मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

'स्त्री "मुक्ती " दिन' खरंच?

      'स्त्री "मुक्ती " दिन' खरंच? ३ जानेवारी १८३१ ही तारीख संपूर्ण भारतवर्षात अजरामर ठरली. कारणही तसेच. त्या तारखेला जन्मलेली एक स्ञी संपुर्ण स्ञीयांच्या स्ञीमुक्तीचा महामार्ग निर्माण करणारी क्रांतीज्योती झाली. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले'‌. अंधकार हा शब्द स्ञी च्या आयुष्याला असा चिकटलेला होता की, चुल आणि मुल यापलिकडे‌ या समाजात ती शुन्यात गणली जायची. जातीचाच विचार केला तर त्यावेळच्या जातीव्यवस्थेतील सर्वात उच्च जातीच्या स्ञीचेही हात दगडाखालीच होते. शिक्षण हा शब्द थोडा जरी तिच्या कानी असला तरीही त्याची कवाडं कुठे असतात? कसे उघडतात? याचा दूरपर्यंत थांगपत्ताही तिला लागला नसावा. मग इथेच ही अशी परिस्थिती तर बाकी स्ञियांचे आयुष्य हे अजून हातोटीचे. गावकुसाबाहेर ठेवल्या जाणाऱ्या अस्पृश्यांना साधी भाकरी मिळविण्यासाठीसुध्दा "जोहार माय बाप जोहार" म्हणून भीक मागावे लागत असे. जिथे पुरुषांना शिक्षणासाठी कष्ट उपसावे लागलेत तिथे त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या स्ञियांचे तर शिक्षणाच्या महायज्ञात नामोनिशाण असणं ही अशक्य बाब होती पण याच अशक्यप्राय गोष्टीला शक्यतेचा कळस दाखविला तो त्यांच्यातल्याच एक धाडसी साविञीने. 

आज अजुनही सौम्य प्रमाणात का होईना स्ञियांना आपल्या स्व-अस्तित्वासाठी विविध समस्यांना सामोरे जात लढावे लागते. काळ बदलला माञ स्ञी ची प्रतिमा आजही समाजातील विशिष्ट घटकांच्या नजरेतून विषमच मानली जाते. त्याचा ञास त्यांना होतोच पण त्यावेळेस तो विरोध‌ ऐवढा तीव्र होता की, स्ञी ने माजघराची चौकटही ओलांडू नये. या अशाही बिकट परिस्थितीत ज्योतिरांवाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी स्वत: शिक्षणाचे धडे घेत समाजाच्या नियमांना फाट्यावर मारत मुलींना घराच्या उंबरठ्यातून मुक्त केले व लेखणीच्या बंधनात अडकवले. काय धाडस म्हणावं या धिटाईचं. म्हणूनच आज त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन तसेच महिला मुक्तीदिन म्हणून साजरी केली जाते. 

साविञीबाईंनी हे कार्य सुरु करुन आज शतकवरही उलटून गेले. शिक्षणाचा लढा यशस्वी झाला. त्याचे अफाट स्वरूप आपण सध्याच्या शाळा- महाविद्यालयात मुलींची पटसंख्या बघून प्रत्यक्षदर्शी अनुभवतोय. परंतू अजूनही मला एक प्रश्न पडतो. खरच आजची स्ञी मुक्त आहे का? संविधानाने जर तिला स्वातंञ्य दिलं असलं,  तिने तिच्या याच स्वातंञ्याच्या अभिव्यक्तीच्या जोरावर दाही दिशांत उच्चपदावर आपल्या यशाचा इंद्रधनुष्य पसरवला असला तरीही ती आज स्वतंत्र आहे का? पर्यायाने या समाजाने तिला स्वतंञता दिलीय का? रोज मला हा प्रश्न पडतो? का? 'माहित नाही'. हेच उत्तर इतके दिवस माझी मनस्थिती मला देत होती. आज माञ माझं मन मला  स्पष्ट उत्तर जरी देत नसेल तरी या प्रश्नाकडे बघण्याचा एक विचारशील दृष्टोकोन माञ माझ्यात नक्कीच निर्माण करतो. अनेक घटनांचा माझ्या मनावरचा परिणाम म्हणजे हे प्रश्न एवढं नक्की उमगलं.

