मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

     🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳
आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर्षानंतर, गुलामगिरीच्या उद्बोधक चटक्यांच्या चिंगाऱ्यांनंतर मान उंचावेल अशा तिरंग्याचे '१५ ऑगस्ट १९४७' ला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले अन् 'भारत' एक स्वतंत्र भारत झाला!
ना कुणाचा चाकर, ना कुणाचा गुलाम,  इथे फडकला फक्त अन् फक्त देशभक्तीच्या उत्साहात लोकशाहीचा सलाम!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावन भुमी. त्यांनी रयतेच्या एकजुटीतून मुघलांच्या, शायिस्तेखान, अफजलखानासारख्या मातब्बर शञुंच्या तावडीतून राष्ट्र सोडवत स्वराज्याचा पारिजात उभा केला. आदर्श रयत, आदर्श  राज्य, आदर्श राजा अशी सुसूत्र लोकशाहीतली मांडणी म्हणजे छञपती शिवाजी राजे, पण राजांच्या या स्वराज्याला काही दशकांनंतर कळ लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून, व्यापाराच्या मुद्द्याने घुसखोरी केलेल्या गोऱ्यांनी 'तोडा, फोडा आणि राज्य करा' या तत्वावर भारतीय सल्तनतीला गुलामीच्या बेड्या ठोकल्या. देशाला. देश बिथरला, विभागला गेला, जात ,धर्म, प्रांत, वर्ण, व्यंग हे व्याभिचारी विचार इंगळीसारखे माणसाच्या मनाला इतके चिकटत गेले की, अखंड स्वराज्य असणारा आपला "देश" च आपला धर्म! हा विचार कुठेतरी मागे सरत गेला.  इंग्रजांचा हा चक्रव्यूह भेदत आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांनी, लोकनायकांनी १५० वर्षांचा सत्तासंघर्ष करुन, कारावास भोगून १९४७ च्या सुर्याला आपल्या देशात स्वातंञ्याची पहाट उगवण्यास भाग पाडले. त्यांचे कष्टही त्या तळपत्या सुर्यासारखेच; पाऊल चुकले तर त्यांच्यासह हातातोंडाशी आलेला स्वातंञ्याचा घास भस्म होऊ शकला असता, पण शेवटी त्यांची वाट स्वातंञ्याच्या वळणावर येऊन ‌विसावलीच. 


आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७७ व्या स्वातंञ्यदिनाच्या या पहाटेला मागे वळून बघतांना इतिहासाची भरभक्कम, स्फूर्तिदायक पाने आत्मासात केल्याशिवाय आपल्याला  मिळालेल्या स्वातंञ्याची व्याख्या आपल्यात व आपल्या येणाऱ्या पिढीच्या मनात रुजणारच नाही. आपल्याला मिळालेली अभिव्यक्ती, सारं वैभव हे स्वातंञ्याचं देणं आहे, क्रातीवीरांनी केलेल्या सत्तासंघर्षाचं, दिलेल्या बलिदानाचं! ते अमृत आहे, आपल्या जगण्याचं, वैचारिकतेचं अन् मुळाने केलेल्या कष्टाचं. म्हणून ते कायम आपल्याला आत्मसात असावं एवढं नक्की!

