रविवार, २४ मे, २०२०

उंडणगावचा बालाजी उत्सव

हरे व्यंकटेशा किती चालविशी, 
तुझे पाय पद्म कधी दाखविशी| 
तुझ्या भेटीची आस मोठी जिवाला, 
कधी भेटशी व्यंकटेशा दयाळा||


लक्ष्मी रमन गोविंदा, बालासाहेब की जय!

सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा विनाश आणि धर्माची स्थापना या ञिसुञीवर परमेश्वराने निरनिराळे अवतार घेतल्याचा उल्लेख भगवतगीतेत आढळतो. त्याचेच एक प्रतिक म्हणजे श्री बालाजी अवतार.

 औरंगाबाद जिल्हा, सिल्लोड तालुक्यात वसलेले, अख़्या पंचक्रोशीत नावलौकिक असणारे, सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव म्हणजेच उंडणगाव...

जिथे खऱ्या अर्थाने हिंदु संस्कृतीचे साक्षात दर्शन घडते. 36पगड जातींचा समाज म्हणजेच 12 बलुतेदार व 18 अलुतेदार गुण्यागोविंदाने इथे आपला व्यवसाय करत नांदतो. तसेच काळानुसार पाऊल टाकत जुन्या काळाच्या परंपरेनुसार, पिढीजात संस्कृतीचे जतन कसे करावे हे शिकविणारे उत्तम विद्यापीठ म्हणजेच उंडणगाव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 
उंडणगावचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र बालाजी देवस्थान, सृष्टीचे पालनहार श्री विष्णु यांचे दुसरे रूप म्हणजे बालाजी हे अतिशय जागृत देवस्थान आहे. दरवर्षी मे महिन्यात वैशाख वद्य नवमीपासुन ते जेष्ठ शुद्ध नवमी या कालावधीत बालाजी उत्सव साजरा केला जातो. उत्सव ही संकल्पना खरतर खुप दृढ आहे पण माझ्या मतानुसार सोप्या भाषेत उत्सव म्हणजे, ज्या विधात्याने ही अजात आणि अफाट सृष्टी निर्माण केली, ज्याने  मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त करून दिला त्याच दैवी शक्तीचा एकञ येवुन केलेला जागर.  तसेच आजच्या परिस्थित़ीनुसार दुरावलेल्या नात्यांना भेटुन दिलेला उजाळा व त्यासाठीच देवाला व्यक्त केलेली कृतज्ञता. अख्या पंचक्रोशीत प्रसिध्द असणाऱ्या बालाजीच्या उत्सवासाठी दुर-दुरून भाविक येतात.  

ध्वजारोहनाने सुरू होणारा हा उत्सव 15 दिवस चालतो. पहिल्या दिवशी राञी श्रींची पालखी निघते. सुवासिनी औक्षण करतात, श्रीची मूर्ती देवळातून पालखीला काढताना कोणी रुमालाच्या तर कोणी पदर टाकुन पायघड्या घालतात. त्याच पायघडावरून बालाजीची सुंदर मुर्ती पालखीसाठी नेतात. तो आशिर्वादाचा रूमाल आपल्याजवळ ठेवला की सर्व काही छान होतं असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. बाहेर ठेवलेल्या लाकडाच्या सुंदर सजवलेल्या पालखीत बालाजी विराजमान होतात. मग मंदिराचे पुजारी वैभव मोदी हे सर्वप्रथम कानगी करतात म्हणजेच बालाजीला यथाशक्ती दक्षिणा देवुन प्रसादरूपी श्रीफळ (नारळ) त्यांना  बालाजीच्या पायी लावुन लक्ष्मी रमन गोविंदा, बालासाहेब  की जय! अश्या जयघोषात देतात. नंतर सर्वच भक्तगण कानगी करतात. मग पालखी मंदिरातुन निघते, सर्वच पुरूषमंडळी पालखीला खांदा देतात व महिला घरोघरी  सडा, रांगोळी ने व  सुवासिनीच्या हाताने औक्षण करून पालखीचे स्वागत केले जाते. कुठे दिवट्या उजळवुन पालखीचे स्वागत करतात. मिरवणुकीत भजन, पावली, खेळतात. या सर्व गजरात पालखी सर्वगावातुन मिरवत़ देवळात येते व मंदिराच्या द्वारामध्येच देव 15 दिवस विराजमान होतात.
प्रार्थना, स्तोत्रे, मंत्रोच्चार, आरत्या, अष्टके, भजने यांनी वातावरणात प्रसन्नता निर्माण होते व सनई चौघड्याच्या आवाजाने आसमंत दणाणून जातो.

