे येण्यासाठी अधिकारी तुम्हाला विनंती करतील". त्यावेळेस कदाचित त्या अधिकाऱ्यांना ते हास्यास्पद वाटले असेल माञ योग्य नियोजन पध्दतीने, उत्कृष्ट कार्यप्रणाली राबवत तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यातींल कार्यक्षमता त्यांनी ओळखली. त्यानुसार त्यांनी कामाचे वर्गीकरण केले. कष्टातून बदल‌ दिसून आला आणि काय तर औरंगाबाद वनजमावबंदी कार्यालय 'आयएसओ' नामांकन मिळणारे महाराष्ट्रातील पहिले वन कार्यालय ठरले. त्यांनी त्यांचा दिलेला शब्द खरा ठरवला. अशा पध्दतीचे आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त करून देणं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरव आहे. आणि या गौरवात खारीचा वाटा हा अंजली धानोरकरांनाच जातो‌.

सन २०१७ मध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रत्येक कामातील वेगळेपण घेरुन त्यात आपली छाप कशी उमटवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजली धानोरकर. इथेही त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत आपलं नाव इतिहासाच्या पानावर भल्यामोठ्या अक्षरात कोरलं. जगप्रसिद्ध वेरुळ येथील चारही केंद्रावर त्यांनी महिलांना प्रशिक्षण देत महिला जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेञीय अधिकारी, मतदान केंद्राधिकारी, केंद्राध्यक्ष, BLO या सर्व पदावर त्यांनी महिलांची नियुक्ती केली. एवढेच नाही तर सुरक्षेसाठीही महिलापोलिसांचीच नियुक्ती त्याठिकाणी करण्यात आली होती. अंजली धानोरकरांच्या मते जर देशाच्या सर्वोच्च पदी महिला असू शकतात तर‌ मग निवडणूक प्रक्रिया त्या का सुव्यवस्थित पार पाडू शकणार नाही. सुदैवाने जिल्हाधिकारी ही त्यावेळेला महिलाच होती त्यामुळे त्यांनी‌ हा उपक्रम राबवला. अगदी मशीन ऑपरेट करण्यापासून ते पोलिंग एजंटपर्यंत सगळंच महिलाराज होतं.‌ हे पाऊल उचलून त्यांनी जोखीम तर पत्करली होती; कारण ही भारतातील पहिली घटना होती. माञ अजंली धानोरकरांच्या अखत्यारीत ही निवडणूक अगदी लिलया पार पडली. महिलांची अशी प्रशासकीय व राजकीय साखळी संपूर्ण भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा घडून आली. आणि हा मैलाचा दगड यशस्वीपणे पेलला तो अंजली धानोरकरांनी. प्रशासकीय अधिकारी कसा असावा? या वाक्याचं दोनच शब्दात उत्तर म्हणजे 'अंजली धानोरकर'.
दबंग हा शब्द पोलिस महिलेला वापरत असले तरी हे विशेषण त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला अगदी चोखपणे लागू होते. कारण त्या कामातून‌ जनतेपर्यंत पोहोचतात. 