मागचं संपूर्ण वर्ष हे भारतात स्वातंञ्याचं गुणगान गाणारं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. याच अमृतमहोत्सवी वर्षात अनेक ऐतिहासिक घटना, निर्णयाने देशाच्या वाटचालीत अमृताचे कलश स्थापिले गेले. एकेकाळी देशाच्या राजकारणाची घडी बसवू बघणारा आपला भारत देश आज आंतरराष्ट्रीय राजकारणात हुकमी एक्का बनलेला आहे. भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपतीपदी "द्रौपदी मुर्मू" या आदिवासी महिलेची वर्णी लागली. त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणं देशासाठी गर्वाची गोष्ट ठरली‌. या ७६ वर्षात विज्ञान- तंञज्ञान ,आयटी क्षेञाच्या जोरावर भारताने प्रगतीची कमान भक्कमपणे उभी‌ केली. स्ञीशिक्षणाने अमुलाग्र प्रगती साधत अंतराळासह जल, वायु, अग्नी व इतर सर्वच क्षेञात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. स्ञीने सामर्थ्यातून इतिहासात केलेल्या पराक्रमाची गुरुकिल्ली आपल्या हाती बाळगली‌ आणि बिकट प्रसंगांना तडीपार करत आपणही या देशाचा भक्कम पाया आहोत हे पटवून दिले. आजही देशकार्यात अविरत कष्ट त्या करत आहेत. 'हर तरफ महिलाराज, सारी श्रृष्टीपर महिलाराज'! असं चिञ पाहून समाधान वाटतं. कारण जी 'स्ञी' आपलं घर सांभाळू शकते तीच 'स्ञी' कधी अर्थव्यवस्था डळमळली तर ताळेबंदही सावरण्याची ताकद ठेवते हे ञिकालाबाधित सत्य आहे. 

तृतीयपंथी हा समाजातीलच एक घटक असला तरी समाजानेच समाजाबाहेर टाकलेला हा वाळीत समाज. जगावं तरी कोणासाठी? जगावं तरी कशासाठी? संघर्ष त्यांच्या ठायी -ठायी, फक्त पोटाच्या भाकरीसाठी. असा हा माणुसकीहीन लोकांच्या अर्धज्ञानामुळे मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला तृतीपंथीयांचा गट प्रवाहात येण्यासाठी  स्वत:ची नदी करत अस्तित्वाच्या संघर्षासाठी रस्त्यावर उभा ठाकला. स्वातंञ्य तर मिळालं होतं त्यांना, तरीही पारतंञ्यात असल्यागत आपल्याच स्वतंञ झालेल्या देशात ते लोकांच्या नजरेतल्या बेड्यांमध्ये बंदिस्त होते. अजूनही म्हणावं तसं त्यांना स्वीकारणं कठीणच जातंय की, या माणुस नावाच्या वैचारिक प्राण्याला. परंतु कुठेतरी काळ बदलतांना दिसतोय. कायदा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या हाकेला साद घालतोय. छोटीशी आशा पल्लवित झाली आहे. पोलीस दलात तृतीयपंथी कर्तव्य बजावतांना आढळून येता आहेत. याचबरोबर नुकतीच पुणे महानगरपालिकेने तृतीयपंथीयांवर विविध पदांची जवाबदारी सोपवत एक नवा पायंडा देशासमोर स्थापित केला ही खरंच सुखावणारी बाब वाटली. असाच देश अपेक्षित आहे भारत मातेला. नाही का? 


भारतीय स्वातंञ्योंत्तर कालखंडातील बैलगाडीने मैलोनमैल केलेले दळणवळण आता मेट्रोपर्यंत आलेले आहे. एवढेच नव्हे तर मेट्रोपुढील तंञज्ञानाचेही संशोधन जोरात चालू आहे. गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेचे जाळे चांगलेच विस्तारले आहे.यामुळे प्रगतीच्या वाटेत रेल्वेचा सुसाट वेग वेग विस्तारला आहेच. अतंराळातही भारतीय संशोधन यंञणेने विशेष छाप पाडली आहे. मंगळ आणि चंद्र आपल्या कवेत घेऊन इतरही ग्रहांवरती दृष्टी ठेवलेली आहे. अंतळरातलं हे  भारतीय  वैभवही आपल्याला स्वातंञ्याचंच तर देणं आहे. 

अंतराळ संशोधन म्हटलं की, विकसित देशांनीच हे शिवधनुष्य पेलावं असा नियम होता. पण याच अंतराळातील घडामोडींवर जगाची असलेली मक्तेदारी इस्रोच्या माध्यमातून भेदत भारताने अंतराळात सरकन गगनभरारी घेतली. अपयशातून यशाचे शिखर गाठत आज आपल्या देशाचे तिसरे चंद्रयान चंद्रापासून हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेय. अन् या सफल प्रयत्नानंतर आपला देश माणसांना घेऊनही चंद्रावर पाऊल टाकेल तो दिवस नक्कीच जवळ असेल. संशोधन क्षेञाने आपले कार्यक्षेत्र देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्यापक केले आहे.  शुन्यातून निर्माण केलेले वैभव आज भारताला संपन्नतेकडे घेऊन चाललेय खरे.


