रविवार, १८ जून, २०२३

😂👑❤️बाबा❤️👑❤️

              ❤️👑❤️बाबा❤️👑❤️


बाबा
जगण्याच्या वर्तुळातला एक अव्यक्त कोपरा! बाबा लिहायला घेतला तरी पेन जड होतो असं वलय. बाबा कष्टानं माखलेला धगधगता अग्निकुंड आणि आपण आदबीनं रहावं म्हणून स्वभावात आणलेला कडकपणा. खरंच बाबा असा आहे का? बाबा‌ म्हणजे आपल्या मुलांसाठी नेहमीच नारळ ते टणक. पण या टणक नारळाकडे बघतांना आपण त्यातंल पाणीदार गोड खोबरं माञ विसरत चाललो आहोत.
कविता करणं सोप्पं असतं का बाबावर
कविता चुकलीच तर कागद फाडताही येईल
माञ तुटलेल्या बाबाला सावरण्याचं बळ आहे कोणाकडे?
आपल्याला कधी बाबा 
सापडलाच नाही का? ९ महिने आईच्या पोटात असलेलं बाळ जन्माला आल्यावर आईसोबत आपल्या बाबाचाही स्पर्श ओळखतो. कारण ९ महिन्याच्या त्या काळात बाबानेही त्याच्याशी गुजगोष्टी केलेल्या असतात. जगात न आलेल्या तान्हुल्यासाठी आर्थिक तजवीज करण्यात तो तेव्हापासूनच गुंतलेला असतो. बाळाचा जन्म होतो. पानावतात त्याचे डोळेही पण पुन्हा बाबाची जागा एका जवाबदार बाबा घेतो अन् अश्रू सुके पडतात तिथे. 
आपलं हे तान्हुलं.....अरे 
खेळाचंय तुझ्याशी मोकळं
आणायचाय तुझ्यासाठी चंद्र चांदण्यांचा गाडा
व्हायचंय तुझ्यासाठी बालपणातला तो म्हातारा घोडा 
अन् फिरवायचं तुला घरभर‌ अगदी जग फिरवल्यासारखं
मी येईल अ...... 
बाळा हे सगळे खेळ खेळायला तुझ्या मामाच्या घरी..
आठ दिवसातून मारेल जमलीच एखादी चक्कर तर तुला गोंजारायला माझ्या उरी
पण तु रडू नको आ... मी आलोच नाही तर.... 
तुझा बाबा तुझा असला तरी तुझ्याचसाठी सारे करण्याचा त्याचा अट्टाहास दुसऱ्यांच्या वेळेनुसार चालतो रे.
समजून घेशील ना.....?माझ्या चिमुरड्या....
येईल मी नक्कीच येईल...
तो पर्यंत विसरु नको अं... तुझ्या बाबाला
 हे त्याच्या मनातले खेळ असतात. आपल्या लेकराशी साधलेला त्याचाच स्व-संवाद. त्याच्या कपाळावरील प्रत्येक आठी या सगळ्या भावनांना व्यक्त करत असते. आपण माञ बाबा या शब्दमागचा तो संवेदशीलपणा घेरण्यात कमी पडतो.
  तो मरमर मरत असतो फक्त. 
  कष्ट करुन झिजत असतो फक्त. 
 
मुलांची बालपणं ते त्यांचा संसार आणि त्यांच्या अवतीभोवती बांधलेली अनेक नात्यांची दोरी. यात कुटूंबाची तिजोरी सांभाळत फक्त जमवाजमव करत असतो. या साऱ्यात कुठेतरी बाबा हरवत जातो. बाबासाठी नाही तर‌ मुलांसाठी. आजकाल त्यांच्यासाठी बाबा म्हणजे फक्त एटीएम आपल्या सुखसुविधांचं. बाकी त्यांनी आपल्यासाठी उपसलेले कष्ट, त्यांनी मारलेल्या त्यांच्या इच्छा याची तिळमाञही जाणीव मुलांना ‌नसते. अत्यंत गरीब परिस्थितीत मोलमजुरी करणारा बाबा आपल्या मुलांनी चॉकलेटसाठी मागितलेला एक रुपयाही मोठ्या आनंदाने त्याच्या हातात ठेवतो. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तो माञ ऐकवेळ उपाशी राहतो. असा असतो बाबा! अव्यक्त बाबा. मोठे होऊन माञ तोच मुलगा/मुलगी...
काय तुमचे दवाखाने, वीट आलाय मला....
एक- एक रुपयाचे त्यांचे कष्ट गेलेत हो‌ पाण्यात.
बाबाला आपण कळत नकळतपणे असेच धक्के देत असतो. तो माञ अव्यक्तपणे गुरफटत असतो तरीही आपल्याच काळजीच्या स्वरात. 
असा असतो बाबा! कधी समजलाच नाही नं आपल्याला.....

बाबा आपल्या मुलीसाठी हळवा आणि मुली आपल्या बाबाच्या काळजातला सगळ्यात सौम्य असा कोपरा. आपल्या आईनंतर आईच्याच जागी आपल्या लाडक्या लेकीला पाहणारा बाबा तिच्यासाठी ढाल असतो. आता सहज व्यक्त होता येतं, मुलींना आपल्या बाबाबद्दल , बाबाला आपल्या मुलीबद्दल. इतके ते नातं बापलेकीचं घट्ट झालंय. पण ग्रामीण बाबा माञ अजूनही आपल्या लेकीवर मायेचा हात फिरवण्यासाठी कष्टाच्या भाकरीचाच घास भरवतो. तिच्या बालपणात तिला चिऊकाऊचा घास घालत घरभर फिरणारा बाबा तिच्या भातुकलीच्या खेळात बाहुला बाहुलीचं लग्न लावतांनाही गुपचूप रुमालाच्या आडोशाने डोळे पुसतो. जशी‌जशी त्याची बाहुली मोठी होते तसतसे समजदारीचं शहाणपण अंगी उतरतांना ती तिच्या कष्टाळू बाबाला मदतीचा हातभार लावते. बाबा थांबवतो तेव्हा लेक उत्तरते...

कष्ट तु सोसावे का तर माझा हुंडा द्यावा
घर तु विकावं का तर माझं घर सजावं
लेक ना मी तुझी? धनाची पेटी ना?
तुझा घास ओरबाडून राहील का रे मी सुखी?
तुझं घर का नसावं माझं? मी का नाही जगावं माझ्या बाबा साठी?
मी रहावं तिकडं खुशीत अन् तु झिजावं माझ्या उंबरठ्यासाठी?
ही का रीत झाली?

लेकीचं हे निरागस बोलणं बाबा नेहमीच ऐकत असतो. लाडक्या लेकीला निरुत्तरपणे नेहमीच सासरी पाठवत असतो. तेव्हाही बाबाच्या डोळ्यात पाणी असतं. तो माञ अव्यक्तपणे कोपरा गाठून आपल्या लेकीचा विरह मोकळा करीत असतो. असा असतो बाबा! खंबीर पण मलूल, कडक पण संवेदनशील. आयुष्यभर जगतो तो स्वत:साठी नव्हे तर त्याने निर्माण केलेल्या घरट्यासाठी....
हो असाच असतो बाबा....
जगण्याच्या वर्तुळातील अव्यक्त कोपरा.......
हो असाच असतो बाबा....

                🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...