एक महिला जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या उपजिल्हाधिकारी पदावर. ना मागे ना पुढे ,काम थेट तोंडावर! एवढा मोठा जिल्ह्याचा सांभाळ करतांना स्वत:साठी वेळ काढणं हे खरच अवघड आहे. माञ या वाक्याला अंजली धानोरकर अपवाद ठरतात. एवढ्या व्यापातूनही त्यांनी स्वत:ला कलाक्षेञाशी अगदी सराईतपणे जोडून ठेवलय. त्यांच्यातील‌ साहित्यिका जेव्हा- जेव्हा बाहेर पडली तेव्हा- तेव्हा साहित्यक्षेञासाठी ती देणगी अनमोल ठरली. 'गट्टीफु' हा त्यांचा बालकवितासंग्रह फार प्रसिद्ध असून त्यांनी चौथ्या आवृत्तीपर्यंत मजल मारली. 'मनतरंग या त्यांच्या ललितलेखासंग्रहाने तर‌ अशी कमाल केली की, त्यातील‌ 'काहूर' हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीएससी, बी. एस.डब्ल्यु व बी.एफ.ए च्या द्वितीय वर्षाच्या‌ अभ्यासक्रमात सन २०१२-१३ पासून समाविष्ट आहेत. त्या स्वतः सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. याचसंदर्भातील व्यक्तीमत्व विकासासाठी सॉफ्टस्किल हे त्यांचे पुस्तक वाचनीय‌ आहे. विविध शासकीय प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्कील मधील विविध विषयांवर प्रशिक्षण दिले तर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, कॉर्पोरेट विभाग अशा अनेक क्षेञांसाठी वेळ काढत त्यांनी सॉफ्ट स्कीलचे धडे दिले. यासोबत 'मला आयएएस व्हायच' हे त्यांच अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे. साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' या पुस्तकाच्या अभिवाचनाची त्यांच्या मधूर आवाजात रेकॉर्डींग ऐकली की आई-मुलाच्या नात्यातील तो निरागस संवाद डोळ्यासमोर चिञ उभे करतो. नामांकित वृत्तपञ मासिकातील त्यांचे स्तंभ लेखन तर पर्वणी ठरते. साहित्यवेड्या अंजली धानोरकरांच्या लेखणीने त्यांना खरच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेपले आहे. स्वत:ला काळाबरोबर त्या कशाप्रकारे सुसंगत ठेवतात याचा प्रत्यय 'Lets Talk Anjali' या त्यांच्या युट्यूब चॅनलवर येतो. त्या कामातून वेळ काढत स्वत;ची आवड जोपासतात. 'जिंदगी मिलेंगी ना दोबारा, मनभर इसे जिले यारा' ह्या ओळींमधील ओवी म्हणजेच अंजली धानोरकर. 

त्यांच्या सामाजिक कार्याचा वेग जाणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त आहेत. २०१९ मध्ये फेमिना मासिकात त्यांच्यावर 'Pillar Of Democracy' म्हणजेच 'लोकशाही आधारस्तंभ' या शीर्षकाने लेख प्रसिद्ध झाला. तो क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. लोकशाहीचा आधारस्तंभ ही स्तुतीसुमनं खरच गगनभेदी आहेत. त्यांच्या किर्तीचे गोडवे सातासमुद्रापारही मोठ्या अभिमानाने गायले जातात. याचं उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या ‘Thrive Global’ या मासिकात त्यांच्यावर प्रसिद्ध झालेला लेख. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वृत्तपञातून त्यांनी आपले लेख जगात पोहोचविले. खरच एका महिलेनं मिळविलेलं हे क्षितीजापलिकडलं यश आपल्या भारताच्या कुठल्याच कोपऱ्यात न मावणारं आहे. त्याला सामावून घ्यायचं असेल तर मनच लागेल आणि जेव्हा ते प्रत्येकाच्या मनात उतरेल ना तेव्हा अंजली धानोरकरांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांसारखे अधिकारी तयार होऊन कायदा व‌ सुव्यवस्थेतून कशा पध्दतीने विकास साध्य होतो. याची प्रचिती येईल. खडतर परिश्रम आणि मनात असणाऱ्या अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन प्रशासकीय सेवेबरोबरच विविध क्षेञाला आपल्या कलेतून संपन्न करत अंजली धानोरकर‌ यांनी आपली विशेष छाप सोडली. कधीही न पुसणारी अशी. सह्याद्रीच्या उंचीसारखं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या या ध्येयवेड्या नारीशक्ती साठी भारतीयांच्या माना शानेनं आणि अभिमानानं उंचावतात. त्यांनी एवढी मोठी उंची गाठली आहे माञ त्यांचा निर्मळ स्वभाव हा सर्वसामान्यांनाही आपलंसं करुन घेतो. त्यांच्या दरबारी सगळेच एकसमान असून कोणी शेतकरी जरी आला तरी त्या वेळ काढून तितक्याच आपुलकीने विचारपूस करतात. याला म्हणतात पतंगाची झेप आभाळाला टेकली तरी डोर माञ जमिनीशी कायम संधान साधून असते. 

