काल मी आणि माझी मैञिण रसिका रोजच्या वळणापेक्षा थोडी आडवाट काढून विद्यापीठाकडे पानचक्की रस्त्याने जात होतो. घाटी पासून पानचक्कीचा रस्ता हा खरच आडवाटेसारखा चाळण झालेला आहे. मग काय, गाडीसोबत आम्हीही उड्या मारत मारत त्या रस्त्यावरुन जात होतो. रसिकाच्या भाषेत ये चल गं तु एडवेंचर्स राईडची मजा घेत जाऊयात. मुळातच आम्ही पञकारितेच्या विद्यार्थिनी असल्याकारणाने बोलणार तरी दुसरं काय नं, आपोआपच आमच्या विचारांची देवाणघेवाण पञकाराच्याच नजरेतनं सुरु होते.
ऐतिहासिक दरवाज्यांच्या शहरातील तो मोडकळीस आलेला त्यातला एक वारसा दिसला. अत्यंत संथ गतीने त्याचे पुनरुज्जीवन सुरू तर झाले आहे ,परंतू इतिहासाची ती पाऊलखुण नव्या रंगात येईल माञ, तो आतापर्यत जागा असणारा इतिहास पुढेही जागा राहील का ? हा प्रश्न आमच्या चर्चेचा पहिला भाग. सहजच ती म्हणते अगं तु पानचक्की बघितली आहेस का? म्हटलं नाही गं. एकलंय माञ भरपूर. आणि तिने चल तुला पानचक्की दाखवते म्हणत गाडीला ब्रेक लावला. आमचा दोघींचा संवाद ऐकून टिकीट घराचे काकाही आम्हाला दरवाज्याबद्दल माहिती सांगायला लागले. पोरींनो, हा दरवाजा मलिक अंबरच्या काकाच्या नावाने बांधला गेला. त्याकाळी चुना आणि त्यात समाविष्ट केलेल्या वेगवेगळ्या मिश्रणाच्या लगद्यातून हा दरवाजा उभा राहिला. म्हणून इतक्या वर्षांचे ऊन-पावसाळे त्याने सहज झेलले. मोठ्या प्रवेशद्वारातून आत जात मलिक अंबरची नहर असा उदघोष करत रसिकाने मला त्या जागेची ओळख करुन दिली.
पण पण पण...बोलता बोलताच त्या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास ऐकत नहरच्या पानचक्कीच्या बाजूला पोहोचलो आणि त्याच इतिहासाला काळीमा फासत डाग लावणाऱ्या माझ्याच मनुष्यप्राण्याची मला भंयकंर चिड आली. रसिकाचा कॅमेरा सुरु झाला आणि अत्यंत गोड शब्दात तिने तिथले वास्तव दर्शन दाखवत औरंगाबादकरांनाच एक आरसा दाखवला. दृश्य असे की, भल्यामोठ्या त्या पाण्याच्या जलसाठ्यात, जो जलसाठाच त्या पानचक्कीचे मुळ आहे त्यातच तुम्ही प्लास्टीकच्या बॉटल्स, काहीही खाल्लेला कचरा टाकता आहात? जमतं तरी कसं? ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, शहराची स्मार्ट सिटी करण्यासाठी, ५२ दरवाज्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी बेसुमार पैसा खर्च होत आहे. आंदोलनं ही चालले आहेत. त्यात जर एखादा वारसा अजूनही समृध्द असेल तर त्यालाही पुनरुज्जीवनाच्या रांगेत उभं करणं यात कुठलं तथ्य आलं. त्यातील माशांना खाऊ घालण्याच्या तुमच्या आकर्षणापोटी त्या जीवांचा जीव कोदंट होत आहे. प्लास्टीकच्या तुकड्यातून कित्येक मासे मृत होऊ शकतात. एवढी साधी समज आपल्यात नसण्याइतपत मंद तर आपण नक्कीच नाही.
आज जागतिक पर्यावरण दिन आणि आदल्या दिवशी ही पानचक्कीची मनाला कुनकुन लावणारी भेट. खरच अशाने पर्यावरण जपलं जाईल का ?हा प्रश्न सकाळी उठल्या उठल्या कित्येकांचे स्टेटस बघून पडला आणि माझी लेखणी सरसावली ती, हा कल्लोळ शब्दबध्द करायला. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या सोबतच माणसाने पर्यावरणाशी पर्यावरणासम वागणे हा मुलमंञ आचरणात आणणेच पर्यावरण अबाधित राखण्याची गुरुकिल्ली आहे. असो....माझं मन तर लिहून हलकं झालं माञ ऐतिहासिक स्थळी केलेल्या कचऱ्यातून केव्हा प्रकाश पडेल याची शाश्वती माञ आता देणंच अवघड झालंय. आपण बघायला जाणाऱ्या ठिकाणीच कचरा करुन ती जागा सुशोभित करणे हे ज्यांना पटतंय त्यांनी एकदा परत त्या ठिकाणी जावून स्वत:चं आत्मचिंतन करावं...!
त्यातून जर काही चांगलं घडणार असेल तर. जगाला ओरडून सांगायला विसरु नका.
बाकीच्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे अखंड जीवसृष्टीचा ऱ्हास एवढंच काय ते डोक्यात घ्या. तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल.
रसिकासोबतची पानचक्कीची पहिली भेट माझ्यासाठी कचराभेट ठरली. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा कचरा बाजूला झालेला असेल या आशेत....
🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️