या उत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे गावातील लेकबाळी आपल्या माहेरी एकवेळ दिवाळीत येणार नाहीत पण बालाजी उत्सवात माञ येणारच येणार!  म्हणून उत्सवाची चाहुल लागताच आईवडीलांचे डोळे लागतात ते आपल्या लेकीच्या वाटेकडे आणि विशेष म्हणजे उत्सव काळात एकदा आलं की मग 15 दिवस  गावातील लेकीसुनांना गावची वेश ओलांडता येत नाही. सासरी जायची काळजी नाही, ती मनसोक्त 15 दिवस माहेरपण जगुन घेते, मैञीणींना भेटते, कोडकौतुक करून घेते. येथील अजुन एक प्रथा म्हणजे इथे उत्सवकाळात कोणत्याही घरी ओलंचिलं, लोणची, मंगल कार्य होत नाही तसेच कोणत्याच घराला कुलूप लागत नाही. अजुनही जुने वृद्ध लोक व गावातील काही समुह उत्सव सुरू झाल्यानंतर भाजीला फोडणी घालत नाही तसेच गावात कोणाच्याच घरी तळण होत नाही. दररोज महाप्रसाद असतो, मोठमोठ्या पंगतीचे आयेजन केले जाते, ज्यांना अन्नदान करायचे आहे त्यांची नावे नोंदवून घेऊन त्यांना प्रसादाची तारीख दिली जाते मंदिराचा अलौकिक महिमा एवढा आहे की, नाव नोंदवल्यानंतर 8-10 वर्षांनी पंगतीत अन्नदान करायचा नंबर लागतो. 

बालाजीचा मुख्य प्रसाद म्हणजेच साखरभात. अहो काय त्या साखरभाताची चव, जिभेवर नुसती रेंगाळतच असते आणि त्याच बरोबर वरणभात, पोळी, आंबटवरण अन् माझी काय सर्वांचीच आवडती गोष्ट म्हणजे पंगतीतली तर्रीदार वांग्याची भाजी! नुसतं लिहितेय तरी तोंडाला पाणी सुटलंय, मन अगदी तृप्त होते... पंगतीवर पंगती उठतात पण परंतु बालाजीच्या कृपेने कधीच अन्न कमी पडत नाही. अन्नाला बरकत एवढी असते की, कोणीच उपाशी रहात नाही. 'आला गेला पई पाहुणा ' अशी आमंञण देण्याची मुळी पद्धतच इथे रोवली गेलीय. साधारणत:  दुपारी 3 ला पहिली पंगत वाजंञीच्या मधुर वाद्यात बसते. बर पंगतीची वेळ  अशी आहे की, एकदा मंदिरातुन पोटभर जेवुन आलं की मग काय संध्याकाळी जेवायचच काम नाही. घरात स्वयंपाकाची काळजी नसते. मग काय एकीकडे बायांचा गप्पांचा फड रंगतो तर दुसरीकडे गल्लीत आलेले पाहुणे मुलं व इथले मुलं यांची दोस्ती होते ती गावाकडच्या पारंपारिक खेळांशी. ते त्यात अगदी रमुन जातात कारण शहरात त्यांना हे सर्व अनुभवायला मिळतच नाही. गम्मत अशी की 1-2 दिवसानंतर गावातले कोणते न शहरातले कोणते हेच ओळखता येत नाही याप्रकारे ते मातीच्या सुवासात हरखुन जातात. नातवंड, नातेवाईक यांच्या आदरातिथ्यात गावची मंडळी रमुन जातात, कोणाची दर्शनाला जाण्याची गडबड चालते तर कोणाची दुसरीच काही लगबग असते. लळीत व बाकी सर्वदिवस वगळता एकादशीला बालाजीला राजगिऱ्याच्या खीरीचा नैवेद्य असतो. मंदिराच्या मुदपाकखान्यात ही खीर तयार करतात. नित्यनियमाने पुजाविधी पार पडल्यानंतर ही खीर वाटप होते. गावातील लहान मुलं, खीरीच्या प्रसादासाठी भांडे घेवुन मंदिरात येतात. येवढ्या गर्दीतुन मिळविलेली खीर खरच एवढी स्वादिष्ट असते की, ती चव तुमच्या अंतरआत्म्याला स्पर्शून जाते. या सर्वांची एक न्यारीच गम्मत. बालाजीच्या 15 दिवशीय सेवाकाळात रोज संध्याकाळी 7 वाजता मंदिरात हरीपाठ असतो. त्या हरिपाठात अगदी लहानापासून मोठ्यांपर्यतचा सर्वच वयाेगट सहभागी होतो. एक रांग महिला व मुलींची तर समोर दुसरी रांग मुंले व पुरूषांची. त्यांच्या प्रत्येकाच्या हातात टाळ (झांज) असते. त्याच टाळ मृदुंगाच्या गजरात मग ते ठेका धरत पाऊली टाकतात. तो प्रसंग विलोभणीय असतो. हरिपाठातुन मनोरंजन व मनोरंजनातुन जीवनाचा सार अगदी सोप्या पद्धतीने कळतो. हीच शैली मला फार भावते. आताच्या पिढीला तर हरिपाठ म्हणजेच काय हे उमजत नाही याचे माञ मला काहीसे वाईट वाटते. जस जसा हरिपाठ पुढे सरकतो तस तसा वातावरणाला सप्तसुरांचा रंग चढत जातो, अगदी लहान मुलगासुध्दा अतिशय धारदार आवाजात हरिपाठ म्हणतो. जेव्हा पारंपारिक फुगडी घातली जाते तेव्हातर अक्षरशः सर्वांच्या डोळ्यासमोर रोमांच उभा राहतो. काय ती गिरकी असते अन् किती प्रकार फुगडीचे दिसतात व्वा! 