अंजली धानोरकर सांगतात. " कायम कायद्याला धरुनच काम करायला हवं. आपली उंची गाठतांना अनेक प्रसंगांना महिला म्हणून सामोरं‌ जावंच लागतं माञ ध्येय मनाशी पक्क असलं की आपल्यातील भुक वाढत जाते. आणि नकळत ती ताकद आपल्यात निर्माण होते कोणत्याही गोष्टीचा निडर होऊन सामना करण्याची. तुमच्यातील क्षमतांना ओळखा, नकारात्मक लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील माञ तेच बळ समजत वाटचाल करत‌ रहा. यश तुमच्या पायाशी असेल. खरच अंजली धानोरकर म्हणजे प्रशासकीय क्षेञातील व्यापक असे विद्यापीठ. त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक महिलादिन पुरेसा नाही. प्रत्येक महिलादिनी गौरव व्हायलाच हवा अशी ही महिलांची शक्ती. प्रशासकीय क्षेञात पाऊल टाकू इच्छिणाऱ्या अनेक महिला, मुलींचं प्रेरणास्थान. या प्रामाणिकतेच्या चालत्याबोलत्या संवेदनशील पुतळ्याला महिलादिनी सलाम! 
                     
                            🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️


रविवार, ६ मार्च, २०२२

💗 कुजबूज नाही तर स्वच्छंदी ती💗

                         💗"तिचं जग"💗

आज कोणतेही आढेवेढे न घालता थेट विषयाला हात घालते. कारण जो समाज काही गोष्टींची सार्वजनिकरित्या वाच्यता करण्याला बंदी घालतो त्याच समाजाच्या अज्ञानामुळे आज महिलांवरील लैंगिक अत्याचार तर वाढतातच आहेत माञ लैंगिक शिक्षणाची समाजात असणारी अज्ञानता यामुळे महिलापुरुषांना समसमान पातळीवर समस्यांना सामोरं जावं लागतं. मग विषय इथेच येवून अडतो‌ की बोलणार कोण? या गोष्टी काय‌ चारचौघात बोलण्याचा विषय आहे का? याच सगळ्या प्रश्नांवरील उत्तर म्हणजे आपल्या औरंगाबादच्या स्ञीरोगतज्ञ डॉ. रश्मी बोरीकर. या जगात प्रत्येक शारीरिक व्याधीचं निराकरण करण्याची क्षमता ही वैद्यकीय क्षेञात आहे. सहज कोणालातरी विचारलं की वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची नावं सांगा. अगदी सहज सांगून टाकतो न आपण. पण जेव्हा लैंगिक समस्येवर अनुबोधन करणारा डॉक्टर जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा माञ जीभ अडखळते. आज माञ बदल घडलाय तो शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत आणि ग्रामीण भागापासून ते आदिवासी पाड्यापर्यंत. आणि हा बदल‌ घडवून आणण्यामागे असणारे मजबूत हात म्हणजे डॉ. रश्मी बोरीकर. कुजबूज न करता स्वच्छंदीपणे शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांवर मोकळेपणाने त्या समाजात भाष्य करतात. त्यांचा या क्षेञापर्यंतचा प्रवास खरतर खुप गमतीदार आहे .सोबतच अगदी खुला आहे‌ या बंदिस्त क्षेञापेक्षा. बघूयात तिचा प्रवास 'तिचं जग' मधून...!

रश्मी बोरीकर यांचा जन्म नागपूरचा आहे कारण त्यांच्या आईचं माहेर हे नागपूरचं. त्यानंतरचं संपुर्ण बालपण हे त्यांचं औरंगाबादमध्ये गेलं. त्यापुढील शिक्षण हे सगळं औरंगाबादमध्येच झालं. इयत्ता १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण त्यांनी शारदा मंदिर मुलींच्या शाळेत घेतलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाची निवड केली व त्यापुढील वाटचालीसाठी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादमध्ये आपले MBBS चे शिक्षण पुर्ण केले. त्यांचे‌ वडील हे सरस्वती भुवन महाविद्यालयात अर्थशास्ञाचे प्राध्यापक होते तर आई ही सरस्वती भुवन मुलांच्या शाळेतून उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचे आजोबा श्रीनिवासराव सखारामपंत बोरीकर हे हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे अग्रणी नेते होते. तसेच त्यांचे वडील आणि आत्या यांनीही वयाचे १० ते१६ या वयोगटात‌ असतांना हैद्राबाद मुक्तीसंग्रामामध्ये तरुण पिढी म्हणुन काम करत आपले शौर्य गाजवले. घरामध्येच स्वातंञ्यसंग्रामात काम केल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना घरातुनच आजोबा आणि समाजसेवेचे बाळकडू मिळाले. आजोबांनी आठवण काढतांना बोरीकर‌ मॅडम सांगतात की, त्यांच्या आजोबाचं वत्कृत्व फार छान होतं. त्याच्या बोलण्याची शैली त्या काळात फार‌ प्रसिद्ध होती. त्यामुळे त्यांच्यातील ते अंगभुत गुण आपोआपच बोरीकर मॅडममध्ये उतरले. त्यामुळे शाळेपासूनच वेगवेगळ्या वत्कृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि मग ओघानेच बक्षिसं. असं सगळं बालपण त्यांच औरंगाबादमध्ये व्यतीत झालेलं आहे.