 खूप गांभीर्याने विचार केला. हे जग ना, फार पुढे गेलंय पण काही रुढी, परंपरा, अनिष्ट चालीरीतींशी इतकं जखडून बसलंय ना की, आता त्याचाही श्वास कोंडतोय माञ मुक्तीची वाट दिसतच नाही. यात मुख्यत्वेकरून स्ञियांचीच जखडण होतांना दिसते. कारण आजची स्ञी म्हणजे चुल आणि मुल च्या पलिकडे गेली असली तरी चुल आणि मुल सांभाळून बाहेरचं जग आणि त्यात सांसारिक जवाबदाऱ्या हे सगळं करणार फक्त स्ञी आणि तेही एकहाती. हे विदारक असलं तरी अजूनही वास्तव आहे याचं माञ वाईट वाटतं. स्ञीसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा असला तरी अहवाल काढून बघा. ग्रामीण भागात किती प्रमाणात स्ञिया १० वी नंतर पुढे शिक्षण घेतात. घेतलं तरी कितींना घरी बसून घ्यावं लागतं आणि किती मुलींचे लग्न बस लिहिता वाचता येतं नं; झालं संपलं. शेवटी स्ञिचीच जात ती, आज ना उद्या लग्न करुन संसारच थाटणार, मग कशाला लागतया शिक्षण? या निकषावर चक्र चालतं. दुसरीकडे लग्नानंतरही स्ञियांमध्ये शिक्षणाची जाणीव जागृत होऊन त्या शिक्षण घेता आहेत ही गोष्ट या गोष्टीवर पांघरुण घालते. पण मुद्दा स्वातंञ्याचा येतो. सावित्रीबाईंनी स्ञीमुक्तीचा लढा दिला तो फक्त शिक्षणापुरता नाही तर त्या शिक्षणातून जाणीव निर्माण होऊन स्ञीला स्व-स्वातंञ्याचं महत्व उमगावं यासाठी सुध्दा. परंतू आजही माझी स्ञी स्वत:मधलं सामर्थ्य ओळखू शकली नाही ये. स्वातंञ्य म्हणजे बाहेर फिरणं नसतं तर स्वातंञ्य समान विचारात असतं. स्वातंञ्य मत मांडण्यात असतं. स्वातंञ्य कुटूंबातही असतं पण स्ञीने स्वत:ला इतकं संवेदनशील आणि दुबळं करुन ठेवलंय नं की, ती स्वतः कितीही ञासातून गेली तरी चालेल पण तिचे कुटूंब, नातेवाईक दुखावले जायला नको.

