शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

पुरुष सत्ताक समाज???

         
               पुरुष सत्ताक समाज???

लेखाची सुरुवात कशी करु मला काही उमजेना, काट्याकुट्यातल्या  पुरुषाला  जाणणं मला काही समजेना...!
अशाच भावना असतात ना आपल्या पुरुषांविषयी. पुरुषांचं जीवन हे काट्याला समर्पक आहे. काटा नेहमीच आडवळणात वाट अडवतो, लक्ष नसलं तर‌ तो कचकन टोचतो. माञ, पुढे पाहिलं तर त्या काट्याचं टोचणं काही क्षण झोंबतं, कारण त्याने पुढच्या संकटापासून आपल्याला सावध केलेले असते. काट्याच्या रस्त्यावर काट्यांचेही फुलं करणारे हात आपल्याला अलगद रस्ता पार करवून देतात अन् स्वत: माञ‌ तो होतो काट्याकुट्यातला पुरुष आपल्याचसाठी! आजच्या जगातलं वातावरण इतकं गढूळ झालंय ना की, येथे होणारे प्रदूषित वातावरण हे मानवाच्या अविचारीपणाच्या, तर्कटी स्वभावाच्या आणि द्वैषभावनेच्या वृत्तीमुळे आहे. या प्रदूषणाने डोळे इतके अंधारले आहेत ना की, त्यामुळे नेमकं चांगलं काय अन् वाईट काय ही समजण्याची प्रवृत्तीच लोकांमध्ये उरलेली नाही. ते म्हणतात ना, गव्हासोबत किडेही रगडले जातात, तश्यातलंच हे. 

पुरुष जात म्हणजे वाईटच, पुरुष जात म्हणजे वर्चस्व आणि पुरुष जात म्हणजेच जबरदस्ती साधारण असा समजच सर्वश्रूत आहे. यामुळे त्यांना समजून घेण्याआधीच त्यांचा निकाल लावून आपण मोकळं होऊन जातो. परंतू नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत तशाच या सृष्टीचक्राच्या दोन बाजू म्हणजे स्ञी आणि पुरुष. या जगाच्या पाठीवर स्ञी आणि पुरुष असे दोन‌ मानवरुप आहेत. पुरुष ही त्यातील जमेची बाजू. सगळं सांभाळूनही अलिप्त असणारा व्यक्ती म्हणजे पुरुष. आपण सहज बोलून जातो; ती काय त्यांची जवाबदारी होती. तो घरातला कर्ता पुरुष, तो नाही सांभाळणार तर मग काय गाव लोकं येतील? बस सपलं. असे दुषणं देत पुरुषाच्या मेहनतीला जवाबदारीचं ओझं लावतो अन् साधे त्याला दोन धीराचे शब्दही देत नाहीत. 

स्ञीला जसे जन्मापासून कष्टच असतात तेच कष्ट अगदी पुरुषाच्याही मार्गात‌आहेच की, छोट्याशा वयात आईला घरातल्या कर्त्यासारखं दळणाचा डबा आणण्यापासून मदत करत तो जवाबदारीच्या संस्कारात घडतो. पुढे तोच आई बाबांचा आधार‌ ते भाऊ बनून आपल्या बहिणीचा पाठीराखा होतो. गृहस्थाश्रमात प्रवेश करतांना आपल्या कुटूंबासह आपल्या सहचारिणीच्या कुटूंबाचीही जवाबदारी स्वीकारुन त्यासाठी मेहनतीची कसोटी लावणारा तो नवरा, जावई अशा अनेक नात्यांच्या बंधनांचा हसतमुखाने स्वीकार करतो. पुरुष म्हणजे नारळासारखा टणक आणि आतून नरम असा उल्लेखला जातो. माञ यात मला पुर्णतः विरोधाभास जाणवतो. खरतर पुरुषांपेक्षा हळवं या जगात कोणीच नाही. अगदी स्ञीसुध्दा याबाबतीत मागे पडते. हे नुसतं वाक्य नाही तर ही अनेक सर्वेक्षणातून  समोर आलेली बाब आहे. तसेच आपल्यातली निरीक्षणक्षमताही आपल्याला याचा ठाव देते. फक्त फरक एवढाच की, तो आतून रडतो. तो आतून तुटतो, तोही थकतो माञ तो ते सारं काही लपवून ठेवतो आपल्या जवाबादारीच्या डोंगरापल्याड. कसा ठाव लागेल सांगा? 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्ञीशक्ती असते माञ माझ्या मते प्रत्येक स्त्रीच्या यशस्वी कारकिर्दीच्या पुढे पुरुष असतो असं म्हटंल तरी वावगं ठरणार नाही. कारण लग्नाआधी एक बाप म्हणून तो आपल्या मुलीला शिक्षणाची वाट दाखवतो. मिञ म्हणून  तो अडचणीत कामी येतो. प्रियकर बनून हट्टही पुरवितो आणि नवरा होऊन तोआयुष्यभराच्या सोबतीत पावलोपावली हातात हात घेऊन आयुष्याची सफर घडवून आणतो. थोडक्यात जी पुरुषीवृत्ती वाईट मार्गाला जावून स्ञियांच्या चारिञ्याची विटंबना करते त्याच विटबंना करणाऱ्यांचे हात काढून हातात देणाराही सत्पुरुष असतो. हे आपण विसरतोच. एक शरीराचा एक भाग निस्तेज असला तरी दुसरा तेजोमय असतोच तसंच पुरुषजातीचं. अज्ञानाच्या अंधकारात स्ञियांना शिक्षणाच्या प्रकाशात चुलीच्या धुरापलीकडेही जग दाखवलं ते पुरुषांनीच. अगदीच छञपतींच्या काळात शुरवीर रणरागिनींनी योध्दाभ्यासातून रणांगण गाजवले तेही पुरूषांमुळेच. 