खरतर बोरीकर मॅडमला स्वत: ला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्यांना कला क्षेत्रात आपलं करिअर करायचं होतं किंवा सायन्सला असतांना फिजिक्सबाबत निर्माण झालेली आवड यामुळे त्यातच काहीतरी संशोधनात्मक करावे असा त्यांचा मानस होता. पण त्या काळात वडीलांचा विचार असा होता की मुलींनी मुलींसाठी वैद्यकीय क्षेञ निवडणं अतिशय  चांगलं आहे. ओघाओघाने गुणही चांगले प्राप्त होत गेले आणि वैद्यकीय प्रवेश निश्चित झाला. प्रवेश घेतल्यानंतर मॅडमला या क्षेञात‌ येण्याचा कधीच पश्चात्ताप झाला नाही. त्यांना हे क्षेत्र आवडायला लागले. त्याचं शिक्षण सगळं घाटीत‌ झालं असल्यामुळे घाटीत येणारे रुग्ण हे खान्देश,मराठवाडा, विदर्भ अशा अनेक भागांतून येत असत. अक्षरशः राञराञ प्रवास करुन रुग्ण प्रसूतीसाठी घाटी मध्ये येत असत. आणि हे ज्या आर्थिक आणि समाजिक घटकातील नागरिक होते त्या भागात शिक्षणाची फार वाणवा प्रकर्षाने जाणवत असत. एका रुग्णाबरोबर‌ नातेवाईकांचा येणारा जत्था जेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर आहे हे कळताच त्या रुग्णाबरोबरची एक बाई सोडली तर‌ सगळे पसार होवून जायचे. त्यावेळेस माञ विद्यार्थीदशेत असतांना त्यांनी स्वत: रूग्णांसाठी रक्त देत ते लेबररुम पर्यंत पोहोचवत त्या महिला आणि बाळाला वाचविण्यासाठी आपल्या शिक्षकांची मदत करायची. या सगळ्यांमधून त्यांना लक्षात आलं की बायकांच्या आयुष्यात जो काही अज्ञानाचा अंधकार आहे‌ त्यांच्यासाठी आपण काहीतरी फार मोठं काम करायला हवं. मग त्यांनी ठरवलं की ,प्रसूती, सिझर,ऑबार्शन यांसारख्या गोष्टी तर सगळेच स्ञीरोगतज्ञ करतात. पण ही जी एक पायाभुत शिक्षणाची गरज आहे ती आपण करू शकतो का? आणि मग त्यातून फक्त‌ लैंगिक शिक्षण असं नाव न घेता त्यांनी त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्राप्त होईल असा प्रयत्न केला. जर यात शरीराची माहिती सांगितली जाईल,शरीराचं विज्ञान सांगितलं जाईल तर नक्कीच सगळ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलूच शकतो. मॅडम स्ञीरोगतज्ञ असल्याने त्या या गोष्टी अधिक शास्ञशुध्द पध्दतीने मांडु शकत होत्या तसेच त्यांच्यात असलेल्या वत्कृत्वाची सांगड आणि घराकडून मिळालेली सामाजिक जाणीव यामुळे या क्षेञात त्या बदल‌ घडवून आणू शकल्या. ज्या गोष्टी आजही डॉक्टर होतांनाच्या अभ्यासक्रमात शिकविल्या जात नाही, ते त्यांनी स्वत: अभ्यास करत जाणून घेतले तसेच दुसऱ्या देशात या शिक्षणाकडे कशापधदतीने बघितले जाते व अगदी सहजरित्या ते हे शिक्षण कसे देतात याचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला. आजपर्यंत बोरीकर मॅडम यांनी पाच मुली असणाऱ्या आदिवासी तांड्यावर‌ जावून सुध्दा मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले आहेत तर अगदी ४०० मुलींच्या समुदायात जावून ही त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. हे काम करत असतांना कुठेही आपला समाज काय म्हणतोय,आपली संस्कृती काय म्हणतेय या गोष्टी मध्ये न येवू देता शास्ञाने त्यांना काय शिकवलेलं आहे? शास्त्राने त्यांना शिकवलेली बाईची प्रजनन संस्था काय आहे? तिचं काम काय आहे आणि त्याच वेळेला शास्ञाने मला शिकवलेली पुरुषांची प्रजनन संस्था पण काय आहे? हे सगळं त्या वैद्यकीय दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहोचवतात. 
 