 बळीराजाचा देश म्हणून जगभर ख्याती असलेला भारत देश आधुनिक शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग शेतीशास्ञात अबलंबवत गेला. शेतीपूरक व्यवसायांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एककीडे सुधारत आहे. दुसरीकडे शहरांचे स्मार्ट सिटीमध्ये जागतिकीकरण झाले. खेडे डिजिटल खेडे म्हणून ओळखले जाऊ लागले. असे अनेकांविध प्रकल्प देशाच्या आजच्या स्थितीसाठी पोषक ठरले. एकूणच काय तर आजपर्यंत देश अनेक अंगांनी बदलला गेला हे‌ नाकारता येणारच नाही. मग ते सामाजिक असो, शैक्षणिक,असो बौध्दिक असो का राजकीय पातळीवरुन असो, पण "सुख, सोयी, सुविधांचा संचार जेव्हा मुक्तपणे जगण्यात व्हायला लागतो ना तेव्हा त्याची किंमत अधिक मौल्यवान होण्याऐवजी ती धूसर व्हायला लागते". हे वाक्य  सगळ्याच अंगांना लागू पडते ही दुर्दैवाची बाब आहे. याच वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतोय पण याची आपल्याला जाणीव नाही किंवा आपण कानाडोळा करतोय अशी गत झालीय आपली. विकास होत असतांना नैतिक मुल्यांचा विसर आपल्या देशातील नागरिकांना पडलाय हे स्पष्ट जाणवते. एकीकडे स्वच्छतेचा संदेश देणारे आपण दुसरीकडे नद्या प्रदुषित करतोय. एकीकडे प्रदुषण होतंय, महागाई वाढलीय, रस्त्यांवर खड्डे पडलेय, सांडपाण्याचा निचरा होत नाही ये, आजार पसरलेत म्हणून टिकास्ञ सोडणारे आपण आपल्यासाठी केलेल्या सुविधांना  पायदळी तुडवतो, भरधाव वेगाने गाड्या चालवत रस्त्याची चाळण आपण करतो, कचरा गाडी आली तरी कचरा गाडीत कचरा न टाकता रिकाम्या जागेवर कचरा नेऊन टाकतो. याचे आत्मभान आपल्याला कुठलीही मागणी करतांना, कृती करतांना असायला हवे.  


एकीकडे देश प्रगतीच्या उंबरठ्यावर असतांना दुसरीकडे देश अनेक समस्यांना झुंजही देत आहे. पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्याची दैना झाली, गरिबांची लाचारी वाढली, गावाची तहान व्याकूळली, विजेनी तारा मोडल्या, शिक्षणाची वाट तुटली, रोगराईने आव पसरला अशा अनेक समस्यांनी सामान्य माणूस होरपळतोय. अजूनही तो लोकशाहीत तर आहे पण तरीही  लोकशाहीबाहेर पडल्यागत त्यांची अवस्था झाली आहे. खेडयांचा विकास होतांना कुठेतरी शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि पायाभूत सोयीसुविधांअभावी  ग्रामीण भाग दुर्लक्षित होतोय असे चिञही आज बघायला मिळतेय. कागदावर असणारी आदर्श गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास काही प्रमाणांत अडसर निर्माण होत आहे. यासाठी जरा बारकाव्याने खेड्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