दररोज रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सर्वातच दिवस कसे सरतात ते कळतच नाही आणि उगवतो तो महाप्रसादाचा व ताटिका, सितास्वयंवराचा दिवस. या दिवशी गावभंडारा असतो. आजुबाजुच्या खेड्यांवरचे तसेच गावात आलेले पाहुणे व गावकरी मंडळी अश्या सर्वासाठीच गावभंडारा असतो. ज्यांना 14 दिवस एकदाही प्रसाद लाभला नाही ते तर याचा आस्वाद घेतातच... सर्वजण मिळुन मिसळुन स्वयंपाक करतात. शाळेच्या मैदानावर या पंगती उठतात. प्रत्येकानेच आपले ताट, वाटी, तांब्या घरून आणावा असा नियम आहे. यामुळे कचरा होत नाही. फक्त ज्यांना शक्य नाही, जे दुरवरून आलेय त्याच्यासाठी वेगळी सोय करतात, कुणीही उपाशी जाता कामा नये याची आवर्जुन काळजी घेतली जाते. राञी मंदिरात सिता स्वयंवर व ताटिका असते.  गावातील काही मुलं ते सोंग अगदी उत्तमरित्या वठवतात. ते बघण्यासाठी गर्दी उसळते.  पंचक्रोशीत प्रसिध्द असलेले किर्तनकार  साठे महाराज हे या कार्यक्रमाचे संगीतमय वाद्यात संचलन करतात. आधी वनमाळी नाचत येतो. वनमाळी म्हणजे निसर्गाचा मिञ. तो प्रार्थना करतो की यंदा खुप पाऊस पडु दे रे देवा.. धनधान्य भरू दे.. वगैरे वगैरे. तो जातो अन्  गणपती बाप्पाला संगीतमय वातावरणात नाचत घेऊन येतो व गणपतीला ही आपली कृपा या सृष्टीवर राहु द्या अशी विनवणी करतात. मग श्रीराम व रावण यांच्यातील धनुष्यबाण उचलण्याचा प्रसंग सादर होतो व त्यात श्रीराम विजयी होतात. लगेच ताटिकारूपी राक्षसाशी राम युद्ध करतात. ताटिकेचा वेश धारण केलेली व्यक्ती काळ्या पोषाखात असते व तोंडाला पण काळाच मुखवटा असतो हातात पेटवलेल्या मशाल घेवुन ती मंदिरात प्रवेश करत आधी बालाजीला वंदन करते व नंतर राम व तिचा समग्राम होतो रामाच्या हातात तलवार असते. या दोन मिनिटाच्या दृश्यानंतर ताटिका निघुन जाते व सियाराम विवाहसोहळा पार पडतो. विनोदी उखाणा घेत तेच रामसिता हास्यकल्लोळ करतात व हा मनोरंजनात्मक पण ऐतिहासिक सोहळा पार पडतो. 

