गुरुवार, ७ जुलै, २०२२

☔⛈️मन पाऊस पाऊस झाले...☔⛈️


          ☔⛈️मन पाऊस पाऊस झाले...☔⛈️

हा पाऊस मजला हरवून जातो पहिल्या वहिल्या भेटी
कोसळणाऱ्या धारांमधुनी जुळती शतजन्माच्या गाठी

मन पाऊस पाऊस झाले
मन तरंग पाण्यावरी न्हाले

माहित नाही काय ती जादू...पण पाऊस आणि माझं कनेक्शन काही वेगळंच भासतं मला. प्रत्येक पावसाची माझ्यासोबतची गाठभेट म्हणजे एक न्यारीच तऱ्हा.. रिमझिम पावसाने सुरुवात झालेल्या सरी मग हलकेच माझ्या मनालाही पावसाकडे चुंबकासारखं खेचतात... मीही ओढावले जाते नकळतच त्या बरसबरस बरसाणाऱ्या कोसळत्या पावसाच्या रागात. हळूच एक पाऊल टाकताच पहिल्या थेंबाच्या स्पर्शानेच जरा शहारायला होतं...माहित नाही का? पण तोही त्याच्या मुक्त बरसण्यातून माझ्याशी नुसताच बडबडत असतो. मीही एकून घेते. अलगद त्या थंड्यागार वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन पावसाच्या रागात मग्न होण्यासाठी सरसावते. आणि मनाच्या पटलावर उमटणाऱ्या रेखाटनात गुंग होतांना सभोवतालचा परिसर माञ माझ्यासाठी घुसर व्हायला लागतो. 
मग त्या पावसाच्या सरीत  बेधुंद बरसणारा धारांचा पाऊस आणि एकटीच मी....!
शांत तो एकांत, सोबतीला खुला आसमंत,
 निवांत क्षण आणि  आजूबाजूची निसर्गाची हिरवळ. त्यातच येणारा पावसाचा धाड धाड आवाज, 
डोलणाऱ्या  झाडांचा आपलाच एक हर्षोल्लास आणि त्या मनाच्या वलयात  निर्माण झालेल्या एकांताच्या रस्त्यात चेहऱ्यावर ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांनी शहाळलेली मी.......
बस्स! एक संवाद सुरू होतो...ना कोणाला समजणाऱ्या, ना कोणाला उमजणाऱ्या माझ्या मनाच्या हिरवळीत तो पाऊस स्थिरावतो. अनेक आठवणींच्या सरीत स्वत:लाच चिंब भिजवून घेतो. 
मनही माझेच आणि तो पाऊसही माझाच...

 उलट प्रश्नांची मग भरते जरा सभा. माझ्याच प्रश्नाची उत्तरे सापडण्यासाठी तो पाऊस राहतो तटस्थ उभा. प्रेम, मैञी माया, जीव, आयुष्य या सगळ्याच एकञित भावनांची माझ्यातलीच जाणीव मला करुन देण्यासाठी तोच पाऊस येतो. प्रत्येक वेळी येतो तेव्हा जरा वेगळा भासतो. मी माञ गुंतत जाते त्याच्या एक-एक थेंबात. हरवून घेते स्वत:ला त्याच्याच आवाजात...ना काळ न वेळेचे भान. असं वाटतं बस चिंब भिजावं आणि तसेच हात पसरवून गुज करावं माझ्या हक्काच्या पावसासोबत...
आभाळात कडाडणाऱ्या चमकदार विजांसोबत
अन् पावसाच्या प्रेमातून हिरवळ चढलेल्या त्या हिरवीशाल‌ पांघरलेल्या, नव्या नवरीचे रुप दाखवणाऱ्या लाजऱ्या बोजऱ्या निसर्गासोबत. या एकांतातल्याच संवादातून मग नकळत माझी कविता होते. अनेक पुसट  प्रश्नांच्या स्पष्ट दिसणाऱ्या उत्तरातून माझ्यातील नव्या भावनांची मलाच जाणीव व्हायला लागते. मग काय बरोबर, काय चूक या कसल्यास गोष्टींची तेव्हा तमा नसते. शेवटी मनच ते सैरावैरा पळणारे त्या पावसाच्या सोबतीने शांत होते. या सगळ्याच जाणिवेतून चेहऱ्यावर स्मितहास्य खुलते, मी माझ्यातच गुंग  होऊन माझी मलाच खुळी भासते. कवितेच्या ओळी मग झरझर येतात अन् पाऊस शमण्याच्या आत त्या पावसाचाच कागद होऊन ती  कविता चिंब भिजते. पावसाळा येतो, पावसाळा जातो पण मी माञ जेव्हा भिजते तेव्हा त्या पावसात शहारते. अंगावर आलेल्या काट्यांतून मनाच्या घट्ट कोपऱ्यात जावून सामावते. हे कधीतरीच होतं जेव्हा तो पाऊस बरसतो अन् त्या पावसात मी त्याची होऊन एकांतात मनाचा कोपरा शोधते. 
तो पाऊस थांबतो पण मी माञ तिथेच असते काही क्षण त्यातच अडकलेली. 
पावसाचे थेंब ओसरतांना माझ्याच मनाला सावरतांना..
तो भास आभासांचा खेळ खेळत सावरते त्या पावसातूंन अन् निघते मग त्या वाटेवरून एका कवितेचं देणं घेऊन... एक अलौकिक जाणिवेचं देणं...........
        
                            ‌‌🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...