पुरुष म्हणजे जळत्या निखाऱ्यावर चालणारा युग पुरुषच. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजेच खरा पुरुषार्थ. पुरूष हा या पुरुषार्थाच्या या पायऱ्यांचे पालन करत असतो. धर्म म्हणजे जात नव्हे तर कर्तव्य. बालवयात बुध्दीचे ग्रहण करणे, विद्याप्राप्तीसाठी श्रम घेणे व कुठल्या स्ञी वर वाईट नजर न टाकणे तसेच अंगात ताकद असतांनाही स्वत:वर ताबा ठेवून परिस्थिती समजून घेऊन मार्ग काढणे हा पुरुषार्थाचा परमधर्म आहे. अर्थ म्हणजे पैसा. अन्न, वस्ञ आणि निवारा या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी व कुटूंबाला सुखी ठेवण्यासाठी सरळमार्गाने अर्थार्जन करणे हे पुरुषार्थाचे दुसरे लक्षण. तसेच अर्थ म्हणजे पैसा कमावणे होत असले तरी नाती असेल विद्या असेल ते  कमावून त्यांना जपणं हे ही याच पुरुषार्थात मोडते. काम म्हणजे उत्पत्ती अर्थात निर्मिती. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या जगाचे चक्र चालू राहण्यासाठी आपल्या कुटूंबाची वंशवेल वाढविणे व त्याचे संगोपन करणे हे पुरूषाचे आद्य कर्तव्य मानले जाते. या सगळ्यांचा शेवट म्हणजे मोक्ष अर्था‌त मृत्यू. या जगाचं एकमेव सत्य म्हणजे जन्म आणि मृत्यू. स्ञीत्व आणि पुरुषत्व हे आपल्या कर्तव्याच्या परिसिमा गाठल्यानंतर मोक्षाच्या दिशेने प्रस्थान करतात. हा पुरुषार्थाचा चारचाकी रथ हाकणारा  पुरूष खरच आयुष्यभर गुरफटलेला असतो तो आपल्या कर्तव्याच्या गर्तेत. हालाकीच्या परिस्थितीतही संध्याकाळी भाकरीसाठी ज्वारी आणतो. नसतांनाही पैसे कोठून आणतो? कळत नाही पण आणतो. मुलीचं लग्न हुंडा देत दणक्यात करतो खरं पण; नंतर  पोटाला चिमटा देत कर्ज फेडतो. शेतात पिक बहरतांना पाहतो, लेकरांना आनंदात पाहतो, अन् पिक कोलमडतांना स्वत: कोलमडतो पण तरीही लेकरांचा आनंद हरवू देत नाही तेव्हा तो शेतकरी बापही पुरुषच असतो. शहरात जावून नोकरी करतो, तिथे भलेही फुटपाथवर राहतो अन् दर महिन्याला घरी खुशाली सांगत पैसे पाठवतो तेव्हा तो पुरुषच असतो. अशा असंख्य छटा पुरुषांच्या आहेत. शेवटी काय तर स्ञिया रडून मोकळं होतात. पुरुषही रडतात, त्यांच्याही भावनांचा बांध फुटतो. माञ ते गांभीर्याने परिस्थिती हाताळतात. सगळं अगदी एकेरी सांभाळून घेतात. कारण पुरुष हे एक तत्व आहे. पुरुष भरलेल्या डोळ्यांमधील अश्रू ढासळत नाही तर ते पिऊन घेत खंबीरता दाखवतो. म्हणजे काय तर त्या झालेल्या अश्रुंचे तो विष पितो आणि रोज थोडं थोडं मरत जगत असतो. जगण्यातलं हे विष तो पितो‌ म्हणूनच बाकीच्यांना अमृताचा प्याला रिचवता येतो आणि याच विषातून अमृत वेगळे करतांना तो माञ एक दिवस विषामुळे धारातीर्थी पडतो. 

हे पुरुषांचं एकूणच जगणं असतं. मानसिकदृष्ट्या, शारिरीकदृष्ट्या, बौध्दिकदृष्टीकोनातून स्ञी-पुरुषांना समान पातळीवरच संघर्ष करावा लागतो पण; पुरुषांना आपण कधी समजूनच घेतलं नाही. कर्तव्य म्हणून आणि आपला कर्ताधर्ता म्हणून पुरुषांकडे बघण्याआधी एक माणूस म्हणून त्याच्या मनात शिरा. जेव्हा तो ढासळतो पण दाखवत नाही तेव्हा समजून घेऊन कधीतरी परिस्थिती बदलेल, असा आधार द्या. मग बघा न समजणारा पुरुषही आपले अंतरंग उलगडत कर्तव्यांपलीकडे जावून जगेल. 

आज जागतिक पुरुष दिनानिमित्त समस्त पुरुषवर्गाला  पुरुषदिनाच्या शुभेच्छा. गमतीत नेहमी म्हटलं जातं, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. पण; आज म्हणेल आणि मान्यही करेल जसं आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात ना तसं तुमची खंबीर साथ आहे म्हणून आम्ही आहोत आणि म्हणूनच या विश्वात झालेले सर्व बदल आहेत. पुरुषातल्या खेळकर मुलाला, मुलातल्या भावाला, मिञाला, प्रियकराला, नवऱ्याला अन् नवऱ्यातल्या बापाला व बापातल्या आजोबाला शतश्: नमन........!

        🖋️🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️🖋️

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...