लैंगिक शिक्षणाची गरज ही फक्त महिलांनाच नाही तर‌ पुरुषांनाही त्या बाबतीत सजग असणं अगदी गरजेचं असतं माञ आपल्या समाजात ती मोकळीक नसते. तर डॉ. बोरीकरांनी ग्रामीण भागातील अनेक शाळेत मुलांशी बोलण्याचाही प्रयत्न केला.जर एक कार्यक्रम त्यांनी मुलींसाठी केला तर‌ दुसरा कार्यक्रम मुलांसाठी करणार असा त्यांचा आग्रह असतो.एवढेच नाही तर एक पाऊल पुढे जावून त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत‌ बोलावून आपल्या मुलांसाठी लैंगिक शिक्षणाबद्दलची जागृकता किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक मोकळीकता त्यांच्या कार्यक्रमांमधून निर्माण झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी हे शिक्षण नसणं ही गोष्ट कारणीभूत आहे. कारण अल्पवयीन मुलीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा समोरची व्यक्ती तिच्या शरीराशी काय करतेय हे तिला कळण्याइतपत तिची समज नसते ना. तो अत्याचार आहे हेच तिला माहित नसतं त्यामुळे हे शाळेतूनच शिकवलं पाहिजे कारण आजही अशी परिस्थिती आहे की, आपण आपल्या आईवडीलांपेक्षा आपल्या शिक्षकांवर जास्त विश्वास ठेवतो. तर हे शिक्षण शाळेतून देतांना नुसतं मुलामुलींशी बोलून उपयोग नाही तर‌ त्यांच्या पालकांनाही विश्वासात घेणं गरजेचं आहे. आता कायद्याने प्रत्येक शाळेमध्ये पालकसंघ आहे. जेव्हा डॉक्टर बोरीकरांनी पालकांशी संवाद साधला तेव्हा ते इतके खुश झाले की ते मॅडमला म्हणाले मॅडम तुम्ही जे बोलता आहात ते जीवनशिक्षण आहे. ते लैंगिक शिक्षण आपण असं म्हणूच शकत नाही. असही नाही आहे की मुलांना शिकवलं की उद्या ते जावून लैंगिक संबधच ठेवणार. तर असं नाही ये. आपली तरुण पिढी ही खुप हुशार आणि समजूतदार आहे. त्या कृतीमागचं विज्ञान समजून घेणं आणि मग त्यावर विचार करणं हा अगदी वेगळा मुद्दा आहे. 
 