विकासाच्या आड येणाऱ्या या सगळ्या गोष्टींना आजची राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे‌. राजकारणात निर्माण झालेला द्वेष, स्वार्थ, ईर्षा, सत्तासंघर्ष या अवगुणांनी जखडलेले राजकारण कुठेतरी समाजकारणापासून दुरावले आहे. याची साखळी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे फोफावली अन् यात कुठेतरी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. मग ते महिलांवरील  वाढते अत्याचार असो , जातीधर्मावरुन पेटणाऱ्या दंगली असो वा उध्दवस्त होणारी शहरे असो. सगळ्या गोष्टींची सुरुवात ही राजकीय व्यवस्थेतून पेटलेल्या ठिणग्यांतूनच होते. देशाच्या राजकारणाचा फटका खेड्यातील मारोतीच्या पारावरही सपकन बसतो. खरंतर असं खेड्यातलं राजकारण हे देशपातळीवर राजकारणापेक्षाही जास्त किचकट आणि गलिच्छ स्वरुपाचं असतं. हे वाक्य तिथल्या परिस्थितीत राहुन प्रत्ययास येते. याला काही गावं, काही माणसंअपवाद ठरतात. म्हणून आजही खेड्यांचा म्हणवणारा देश हा कुठेतरी दुर्गम भागातील खेड्यांकडे दुर्लक्षित झाल्यागत आहे. देशाची जनता तर पुरती हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करतेय. लोकशाहीचा महत्वाचा हक्क असणारी भारताची रयत मत पैशाने विकत देशाला बिकट अवस्थेत ढकलण्यात हातभार लावते फक्त. रयतेचे आत्मभान जागृत करुन ते आत्मसात करण्याची ताकद‌ आता फक्त जनतेतच आहे. नाहीतर सामाजिकता फार दबून जाईल या राजकीय स्वार्थाखाली.

राजकारण हे सारीपाटाच्या खेळासारखं आहे. फासे पलटले की, डावपेच बदलले जातात, पण तेच डावपेच जर जनतेच्या भल्याचे समाजात निर्माण झालेल्या तेढीला लगाम लावणारे असतील तर नक्कीच स्वतंञ झालेला भारत, विकासाच्या शर्यतीत असलेला सुजलाम् सुफलाम भारत मागे खेचला जाणार नाही. देशाची व्यवस्था बघणाऱ्या देशाच्या सर्वच नागरिकांना एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 
 

आपल्याच देशाच्या या दोन रुपांनी आपल्या राष्ट्राला विभागून सार्वभौमत्वापासून लांब ठेवलंय. कुठेतरी ही दरी भरुन निघायला हवी. अखंड अभिमान वाटावा असा आपल्या देशाचा तेजस्वी सुर्य जागतिक  पातळीवर  तळपायला हवा अशी मनोमन इच्छा या स्वातंञ्यदिनाच्या मंगलपर्वावर एक भारतीय नागरिक म्हणून वाटते.
स्वातंञ्यासोबत येते ते कर्तव्य ,कर्तृत्व आणि त्याला अबाधित ठेवण्याचे कार्य.....
नुसतं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवीरांनी खस्ता खाल्ल्या नाही तर त्या स्वातंञ्यासोबत एकवटलेला देश सदैव एकजूटीने नांदावा अन् देशाकडे पुन्हा तिरकस नजरेने बघणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता यावं हा विचार राष्ट्रात रुजावा यासाठीही त्यांनी जीवाचं रान केलं.....
त्यांनी आपल्याला मिळवून दिलेले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांच्या गुलामीत जाऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून आपण सावध रहायला हवं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यापुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत'. या सर्वव्यापी प्रतिज्ञेवर आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. 'सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचा आपल्याला अभिमान आहे. याच आपल्या मातीतल्या देशाने कायम अखंडित, अबाधित आणि संघटितच असायला हवं.... यासाठी अप्रत्यक्षपणे  कार्य करण्याची शपथ आपण आजच्या दिवशी घेऊयात. देशाच्या सीमेवरचे जवान प्राणाची खिंड लढवत देशाचे रक्षण करतात. आपणही आपल्या देशाच्या अंतर्गत विकासासाठी सदैव कार्यरत राहुयात. देशाप्रती आपले कर्तव्य, निष्ठा पार पाडण्याचा 'प्रण' करुयात!
हे भारताच्या लेकरा...
रुजव तुझ्या मनात या देशसेवेचे गारुड...
आत्मसात कर स्वातंञ्याचे तेजस्वी भारुड....🇪🇬🇪🇬
 
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.....!

जय हिंद, जय भारत 
#शब्दप्राची🖋️🖋️


                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...