 लग्न होणं म्हणजे खरंतर नियमाच्या गराड्यात अडकनं नसतं पण आज तोच अर्थ काढला जातो. आईबापाकडून दुसऱ्यांच्या घरात ती मुलगी पाऊल टाकत असते पण इकडे रुबाब दाखविणारी पोर माञ आईबाप समोर असले तरी त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलायलाही सासू-सासरे, नवरा यांची अनुमती घेते. मी म्हणते का असं असावं. तिने तिचं व्यक्तिस्वातंत्र्य बाजूला ठेवून का हे हात पाय नसलेले नियम पाळावेत. ती काय मोलकरीण आहे की बंदिस्त गुन्हेगार? पण हा प्रश्न त्या शोषित स्ञीला पडतच नाही. मुकाट्याने एखादी शिकलेली मुलगीही सासरची मंडळी म्हणून हे नियम पाळत असते. परंपरागत चालत आलेल्या कुटूंबाच्या नियमात बसून सुनेने वागावं. यालाच खरं तर कौटूंबिक भाषेत स्वातंत्र्य म्हणतात. अजून एका वाक्याची मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते. मुलीला उत्तम स्थळ आले. मुलगा शिकलेला तर आहेच त्याचबरोबर घरी इतकी गडगंज संपत्ती आहे हे की, मुलीच्या पायाशी सुख लोळण घालेल. ही बातमी साऱ्या गावात हर्षानं सांगताना आईवडील म्हणतात, मुलाकडची मंडळी म्हटली की, आमच्याकडे तुमच्या मुलीला  घराबाहेरही पडण्याची गरज नाही. तिला सगळं हातात मिळेल. आमची  मुलगी घरात राज्य करेल. हे वाक्य म्हणतांना ते आनंदी होतात. माञ एका वडीलांचा पिता म्हणून, एक पुरुष म्हणून आणि एक स्ञी म्हणूनही या वाक्याची लाज वाटावी. जर त्या मुलीला शिकून सवरुनही फक्त गडगंज श्रीमंती आहे म्हणून  सगळी सुखं घरातच मिळणार असतील तर त्या सुखाचं मोलच काय; अडकणार ती चौकटी आतच.अपेक्षा काय फक्त मुलीनी सगळा संसार सांभाळून घ्यावा. त्याउपर शिकलेल्या मुलाला त्याच्या तोलामापाचा हुंडा द्यावा लागतो हा विषयच वेगळा. हुंडा देतांना आणि घेतांना माञ शिक्षणाच्या बदल्यात शिक्षण बघितलं जात नाही. परिणामी हा विचारही कोणाच्या डोक्यात येत नाही. मग मुलगी उच्चशिक्षित असली तरी फरक काय पडतो. यात काही नवल नाही. कारण आपल्याकडे असा दुरगामी विचार कुणी रुजवलाच नाही. कोणी रुजवायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यावर बोटच उगारले जातात. मग अगदी स्पष्टोक्तीने सांगायचं झालं तर एवढं शिकून सवरुन तुम्ही घरातच राहिला आहात आणि घरातील सगळी जवाबदारी सांभाळता आहात तर तुम्ही मोलकरीण म्हणूनच तिथे जगता आहात. मग एवढं सगळं बारा महिने अठरा काळ करून मिळतंय काय तर दोन वेळचं खायला जेवण आणि खर्चासाठी चार पैसे. त्यातही हिशोब विचारला जाणार. काय अर्थ त्या चार भिंतीला. पैसा, श्रीमंती सर्वस्व नसतं तर‌ स्व-स्वातंञ्य आणि समाधान महत्वाचं असतं माञ ज्या एका वाक्यासाठी आपल्याला आनंद मिळतो तो आनंद म्हणजे पुढे चालून आपल्यासाठी उबंरठ्यात अडकलेले पाऊल होतो. याची तसूभरही जाणीव सुरुवातीला आपल्याला होत नाही. 

विषय जवाबदारीचा नाही तर मोकळीकतेचा, विचारसरणीचा आणि लादलेल्या विषमतेतील अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा आहे. म्हणजे आजही जर कौटूंबिक पातळीवर, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर स्ञीच्या मागचा "अबला नारी" हा शिक्का अधिकच घट्ट होत असेल तर मग पुनश्च साविञीबाईंना नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. आज जेव्हा एखादा नवरा लग्न झाल्यावरही आपल्या पत्नीवर संशय ठेवून तिला एकटीने बाहेर जाण्यास, मिञमैञिणींशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करतो तेव्हा तो नियम त्याच्यासाठीही वर्ज्य असावा असं तिला वाटतही नाही. एक प्रसंग असा की, रोज नोकरीवर जाणारा नवरा आपल्या मुलांना शाळेत सोडवून रोज बाहेर जातांना घराला बाहेरुन टाळा ठोकून जातो. तोंड दाबून ती बुक्क्याचा मार सहन करते. कसलीही चुक नसतांना. काय म्हणावं अशा विकृतीला तेही २१ व्या शतकात. हे ऐकतांना जितकं वाईट वाटतं त्यापेक्षाही भयकंर हे वास्तव आहे. त्या महिलेची या गोष्टी सहन करण्याची सहनशील वृत्ती स्वत: मध्ये अंगिकारावी की तिचा खेद व्यक्त करावा. याचं उत्तर कोणीतरी द्यावं. अंगावर काटा येतो हे असं वास्तव ऐकतांना.‌ पण दुर्दैवाने या काट्याचं कुंपण तोडण्याची बुध्दी माञ त्या स्ञियांना होत नाही. कारण इतकी वर्ष त्या काट्यांचे रुतणे आणि त्यांच करुप होऊन त्यानिशी वावरणं त्यांना कधीच चुकीचंच वाटलं नाही. रीतच ती म्हणून मलम लावून आभासी स्वातंञ्याच्या पारतंञ्यात त्या हसत-हसत आयुष्य जगत आहेत. मी माञ गुरफटलेय त्यांच्याच प्रश्नात. 

सरकारी हुद्यावर खुर्चीत  बसली असती का?
फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?