याला अनुसरुच एक मुद्दा म्हणजे मुलींच्या मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज. आजही वर्षानुवर्षे चालत आलेल्या समज-गैरसमजांमुळे मासिक पाळीत महिलांना अस्पृश्य समजलं जातं. आजही त्यांना बाजूला बसवलं जातं तर काही समाजात घराबाहेर ठेवायला ही मागेपुढे बघितलं जात नाही. याबाबत डॉ.बोरीकर प्रत्यक्ष शिक्षकांशी संवाद साधत संपुर्ण प्रजनन संस्थेची आकृती फळ्यावरती काढून स्ञीबीज कसं तयार होतं? मृतपेशी काय असते. हे समजावून सांगतात. जर घरातील निर्णय प्रक्रियेत आई, वडील सगळेच असतात तर‌‌ मासिक पाळी बद्दल बोलतांना आजही जीभ का कचरते. मासिक पाळी म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी सगळ्यात सुंदर आहे. ज्यातून एक नवीन जीव‌ जन्माला  येतो. जो समाज मासिक पाळीत स्ञीला कमी लेखतो तो समाज त्या पाळीमुळेच आज या जगात आहे. हे माञ तो सोयीस्कर पणे विसरतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही पाळी हा मुद्दा देवाधर्माशी जोडलेला आहे. बाईची पाळी ही प्रत्येकच धर्मात वाईट मानली गेलेली आहे. मुस्लिम धर्मात तिला नमाज पडण्याची परवानगी नाही, हिंदू धर्मात नमस्कार करण्याची नाही तर‌ बाकी कुठल्याच धर्मात प्रार्थनेची परवानगी नाही. मग जर कुठल्याही सजीवाचा जन्म हा त्या गर्भाशयातून आहे तर मग त्या गर्भपिशवीला वाईट मानायचं काय‌ कारण? आजही दुकानदाराला सॅनिटरी नॅपकिन मागायला मुलींना लाज वाटते. सॅनिटरी नॅपकिनचं पॅकेट ते वर्तमानपञात  गुंडाळून देतात.  का बरं असं? ज्या दिवशी मुलगी पाळीला पाप समजणार‌ नाही, ज्या दिवशी नवरा, वडील, मुलगा, मिञ तिच्यासाठी स्वत: जावून सॅनिटरी नॅपकिन आणून तिची त्या चार दिवसांत काळजी घेईल त्या दिवसापासून 'पाळी' हा शब्द नॉर्मल असेल. पण या सगळ्या दिशेनं होणारा बदल हा खुप सावकाश आहे. यावर बदल‌ घडवून आणायचा असेल तर शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आपल्याला प्रत्येक कुलूपेचं ताळं तोडण्यासाठी उपयुक्त आहे. 

बोलत रहा,बोलत राहा समाजात सकारात्मकता पसरवत रहा. ताशेरे ओढले जातील माञ हेतू उदात्त असल्याने एक दिवस नक्कीच उजाडेल जेव्हा नावीन्यपूर्ण बदल‌ दिसून येईल. १०००० मुलींमागे दोन मुली जरी बदलल्या की मी आता पाळीत कुठलेही बंधन पाळणार नाही तरी यात माझं यश असेल असं डॉ. बोरीकर मॅडम आवर्जून सांगतात. 
बोरीकर‌ मॅडमच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश काळातील‌ जी आरोग्यव्यवस्था आहे तिच आपण पाळत आहोत. आपण आजही त्यात काहीही बदल केलेला नाही. जो सामाजिक शास्त्र हा विषय वैद्यकीय क्षेत्रात पुर्णपणे शिकवला जायला हवा तो पाहिजे तसा शिकवला जात‌ नाही. वैद्यकीय अभ्यासक्रम आता काळानुसार अद्यायावत करण्याची गरज आहे. शरीरक्रिया शिकवत असतांना माणसामाणसातील नातेसंबंध कसे असावेत. कुटूंबाला धरुन संबंध कसे असावे हेही त्यात अंतर्भूत केलं पाहिजे.

 दरवर्षी युनो ही संस्था महिलादिनाचे थीम देत असते. तर यावर्षीचं थीम आहे. 'CHANGE THE BUYEST' म्हणजे 'ग्रह बदलूयात'. मग आपल्याबद्दलचे ग्रह आपणच बदलूयात ना. बाई म्हणजे क्षमाशील, बाई म्हणजे नाजूक, बाई म्हणजे सुंदर, बाई म्हणजे प्रेमळ, बाई म्हणजे संवेदनशील, बाई म्हणजे सहनशील ही जी काही चौकट महिलांसाठी आखलेली आहे तर हीच आपण बदलूयात ना. मग आपण म्हणु शकतो मी एक महिला असण्याआधी मी एक माणूस आहे. आणि माणुस म्हणून सगळ्यांना असणाऱ्या भावना या आपल्याला सुध्दा आहेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्ञीला स्वत:ची ओळख आणि तिच्यातील अस्मितेची जाणीव होईल. ही सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी. खरच डॉ. रश्मी बोरीकर या जे शास्ञशुध्द पध्दतीतून लैंगिक शिक्षणाचे कार्य करत समाजात जागृकता निर्माण करता आहेत त्याला तोड नाही. त्यांच्या या कार्याला महिलादिनानिमित्त सलाम! 

   ‌                        🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...