आणि शेवटचा दिवस उजाडतो तो उत्साह आणि भावभावनांचा  खेळ दाखवणाऱ्या लळिताचा. या दिवशी माञ उंडणगावला याञेचे स्वरूप प्राप्त होते. जे पंधरा दिवसात येवु शकत नाही ते लळिताला नक्कीच येतात. मंदिराला अजुनही प्रकाशझोतात आणले जाते. स्वयंसेवक व मंदिर समिती हिरीरीने सर्वदुर चोख व्यवस्था ठेवतात. कुठेही कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते. मग उत्साहपुर्ण वातावरणात मंदिरात लळिताला प्रारंभ होतो. गंगाळ म्हणजेच साखरभाताचा नैवेद्य घेऊन नवदांपत्य जोडपी पुजेला बसतात. नवीन लग्न झाले की गंगाळ आवर्जुन करावे असे इथे मानतात. या दिवशी गावात अगदी जनसागर उसळतो. मोठ्याच मोठ्या  दर्शनाच्या रांगा, 1 ते 5 वर्षापर्यतच्या बालकांना पाळण्यात टाकण्याची गर्दी असं काय काय चालु असतं. पाळण्याची परंपरा खुप जुनी आहे. मंदिरात समाेरच्या भागात लाकडी जुन्या पद्धतीचा पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात बालकांना टाकलं की त्यांना बालाजीचा आशिर्वाद मिळतो. तो पाळणा झुलवण्याचा मान हा प्रभु शास्ञी यांचा होता. ते  अतिशय विद्वान तसेच आयुर्वेदिक डॉक्टर होते. अतिशय उत्कृष्टरित्या ते भागवत कथन करा़यचे पण काही वर्षांपुर्वीच त्यांना देवाज्ञा झाली. आता मंदिरच ते बघते गोड पाळणाही म्हटला जातो. 12 वाजता श्रींची आरती होते व गंगाळाचा प्रसाद तिथे उपस्थितांना दिला जातो. नंतर बालकांना पाळण्यात ठेवण्याचा कार्यक्रम होतो तसेच मंदिरातर्फे बुंदीचा प्रसाद प्रत्येक भाविकांना दिला जातो. बालाजी म्हटलं की अजुन एक प्रसाद आठवतो तो म्हणजे शेरण्यांचा. शेरणी म्हणजे गोड साखरफुटाने असतात, काही डाळ्यांचे तर काही मुरमुऱ्य़ांचे. खुपच मस्त असते. वर्षातुन एकदा फक्त बालाजी उत्सवात शेरणी मिळते. प्रत्येक भाविक शेरणीचा प्रसाद मंदिराबाहेरील दुकानातुन घेवुन मध्ये जातात. मंदिरात देवाजवळ प्रत्येकालाच कुंकवाचे टिळे लावले जातात. 15 दिवसांनंतर घरोघरी  आलेल्या पाहुण्यांसाठी आंब्याचा रस, पुर्णाची पोळी, कुर्डळ्या पापड, रश्शी असा घाट असतो. अशा या लळिताने उत्सवाची राञी गर्दी ओसरल्यावर दही हंडी फोडुन काल्याच्या प्रसादाने सांगता होते. मंदिराचे पुजारी आरती करतात व देव उठवुन परत नेहमीच्या गाभाऱ्यात बसवतात. त्या दिवशी देवाला अंबोऱ्याच्या पोळीचा नैवेद्य असतो. नंतर त्या पोळीचा तुकडा तिथे उपस्थितांना दिला जातो. ती पोळी धांन्याच्या कोठारात ठेवली की घरात कधीच धांन्याची कमी भासत नाही. धान्याला बरकत येते. अश्याप्रकारे उत्सव संपन्न होतो. व सर्व पाहुण्याची पुढच्या वर्षी येण्याच्या सांगोव्याने आनंदअश्रुंनी पाठवण होते व गाव पुन्हा आपल़्या दिनचर्येत व्यस्त होते. 

असा हा वार्षिक उत्सव दरवर्षी नवीन ऊर्जा देतो परंतु 2020 हे वर्ष मात्र अपवादात्मक निघालं. कोरोना महामारीचा परिणाम बालाजी उत्सवावर सुद्धा पडला. जुन्या काळानुसार फक्त 5 दिवसीय उत्सवाची लळिताने सांगता झाली, सर्व काही विधिवत पद्धतीने नियमानुसार यथोचित पार पडले. माञ कोणालाही मंदिरात प्रवेश नव्हता. पालखीही काढण्यात आली नाही. लळिताचा सोहळा घरबसल्या भाविकांनी live द्वारे मंदिराने दिलेल्या संकेतस्थळावर बघितला व तिथुनच बालाजीला प्रार्थना  केली. मागच्या सर्वच आठवणींना उजाळा देत घरीच राहुन बालाजी उत्सव साजरा केला. मी खुप नशीबवान आहे कारण रांगोळीरूपी सेवा माझ्याहातुन करवून घेऊन बालाजीने मला कृतकृत्य केले, देवा अशीच सेवा माझ्याहातुन दरवर्षी करून घेऊन मला कृतकृत्य कर हीच प्रार्थना🙏🏻 
लक्ष्मी रमन गोविंदा, बालासाहेब की जय...!

🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳

      🇮🇳🇮🇳विकासाच्या वाटेवर चालतांना🇮🇳🇮🇳 आपण आज अशा स्वातंञ्याच्या बलाढ्य रणांगणात आहोत, ज्याने १५० वर्षांच्या सत्तासंघर...