हे गाणं आज जोरात वाजतंय पण या मुली ज्यांच्यामुळे शिकल्या त्यांनी सगळ्या बंधनांना झुगारुन आपली वाट घडवली. शेणाच्या गोळ्यांनी साडीवर एकेका मुलीच्या जीवन उध्दाराच्या फुलांचे नक्षी त्यांनी कोरले. दगडाचे वार पाटीवर खडूने ज्ञान गिरवून ढालीप्रमाणे झेलून परतावून लावलेत. हे सगळं त्यांनी पारतंञ्याच्या काळात केलं. 'स्व'ची जाणीव करुन घेतली. त्याही स्वार्थी झाल्या पण का? तर स्वत:ला घडवून दुसऱ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी. मग आज तर त्या मानाने सगळं सोप्पं आहे. मुख्य म्हणजे संविधानाचा आधार पाठीशी आहे. अधिकार माणसांनी, समाजाने नाही तर संविधानाने दिलेत ते सर्वांसाठी समान असूनही आज आपण स्ञी म्हणून वेगळेच नियम का पाळतो? कोणताही निर्णय घेण्याआधी सगळ्यांचीच गरज नसतांना अनुमती का घ्यावी लागते? असे प्रश्न विचारा कधीतरी स्वत:ला. आहे नं मी ही माणूस? सृष्टीची निर्माती मीच नं? मग मी का? नाही स्वत:साठी, स्वत:च्या आरोग्यासाठी थोडं स्वार्थी व्हावं. का? नाही मी कधीतरी  स्वत: सोबतच कोणालाही नं सांगता वाटेल तिथे जाऊन वेळ घालवावा? आज खरच समाजाच्या आतच्या या अक्राळविक्राळ विचारप्रवाहात अडकलेल्या लोकांना खऱ्या प्रवाहात आणण्याची गरज आहे जो साविञीबाईंनी स्ञियांसाठी वाहता केला. त्यात पडलेले बांध जेव्हा तुटतील ना तेव्हा साविञीबाईंसारख्या अनेक स्ञिया सक्षमपणे  जगाचा डोलारा पुढे नेण्यात मोकळीकतेने हातभार लावतील. 

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

 सावित्रीबाईंनी बाईंचे हे उदगार आज चौकटी आत नसलेले नियमही डोळ्यांवर झापड टाकून पाळणाऱ्या स्ञियांना व विषमतेच्या दृष्टचक्रात अडकून राहिलेल्या समाजवर्गाला तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच एक स्ञी जेव्हा संपूर्ण स्ञी जातीसाठी मागे पुढे न पाहता उभी राहिली तेव्हा तिने कुठल्याही विशिष्ट समाजासाठी नव्हे तर फक्त स्ञी जातीसाठी उभी ठाकली. विशेषतः त्यांच्यासाठी तेव्हाची ती स्ञी जात म्हणजे अजात होती. म्हणजे कुठलाही जातीभेद त्यांनी मान्यच केला नाही. म्हणून त्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका "क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले" म्हणून अजरामर झाल्या. आज प्रत्येक घरात शिक्षित सावित्री आहे ती याच साविञीमुळे. लक्षात ठेवा तुमची मुलगी ही तुमचं प्रतिरुप असते. तुम्ही तिला जे दाखवाल त्याच विचारांचा पगडा तिच्यावर असेल. त्या मातीच्या गोळ्याला स्व-स्वातंञ्याचा आकार‌ द्या तुम्हीही तसंच जगा म्हणजे तिचं‌ जगणं सोहळा असेल. मग ती स्वच्छंदी होऊन, अजात होऊन पारदर्शकरित्या हे जग बघेल. सगळं सांभाळेल‌ पण स्वत:ला नं गमावता. त्या दिवशी माञ हे विश्व कधीही मागे वळून बघणार‌ नाही कारण त्याचं सारथ्य करणारा स्ञी वर्ग आणि पुरुषवर्ग एका समान विचारधारेवर समन्वय साधणारा असणार...
 शेवटी फक्त इतकेच मनापासून सांगू इच्छिते की, साविञीबाई हे नाव फक्त आठवणीत न ठेवता स्ञी म्हणून पुनश्च विचाराने जन्म देऊन प्रत्येक स्ञीच्या आचरणातही जन्म द्यायला हवा. हेच साविञीबाईंना खरे अभिवादन ठरेल!

                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...